लक्ष्मीला उठायला आज थोडा उशीर झाला होता. तिची सासू उठली तरीही लक्ष्मी झोपलेलीच होती. हे पाहून तिच्या सासूचा पारा चढला. त्या हॉल मधून लक्ष्मीच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत होत्या. सकाळी सकाळी देवाचे नामस्मरण करण्याच्या वयात त्या अगदी खालच्या थराला जाऊन शिव्या देत होत्या.
त्यांच्या आवाजाने लक्ष्मीची झोप उडाली. अजूनही तिचं डोकं ठणकत होतं. तिची पाठ दुखत होती. तरीही ती अंथरुणातून उठण्याचा प्रयत्न करू लागली. जसा तिने जमिनीवर पाय ठेवला तशीच एक वेदनेची तीव्र सनक तिच्या पायामधून तिच्या डोक्यात गेली. ती तशीच कशीबशी लंगडत बाथरूम मध्ये गेली. तिच्या अंगात ताप भरलेला होता. पण तरीही तिने अंघोळ केली. आणि कशीबशी तयार होऊन रूमच्या बाहेर गेली.
तिला पाहताच तिच्या सासूबाईंच्या तोंडाचा पट्टा पुन्हा सुरू झाला.
” आल्या का महाराणी…ही काय वेळ झालीय का उठायची… झोपाच काढायच्या होत्या तर लग्न कशाला केलं…राहायचं ना माहेरी झोपा काढत…तिथं पण कशी राहणार म्हणा…तुझ्या बापाची ऐपत तरी आहे का तुला खाऊ घालायची…स्वतःच्या डोक्यावरचं ओझं काढून आम्हाला दिलं… असं काय माहिती होतं की अशी अवदसा येईल घरात…कामाची ना धामाची…नुसतं खायला जमतं तुला…लग्नाला पाच वर्ष झालीत…अजुन कुस उजवली नाही मेलीची…”
हे ऐकुन लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी आले. ते तिने बोटाच्या कडेने अलगद टिपले. इतक्यात तिची सासूबाई म्हणाली…
” आता इथे उभी का आहेस…जा तुझे सासरे अन मी केव्हापासून चहाची वाट बघतोय…पटापट हात चालव…”
लक्ष्मी लगेच कामाला लागली. तिच्या वेदनांना विसरून. कारण या असल्या वेदनांची सवय झाली होती तिला. शरीरावर असणाऱ्या जखमा आणि मनावर झालेल्या जखमांची देखील.
लक्ष्मी फक्त नावापुरतीच लक्ष्मी होती. पण खऱ्या आयुष्यात तिला मात्र तिची जागा एका मोलकरीण पेक्षा जास्त नव्हती. तिच्या माहेरी ती धरून चार बहिणी होत्या. चार बहिणींच्या पाठीवर तिचा भाऊ जन्माला आला होता. त्यामुळे त्याचे कोडकौतुक करण्यात तिच्या आईवडिलांचा पूर्ण वेळ जात असे. या चार बहिणीकडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष होते. लक्ष्मीचा भाऊ मात्र बहिणींना खूप माया लावायचा. पण तो वयाने लहान असल्यामुळे तो बहिणींसाठी काहीच करू शकला नाही. फक्त डोक्यावरचा भार कमी करायचा म्हणून तिच्या वडिलांनी अठरा वर्षांच्या होताच चारही बहिणींची लग्न उरकून टाकली.
लक्ष्मी तिसऱ्या नंबरची बहीण होती. तिच्या बाकी बहिणींच्या मानाने तिला खूप श्रीमंत सासर मिळाले होते. पण फक्त पैशाने श्रीमंत. मनाने तर फार दरिद्री होते. घरातल्या सूनेकडे त्यांनी कधी घरची लक्ष्मी म्हणून पहिलेच नाही.
तिचा नवरा राकेश तर एक नंबरचा बिघडलेला मुलगा होता. घरची श्रीमंती आणि त्याच्या आईवडिलांचे त्याला पाठीशी घालने यामुळे आणखीनच सोकावला होता. आणि अवघ्या पंचक्रोशीत त्याचे कारनामे माहिती होते. त्यामुळे त्याला लग्नासाठी मुलगीच मिळत नव्हती.
लक्ष्मी साठी राकेशचे स्थळ गेले तेव्हा लक्ष्मीच्या वडिलांनी फारशी चौकशी न करता लक्ष्मीचे लग्न त्याच्याशी लावून दिले. आणि पाठवणीच्या वेळी दिल्या घरी सुखी रहा आणि आता तेच तुझं घर आहे. ह्या घराशी आता तुझा काहीही संबंध नाही असा प्रेमळ इशारा देखील दिला.
तेव्हापासून लक्ष्मीने कधीच आईवडिलांकडे कुठली तक्रार केली नाही. लग्न झाल्यावर तिचा नवरा साधारण महिनाभर चांगला वागला. त्यानंतर त्याचे खरे रंग लक्ष्मी ला दिसायला लागले.
राकेश रोज रात्री उशिरा घरी यायचा आणि ते ही दारूच्या नशेत झिंगत. कधी लक्ष्मी सोबत दोन प्रेमाचे शब्द बोलायचा नाही. लक्ष्मीच्या सासूबाई सुद्धा नेहमी त्याला पाठीशी घालायच्या. लक्ष्मी त्या घरामध्ये फक्त एक मोलकरीण बनून राहिली होती.
एकदा लक्ष्मीने मोठ्या हिंमतीने तिच्या नवऱ्याला सांगितले की घरी लवकर येत जा. तेव्हा त्याने तिला खूप मारले. त्यानंतर जेव्हा त्याच्या मनात येईल तेव्हा तो तिला मारायला लागला. तो त्यांच्या रूम मधील टी व्ही चा आवाज वाढवून द्यायचा आणि आतमध्ये लक्ष्मीला मारायचा जेणेकरून तिचा आवाज बाहेर जायला नको. लक्ष्मीच्या रूम मधून टीव्ही चा आवाज मोठा झाला की लक्ष्मीच्या सासुबाईला समजून जायचं की राकेश लक्ष्मीला मारतोय. पण त्यांनी कधीच राकेशला आवरायचा प्रयत्न केला नाही. लक्ष्मीला त्रास झालेलं पाहून त्यांना चांगलच वाटायचं.
काल सुद्धा राकेशने लक्ष्मीला मार मार मारले होते. लक्ष्मीचे अवघे अंग दुखत होते. त्यामुळेच तिला लवकर जाग आली नाही. आणि म्हणूनच तिच्या सासूबाई तिला सुनावत होत्या.
तिला कधीकधी वाटायचे की माहेरी निघून जावे. अशा माणसासोबत संसार करू नये. पण माहेरी सुद्धा फारसा आधार नव्हता. तिच्या वडिलांनी तिला माहेरी उभे केले नसते. तिचा भाऊ मध्ये मध्ये तिला भेटायला यायचा. पण लक्ष्मीने त्याला तिला होत असलेल्या त्रासाबद्दल काहीच सांगितले नाही. तरीसुद्धा त्याला तिच्या शरीरावरील जखमांचे व्रण पाहून कळत होते. पण तो लहान असल्यामुळे काहीच करू शकत नसे.
लक्ष्मीने आता याला आपली नियती मानून स्वीकारले होते. आज ना उद्या आपल्याला मूलबाळ होईल या आशेवर ती जगत होती. पण लग्नाला पाच वर्षे झाली तरीही अजुन तिच्या घरात पाळणा हलला नव्हता.
लक्ष्मीच्या सासूने लक्ष्मीला दवाखान्यात नेले तेव्हा डॉक्टर म्हणाल्या की सर्व काही नॉर्मल आहे. पण तरीही एकदा राकेशला घेऊन या. त्याला तपासले की नक्की काय प्रोब्लेम आहे ते कळेल. पण लक्ष्मीच्या सासूबाईंनी डॉक्टरांचे काहीच ऐकले नाही. त्यांना वाटायचे की लक्ष्मी मध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून त्यांनी कधीच राकेशला या बाबतीत जबाबदार धरले नाही. आणि त्या लक्ष्मीला वांझ म्हणून हिणवत. पण लक्ष्मीने आशा सोडली नव्हती. तिला विश्वास होता की आज ना उद्या ती सुद्धा आई बनेल.
याच आशेवर लक्ष्मी जगत होती. सर्वकाही मूकपणे सहन करत होती. पण तिच्या गप्प राहिल्याने आपल्या कृत्याला जणू मूकसंमती दिलीय असे मानून तिच्या घरचे तिला छळायचे. पण या छळवादाला देखील सीमा असतात. लवकरच लक्ष्मीच्या सहनशक्तीचा अंत होणार होता.
एके दिवशी राकेश घरात एका मुलीला घेऊन आला. आणि घरात सांगितले की हिला आईची काळजी घ्यायला आणले आहे. कारण लक्ष्मी आईची योग्य पद्धतीने काळजी घेऊ शकत नाही. राकेशच्या बाहेरख्याली पणाबद्दल लक्ष्मीला कल्पना होतीच. पण ह्या मुलीवर काही तिला संशय आला नाही. ती आता लक्ष्मीच्या घरीच राहून तिच्या सासूला काय हवं नको ते बघत होती.
एके दिवशी स्वयंपाक घरातील कामे आटोपल्यावर लक्ष्मी तिच्या रूममध्ये गेली तेव्हा तिने जे बघितले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने आज राकेशला त्या मुलीसोबत नको त्या अवस्थेत पाहिले होते. ती तिथेच मटकन खाली बसली.
राकेशचे तिच्याकडे लक्ष गेले. पण आपल्याला काही फरक पडत नाही या आविर्भावात राकेश ने तिला रुमच्या बाहेर जायला सांगितले. पण तिला काहीही ऐकू येत नव्हतं. तिच्या डोक्याने जणू काम करणे बंद केले होते. ती तिथेच सुन्न पने बसली होती. इतक्यात राकेश तिच्याजवळ आला आणि तिच्या केसांना पकडून तिला बाहेर खेचू लागला.
आता मात्र लक्ष्मी भानावर आली. आणि तिने शरीरातील सर्व बळ एकवटून जोरात राकेशला धक्का दिला. तसा राकेश बाजूला भिंतीवर आदळला. लक्ष्मी त्याच्याकडे पाहत होती. आज तिच्या नजरेत अंगार होता. लक्ष्मीला इतक्या रागात पाहून ती मुलगी रूममधून कशीबशी पळतच बाहेर गेली.
राकेशने स्वतःला सावरले आणि तो रागातच उठला. त्याने त्याच्या रूमचा दरवाजा आतून बंद केला आणि नेहमीप्रमाणेच टी व्ही चा आवाज मोठा केला. लक्ष्मीच्या सासूबाईंनी टी व्ही चा मोठा झालेला आवाज ऐकला आणि त्यांना परिस्थितीचा अंदाज आला. नेहमीप्रमाणे आजसुद्धा सर्व कळत असूनही त्यांनी राकेशला आवरायची तसदी घेतली नाही. त्या आरामात हॉलमध्ये बसून लक्ष्मी आणि राकेशच्या रूम मधून येणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करत होत्या.
थोड्या वेळाने टीव्ही चा आवाज बंद झाला. रूमचा दरवाजा उघडला गेला आणि आतून लक्ष्मी हातात भली मोठी बॅग घेऊन बाहेर पडली. तिच्या सासूने तिला पाहिले. लक्ष्मी तर चांगली होती. मग ती रूम मधून मारण्याचा आवाज येत होता त्याचे काय. त्या घाईघाईने रूम मध्ये गेल्या तेव्हा राकेश मार खाऊन खाली विव्हळत पडला होता. लक्ष्मीने आज दुर्गाचे रुप घेत तिच्या नवऱ्या रुपी राक्षसाला त्याच्याच पद्धतीने चोप दिला होता. तिच्या सासूबाईंना परिस्थितीची कल्पना आली आणि त्या रूम मधून बाहेर पडल्या व बॅग घेऊन घराच्या बाहेर जाणाऱ्या लक्ष्मीला अडवत म्हणाल्या.
” तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलावर हात उगारायची. तुला जिवंत सोडणार नाही तो. मारून मारून काय अवस्था करून ठेवली माझ्या पोराची. थांब तुला दाखवतेच आता…”
आणि त्यांनी लक्ष्मीला मारायला तिच्यावर हात उगारला. लक्ष्मीने त्यांचा हात हवेतच अडवला. आणि जोरात झटकून दिला. आणि म्हणाली…
” मला हात लावायची हिम्मत सुद्धा करायची नाही. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणी नाही. स्त्री सहन करते कारण तिला संसार महत्वाचा वाटतो. आजवर सर्वकाही सहन केले ते मी कमजोर आहे म्हणून नव्हे, तर मला माझा संसार टिकवून ठेवायचा होता म्हणून.
मला वाटलं आज ना उद्या तुम्ही बदलणार. पण छे. ते आता अशक्यच वाटतंय. नवऱ्याला दैवत मानून पूजा करणारी बायको असेल तर नवऱ्याने सुद्धा तसं वागायला हवं. दैवत नाही तर निदान माणूस म्हणून तरी वागायला हवं. पण तुम्ही माणसं म्हणायच्या लायक सुद्धा नाही. तुम्ही तर हैवान आहात. घरातल्या सुनेला लक्ष्मीची उपमा देतात.
पण तुम्ही तर मला एखाद्या निर्जीव वस्तू प्रमाणे लाथाडत आलाय आजवर. पण आज तर हद्द झाली. माझ्या नजरेसमोर माझा नवरा एका परक्या स्त्री सोबत नको ते चाळे करत होता. एक स्त्री काहीही सहन करू शकते. पण आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी बाई नाही.
तुम्हीसुद्धा एक स्त्री आहात. मग तुम्हाला हे सर्व माहिती असूनदेखील तुम्ही त्यांना पाठीशी घालत आहात. आणि एक आई म्हणून तुम्ही हरल्यात आज. तो एक वाईट माणूस बनलाय यात फक्त माझेच नाही तर तुमचे देखील नुकसान आहे हे अजूनही कळले नाही तुम्हाला. मी आज कायमची तुमचे घर सोडून जात आहे. आणि पुन्हा कधीही या नरकात पाय ठेवणार नाही…”
लक्ष्मीच्या डोळ्यातील अंगार पाहून तिची सासू मागे सरली. लक्ष्मीने आपली बॅग उचलली आणि चालू लागली. कुठे जायचे हे तिला माहिती नव्हते. पण इथे राहायचे नाही हा निर्धार झाला होता.
तिची सासू आणि नवरा मात्र तिला पाहतच राहिले. कारण घरच्या लक्ष्मीने घेतलेले दुर्गेचे रुप त्यांना अगदीच अनपेक्षित होते.
समाप्त.
आरती निलेश खरबडकर.
( अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला लाईक करा. )
Laxmi ne khup chan nirnay ghetala. Weldo