नेहा सहजीवन सोसायटी मध्ये राहायला येऊन जवळपास एक महिना झाला होता. निशांत ऑफिस मध्ये गेल्यावर दिवसभर नेहा एकटीच घरी राहायची. नवीन सोसायटी असल्याने अजून तिची इथे फारशी ओळख सुद्धा झालेली नव्हती. पण शेजारच्या मीना काकू मात्र तिच्या चांगल्याच ओळखीच्या झाल्या होत्या.
मीना काकू पहिल्या दिवशीच नेहाची विचारपूस करायला तिच्याकडे आल्या होत्या. आणि तेव्हापासून त्यांचे नेहाच्या घरी जाणे येणे सुरू झाले होते. त्या दुपारी येऊन बसल्या की नेहाला सुद्धा जरा बरं वाटायचं. काकू खूप बोलक्या होत्या. काकू नेहाला सोसायटी मधील गमती जमती सांगायच्या. पण ह्या सर्व गोष्टी सांगताना काकूंचा दृष्टिकोन मात्र वेगळा होता. नेहाला त्यांच्या गोष्टी ऐकुन भारी गंमत वाटायची.
आजूबाजूला सुद्धा आता थोडीफार ओळख होत होती. मात्र त्यांच्या बाजूलाच माला काकू राहायच्या. त्या मात्र तिच्याशी अजूनही बोललेल्या नव्हत्या. एक दोनदा त्यांची नजरानजर झाली होती. पण बोलणं मात्र अजूनही झालेलं नव्हतं. काकूंचा एक मुलगाही होता. जाता येताना दिसायचा पण त्याच्या चालण्याची ढब पाहून तो दारूत आहे हे कोणालाही ओळखायला यायचे.
एक दोनदा जेव्हा तो तिथून जात होता तेव्हा मीना काकू नेहाच्या घरीच होत्या. एकदा त्याला जाताना पाहून मीना काकू म्हणाल्या.
” चांगला पोरगा आहे ग हा…पण बायको पळून गेली आणि एकटा पडला…त्याच्या आईला ह्या वयात सगळी कामे करावी लागतात बघ…काय तिला दुर्बुद्धी सुचली अन् पळून गेली देव जाणे…आजकालच्या मुलींमध्ये अजिबात सहनशक्ती नाही बघ…”
नेहा मात्र यावर काहीच बोलली नाही. त्यानंतर काकू पुन्हा एक दोनदा असेच म्हणाल्या. नेहाला मात्र आता त्या मुलाची दया येत होती. तिला वाटले होते की बायको पळून गेल्याने त्याची ही अवस्था झाली असावी. बिचाऱ्या त्याच्या आईला पण किती वाईट वाटत असेल त्याला असे पाहून.
मग एके दिवशी तिची एक मैत्रीण वैशाली जी जवळच राहायची ती नेहाला भेटायला तिच्या घरी आली. दोघीही बेडरूम मधल्या बाल्कनीत बसून चहा घेत असताना नेहाला माला काकू दिसल्या. भर उन्हात त्या दोरीवर कपडे वाळू घालत होत्या. त्यांना पाहून नेहाला पुन्हा वाईट वाटले. ती वैशालीला म्हणाली.
” बघ त्या काकूंना या वयात सुद्धा किती कामे करावी लागत आहे…त्यांची सून पळून गेली आणि त्यांच्या मुलाच्या आयुष्याची वाट लागली…बिचारा तिच्या आठवणीत रोज दारू पिऊन घरी येतो…” नेहा हळहळत म्हणाली.
” अगं ए बाई…काय बोलत आहेस तू…मी त्यांच्या सुनेला चांगलीच ओळखते…ती पळून गेली नाही…तर ह्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून तिने ह्याला घटस्फोट दिलाय…तो देखील कायदेशीर पद्धतीने…आणि हा तिच्या दुःखाने प्यायला नाही लागला तर लग्नाच्या आधीपासूनच ह्याला दारूचे व्यसन होते…” वैशाली म्हणाली.
” अगं पण बाजूच्या काकू तर मला सांगत होत्या की ती पळून गेलीय म्हणून…” नेहा आश्चर्याने म्हणाली.
” अगं…त्यांच्या पळून गेली याचा अर्थ आहे की अर्ध्या संसारातून निघून गेली…नवऱ्याच्या घरून निघून गेली म्हणून तिच्यावर पळपुटेपणाचा आळ आणत आहेत ह्या बायका…त्यांच्या मते आणखी थोडं सहन करायचं असतं तिने…” वैशाली ने सांगितले.
वैशाली चे बोलणे ऐकून नेहा विचारातच पडली. वैशाली पुढे म्हणाली.
” त्यांचा मुलगा आधीच खूप दारू प्यायचा…त्या त्याला सांगून कंटाळल्या…मग त्यांना वाटले की त्याचे लग्न करून दिल्यावर तो सुधारेन…म्हणून मग त्यांनी त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात केली…त्यांच्या मुलात अनेक दुर्गुण होते पण मुलगी मात्र त्यांना सर्वगुणसंपन्न हवी होती…त्यासाठी काही दिवस ह्याने दारू पिणे बंद केले होते.
मग त्यांनी गावाकडून एक चांगली मुलगी त्याच्यासाठी पसंत केली…शहरातील मुलगा आणि नोकरीवर आहे म्हटल्यावर तिच्या वडिलांनी ह्यांना भरपूर हुंडा सुद्धा दिला…पण लग्न करून आल्यानंतर दोनच दिवसात तो पुन्हा प्यायला लागला…तिने बिचारी ने त्याला खूप समजावले पण हा काहीच ऐकला नाही.
त्याची आई सुद्धा म्हणाली की आशी इतका प्यायचा नाही लग्न झाल्यापासून प्यायला लागला…आणि सासू जवळ सुद्धा काही बोलायची सोय राहिली नाही तिला….आणि अशातच दिवस राहिले…तिला वाटले की एक बाळ झालं की सगळं ठीक होईल…तसा अनेक जणांनी तिला सल्ला दिला पण बाळ झाल्यावरही ह्याचे स्वैर वागणे काही थांबले नाही…मग तिने सुद्धा त्याला सोडायचा निर्णय घेतला आणि गेली काही निघून…” वैशालीने सांगितले.
आता मात्र नेहाचा गैरसमज दूर झाला. तिने ही इतरांचे ऐकून त्यांच्या सूनेबद्दल पूर्वग्रह बाळगला होता आणि सरळ सरळ तिच्यावर आरोप करून मोकळी सुद्धा झाली होती. आता मात्र नेहाला स्वतःच्याच विचारांची कीव वाटत होती.
नेहाच्या कानावर एव्हाना मीना काकूचे सतत बोलणे पडायचे. त्यांची सून पळून गेली म्हणून. सुरुवातीला नेहाला त्यांना काहीही विचारण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण वारंवार ऐकून तिला सुद्धा वाटले की एकदा मीना काकूंच्या मनातले जाणून घ्यावे म्हणून. म्हणून मग तिने मीना काकूंना विचारलेच…
” त्यांच्या सुनेला मूलबाळ नव्हतं का…?” नेहाने विचारले.
” अगं आहे ना…एक मुलगी आहे…” काकू म्हणाल्या.
” मग ज्याच्या सोबत पळून गेली आहे त्याने त्या मुलीला ही स्वीकारले का..?” नेहाने पुन्हा प्रश्न विचारला.
” अगं ती कुणा दुसऱ्या पुरुषाबरोबर थोडेच पळून गेली आहे…” काकू म्हणाल्या.
” मग कुणाबरोबर पळून गेलीय…?” नेहाचा प्रश्न.
” एकटीच गेलीय…” काकू म्हणाल्या.
” काहीही हा काकू…एकटं कुणी पळून जात असतं का…?” नेहा गमतीने म्हणाली.
” ती गेलीय ना पण ह्या घरातून पळून…” काकू पोटतिडकीने सांगू लागल्या.
” म्हणजे जेव्हा ती या घरातून निघाली तेव्हा चालत न जाता पळत गेली का…?” नेहाचा प्रश्न.
” नाही ग बाई…गाडीने गेली होती…” काकू वैतागून म्हणाल्या.
” मग तुम्ही असे मला वारंवार का सांगताय की त्यांची सून पळून गेली म्हणून…” नेहा ने विचारले.
” अगं भरल्या संसारातून पळूनच गेली ना ती…” काकू म्हणाल्या.
” ह्याला पळून जाणं म्हणत नाहीत काकू…त्या दोघांचा संसार टिकला नाही म्हणून तीने झाला डिव्होर्स दिला आणि तिच्या माहेरी निघून गेली इतकंच…” नेहा म्हणाली.
” अगं ही काय एवढी साधी गोष्ट वाटते का तुला…संसार मोडणं म्हणजे बाईचं अपयश असतं…संसार टिकवणे हेच बाईचे यश असते…एकदा का नवऱ्याला सोडून दिलं की मग बाईच्या जगण्याला काही अर्थ राहत नाही बघ…” काकू म्हणाल्या.
” अहो काकू…कोणत्या काळात आहोत आपण आणि तुम्ही काय बोलताय…हे सगळं जुनं झालंय आता…आता एक स्त्री स्वतःच स्वतःचे निर्णय घेऊ शकते…तिला आनंदी राहण्यासाठी वा जगण्यासाठी पुरुषाची साथ लागतेच असे नाही…आणि जर दोघांचं नाही पटलं तर ओढूनताणून एकत्र राहण्यात काय अर्थ आहे…अशाने त्या स्त्रीची किती घुसमट होईल…आणि लग्न न टिकणे हे जितके एका स्त्रीचे अपयश आहे तितकेच ते एका पुरुषाचे ही अपयश आहे…” नेहा काकूंना समजावत म्हणाली.
क्रमशः
लग्न झालं की सुधारेल ? – भाग २ (अंतिम भाग)