” अहो…बाहेर कुणीतरी आलंय तुम्हाला भेटायला…” बायकोने राजेशला आवाज दिला.
मोबाईल मध्ये मघापासून डोकं खुपसून बसलेला राजेश थोड्या त्रासिक आवाजात म्हणाला.
” त्यांना दोन मिनिटे बाहेर थांबायला सांग…मी आलोच…”
एवढे बोलून राजेश पुन्हा मोबाईल मध्ये डोकावला. पाच मिनिटे झाल्यावर पुन्हा राजश्रीने त्याला आवाज दिला.
आता मात्र त्याने मोबाईल बाजूला ठेवला. रविवारी सुद्धा स्वस्थ बसू देत नाहीत असे पुटपुटत बाहेर कोण आलंय ते पाहायला गेला.
बाहेर एक साधारण तीस वर्षांचा माणूस गेट समोर हात बांधून खाली मान घालून ह्याची वाट पाहत उभा होता. त्याच्या वेशभूषे वरून तो गरीब घरचा असून काहीतरी काम मागायला किंवा पैसे मागायला आला असावा असा राजेशचा समज झाला.
” आमच्याकडे काही काम नाहीय सध्या…तुम्ही कुठेतरी दुसरीकडे काम शोधा…” राजेश म्हणाला आणि आत निघून जायला लागला.
” थांबा साहेब…मी तुमच्याकडे काम शोधायला नाही आलो आहे…मला तुमच्याशी दुसरं काम होतं…” तो म्हणाला.
” काय काम होतं…?” राजेश ने विचारले.
” साहेब…मी सदा…सदानंद कोकाटे…मी तुमच्या जुन्या घराजवळ राहतो…मी असं ऐकलय की तुम्ही ते घर विकणार आहात…” तो म्हणाला.
” हो…विकायचं तर आहे…” राजेश म्हणाला.
” साहेब…मला ते घर विकत घ्यायचं आहे…तुम्ही कितीपर्यंत विकणार आहात ते घर…” तो म्हणाला.
” हे बघ…घर जुनं आहे…खूप लहान आहे…शिवाय ते मुख्य शहरात येत पण नाही…शहराच्या थोडं बाहेर आहे…म्हणून जास्त नाही पण सहा लखांना विकेल ते घर…तुला जमत असेल तर बघ…” राजेश म्हणाला.
” साहेब…काही कमी नाही होणार का…?” सदा ने विचारले.
” नाही…काहीच कमी होणार नाहीत…तुला जमत असेल तर सांग…नाहीतर मी शोधेन दुसरा कुणीतरी…” राजेश बेफिकिरी ने म्हणाला.
” तसं नाही साहेब…जमेल मला…फक्त काही दिवस मुदत द्या…” सदा म्हणाला.
” ठीक आहे… तुझं काय ते मला नक्की सांग..मग आपण सौदा पक्का करू…मग पाहू…” राजेश म्हणाला.
” साहेब… माझं नक्की आहे…मला ते घर घ्यायचं आहे…मी सोबत इसाराची रक्कम सुद्धा घेऊन आलो आहे…आणि उरलेली रक्कम दोन महिन्यात देईल.. “
एवढे बोलून राजेशने त्याच्या जवळ असलेल्या थैलीतून एक पाकीट काढले आणि त्यात असलेले एकवीस हजार राजेशला दिले.
इतक्या लवकर घराचा व्यवहार होईल ह्याची कल्पना नसलेल्या राजेशला सदाकडून इसार घेताना नवल वाटले. कारण त्याचे घर जुने होते. शहराच्या बाहेर तीन खोल्यांचे जुने कौलारू घर. त्यात मागच्या आठ वर्षांपासून बंद. राजेश फक्त वर्षातून एकदा जुन्या घराकडे फिरकायचा.
नुसतं बंद होतं म्हणून राजेशने ते घर विकायचा निर्णय घेतला होता. तसे दोन चार ग्राहक आलेले होते पण भाव पाडून घर मागायचे. म्हणून राजेशने अजुन सौदा पक्का केला नव्हता. त्याला पाच लाख एवढी रक्कम अपेक्षित होती. पण सदा इतक्या लवकर त्याने सांगितलेल्या रकमेवर हो म्हणेल असे त्याला अजिबात वाटले नव्हते. पण त्याला फक्त घराचा व्यवहार झाल्याचा आनंद झाला होता.
पुढे सदा ने दोन महिन्यात सहा लाख इतकी रक्कम जमा केली आणि घराची खरेदी लवकर करण्याची विनंती केली. राजेशने सुद्धा या साठी होकार दिला. आणि लवकरच नोंदणी पूर्ण करून घर राजेशच्या नावावरून सदाच्या नावावर झाले.
पुढे काही दिवसांनी राजेशला योगायोगाने त्याच घराकडे एक काम होतं. काम संपल्यावर राजेशला वाटले की एकदा जुन्या घराकडे जाऊन बघावं सदानंदने घरात काय नवीन बदल केलाय.
ती त्याच्या जुन्या घराकडे आला. घराकडे पाहून त्याला नवल वाटले. सदानंदने घर खरंच खूप चांगल्या पद्धतीने सजवले होते. मेन गेट समोर छान टिन शेड उभारले होते. घरासमोरील जागेत छान बाग तयार केली होती. घराच्या आजूबाजूला खूप स्वच्छता केली होती. घराला सुंदर रंग दिला होता. एका वर्षापूर्वी कोणी या घराला बघितलं असतं तर आता हे तेच घर आहे ह्यावर कुणाचा विश्वास बसला नसता.
राजेश घराच्या दिशेने समोर जाणार इतक्यात त्याने बघितले की कुणीतरी वृद्ध स्त्री एका लहान मुलाचं बोट पकडून घराबाहेर येत होती. त्या स्त्रीला पाहताच त्याला मोठा धक्का बसला. कारण ती त्याची आई होती. सोबत हात धरून चाललेला मुलगा सदाचा मुलगा होता. त्यांच्या मागेच सदाची बायको सुद्धा चहा घेऊन बाहेर ओसरीवर आली.
तिघेही जण हसतखेळत एकमेकांशी गप्पा मारत होते. त्याची आई खूप खुश होती. तीच आई जीला त्याने चार वर्षांपूर्वी एका वृद्धाश्रमात ठेवले होते. सुरुवातीला कधीतरी मध्ये जाऊन तो आईची विचारपूस करायचा मात्र मागच्या दोन वर्षात त्याने आईची साधी चौकशी सुद्धा केली नव्हती. आईला असे अचानक जुन्या घरी पाहून तो हादरलाच.
त्याला आठवले. ह्याच घरी तो लहानाचा मोठा झाला होता. ह्याच तीन रूमच्या खोल्यांमध्ये त्याचे लहानपण गेले होते. त्याच्या आईवडिलांचा ती एकुलता एक मुलगा होता. राजेशच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. म्हणून एकाच मुलाला चांगलं शिकवून मोठं करायचं म्हणून राजेश झाल्यावर त्यांनी दुसऱ्या मुलाचा विचार केला नाही.
त्यांनी राजेशला चांगल्यातली चांगली गोष्ट दिली. स्वतःला कधी काही घेतले नाही पण राजेशला कशाचीच कमी भासू दिली नाही. त्याला चांगलं शिक्षण दिलं. राजेशला मात्र आईवडिल त्याच्यासाठी जे करायचे ते त्यांचं कर्तव्यच वाटायचं. पुढे राजेश चांगला शिकला. चांगल्या नोकरीवर लागला. आईवडिलांच जणू स्वप्नच पूर्ण झालं होतं.
पण हे सुख पाहायला राजेशचे वडील जास्त दिवस जिवंत राहिले नाहीत. एके दिवशी हार्ट अटॅकने ते हे जग सोडून गेले. राजेशच्या आईला ते गेल्याचे खूप दुःख झाले पण राजेशकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरले आणि पुढील आयुष्य मुलाच्या सहवासात, त्याच्या सुखासाठी जगायचे ठरवले.
राजेशने त्याच्या पगारातून चांगले नवीन घर खरेदी केले. हे जुने घर त्याला त्याच्या स्टेटस ला न शोभणारे वाटत होते. राजेशच्या आईची मात्र हे घर सोडायची अजिबात इच्छा नव्हती. कारण हे घर त्यांच्या सुखदुःखाचे सोबती होते. ह्या घरात राजेशच्या वडिलांच्या आठवणी होत्या.
मात्र राजेशच्या हट्टापुढे त्यांचे काहीच चालले नाही. शेवटी त्या सुद्धा राजेश सोबत त्यांच्या नवीन घरात राहायला आल्या. पण जुन्या घराची आठवण मात्र त्यांना कायम यायची. नवीन घरात आल्यावर त्यांना खूप एकाकी वाटायचे.
कारण राजेश रात्री उशिरापर्यंत त्याच्या ऑफिसमध्येच राहायचा. आणि शेजाऱ्यांशी बोलायचे म्हटल्यास त्यांच्याशी फारशी ओळख झालेली नव्हती. आणि घरात काम करायला आलेल्या मोलकरणीसोबत गप्पा मारलेल्या राजेशला चालायच्या नाहीत.
पुढे राजेशने त्याच्याच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या राजश्रीशी लग्न केले. नवीन सून घरात आली. राजेशच्या आईला वाटले की आपले एकाकीपण सुनेच्या येण्याने काहीशे कमी होईल. पण तसे काहीच झाले नाही. राजश्री आपल्या ऑफिस च्या कामात आणि नंतर तिच्या मित्र मैत्रिणी आणि पार्ट्यांमध्ये रमायची. पुढे राजेश सुद्धा आईशी फक्त कामापुरतेच बोलायला लागला.
क्रमशः
मला आई हवी – भाग २ (अंतिम भाग )