नंदिनी घाई घाईने घरी आली तेव्हा घराबाहेर असलेल्या चपला पाहून तिला ती गोंधळली. आता पाऊण तासापूर्वी बाहेर पडली तेव्हा घरी फक्त सासूबाई होत्या. घरी कोणी पाहुणे सुद्धा येणार नव्हते. ती लगेच आत गेली तेव्हा पाहते तर शेजारचे सात आठ लोक घरी जमले होते. त्यांच्या जवळ उभा असलेला नितीन रागारागाने तिच्याकडे पाहत होता. काय घडतंय हे तिला काहीच कळत नव्हते. इतक्यात तिची जाऊ तिच्या सासूबाईंच्या खोलीतून बाहेर आली आणि नंदिनी कडे पाहून म्हणाली.
” काय बाईसाहेब, कुठे गेल्या होत्या फिरायला ? ते सुद्धा ऐन दुपारच्या वेळी ? घरी सासूबाईंना एकट्या सोडून ?”
नंदिनीची मोठी जाऊ तिच्या नवऱ्यासोबत बाजूच्याच कॉलनी मध्ये राहायची. नंदिनी आणि नितीन चे लग्न झाल्यावर उगाच काहीतरी कारण काढून ती वेगळं राहायला गेली होती. अधून मधून घरी यायची पण नंदिनीशी नीट बोलायची नाही. आज नंदिनीने फोन उचलला नाही म्हणून मग नितीनने सुप्रिया वहिनीला कॉल करून बोलावून घेतले होते.
” काय झालंय ताई…तुम्ही अशा का बोलताय ? काही घडलंय का ?” नंदिनीने साशंकतेने विचारले.
” तुझ्या सारखी निष्काळजी बाई असल्यावर जे होणार तेच झालंय…” नितिन तिच्यावर आरोप करत म्हणाला.
” म्हणजे…मला काही कळत नाहीये…” नंदिनी ने जरा घाबरतच विचारले.
” अगं सासूबाई पाय घसरुन पडल्यात…डोकं जिन्याला लागलंय त्यामुळे दुखापत झाली आहे त्यांना… आताच दवाखान्यातून डोक्याला पट्टी करून आणली आहे…भाऊजी तुला फोन करत होते तर फोन पण उचलत नव्हतीस…तेवढं बरंय की फ्रॅक्चर नाही झालं आईंच्या पायाला…किती ग निष्काळजी तू…” सुप्रिया म्हणाली.
” बरं कुठे गेली होतीस तू आईला एकटं सोडून…अशी घेणार आहेस का तू आईची काळजी…” नितीनने संतापाने विचारले.
” मला ताईने बोलवलं होतं…त्यांना बरं वाटत नव्हतं…येताना फोन पण त्यांच्याकडेच विसरले…अर्ध्या रस्त्यात आल्यावर लक्षात आलं माझ्या…” नंदिनी हळू आवाजात म्हणाली. तिच्या बोलण्यात काहीशी अपराधीपणाची भावना सुद्धा होती.
” त्यांना सांभाळायला त्यांच्या घरचे नाहीत का…त्यांच्यासाठी माझ्या आईकडे दुर्लक्ष करणार आहेस का तू…” नितीनचा आवाज आता मोठा झाला होता.
” नाहीतर काय भाऊजी… अहो मी असताना आईला कधी काही झालंय का…किती काळजी घेतली मी त्यांची…आणि तुमची बायको बघा…चार महिने झालेत फक्त लग्नाला…आणि आतापासून ही अशी वागत आहे… पुढे काय होणार काय माहीत…?” सुप्रियाने आगीत तेल ओतायचे काम केले.
” की तुला लग्ना आधीच समजावून सांगितले होते की माझ्या आईची काळजी घ्यायची म्हणून…तेव्हा तर म्हणाली होतीस की स्वतःची आई समजून काळजी घेईल तिची…” नितीन रागाने म्हणाला.
” छोट्या छोट्या गोष्टीत एवढे दुर्लक्ष करते ही तर बाकीची जबाबदारी कशी पार पाडत असेल…” सुप्रिया म्हणाली.
” माझ्या आईला जर काही झाले असते तर मी तुला आयुष्यात कधीच माफ केले नसते…” नितीन म्हणाला.
” हो ना भाऊजी…मला तर आश्चर्य वाटतंय की कुणी इतकं गैर जबाबदार कसं असू शकतं..? मला तर आता सासूबाईंची काळजी वाटायला लागली आहे…” सुप्रिया म्हणाली.
इतक्यात आतल्या खोलीत आराम करत असणाऱ्या सासूबाई ह्यांचे बोलणे ऐकुन त्यांना रहवल्या गेले नाही म्हणून बाहेर आल्या. त्यांना पाहून नंदिनी लगेच त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली.
” आई, काय झालंय तुम्हाला…हे डोक्याला काय लागलंय…”
तिला डोळ्यांनीच शांत राहण्याचा इशारा करून सासूबाई सुप्रिया कडे पाहत म्हणाल्या.
” बरोबर बोलत आहेस सुप्रिया तू…नंदिनी इतकी बेजबाबदार असताना तुला माझी काळजी वाटणे स्वाभाविक आहे…पण ह्यावर एक उपाय आहे माझ्याकडे…” सासूबाई म्हणाल्या.
” कोणता उपाय आहे आई ?” सुप्रियाने चमकून विचारले. तिला वाटले की सासूबाई नंदिनी ला चांगली शिक्षा देणार आता. सासूबाई पुढे काय करतात ह्याची तिला उत्सुकता लागली होती.
” मी ठरवलंय की मी आता माझा मोठ्या सुनेच्या घरी जाऊन राहणार…म्हणजे तुझ्याकडे…” सासूबाई म्हणाल्या.
आता मात्र सुप्रियाचे धाबे दणाणले. तिला वाटले की नंदिनी वर बेजबाबदार असण्याचा आळ आणून ती मजेत दोघा नवरा बायकोच्या भांडणाची माझा घेईल. पण करायला गेले एक आणि झाले भलतेच असे तिला होऊन गेले.
नितीन मात्र आता आणखी रागाने नंदिनी कडे पाहायला लागला. नंदिनी खाली मान घालून उभी राहिली. सुप्रिया पुढे म्हणाली.
” आई..एवढा पण टोकाचा निर्णय घेणे बरे नाही…नंदिनीची चूक आपण माफ करून तिला एखादी संधी द्यायला हवी…”
” नाही…माझं ठरलंय आता…मला नाही द्यायची तिला संधी…” सासूबाई म्हणाल्या.
” अहो सासूबाई…मला सवय राहिली नाही आता एवढ्या कामांची…शिवाय घर सुद्धा दोनच बेडरूम चे आहे…तुम्ही कुठे राहणार ना…तुम्हाला कठीण जाईल ऍडजस्ट करायला…” सुप्रिया म्हणाली.
” बस…एवढीच काळजी होती सासूची..?” सासूबाईंनी प्रश्न केला.
” तस नाही आई…” सुप्रिया पुढे काही बोलू शकली नाही.
” आणि तुझं काय रे नितीन…ती जर काही अर्जंट कामानिमित्ताने बाहेर गेली तर काय फरक पडतो… मी काय लहान मुल आहे का एकटं न सोडायला…चार महिन्यापूर्वी तुझ्या लग्नाआधी तर अनेकदा रात्री उशिरा घरी यायचास…उशिरा पर्यंत मित्रांमध्ये बसून रहायचास तेव्हा तुला आई घरी एकटी असल्याची जाणीव व्हायची का ?” सासूबाईंनी नितीनला विचारले.
आईच्या प्रश्नावर नितीन ओशाळला. मग स्वतःची बाजू सावरत म्हणाला.
” माझी गोष्ट वेगळी आहे आई…पण नंदिनी या घरची सून आहे…तुला सोडून स्वतःच्या ताईकडे जायची तिला काही गरज नव्हती…”
” का नाही जाऊ शकत…लग्न झालंय म्हणजे माहेरच्यांशी संबंध तुटले असा होत नाही…आणि तुझ्या माहिती साठी सांगते की ती तिच्या ताईकडे नाही तर तुझ्याताई कडे गेली होती…तुझा निशा ताईचा मला फोन आलेला की तिला बरं वाटत नाही, दवाखान्यात जायचंय…तुझे दाजी बाहेरगावी गेली होती…म्हणून मीच सुप्रियाला तिच्यासोबत म्हणून पाठवले होते…”
आता मात्र नितीन आणि सुप्रिया पार खजील झाले होते. नितीन तर नंदिनीकडे पाहू सुद्धा शकत नव्हता. तो तसाच ओशाळल्या नजरेने खाली पाहत गप्प उभा राहिला. सासूबाई पुढे म्हणाल्या.
” चालताना जरा पाय घसरला आणि डोकं जिन्यावर आपटलं…हयात कोणाची काय चूक… नंदिनी घरी असती तरीपण असे घडले नसते ह्याची काय शाश्वती…त्यामुळे यापुढे कोणाला काही बोलण्या आधी जरा परिस्थिती बद्दल माहिती घेत जा…”
मग स्वतःचे बोलणे आठवून नितीनला स्वतःचीच लाज वाटली. एवढ्या दिवसात नंदिनी ने तक्रार करायला एक संधी सिद्ध दिली नव्हती. तरीपण तिला अस चुकीचं ठरवून सगळ्यांसमोर तिच्यावर बेजबाबदार असल्याचा आळ आणत तिला नको ते बोलल्याचा त्याला पश्चात्ताप होत होता. तो नंदिनी जवळ जाऊन म्हणाला.
” मला माफ कर नंदिनी…मी चुकलो…मी तुला असं बोलायला नको होतं… आईला लागलेलं बघून मला खूप राग आला होता…पण यानंतर मी तुला असं कधीच बोलणार नाही…”
” तुम्ही माझी माफी नका मागू…मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं आईंच्या काळजीपोटीच बोललात…” नंदिनी म्हणाली.
” बघितलंस तुझी बायको किती समजदार आहे ते…पुन्हा कधी दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून नंदिनीला असे वाईट बोललेले किंवा तिच्याशी वाईट वागलेले मी सहन करून घेणार नाही…” सासूबाई सुप्रिया कडे पाहत बोलल्या.
” ह्या नंतर माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही आई…” नितीन नंदिनी कडे पाहत म्हणाला.
एवढा वेळ घाबरून असलेली नंदिनी आता सासूबाईंकडे समाधानाने आणि कौतुकाने पाहत होती. आज तिला सासूबाईंच्या रुपात प्रेमळ आई मिळाली होती. सुप्रिया मात्र हे सगळं ऐकून
तिथून मान खाली घालून आपल्या घरी निघून गेली.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.