मीरा…माझी सर्वात चांगली मैत्रीण. अगदी जिवाभावाची.शांत, सुस्वभावी, अभ्यासात हुशार, साधी राहणी. नाकी डोळी नीटस.माझ्या सुख दुःखात नेहमी माझ्या सोबत राहणारी.
माझं लग्न झाल्यावर 2-3 महिन्यात तीच सुद्धा लग्न ठरलं. तिने मला मुलाचा फोटो पाठवला. मुलगा तसा ठीक होता. नोकरी वर पर्मनंट होणार होता म्हणे. शिक्षण पण चांगलं होत. पण का कुणास ठाऊक मला तो मुलगा फारसा ठीक वाटला नाही. मी तिला तस बोलून देखील दाखवलं.
पण तिच्या घरच्यांना आणि पर्यायाने तिला देखील मुलगा पसंत आला. मुला कडच्यांनी ५ लाख इतका हुंडा मागितला. ३ लाखांवर नक्की झालं. आणि मीराच लग्न पार पडलं. तिच्या लग्नानंतर तिची अन माझी बरेच दिवस भेट नव्हती. फोन वर बोलणं व्हायचं. पण तेही खूप कमी. आम्ही दोघीही आपापल्या संसारात गुंतलो होतो…
जवळपास वर्षभरानंतर दिवाळी मध्ये माहेरी जायचा योग आला आणि मीराची व माझी भेट झाली. मला बघितल्यावर मिरा ने मला मिठीच मारली…आणि एकदम तिला रडू आले. नेमक काय झालं ते मला कळलंच नाही. मी तिला शांत केले अन् तिला रडण्याचे कारण विचारले. तर तिने सांगायला सुरुवात केली.
तिचा नवरा बाहेरगावी नोकरी करायचा. सुरुवातीला काही दिवस मीरा सासरी राहिली. काही दिवसांनी तिचा नवरा तिला पण सोबत नेणार होता. पण तो तिला न्यायचं नाव घेईना. तिच्याशी फोनवर सुद्धा खूप कमी बोलायचा. शेवटी घरच्यांनी त्याच्यावर खूप दबाव टाकला तेव्हा तो तिला सोबत घेऊन गेला.
पण तिथेही तो तिच्याशी तुटक वागायचा. मनमोकळेपणाने बोलत नव्हता. तिला हवं नको ते विचारत नव्हता. तिला खर्च करायला म्हणून एक साधा पैसाही त्याने दिला नव्हता. इतकंच काय तर एका वर्षात एक साडी देखील दिली नव्हती. त्याच्या वागण्याचं तिला वाईट वाटत असे पण हळूहळू सर्व ठीक होईल या आशेवर ती दिवस काढत होती.
तिच्या वडिलांनी तब्येत ठीक नव्हती म्हणून तिने घरीसुद्धा काहीच सांगितले नाही. सर्वकाही मनात ठेवून ती निमूटपणे सहन करत होती. आज ना उद्या सर्व ठीक होईल अशी तिला आशा होती. पण चांगलं असं काहीच घडत नव्हतं. तिचा नवरा सतत तिच्यावर रागवायचा. सतत काहीतरी कारण काढून भांडण करायचा…
एके दिवशी तिने सहज म्हणून तिच्या नवऱ्याच्या नकळत त्याचा मोबाईल बघितला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या नवऱ्याचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांचे मेसेजेस बघून तिला सर्वकाही कळले. तिचा नवरा आत आला नि त्याचा फोन तिच्या हातात पाहून त्याला सर्व कळून चुकले. मीरा ने त्याला जाब विचारला तेव्हा त्याने उलट तिच्या अंगावर हात घातला. आणि तेव्हापासून तो आणखी जास्त भांडायला लागला. तिला मारायला देखील लागला.
मीराच्या आयुष्यात हे सर्व होत असताना अचानक तिच्या बाबांना हार्ट अटॅक आला. त्यामुळे तिने घरी यातले काहीच सांगितले नाही. ती तिच्या बाबांना पाहायला माहेरी गेली तेव्हा तिचा नवरा साधा घरात तिच्या बाबांना पाहायला देखील आला नाही. मीरा काही दिवस तिच्या माहेरीच राहणार होती. मीराचा उदास चेहरा बघून तिच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली…तरीदेखील मीराने आईला काहीच सांगितले नाही.
मीरा च्या नवऱ्याने तिला एकदाही कॉल केला नाही. तिच्या आईला आता खात्री पटली होती की त्यांच्यात काहीतरी बिनसलंय. तिच्या आईने तिला स्वतःची शपथ देऊन विचारले तेव्हा मीरा ने सर्वकाही सांगून टाकले. मीरा च्या आईला खूप दुःख झाले. इकडे नवऱ्याची तब्येत आणि मुलीची अशी अवस्था यामुळे ती अगदी हतबल झाली. तरीदेखील त्यांनी आशा सोडली नाही. तिने जावयाला समजावयाचे ठरविले. तिने जावयाला फोन करून थोड्या सौम्य शब्दात समजावून सांगितले. जावयाने देखील हो ला हो असे उत्तर दिले.
आठ दिवस माहेरी राहून मीरा परत घरी गेली…इथून तिच्या दुःखाची परत सुरुवात झाली. तिने तिच्या आईला सांगितलं म्हणून त्याला खूप राग आला होता. त्याने तिला मारायला सुरुवात केली. आता तर तो घरात किराणा देखील आणत नसे. थोडफार जे काही असे ते मीरा करून खाई. तो तर सारखा बाहेर खायचा.
मीरा च्या वडिलांची तब्येत चांगली झाली तेव्हा तिच्या आईने त्यांच्या कानावर सगळी गोष्ट घातली. ते तडक मीरा ला भेटायला आले. मीरा ला पाहिल्यावर त्यांना कळले की तिचे खूप हाल सुरू आहेत. ते तिला घरी घेऊन आले . मात्र तिच्या नवऱ्याने तिला साधा एक फोन देखील केला नाही. आणि सरळ घटस्फोटाची मागणी केली…
मागच्या एका वर्षात मीरा सोबत एवढं सगळं घडलं होत. मला ऐकून खूप वाईट वाटले. मीराच्या आईने मला तिची समजूत काढायला सांगितली. मी देखील तिला समजावून सांगितले. जे काही झालं ते विसरून परत अभ्यासाला लागायचा सल्ला देखील दिला. पण तिच्यासाठी हे सगळं तितकं सोप्प नव्हतं. तरीही तिने तिच्या आईवडिलांकडे पाहून परत अभ्यास करायला सुरुवात केली.
तिच्या वडिलांनी तिला शहरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पाठविले. मीराने देखील तिच्या आईवडिलांच्या विश्वासाला सार्थ ठरवत दुसऱ्याच परीक्षेत यश खेचून आणले. ती वनविभागात नोकरीला लागली. तिच्या आयुष्याचं सोनं झालं होत. अन् तिच्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज. आज मीरा स्वतःच्या पायावर उभी आहे. आज ती आत्मविश्वासाने भरलेली आहे. याच श्रेय जात तिच्या आईवडिलांना. ज्यांनी तिला आहे त्या परिस्थितीत सहन करायला सांगितले नाही तर परिस्थितीशी दोन हात करून आपलं आयुष्य समृद्ध करायला शिकविले…
( सत्यघटनेवर आधारित )
लेखिका- आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार pixel free image
तुम्ही मला इथेही फॉलो करू शकता. 👇