” प्रिया…हे काय घातलस तू… अगं नवीन लग्न झालंय ना तुझं…आजूबाजूचे लोक पाहतील तर काय म्हणतील…आणि तसंही आपल्या घरी नाही चालत असा पंजाबी ड्रेस घातलेला…तू घरी साडीच घालत जा… तसंही साडी खूप शोभते हो तुला…” शोभाताई आपल्या सूनबाई ला म्हणाल्या.
तसा प्रियाचा चेहरा उतरला. दीड महिन्यांपूर्वी शोभाताईंच्या घरी सून म्हणून आलेली प्रिया आजवर साडीतच वावरत होती. पण आजकाल घरात ड्रेस वापरणे खूप कॉमन गोष्ट आहे म्हणून तिने ड्रेस घालण्याआधी शोभाताईंना विचारले नाही.
तसंही शोभाताई लग्नाच्या आधी प्रियाला नेहमी म्हणायच्या..’ मी काही इतर सासवांसारखी नाही हो…तुला आपल्या घरात काहीच बंधन नसणार…तुला हवं ते करत जा…तू पण मला माझ्या लेकीसारखीच ना…’ आणि आता मात्र साडीच शोभते असे म्हणून सरळ सरळ ड्रेस घालायला नकार दिला. प्रियाला साडीमध्ये फार अवघडल्यासारखे व्हायचे.
प्रिया आणि विनयचे अरेंज मॅरेज. दोघांचाही रीतसर कांड्यापोह्यांचा कार्यक्रम पार पडला होता. तेव्हा मात्र शोभाताईंनी आम्ही किती आधुनिक विचारांचे आहोत हे पटवून सांगितले होते. पण आता मात्र शोभाताई एका पारंपरिक सासूच्या भूमिकेत वागत होत्या.
प्रियाने सकाळी साडेपाचला उठायलाच हवे, अंघोळ केल्याशिवाय घरात कशाला हात लावू नये, थोरामोठ्यांच्या समोर पदर घ्यावा, शेजाऱ्यांशी जास्त बोलू नये, अशी एक ना अनेक बंधने तिच्यावर नकळतच लादली गेली होती.
प्रियाचे लग्न झाल्यापासून तिच्या सासूबाईंनी स्वयंपाकघरातील सर्व जबाबदारी तिच्यावरच टाकली होती. नणंद श्वेता तर अजिबातच घरातील कामांना हात लावत नसे. घरातील कामांमधूनच वेळ न मिळाल्याने प्रिया आणि विनय कधीच बाहेर फिरायला जाऊ शकले नाही.
एखाद्या वेळेला काम लवकर आटोपून बाहेर पडायचे म्हटल्यास नेमके तेव्हाच सासूबाईंची तब्येत खराब व्हायची. इतकेच नव्हे तर प्रिया एखादेवेळी फोनवर बोलत असली किंवा फोन हाताळत असली तरी तिच्या सासुबाई तिला रागवायच्या.
प्रियाला अगदी एकटे पडल्यासारखे वाटायचे. स्वतःच्याच घरात परके असल्यासारखे, सतत कुणाच्यातरी देखरेखीखाली असल्यासारखे वाटायचे. शेवटी तिने विनयला तिची होणारी घुसमट बोलून दाखवली. तर विनय उलट तिच्यावरच रागावला. तो म्हणाला…
“हे बघ प्रिया…माझ्या आईने आजवर खूप कष्ट घेतले आहेत…आणि आता घरात सून आली म्हटल्यावर ती आरामच करणार ना…आणि श्वेता या घरातील मुलगी आहे…लहानपणी पासूनच ती खूप लाडात वाढलेली आहे…तिला घरकामाची सवय नाही अजुन…आणि राहिली गोष्ट साडी घालण्याची तर ती तुझ्या आणि आईच्या मधील गोष्ट आहे….आणि तुम्हा सासू सुनेच्या मध्ये मला पडायचे नाही…तुम्ही आपापसात काय ते बघून घ्या…”
विनयचे बोलणे ऐकून प्रियाला वाईट वाटले. आता परिस्थितीचा स्वीकार करण्यावाचून प्रियाकडे दुसरा काहीच उपाय नव्हता. पण मनात कुठेतरी तिला सासूबाईंच्या वागण्याचे वाईट वाटायचे.
प्रियाच्या लग्नाला चार वर्षे होत आली होती. यंदा तिच्या सासरचे तिच्या नणंदेसाठी योग्य स्थळ पाहत होते. दोन तीन स्थळं पाहून झाल्यावर त्यांना स्वप्नीलचे स्थळ पसंत पडले. आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. शिवाय चांगल्या नोकरीवर होता.
दोन्हीकडील मंडळींची पसंती झाली आणि स्वप्निल व श्वेताचे थाटामाटात लग्न पार पडले. नवीन जोडपे छान आठ दहा दिवसांसाठी बाहेर फिरायला गेले. सर्वकाही छान सुरू होते. पण अवघ्या महिनाभरात नव्याची नवलाई संपली आणि आणि एक दिवस श्वेता अगदी रागातच माहेरी आली.
” काय झालं श्वेता…काही बिनसलंय का तुझं अन् स्वप्निल
रावांच…की सासुबाई काही बोलल्या तुला..?” श्वेताच्या आईने विचारले.
” हो आई…माझ्या सासूबाई बोलल्या मला…म्हणाल्या घरी जीन्स, टी शर्ट घातलेला चालणार नाही म्हणून… इतकंच नाही तर दिवसभर मला काही ना काही कामच सांगत असतात… मी म्हटलं त्यांना की आपण घरातील कामांसाठी मोलकरीण ठेवू तर म्हणतात की स्वयंपाक तूच करत जा…बाकी कामांसाठी आपण मोलकरीण ठेवू…” श्वेता म्हणाली.
” अगं पण असं का म्हणाल्या त्या…?”
” म्हणे स्वयंपाक घरच्या सूनेनेच बनवला पाहिजे…त्यामध्ये मी बनवलेल्या पदार्थांना नावे सुद्धा ठेवतात…आता मी काय सर्वकाही एकदमच शिकणार का..? आणि मला खूप कंटाळा येतो ग दोन्ही वेळ स्वयंपाक करण्याचा…माझ्या सासूबाई तर अजिबात कामाला हात लावत नाहीत…” श्वेता म्हणाली.
” मग तू जावई बापूंशी बोलून बघ ना..
” अगं आई…ते पण त्यांच्या आईचीच बाजू घेतात ग आई…म्हणतात की हळूहळू कामांची सवय होईल…पण त्यांच्या आईला काहीच म्हणत नाही…” श्वेता म्हणाली.
” असं होय…मग तू तुझ्या सासूबाईंना ठणकावून सांग…म्हणावं मी माझ्या मनात येईल ते कपडे घालेन…आणि घरातील स्वयंपाक फक्त एकवेळ करेन…बाकी तुम्हीसुद्धा घरकामात मदत करा म्हणावं…नाहीतर सरळ स्वप्निलरावांना सांग वेगळं राहायला…” श्वेताची आई म्हणाली.
” अगं आई…पण हे तयार होणार नाहीत ना वेगळं राहायला…”
” त्यांना सांग म्हणावं वेगळं राहायला तयार असाल तरच मी घरी येईल नाहीतर माहेरीच राहते म्हणावं…मग त्यांचा नाईलाज होईल…आणि तसंही तू जर त्यांचं सारं काही ऐकशील तर ते तुला गृहितच धरतील आणि तुला घरकामाला जुंपतील…” श्वेताची आई म्हणाली.
” हो आई…आजच बोलते ह्यांच्याशी…” श्वेता म्हणाली.
आपली नणंद आणि सासूबाईंचे सर्व बोलणे प्रियाने ऐकले होते. सासूबाईंचे आपल्या मुलीच्या बाबतीत अन् सुनेच्या बाबतीत विचार किती भिन्न आहेत हे पाहून प्रियाला नवल वाटले अन् वाईट ही…मात्र सासूबाईंची एक गोष्ट मात्र प्रियाला पटली होती. ती म्हणजे समोरच्या व्यक्तीचे सर्व काही ऐकत राहिले तर ती व्यक्ती आपल्याला गृहीत धरते. प्रियाने ठरवले होते की जी शिकवणूक त्या त्यांच्या मुलीला देत आहेत उद्यापासून ती सुद्धा तशीच वागेल. पण स्वतःमधील चांगुलपणा जपून.
आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा अनेक प्रिया आणि श्वेता असतात. आजही समाजात अशा अनेक सासवा मिळतील ज्या म्हणतात की ‘ आम्ही सुनेला मुली प्रमाणे वागवू ‘. पण प्रत्यक्षात मात्र मुली आणि सूनांसाठी त्यांचे कायदे हे नेहमी भिन्नच असतात. अर्थातच ह्याला काही अपवाद देखील असतील.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.