राधिकाचा मुलगा श्लोक थोडा मोठा झाल्यावर मात्र तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. प्रायव्हेट नोकरी मिळाली सुद्धा. पगार कमी होता पण काम चांगले होते. राधिका आता आर्थिक रित्या सक्षम होत होती. तिच्या पैशातून घराला हातभारच लावत असल्याने तिच्या सासूने ही तिच्या नोकरी करण्याला विरोध केला नाही. आणि राधिकाच्या नवऱ्याला सुद्धा चांगला पगार होता. शिवाय सासरेबुवांची पेंशन सुद्धा यायची दर महिन्याला. चांगला स्वतःचा टू बी एच के फ्लॅट सुद्धा होता. तिच्या घरी काहीच कमी नव्हते.
पण तिच्या माहेरची परिस्थिती मात्र फारशी काही बदलली नव्हती. तिचे बाबा आणि भाऊ मिळून भरपूर मेहनत करायचे आणि जे काही पिकेल त्यात गुजराण करायचे. आता तिच्या भावाचे सुद्धा लग्न झाले होते. वहिनी सुद्धा घरच्या शेतीत कष्ट घ्यायची.
पण एके दिवशी त्यांचे नशीब पालटले आणि कळले की त्यांची शेती एका धरण प्रकल्पात जाणार आहे. शेतीचा चांगला भरघोस मोबदला सुद्धा मिळणार होता. एवढ्या पैशातून पुन्हा पाच एकर शेती घेता येणार होती आणि बराच पैसा शिल्लक सुद्धा राहणार होता. दीपकने आनंदाने ही गोष्ट राधिकाला सांगितली आणि राधिकाने तिच्या नवऱ्याला.
पण तिच्या नवऱ्याच्या मनात मात्र यामुळे वेगळेच विचार आले. त्याला वाटले की ह्या पैशातून अर्धा वाटा राधिकाने मागितला तर त्यांना द्यावाच लागेल कारण जितका मुलांचा अधिकार असतो तितकाच मुलींचा सुद्धा अधिकार असतोच. म्हणून इतक्या दिवसांपासून राधिकाचा नवरा आणि सासू तिच्याशी इतक्या गोडी गुलाबी ने वागत होते. राधिका ला आता सगळे कळून चुकले होते.
दोन दिवसांनी रक्षाबंधन होते. नेहमी तिचा भाऊ तिच्या घरी यायचा रक्षाबंधन साठी. पण यावेळी मात्र सुजितने त्याला फोन करून कळवले होते की यावळेला तो आणि राधिकाच श्लोक ला घेऊन गावी येत आहेत. तिच्या माहेरच्यांना खूप आनंद झाला होता. मुलगी आणि जावई येणार म्हणून नेमकं काय करू आणि काय नको असे त्यांना झाले होते.
सुजितने मात्र रस्त्यानेच राधिकाला समजावून सांगितले होते की आज काहीही करून घरच्यांसमोर वाटणीचा विषय काढायचा म्हणून. राधिका आज वेगळ्याच धर्मसंकटात सापडली होती. राधिका आणि सुजय जेव्हा तिच्या घरी पोहचले तेव्हा सगळ्यांनीच उत्साहात त्यांचे स्वागत केले. श्लोकचा तर सगळेच खूप लाड करत होते. पण राधिका मात्र अजूनही खूप टेन्शन मध्ये होती.
तिच्या आईने आणि वहिनीने आज सगळं स्वयंपाक तिच्या आणि सुजितच्या आवडीचा केला होता. पण राधिकाला मात्र या सगळ्याचा पुरेपूर आनंद सुद्धा घेता आला नव्हता. गावी जुन्या घराशेजारीच नव्या घराचे ही बांधकाम सुरू केले होते. तिचा भाऊ आणि वहिनी खूप उत्साहाने त्यांना नवीन घर दाखवत होते.
नंतर राधिकाने दीपकला राखी बांधली. आणि दीपकने ओवाळणी म्हणून राधिकाच्या हातात एक बॉक्स ठेवला. राधिका ने तो बॉक्स उघडला आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. आतमध्ये सुंदर सोन्याचा नेकलेस ठेवलेला होता. निदान दोन तोळ्यांचा तरी असेल. तिने तिच्या दादाला विचारले.
” दादा…हे काय…इतका महाग नेकलेस…इतका खर्च कशाला केलास…?” राधिका म्हणाली.
” तुझ्या लग्नात तुला भरपूर दागिने करावेत अशी खूप इच्छा होती बाबांची आणि माझी…पण परिस्थिती फारशी चांगली नसल्याने जे होतं त्यातच समाधान मानले तू…कधी कशाचा हट्ट नाही की काहीच नाही…म्हणून म्हटलं या रक्षा बंधनाला आपल्या बहिणीला साधं गिफ्ट द्यायचं नाही…तुला आवडले ना…?” दादा म्हणाला.
” नाही दादा… तू दिलेलं साधं गिफ्ट सुद्धा माझ्या साठी लाख मोलाचं आहे…कारण तू आजवर चांगल्यात चांगल मला दिलेस…तू नेहमी तुझ्या आधी माझा विचार करत आलास…माझ्यावर नेहमी प्रेम केलंस…तेच माझ्यासाठी खूप काही आहे…तू माझा एवढा विचार करतोस ह्यातच सगळं आलं…” राधिका म्हणाली.
” अगं पण हा तुझा अधिकार आहे… भावाजवळ तू हक्काने काहीही मागू शकतेस…तू या घराची मुलगी आणि माझी बहिण म्हणून हा तुझा हक्क आहे…आणि तू तुझ्या भावाजवळ कधीही काहीही मागू शकतेस…” दादा म्हणाला.
” तर मग मला तुझ्याकडून एक अनमोल गिफ्ट हवे आहे…” राधिका म्हणाली.
” माग ना…काहीही मग…” दादा म्हणाला.
सुजय मनातून आनंदला…त्याला वाटले राधिका आता तिच्या भावा जवळ वाटणीचा विषय काढणार आहे…तो आतुरतेने भावा बहिणींचे बोलणे ऐकत होता. इतक्यात राधिका पुढे म्हणाली.
” माझ्यावर सतत मायेची पाखरण करणारे हे माहेर आयुष्यभर असेच राहू दे…तू नेहमीच तुझ्या लहान बहिणीला एवढीच माया दे…हे माझं हक्काचं माहेर नेहमीच माझ्यासाठी खुलं राहू दे…आणखी मला काहीही नको…” राधिका म्हणाली.
” हे नेहमी असेच राहील…आणि आपल्या दोघा बहीण भावांचे प्रेमसुद्धा…अगदी आपण जक्खड म्हातारे झाली तरी सुद्धा…” तिचा भाऊ हसून म्हणाला.
आणि राधिकाने तिच्या दादाला मिठी मारली. वहिनी दोघा भाऊ बहिणीला कौतुकाने पाहत होती. आईने दोघा बहीण भावाची दुरूनच दृष्ट काढली. सुजित मात्र रधिकावर चिडला. त्याला वाटले की राधिका ने वाटणी मागायची चांगली संधी गमावली म्हणून.
त्यानंतर सर्वांच्या गोष्टी सुरू होत्या मात्र सुजित रागात होता. तो काही फारसा बोलला नाही. त्यानंतर राधिका आणि सुजितची घरी जाण्याची तयारी सुरू झाली. सुजित मात्र अजूनही आशेवर होता की राधिका आता विषय काढेलच. पण राधिका मात्र काहीच बोलली नाही. त्यानंतर सगळ्यांनी दोघांनाही आनंदाने निरोप दीला.
गाडीत बसल्यावर सुजित तिला म्हणाला.
” मूर्ख आहेस का ग तू…तुझा भाऊ तुला इतक्या आश्वासक पणे म्हणत होता की तुला काय पाहिजे ते सांग…पण तू मात्र काही बोलली नाहीस…सरळ सरळ तुझ्या हिश्याचे पैसे का नाहीत मागितले…?”
” कारण त्या पैशांवर माझा काहीच हक्क नाही…” राधिका शांततेने म्हणाली.
” पण त्या पैशांवर तुझा पण हक्क आहे ना मुलगी म्हणून…?” सुजित म्हणाला.
” नाही…त्या पैशांवर फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांचा आणि दादांचा हक्क आहे…मी आजवर काय केलंय आई बाबांसाठी…बाबा आजारी होते तेव्हा त्यांना काही दिवस स्वतःच्या घरी सुद्धा ठेवू शकले नाही मी कारण तुम्ही नाही म्हटले होते…त्यांना तसेच आजारपणात गावाहून दर दोन दिवसांनी इथे दवाखान्यात यावे लागत असे…
मी त्यांच्याबद्दल जे माझे कर्तव्य होते ते निभावू शकले नाही तर त्यांच्या पैशांवर वाटा कसा सांगणार…हे मला जमणार नाही…माझ्या बाबांनी आणि दादा ने मला कधी कशाचीच कमी पडू दिली नाही…आजवर इतक्या हलाखीच्या परिस्थितीत राहिले आणि आता जेव्हा त्यांना थोडं फार सुख मिळत असेल तर मी त्यांच्याकडून ते सुख काढून घेणार नाही…
मी मागितलं तर ते मला अर्धा वाटा नक्कीच देतील पण हे मलाच योग्य वाटत नाही…कारण आजवर मी माझ्या आई बाबांसाठी काहीच करू शकले नाही…आणि पुढे सुद्धा काहीच करू शकणार नाही हे मला माहिती आहे…म्हणून माझा त्या पैशांवर सुद्धा काहीच हक्क नाही…आणि आपल्याकडे कशाची कमी सुद्धा नाहीय…
आणि तरीही तुम्हाला असे वाटत असेल की मी बाबांना माझा हिस्सा मागावा तर भविष्यात कधी गरज पडल्यास माझ्या आई बाबांना आपल्याकडे ठेवावे लागले किंवा आपल्याला त्यांचा सांभाळ करावा लागला तर तुम्ही मागे हटणार नाही ह्याची ग्वाही द्या…अन् तुम्ही त्यांची जबाबदारी स्वीकारू शकतं नसाल तर मला हिस्सा मागायला सांगू नका…” राधिका म्हणाली.
यावर मात्र सुजित गप्प बसला. राधिकाचे वडील आजारी असताना आपण त्यांना आपल्या घरी ठेवून घेण्यास नकार दिला होता हे त्याला आठवले होते. राधिका अगदी योग्यच बोलत आहे हे सुद्धा त्याला कळून चुकले होते. तो मनातून वरमला. आणि मुकाट्याने गाडी चालवू लागला. राधिकाच्या मनावरचे ओझे मात्र आज उतरल्यासारखे वाटत होते.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
कथा आवडल्यास माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.