“विनय… अरे, त्यात सुमितचे काय चुकले? तो बरोबर तर म्हणतोय!” नरेश अतिशय थंडपणे म्हणाला,
” काय? दादा… तू हे काय बोलतोयस?”
“अरे विनय, समजून घे ना. सुमित नवीन संसार करतोय. त्याची बायको शिकलेली, हायफाय आहे. त्यात अर्णव तिथे जाऊन राहिला, तर त्यांना उगाच अडचण होणार ना? त्यांच्या रोजच्या राहणीमानात फरक पडेल. त्यापेक्षा तू अर्णवची दुसरीकडे काहीतरी सोय कर ना. कशाला मुलांच्या संसारात ढवळाढवळ करतोस?” नरेश अत्यंत बेफिकिरीने म्हणाला.
विनयच्या पायाखालची जमीन सरकली. वर्षानुवर्षे जपलेले नाते, केलेला त्याग, मुलांना लावलेली माया,या सर्वांचा एका क्षणात चुराडा झाला होता.
विनयच्या डोळ्यांतून आता अश्रू वाहात नव्हते, तर रागाची आणि दुःख दाटून आले होते.
“दादा!” विनयचा आवाज आता चढला होता, “तू हे मला सांगतोयस? आज अर्णवला १५ दिवस ठेवणे सुमितला अडचण वाटतेय? आणि तू त्याची बाजू घेतोयस? दादा, जरा मागे वळून बघ! सुमित आणि अमित जेव्हा लहान होते, शाळेत जायला लागले होते, तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च कोणी केला?
त्यांच्या महागड्या क्लासेसची फी, हॉस्टेलचा खर्च, लॅपटॉप, कपडे—हे सगळे करताना मी माझ्या आयुष्यात किती अडचणी सहन केल्या, हे विसरलास तू? मी माझ्या अर्णवचे आणि अनन्याचे किती हट्ट मारले, त्यांना किती गोष्टींपासून वंचित ठेवले, फक्त तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून! मी स्वतः कष्ट सोसले, पण सुमित आणि अमितला कधी कसली कमी पडू दिली नाही. आणि आज माझ्या मुलाला १५ दिवसांसाठी थारा देताना तुम्हाला ‘अडचण’ वाटतेय?”
विनयच्या या संतापावर नरेशच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले, त्यांनी विनयच्या उरल्यासुरल्या आशेचे धिंडवडे काढले.
“हे बघ विनय! तू जे काही केलेस, ते तुझे ‘कर्तव्य’ होते. तू या घराचा लहान मुलगा होतास आणि सरकारी नोकरीत होतास. भावाच्या मुलांसाठी केलेस तर काय मोठा तीर मारलास? तू काही आमच्यावर ‘उपकार’ केले नाहीत! आणि आता त्या जुन्या गोष्टींचे तुणतुणे वाजवून सुमितला दोष देऊ नकोस”
“कर्तव्य होते… उपकार केले नाहीत”
हे शब्द विनयच्या कानात विजेसारखे कडाडले. विनयचे डोळे क्षणात उघडले. त्याच्या डोळ्यांवर असलेला भावाच्या प्रेमाचा आणि नात्यांच्या खोट्या अपुलकीचा चष्मा चक्काचूर झाला. त्याला कळून चुकले की, ज्यांना तो स्वतःचे कुटुंब मानत होता, त्यांच्यासाठी तो केवळ एक ‘पैशांचे एटीएम’ आणि ‘गरज भागवणारे साधन’ होता. त्यांनी त्याच्या त्यागाला कधी प्रेम मानलेच नव्हते, तर ते त्यांचे ‘हक्क’ आणि विनयचे ‘कर्तव्य’ मानले होते.
विनयने क्षणभर शांतता पाळली. त्याचे ओठ थरथरत होते, पण मनात एक विलक्षण खंबीरपणा आला.
“बरोबर आहे दादा… तू अगदी बरोबर बोललास. मी उपकार नाही केले. मी मूर्खपणा केला! मी माझ्या स्वतःच्या स्वतःच्या मुलांच्या इच्छेचा बळी देऊन दुसऱ्यांच्या बाभळीच्या झाडाला पाणी घालत राहिलो. आज माझे डोळे पूर्णपणे उघडले,” एवढे बोलून विनयने फोन कट केला.
फोन ठेवल्यानंतर विनय काही वेळ शांत बसून राहिला. अनुराधा आणि अर्णव दारातच उभे होते. त्यांनी दूरध्वनीवरील तो सगळा संवाद ऐकला होता.
अनुराधाच्या डोळ्यांत पाणी होते, पण अर्णवच्या चेहऱ्यावर एक वेगळाच स्वाभिमान दिसत होता. अर्णव पुढे आला आणि त्याने विनयच्या खांद्यावर हात ठेवला.
“बाबा,” अर्णव अत्यंत धीर गंभीर आवाजात म्हणाला, “तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. मला सुमित दादाच्या किंवा काकांच्या मेहेरबानीची अजिबात गरज नाही. मी पुण्यात लॉजवर किंवा मित्राच्या रूमवर राहीन. मी स्वतःच्या हिमतीवर पुढे जाईन. मला तुमचा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे.”
अर्णवचे ते शब्द ऐकून विनयचा उर अभिमानाने भरून आला. ज्या मुलाकडे त्याने आयुष्यात अनेकदा दुर्लक्ष केले होते, तोच मुलगा आज बापाचा स्वाभिमान सांभाळायला खंबीरपणे उभा होता. विनयने अर्णवला घट्ट मिठी मारली.
“नाही अर्णव,” विनय म्हणाला, “तुला कुठल्याही साध्या रूमवर राहायची गरज नाही. तुझे बाबा अजून जीवंत आहेत.”
विनयने लगेच आपल्या काही जुन्या मित्रांना फोन केले. पुण्यात अर्णवसाठी एका अत्यंत चांगल्या आणि सुरक्षित पेइंग गेस्ट (PG) ची सोय केली. सर्व सोयीनियुक्त खोली, उत्तम जेवणाची सोय—या सर्वांचा खर्च विनयने स्वतः केला.
त्या दिवसापासून विनयच्या आयुष्याची दिशा बदलली. त्याने स्वतःच्या मनाला ठामपणे बजावले.”आता इथून पुढे फक्त माझी पत्नी, माझी मुले—अर्णव आणि अनन्या! बाकी कोणासाठीही स्वतःचा बळी द्यायचा नाही.’
अर्णव पुण्याला गेला. त्याने प्रचंड मेहनत केली. त्याचा कोर्स अत्यंत यशस्वीपणे पूर्ण झाला आणि त्याच्या कौशल्यामुळे त्याला थेट एका नावाजलेल्या परदेशी कंपनीत (MNC) खूप चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली—ज्याचे पॅकेज सुमितच्या पगारापेक्षाही दुप्पट होते!
काही महिने उलटले. विनयच्या घरातील वातावरण आता खूप प्रसन्न आणि शांत होते. अर्णवला नोकरी लागल्याने घराची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. अनन्याही आता चांगल्या महाविद्यालयात शिकत होती. विनयने आता गावी पैसे पाठवणे पूर्णपणे बंद केले होते.
दरम्यान, गावी नरेशच्या घरात एक नवीन संकट उभे ठाकले.
लहान मुलगा अमित याने इंजिनिअरिंग पूर्ण केले होते, पण त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. सुमितने पुण्यात स्वतःच्या संसारात आणि चैनीच्या आयुष्यात अमितला किंवा नरेशला मदत करणे सोडून दिले होते. सुमितची पत्नी अमितला स्वतःच्या घरात ठेवायला तयार नव्हती.
त्यातच, अमितला एका खाजगी संस्थेतून एक मोठा प्रोफेशनल डिप्लोमा करायचा होता, ज्याची फी आणि पुण्यात राहण्याचा खर्च मिळून सुमारे एक लाख रुपये अचानक लागणार होते. नरेशने सुमितकडे पैसे मागितले.
“बाबा, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. माझे स्वतःचे होम लोनचे हप्ते आहेत, कारचे हप्ते आहेत आणि आमची युरोप टूर प्लॅन झाली आहे. मी अमितला एवढे पैसे देऊ शकत नाही,” सुमितने स्पष्ट शब्दांत बापाला सांगून फोन ठेवून दिला.
नरेशच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या सुमितचा त्याला एवढा गर्व होता, ज्या सुमितसाठी त्याने लहान भावाला सुनावले होते, तोच सुमित आज स्वतःच्या भावासाठी आणि बापासाठी एक रुपया काढायला तयार नव्हता!
आता नरेशसमोर एकच पर्याय उरला होता—विनय! नरेशला आता विनयच्या औदार्याची आणि त्यागाची आठवण झाली. पूर्वी जेव्हा जेव्हा कसलीही पैशांची गरज पडायची, तेव्हा विनय एका शब्दात पैसे उभे करायचा.
एक दिवस दुपारी, नरेश थेट विनयच्या शहरातल्या घरी पोहोचला.
दाराची कडी वाजली. अनुराधाने दार उघडले. दारात नरेशला पाहून तिला धक्काच बसला. नरेशचा चेहरा सुकला होता, कपडे मळलेले होते आणि चेहऱ्यावर एक प्रकारची लाचारी होती.
“अरे… दादा? या, आत या,” अनुराधाने शिष्टाचाराने बोलावले.
विनय हॉलमध्येच बसून वर्तमानपत्र वाचत होता. नरेशला पाहून तो उठला, पण त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा आदर किंवा आपुलकीचा उत्साह नव्हता. अत्यंत शांत आणि कोरड्या चेहऱ्याने विनयने विचारले,
“बोल दादा, कसा काय येणे केलेस?”
नरेश सोफ्यावर बसला. त्याने पाण्याचा पेल्याला हात लावला नाही. तो मान खाली घालून बसला होता.
“विनय…” नरेशचा आवाज कापत होता, “मला… मला तुझी खूप मोठी मदत हवी आहे.”
“कसली मदत?” विनयने अत्यंत शांतपणे विचारले.
“अरे विनय… अमितचे इंजिनिअरिंग झालेय, पण त्याला नोकरी नाही. आता त्याला एक नवीन कोर्स करायचा आहे. त्याला एक लाख रुपयांची खूप गरज आहे. सुमितने हात वर केले आहेत. तो मदत करत नाहीये. विनय… तूच अमितचा लहान काका आहेस. तू नेहमी त्याच्या शिक्षणाचा खर्च केलायस. या वेळीही तूच अमितला सावरू शकतोस. प्लीज मला एक लाख रुपये दे ना… मी शेतीचा माल विकल्यावर हळूहळू परत करेन.”
नरेश याचना करत होता. त्याचे डोळे पाणावले होते. विनयने वर्तमानपत्र घडी घालून बाजूला ठेवले. तो नरेशच्या डोळ्यांत डोळे घालून पाहू लागला. हॉलमध्ये क्षणभर भयानक शांतता पसरली. अनुराधा एका कोपऱ्यात उभी राहून पाहत होती.
विनयने हळूच श्वास घेतला आणि अतिशय संयमित, पण खडकासारख्या कडक आवाजात म्हणाला.
“माफ कर दादा… मी तुला एवढे पैसे देऊ शकत नाही.”
“विनय! हे तू काय बोलतोयस? अमित तुझा भाचा आहे ना? तू त्याचा लहानपणापासून खर्च केलायस…” नरेशने धक्का बसल्यासारखे वर पाहिले.
“हो दादा, मी लहानपणापासून सुमित आणि अमितचा खर्च केला. पण तूच मला काही महिन्यांपूर्वी एका गोष्टीची आठवण करून दिली होतीस ना? तू म्हणाला होतास की—’मुलांसाठी करणे हे माझे कर्तव्य होते, मी कसलेही उपकार केले नाहीत!'” विनय म्हणाला.
हे ऐकून नरेशचा चेहरा पांढरा पडला.
विनय पुढे म्हणाला,
“दादा, मी माझे ते ‘कर्तव्य’ सुमित आणि अमितचे ग्रॅज्युएशन होईपर्यंत प्रामाणिकपणे पार पाडले. आता माझी ती ‘ड्यूटी’ संपली आहे! आता माझी खरी कर्तव्ये माझ्या स्वतःच्या मुलांकडे—अर्णव आणि अनन्याकडे आहेत. माझ्या अर्णवला जेव्हा तुमच्या सुमितच्या मदतीची गरज होती, तेव्हा तुम्ही त्याला ‘अडचण’ म्हणून मदत करायला नकार दिला होतात.
आज माझ्याकडे जे काही पैसे आहेत, ते मी माझ्या अर्णवच्या आणि अनन्याच्या भविष्यासाठी साठवले आहेत. मी आता एका पैशाचीही मदत करू शकत नाही.”
नरेशच्या डोळ्यातून आता घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याला त्याच्या अहंकाराची, स्वामित्वाची आणि वागण्याची अत्यंत क्रूरपणे जाणीव झाली होती.
“विनय… मला माफ कर रे! मी चुकलो,” नरेश हात जोडून म्हणाला.
“माझा अहंकार आणि सुमितचा स्वार्थ याने माझे डोळे झाकले होते. तू आमच्यासाठी काय केलेस, याची किंमत मला आज कळतेय. सुमितने मला आणि अमितला उघड्यावर पाडले रे! मला माझी चूक कळाली आहे.”
विनय उठून उभा राहिला. त्याने नरेशच्या जोडलेल्या हातांवर आपला हात ठेवला.
“दादा… मी तुझ्यावर राग धरलेला नाही. तू माझा मोठा भाऊ आहेस आणि मी तुझा आदर करतो. पण नात्यांची व्याख्या जेव्हा फक्त पैशांवर आणि सोयीवर ठरते, तेव्हा तिथे त्याग करायला सीमा असावी लागते. मी अमितला शुभेच्छा देतो, पण आर्थिक मदत करणे आता माझ्या आवाक्याबाहेर आहे. तू सुमितशी पुन्हा बोल, तो त्याचा सख्खा भाऊ आहे. त्याला त्याच्या कर्तव्याची आठवण करून दे.”
नरेशजवळ आता बोलण्यासारखे काहीही उरले नव्हते. ज्या भावाला त्याने ‘उपकार केले नाहीत’ म्हणून हीणवले होते, त्याच भावाच्या दारात आज त्याला आपल्या स्वार्थीपणाचा आरसा दिसला होता.
नरेश काही न बोलता, मान खाली घालून, अत्यंत जड पावलांनी त्या घरातून बाहेर पडला.
दारात उभा राहून विनयने दादाला जाताना पाहिले. विनयच्या मनावर वर्षानुवर्षे साचलेले दडपण आज पूर्णपणे निघून गेले होते. त्याला आज खऱ्या अर्थाने हलके वाटत होते.
मागाहून अनुराधा आणि अर्णव बाहेर आले. अर्णवने बापाच्या खांद्यावर हात ठेवला. विनयने अर्णव आणि अनुराधाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आता कसलीही खंत नव्हती, तर एक तृप्त आणि स्वाभिमानी स्मितहास्य होते.
नात्यांमध्ये निस्वार्थ प्रेम आणि त्याग असणे सुंदर आहे, पण जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या त्यागाला ‘कर्तव्य’ मानून त्याचा अनादर करू लागते, तिथे स्वतःच्या स्वाभिमानाची आणि स्वतःच्या कुटुंबाची सीमा आखणे हेच खरे आत्मभान ठरते.
समाप्त.
ही कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा 😊 आणि अशाच काही हृदयस्पर्शी कथा इथे वाचा 👇
©® आरती निलेश खरबडकर.