विशाखा नंदनवन सोसायटी मध्ये नवीनच राहायला आलेली होती. विशाखाच्या कुटुंबात ती, तिचा लहान भाऊ आणि तिचे आई बाबा असे चौघेजण होते. अगदी लहान कुटुंब. विशाखा एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत होती.
विशाखाच्या वडिलांचे त्यांच्या गावी एक छोटेसे दुकान होते. पण त्यांच्या वारंवार आजारी पडल्याने ते दुकान बरेचदा बंदच असायचे. आणि आता तर विशाखा नोकरीला लागल्यावर तिने त्यांना हट्ट करून तिच्याबरोबर शहरात राहायला आणले होते.
विशाखाचा भाऊ रोहित इंजिनिअरिंगला होता. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी विशाखावरच होती. आणि विशाखाने सुद्धा ती जबाबदारी अगदी आनंदाने स्वीकारली होती.
नंदनवन सोसायटी तशी बरीच जुनी सोसायटी होती. तिथे अनेक ज्येष्ठ नागरिक राहायचे. विशाखाला वाटले की तिच्या बाबांना त्या सर्वांची छान सोबत होईल. विशाखाने मोठ्या हौसेने घराचे इंटेरियर डिझाईन करून घेतले होते. घरी राहायला येण्याआधी घरात छान पूजा केली होती.
विशाखाच्या शेजारी जोशी काका राहायचे. जोशी काकांच्या घरी फक्त ते आणि त्यांची बायको हे दोघेच असायचे. त्यांना एक मुलगा होता. तीदेखील नोकरी निमित्ताने परदेशी स्थायिक झाला होता. अधून मधून त्यांच्या भेटीसाठी भारतात येई.
त्यांची विशाखाच्या घरच्यांशी थोडी ओळख झाली होती. जोशी काका आणि काकू अधूनमधून विशाखाच्या घरी यायचे. तेव्हा जोशी काका विशाखाला बऱ्याच सूचना करायचे. काही काम असले तर ते अगदी निसंकोच आम्हाला सांगायचे असे म्हणायचे. विशाखा सुद्धा हसून हो म्हणायची.
पण प्रत्यक्षात मात्र तिने सोसायटीमध्ये कधीच कोणाला काही काम सांगितले नाही वा कसलीही मदत मागितली नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ती स्वतःच जातीने लक्ष देऊन करवून घ्यायची.
विशाखाच्या घरापासून अगदी थोड्या अंतरावर एक नाला होता. त्याचा तसा त्यांना काही विशेष त्रास नव्हता पण पावसाळ्यात मात्र खूप पंचाईत व्हायची. शिवाय त्यामुळे मच्छर सुद्धा व्हायचे. सोसायटी मध्ये बऱ्याच जणांनी त्या नाल्याचे काम करून घेण्याचा प्रयत्न केला होता पण नाल्याचे काम अजूनही झाले नव्हते.
विशाखाने सुद्धा त्या नाल्याचे काम करवून घ्यायचे ठरवले. तिने महानगरपालिकेला त्याबाबत निवेदन दिले. आणि त्या कामाचा पाठपुरावा केला. आणि तिच्या सुदैवाने अवघ्या दोन महिन्यात त्या कामाला मंजुरी मिळाली. आणि तिच्या घरासमोरील नाल्याचे बांधकाम सुरू झाले.
त्या नाल्याचे बांधकाम सुरू झाल्यामुळे विशाखा खुश होती. पण त्या सोसायटी मधील काही लोकांना मात्र हे आवडले नाही. कारण त्यांनी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांना हे जमले नव्हते आणि विशाखाने मात्र अवघ्या काही दिवसातच हे करून दाखवले होते.
जे आपल्यापैकी कोणत्याही मातब्बर मंडळींना जमले नाही ते एका मुलीने करून दाखवले यामुळे त्यांचा पुरुषी अहंकार दुखावला गेला. शिवाय ती तिच्या घरातील आणि बाहेरील कामे अगदी चांगल्या प्रकारे पार पाडायची. आणि कधीच सोसायटी मधल्या लोकांची मदत मागायची नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी काही लोकांचा विशाखावर रोष निर्माण झाला. शेजारचे जोशी काका हे सुद्धा त्यांच्यापैकीच एक होते. त्यांनाही वाटायचे की विशाखा त्यांना योग्य तो मान देत नाही आणि त्यांच्या सूचना धुडकावून लावते.
त्यामुळे काही लोकांनी मुद्दाम तिच्याबद्दल वाईट बोलू लागले. विशाखा उद्धट आहे, ती थोरामोठ्यांना मान देत नाही, कोणत्याही बाबतीत विचारत नाही, स्वतःला अती शहाणी समजते वगैरे वगैरे. विशाखाचे वडील जेव्हा सोसायटी मध्ये बाहेर पडायचे तेव्हा मुद्दाम त्यांच्या कानावर मुलींच्या कमाईवर जगतात, स्वतः काहीच करत नाही अशी कुजबूज करायचे.
जोशी काका सुद्धा त्यांच्यापैकीच एक होते. त्यांनी विशाखाच्या घरच्यांशी बोलणेच सोडले होते. किंवा जेव्हा केव्हा बोलायचे तेव्हा आडून आडून त्यांना टोमणे मारायचे. विशाखाच्या घरच्यांना वाईट वाटायचे पण विशाखा त्यांना समजवायची की सर्व काही ठीक होईल आणि पुन्हा सर्व पूर्ववत होईल म्हणून.
असेच काही दिवस गेलेत. विशाखा आपल्या ऑफिसच्या आणि घरच्या कामात व्यस्त असायची. त्यामुळे सोसायटीच्या लोकांकडे लक्ष द्यायला तिला पुरेसा वेळ मिळत नसे. त्यामुळे कोणी तिला काही टोचून बोलले तरीही ती फक्त हसून तिथून निघून जायची.
एकदा जोशी काकू त्यांच्या पायरीवरून खाली पडल्या. त्याच्या पायाला बराच मार लागलेला होता. अगदी त्या उठूही शकत नव्हत्या. नेमकं त्यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हतं. विशाखा ऑफिसला जाण्याची तयारी करत होती. तिने जोशी काकूंचा आवाज ऐकला आणि ती धावतच त्यांच्या घरी गेली. तिच्या पाठोपाठ तिचे आईवडील सुद्धा जोशी काकूंकडे गेले.
विशाखाने जोशी काकूंना आधार देऊन त्यांना आधी नीट बसवले. मग जोशी काकांना फोन करून घरी बोलावून घेतले. जोशी काकांना घरी यायला वेळ लागणार होता. तोपर्यंत काकूंना असेच घरी ठेवणे बरे नाही असे म्हणत विशाखाने फोन करून कॅब बोलावली आणि तिच्या आईवडिलांच्या मदतीने जोशी काकूंना घेऊन ती सरळ दवाखान्यात जायला निघाली. तिने जोशी काकांना सुद्धा सरळ हॉस्पिटलला यायला सांगितले.
काकूंच्या पायाला सौम्य फ्रॅक्चर झाले होते. महिनाभरासाठी पायाला प्लास्टर बांधले होते. आणि डॉक्टरांनी त्यांना सक्तीने आराम करायचे सांगितले होते.
जोशी काका हॉस्पिटलला आले आणि सगळ्या औचारिकता पूर्ण करून काकूंना घरी घेऊन आले. घरी गेल्यावर घरातील सर्व कामे जोशी काकांना करावी लागणार होती. पण इतकी वर्ष घराच्या कामांना त्यांनी हात देखील लावला नव्हता. त्यामुळे त्यांनी घरातील काही कामांसाठी एक कामवाली ठेवली होती. पण तरीही बरीच कामे ते स्वतःच करायचे.
विशाखा अधूनमधून जोशी काकूंना भेटायला जायची. जाताना कधी त्यांच्यासाठी भाजी किंवा काहीतरी नवीन पदार्थ घेऊन जायची. त्यांना कामात मदत करायची. त्यांच्याशी गप्पा मारायची. त्यांची विचारपूस करायची. विशाखा चे आईवडील सुद्धा अधून मधून जाऊन काकूंची चौकशी करायचे. जोशी काकूंना आता विशाखा आणि तिच्या घरच्यांचा फार आधार वाटायचा.
जोशी काकांना देखील विशाखाचा चांगुलपणा कळून चुकला होता. आपण या मुलीच्या बाबतीत थोड चुकीचं वागलो याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी विशाखाची माफी मागायची ठरवले. एके दिवशी जोशी काकू आणि विशाखाच्या आई वडिलांच्या उपस्थितीत ते विशाखाला म्हणाले…
” बाळा, मला माफ कर…मी तुझ्याशी चुकीचा वागलो ग…तू एक मुलगी असून सुद्धा सगळ्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडतेस…मी मात्र तुला अती शहाणी समजलो होतो…पण मी चुकीचा होतो…तू अतीशहाणी नाहीस तर कर्तृत्ववान आहेस…आणि त्यासोबतच नम्र सुद्धा आहेस…पण मी मात्र इतका मोठा असूनही समजूतदारपणा दाखवला नाही…तू मात्र कुठलीही गोष्ट मनात न ठेवता आम्हाला मदत केलीस…ती सुद्धा चांगल्या मनाने…”
” माफी कसली मागताय काका…तुम्ही मला वडीलांप्रमाणे आहात…माझं काही चुकलं असेल तर मला ओरडण्याचा हक्क आहे तुम्हाला..आणि राहिली गोष्ट मदत करण्याची तर मला माहिती आहे की हेच जर काकूंच्या ऐवजी आमच्या घरात कुणाच्या बाबतीत घडले असते तर तुम्हीसुद्धा हेच केले असते… मला तुमचा कधीही राग आलेला नाही… यापुढेही मी कुठे चुकत असेल तर मला हक्काने सांगा…आणि तुमचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत असू द्या……” विशाखा म्हणाली.
काकांनी अगदी प्रेमाने विशाखा च्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला आशीर्वाद दिला…
” खूप मोठी हो बाळा…नेहमी सुखी राहा…”
आणि तेव्हापासून ह्या दोन घरातील मतभेद कायमचे संपले. गैरसमजाचे मळभ दूर झाले. आधीचे शेजारी आता सख्खे शेजारी बनले. ते आता विशाखा ला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानतात. तिचे कधी चुकले असे वाटले तर हक्काने ओरडतात. अजूनही जोशी काका विशाखाला सूचना देत असतात पण विशाखा त्या ऐकल्या नाहीत तर त्यांना राग मात्र येत नाही…
क्रमशः
©आरती निलेश खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला लाईक करा.
खूप छान
धन्यवाद