गेल्या काही दिवसांपासून मी खूप टेन्शन मध्ये होते. माझ्या मुलाचं म्हणजेच अर्णवच वजन बरंच कमी झालं होत…आठ महिन्यांचा होईपर्यंत त्याच वजन व्यवस्थित वाढत होते…पण मध्येच त्याला कफ चा त्रास झाला आणि त्याच वजन कमी झालं. मी त्याला घेऊन कुठेही बाहेर गेले की फक्त एकच वाक्य कानावर पडायचं…” काय ग! खूपच बारीक झालाय अर्णव. माझ्या शेजारी अर्णव पेक्षा दोन महिन्यांनी लहान मुलगी होती. ती सुद्धा अर्णव च्या मानाने चांगली गुटगुटीत होती. आता मलासुद्धा वाटायला लागले की अर्णव खरंच खूप बारीक झालाय. आणि माझ्यातल्या काळजीवाहू आईने त्याचे वजन वाढवण्याचा निर्धार केला आणि माझं मिशन वजन वाढवा सुरू झालं.
मी लगेच गूगल वर शोधमोहीम सुरू केली. मुलांचे वजन वाढविणाऱ्या रेसिपीज शोधून काढल्या. आणि रोज काहीतरी नवीन त्याला खायला घातले. सर्व प्रकारचे पिठं, सुकामेवा, फळे हे सर्व ना चुकता देऊ लागले. त्याला डाएट पूर्णपणे बदलला. मात्र तरीही काही फरक पडत नव्हता. मग मी त्याला जबरदस्तीने थोड जास्त खाऊ घालायची. पण त्याला जास्त झाले की तो लगेच उलटी करायचा. मग मी त्याला जबरदस्ती भरविणे बंद केले. पण प्रॉब्लेम मात्र तसाच होता. तो आणखीच बारीक दिसायला लागला.
मग कुणीतरी मला सल्ला दिला की मुलाची मालिश केल्याने फरक पडतो. दिवसातून निदान चार ते पाच वेळा मालिश कर. मी लगेच मनावर घेतले आणि दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याची मालिश करायला सुरुवात केली. दिवसभर माझ्या हाताला अन् अर्णवच्या अंगाला फक्त तेलाचाच वास यायचा. पण तरीही त्याच्या वजनात काहीच फरक पडला नाही. मला आणखी काळजी वाटायला लागली. मला रात्रभर त्या विचाराने झोपसुद्धा यायची नाही.
मग मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी त्याला तपासले आणि म्हणाले की जर तो अॅक्टिव असेल, चांगला खेळत असेल, आणि त्याला इतर दुसरा कोणता प्रॉब्लेम नसेल तर तो नॉर्मल आहे. पण मला बापडीला हे पटणार नव्हतं. जर इतरांच्या मुलाचं वजन जास्त आहे तर माझ्या मुलाचं देखील वजन जास्तच हवं हे माझं ठाम मत. मग डॉक्टरांनी एक टॉनिक लिहून दिलं आणि मी न चुकता त्याला वेळेवर टॉनिक देत गेले. अस करून पूर्ण टॉनिक ची बाटली संपली पण अर्णवच वजन जैसे थे.
. आता मात्र माझी सहनशक्ती संपत चाललेली होती. काही केल्या अर्णवचे वजन वाढत नव्हते. मग मला शेजारच्या काकू म्हणाल्या की अर्णवला कुणाची तरी दृष्ट लागली असेल. तू मीठ मोहरीने त्याची दृष्ट काढ. आणि त्यांनी मला दृष्ट काढण्याचे १०१ उपाय समजावून सांगितले. मग दुसऱ्या दिवशीपासून मी सकाळ संध्याकाळ मीठ मोहरीने अर्णवची दृष्ट काढायला सुरुवात केली. कधी मिठाने, कधी हिंगाने तर कधी पाण्यात फूल टाकून दृष्ट काढण्याचे उपाय अहोरात्र सुरू ठेवले. अर्णवने खाल्लेलं उष्ट काळया कुत्र्याला टाकायचं म्हणून चार गल्ल्या फिरून काळ कुत्रं शोधलं. पण तरीही अर्णव च वजन काही केल्या वाढलं नाही. आता मात्र मला भयानक टेन्शन आलं होतं. माझी रात्रीची झोप पार उडून गेली होती. काय करावं अन् काय नाही हे मला सुचत नव्हतं.
माझा नवरा माझी धडपड पाहत होता. त्याने मला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. प्रत्येकाची तब्येत वेगवेगळी असते… हळूहळू अर्णव च वजन सुद्धा वाढेल. आणि तो नॉर्मल आहे…त्याची वाढ व्यवस्थित होत आहे. पण मी काही ऐकायलाच तयार नव्हते. तुम्हाला माझ्या मुलाची काळजीच नाही एवढ म्हणून त्यांना सुनावले. शेवटी माझ्या नवऱ्याचाही नाईलाज झाला.
मग मला कुणीतरी सांगितलं की पितरांना खुश केलं तर त्याच फळ आपल्या मुलांना मिळत. आणि माझ्या हाती जणू काही एखाद्या खजिन्याची चावी लागली. आमच्यात अक्षय तृतीयेला पितरांना जेवण देतात. बघता बघता अक्षय तृतीयेचा दिवस उगवला. कधी नव्हे ती सकाळी पाच वाजता उठून मी कामाला लागले. संपूर्ण घरझाडून पुसून स्वच्छ केले. बाहेर रांगोळी काढली. माझ्या स्वर्गवासी सासरेरबुवांच्या आवडीचे सर्व पदार्थ तयार केले. तीन स्वीट डिश बनवल्या. त्यांच्या आवडीचे पान बोलावून घेतले. त्यांचा फोटो घासून पुसून अगदी लख्ख केला. त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने हार तयार केला. त्यांच्यासाठी ताट वाढून त्यांच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला आणि अर्णव च वजन वाढू द्या अशी विनवणी केली. आणि त्याच वजन कधी वाढेल ह्याची वाट बघत बसले.
एके दिवशी एका मैत्रिणीच्या घरी जाण्याचा योग आला. तिचा मुलगा सुद्धा अर्णव च्या बरोबरीचा होता. दोघांमध्ये फक्त आठ दिवसांचा फरक होता. अर्णव तिथे जाऊन तिच्या मुलाशी खेळू लागला. मी त्यांच्याकडे पाहत होते. आणि माझ्या लक्षात आले की अर्णव तिच्या मुलापेक्षा खूप जास्त अॅक्टिव होता. मैत्रिणीचा मुलगा गुटगुटीत होता पण तो अर्णव इतका हुशार वाटत नव्हता. मैत्रीण अर्णव च कौतुककरत म्हणाली की अर्णव ला काय खाऊ घालते ते मलापण सांग. एव्हाना माझा गैरसमज दूर झाला होता. बाळ गुटगुटीतच हवं असं अस काही नसतं हे मला कळून चूकलं होतं. आता मल स्वतःवर हसू येत होतं. पितृदेवांनी अर्णव च वजन वजन तर नाही वाढवलं पण मला सुबुद्धी नक्कीच दिली. आता मी वजन वाढवण्याचा अट्टाहास सोडून दिला. आणि त्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.
आणि काही दिवसानंतर अर्णव च वजन वाढायला सुरुवात झाली. एकदम गुटगुटीत नाही झाला पण थोडा बरा दिसायला लागला.
बरेचदा आपण इतर मुलांना पाहून आपल्या मुलांची त्यांच्याशी तुलना करायला लागतो. आणि त्यापायी नको नको ते करतो. पण इतरांशी तुलना न करता आपण डोळसपणे बाळाच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवे. प्रत्येक मुलाची वाढ ही एकसारखी नसते हे लक्षात घ्यायला हवे.
समाप्त.
फोटो – साभार pixel
©®आरती लोडम खरबडकर.
ब्लॉग आवडल्यास माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करा.