वेगळा न्याय – भाग २ (अंतिम भाग) एक हृदयस्पर्शी कौटुंबिक कथा.

अशातच तिची नणंद तिच्या मुलांना घेऊन तिच्या घरी आली. घरी यायला संध्याकाळ झाली होती. आल्यावर कांचन ने त्यांना चहा केला. त्यानंतर नणंद हिला म्हणाली.

 

” काय मग कांचन, आज जेवणाचा बेत काय आहे ?”

 

” मी तर काहीच केले नाही ताई. तुम्हीच तुम्हाला जे आवडते ते बनवा स्वतःच्या हाताने. एवढा लांबचा प्रवास करून आल्या आहात तुम्ही. रस्त्याने मनाप्रमाणे जेवण पण मिळालं नसेल. करा तुम्ही स्वतःच्या आवडीच जेवण. आमच्यासाठी पण करा. आम्हाला पण कळू देत तुमची आवड काय आहे ते.” कांचन म्हणाली.

 

हे ऐकून सगळेच गोंधळले. नणंद नुसती हिच्याकडे पाहत बसली. सासू सुद्धा हिला काय झालंय ह्याचा विचार करू लागली. शरद मात्र तिला म्हणाला.

 

” काय हे कांचन, ताई किचन मध्ये जाऊन स्वयंपाक करणार का आता ?”

 

” ह्यात काय वाईट आहे. कितीतरी लेकींना वहिनी आल्यावर माहेरच्या किचन मध्ये सुद्धा जाता येत नाही. मग मी तर त्यांना किचन मध्ये जाऊन स्वयंपाक करायला सांगत आहे. तो ही त्यांच्या आवडीचा. मग ह्यात माझाच मोठेपणा नाही का?” कांचन म्हणाली.

 

त्यासरशी शरदला तिचे त्या दिवशीचे बोलणे आठवले. त्यावर त्याने दिलेले उत्तर सुद्धा आठवले. त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो गप्प बसला.

 

आता मात्र सासूबाईंना तिच्या बोलण्याचा राग आला. त्या तडक उठल्या आणि म्हणाल्या.

 

” माझी लेक एवढी थकून आली आहे. आणि तू स्वयंपाक करणार आहे का. तुझ्यात एवढी सुद्धा माणुसकी नाही आहे का ?”

 

” मग मी सुद्धा त्या दिवशी एवढी थकून आले होते. एवढा मोठा प्रवास करून. बाळ अंगावर पिते तर भूक सुद्धा खूप लागते मला. नेहमी नाही पण निदान एकदा तरी तुम्ही माझ्यासाठी स्वयंपाक केला असता तर काही बिघडले असते का. मुलीसाठी वेगळा न्याय आणि सुनेसाठी वेगळा न्याय असे का ? हा प्रसंग तुमच्या मुलीवर आला तेव्हा तुम्हाला माणुसकी आठवली पण जेव्हा तुम्ही माझ्यासोबत अशा वागल्या तेव्हा नाही आठवली तुम्हाला माणुसकी ?” कांचन म्हणाली.

 

हे ऐकून शरदला आपली चूक कळली. पुढे जर कांचन आजारी पडली आणि आपण किंवा आईने तिला मदत नाही केली तर या छोट्या बाळाचे काय होईल? तिचे किती हाल होतील हा विचार करून त्याच्या अंगावर काटा आला. त्याला सुद्धा स्वतःच्या वागण्याची प्रचंड लाज वाटली.

 

तो काहीच बोलू शकला नाही. सगळे गप्प होते. कोणीच काही बोलले नाही. नणंदला नेमकं काय घडलंय त्याची कल्पना आल्यावर ती वंदनाताईंना म्हणाली.

 

” हे काय आई ? तू खरंच अशी वागलीस. अगं जेव्हा कांचन घरात नव्हती तेव्हा सगळं काही तूच करायची ना घरात. मग एक दिवस सुनेला स्वतःच्या हाताने करून खाऊ घातलं असतं तर काय बिघडलं असतं. ती पण थकली असेल ना. ती काय काम करायची मशीन आहे का. जशी मी आज प्रवासातून आल्यावर दमली आहे हे तुला आपोआप कळलं तसं हिच्याबाबतीत का नाही जाणवलं. तू आज हिला परक्या सारखी वागणूक देशील तर ही सुद्धा पुढे तुला आपलं समजेल अशी अपेक्षा नको करुस मग.”

 

आपल्या मुलीचे हे शब्द वंदनाताईंच्या काळजाला पार आरपार टोचले. त्यांना भूतकाळ आठवला. कांचन जेव्हा गरोदर होती, जेव्हा ती आजारी असायची, तेव्हा आपण तिला अशीच वागणूक दिली होती. त्यांना आपल्या वागण्याची आज पहिल्यांदा लाज वाटली. आपण तर बाहेरच्या भुकलेय लोकांना सुद्धा जेवण देतो. मग आपल्या घरची सून उपाशी असताना आपण तिला जेवण बनवून दिले नाही हे वाटून त्या खजील झाल्या.

 

 

त्यांनी हळूच कांचनच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू होते. त्या मायेने म्हणाल्या, “कांचन, मला क्षमा कर बाळा. मी आजपर्यंत तुझ्याशी फार वाईट वागले. सून म्हणून नाही, तर या घराची गुलाम म्हणून मी तुझ्याकडे पाहिले. पण आज माझे डोळे उघडले. यापुढे माझी लेक आणि तुझ्यात मी कधीही फरक करणार नाही.”

 

” मला त्या दिवशी किती वाईट वाटले होते ह्याची जाणीव तुम्हाला झाली ह्यातच सर्व काही आले. तुम्ही माझी माफी वगैरे मागू नका.” कांचन म्हणाली.

 

” आज तुम्ही दोघीही सासू सुना आराम करा. स्वयंपाक मी बनवते.” नणंद म्हणाली.

 

” नको ताई. स्वयंपाक बनवलाय मी. मी तर फक्त आईला जाणीव व्हावी म्हणून तसं म्हणाले होते. तुमच्या आवडीचा बेत आहे आज सर्व.” कांचन म्हणाली.

 

” तुझी सून हुशार आहे बघ आई.” नणंदेने असे म्हणताच सर्वजण हसले.

 

त्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले. त्या दिवसानंतर काकांच्या सासुबाई पार बदलल्या होत्या. आता त्या छोट्यामोठ्या कामात कानांची मदत करायच्या. बाळाला खेळवायच्या, त्याची मालिश अंघोळ करायच्या. कांचनला हवं नको ते विचारायच्या. तिने मनोमन देवाचे आभार मानले होते. तिने भांडून किंवा वादविवाद न करता योग्य मार्गाने सासूबाईंनी परिस्थितीची जाणीव करून देऊन एक उत्तम धडा शिकवला होता. त्या दिवसापासून त्या घरात सासू आणि सुनेचे नाही, तर एका आई आणि मुलीचे नाते जन्माला आले होते.

 

कधीकधी सहन करण्याऐवजी परिस्थिती बदलण्यासाठी बोललेले योग्य ठरते.

 

समाप्त.

तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच काही हृदयस्पर्शी कथा इथे वाचा.

सूर तेच छेडीता..!

अधिकार भाग २ (अंतिम भाग)

खरी संपत्ती

 

विश्वासघात ( एका फसवणुकीची कथा )- भाग १

 

 

©®आरती निलेश खरबडकर.

Leave a Comment