कांचनने जेव्हा पहिल्यांदा या घरात पाऊल ठेवले, तेव्हा तिच्या हातातील हिरव्या बांगड्यांचा किणकिणाट आणि पायांतील पैंजणांचा छुमछुम आवाज संपूर्ण घरात आनंदाचे कारंजे उडवून गेला होता. पण लग्न होऊन काहीच दिवस झाले आणि घराचे चित्र बदलले. .
तिच्या सासूबाई, म्हणजेच वंदनाताई, जुन्या वळणाच्या आणि हुकमी स्वभावाच्या होत्या. ‘सून आली म्हणजे मी आता कारभारीण झाले,’ या थाटात त्यांनी घरकामाची सर्व सूत्रे कांचनच्या हाती सोपवली. हळूहळू परिस्थिती अशी झाली की, वंदनाताई स्वतःच्या हाताने पाण्याचा ग्लास घ्यायलाही नकार देऊ लागल्या.
“कांचन, अगं जरा चहा ठेव पाहू… आणि हो, आल्याचा तुकडा जरा जास्त घाल,” सोफ्यावर पाय पसरून टीव्ही पाहत वंदनाताईंनी हुकूम सोडला.
“हो आले आई,” स्वयंपाकघरातून घामाच्या धारा पुसत कांचनने उत्तर दिले. सकाळपासून तिचे पाय जमिनीला टिकले नव्हते. कधीकधी तिची तब्येत ठीक नसायची, डोके ठणकत असायचे. अशा वेळी तिला वाटे की सासूबाईंनी निदान म्हणावे तरी की काय झाले. पण वंदनाताईंच्या कपाळावरची आठी कधी सुटलीच नाही.
कांचन चा नवरा शरद सकाळी ऑफिसला जाई तो रात्री उशिरा घरी यायचा. त्याला ह्या सगळ्याची काही कल्पना नव्हती. एकदा कांचनने तिच्या मनातील सल त्याला बोलून दाखवली.
” अहो…आज मला बरं नव्हतं…आईंनी मला साधं विचारलं सुद्धा नाही की मी कशी आहे…उलट आज सुद्धा एकाही कामात मदत केली नाही…”
” मी दिवसभर कामात असतो. घरी आल्यावर मला ह्या घरच्या कुरबुरी सांगत नको जाऊस. अन् आईचं वय झालंय आता. होत नसेल काम तिच्याकडून.” शरद तिला म्हणाला.
त्यानंतर मग ती काहीच बोलली नाही.
दिवस जात होते. अशातच एक गोड बातमी आली. कांचनच्या रूपाने घरात नवीन अंकुर फुलणार होता. कांचनला दिवस गेले. वंदनाताईंना आनंद तर झाला, पण त्यांच्या वागण्यात तिळमात्र बदल झाला नाही. उलट, “आमच्या काळात आम्ही नवव्या महिन्यांपर्यंत विहिरीचे पाणी शेंदत होतो,” असे टोमणे मारून त्यांनी कांचनला विश्रांती घेण्यापासून रोखले.
डोहाळे जेवणाचे दिवस आले तरी कांचन उपाशीपोटी घरातील उरकी कामे करत असायची. अनेकदा तिचे डोळे भरून यायचे, पण देवाचा धावा करत ती दिवस कंठत होती.
शेवटी, नवव्या महिन्यात कांचन पहिल्या बाळंतपणासाठी आपल्या माहेरी गेली. तिथे तिच्या आई-वडिलांच्या मायेच्या छायेत तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. माहेरची दोन महिने जणू पंख लावून उडाली. बाळाच्या हसण्याने कांचन आपले सगळे दुःख विसरली होती.
दोन महिन्यांनी, छोट्या बाळाला कडेवर घेऊन कांचन परत सासरी आली. पाच तासांचा मोठा आणि थकवणारा प्रवास करून ती घरात शिरली. तिला वाटले होते की आज सासूबाईंनी तिच्यासाठी छान गरम जेवण बनवून ठेवले असेल. पण घरात पाऊल टाकताच तिला स्वयंपाकघरातून कोणताही सुवास आला नाही. उलट तिथली भांडी तशीच पडली होती.
वंदनाताई सोफ्यावर बसून बाळाला पाहत म्हणाल्या, “आली का गं कांचन? ये ये… जरा बाळ दाखव मला.” त्यांनी बाळाला हातात घेतले आणि लटके हसत म्हणाल्या, “एवढ्या दुरून आली आहेस तू. प्रवासात काय ते डब्यातलं सुकं जेवण मिळालं असेल ना? तुला तर खूप भूक लागली असेल. एक काम कर, तू तुझ्या हाताने तुला जे आवडते ते छान मऊ सूत जेवण बनव, आणि मलाही वाढ. तुझ्या हाताच्या जेवणाची चवच न्यारी बाई!”
कांचनच्या पायाखालची जमीनच सरकली. बाळाला घेऊन आलेल्या सुनेला साधे पाणी न विचारता, सासूबाई तिच्याकडूनच जेवणाची अपेक्षा करत होत्या. कांचनच्या डोळ्यातून अश्रू घळघळू लागले. आधीच भुकेने व्याकुळ झालेली ती सासूबाईंच्या वागण्याने अधिकच दुखावल्या गेली. ती तिच्या खोलीत गेली. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून शरद तिला म्हणाला.
” रडायला काय झालंय तुला ?”
” तुम्ही बघितलं ना. सासूबाईंनी माझ्यासाठी स्वयंपाक सुद्धा केला नाही.”
” अगं तुला तुझ्या आवडीच करून खाता यावं म्हणून नाही केला तिने स्वयंपाक. तिला वाटले तुला आवडणार नाही. तुला जे आवडतं ते करून खा हे म्हणणं म्हणजे आईचा मोठेपणाच आहे.” शरद म्हणाला.
आता मात्र तिला कळून चुकले की नवऱ्याला सांगून सुद्धा काही उपयोग होणार नाही. तिने पदर खोचला आणि कामाला लागली. त्यानंतर तिने सासूबाईंकडून कोणत्याच कामाची अपेक्षा ठेवली नाही. सासूबाईंनी कधी बाळाला अंघोळ घातली नाही की कधी त्याची मालिश केली नाही. कांचनने सुद्धा कधी त्यांना काही करायला सांगितले नाही.
क्रमशः
वेगळा न्याय – भाग २ (अंतिम भाग) एक हृदयस्पर्शी कौटुंबिक कथा.