मृणाल घाईघाईने तयारी करत होती. तिने आधी मुलाला नीट तयार केले आणि मग तिची तयारी आटोपली. तिने छान निळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर मॅचींग कानातले शोभून दिसत होते. चेहऱ्यावर हलकासा मेक अप आणि लांब केसांच्या वेणीत छानसा गजरा माळला होता. लहानगा अबीर बाबांची वाट पाहत होता. तेवढ्यात दाराची बेल वाजली. मृणालने दार उघडले. महेश आत आला आणि मृणाल ला पाहून म्हणाला.
” इतकी तयारी कशाची केली आहे… कुठं बाहेर जाणार आहेस का..?”
” अहो विसरलात का..?…आपल्याला आज विनय भाऊजी च्या घरी पार्टीला जायचंय…आज त्यांच्या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस नाही का…विनय भाऊजी स्वतःच निमंत्रण देऊन गेले ना तुम्हाला परवा…” मृणाल म्हणाली.
” हो मला माहिती आहे…मी जाणार सुद्धा आहे…पण एकटाच…तू कशाला उगाच दगदग करतेस…अबीर ला पण बोअर होईल खूप…तू घरीच थांब… मी येतो जाऊन…” महेश थंडपणे म्हणाला.
” अहो पण त्या दिवशी भाऊजी खूप आग्रह करत होते की जोडीने या म्हणून…आणि तुम्हीसुद्धा हो म्हणाला होतात…” मृणाल म्हणाली.
” मी त्याला असच म्हणालो होतो…आणि मी त्याला सांगून देईल तुला बर वाटत नाही म्हणून तू आली नाहीस..” महेश म्हणाला.
” पण मी तयार झालेली आहे आता आणि अबीर पण खूप दिवसांपासून कुठे बाहेर गेला नाही…तेवढंच जरा त्यालाही बरं वाटेल बाहेर जाऊन…” मृणाल म्हणाली.
” काय तयार झाली आहेस…ही काठा पदराची साडी…वेणीत गजरा…नेहमीचा तुझा तो गबाळा अवतार…पार्टीसाठी असं कोण तयार होतं…कधीतरी स्वतःला नीट आरशात बघ…वजन किती वाढलंय…नुसती फुगत चालली आहेस…तुला सोबत घेऊन पार्टीत मिरवायची लाज वाटते मला…त्यापेक्षा तु घरीच बरी आहेस…मी एकटाच जाऊन येतो पार्टीला…”
एवढे बोलून महेश तयारी करायला आत निघून गेला…आपण आता काय बोललो ह्याची जराही जाणीव त्याला नव्हती. त्याचा शब्द न शब्द मृणाल च्या जिव्हारी लागला होता. महेश तिच्याबद्दल असा विचार करतो हे तिला आजच कळलं होतं. ती सुन्न डोक्याने सोफ्यावर बराच वेळ बसून होती.
महेश मात्र त्याची तयारी आटोपून एकटाच पार्टीला निघून गेला. जाताना त्याने मृणालकडे लक्षही दिले नाही. आपण काहीतरी वाईट बोललो आहोत ह्याची त्याला पुसटशी जाणीव देखील नव्हती.
महेश निघून गेल्यावर तिने अबीर साठी खायला बनवले. जेवण करून अबीर झोपी गेला. पण मृणालला मात्र जेवायची अजिबात इच्छा नव्हती. तिच्या डोक्यात सतत विचार येत होते.
तिला जुने दिवस आठवत होते. लग्नाच्या पहिल्या रात्री जेव्हा तिने महेशला विचारले होते की त्याला तिच्यामध्ये नेमके काय आवडले होते तेव्हा तो म्हणाला होता की ” मला तुझा साधेपणा खूप आवडला. आणि तेव्हापासून त्याला आवडते म्हणून ती साधीच राहायची. त्याच्या आवडीचा विचार करून तिने स्वतःला कधीच बदलण्याचा प्रयत्न केला नाही.
पण आज मात्र त्याच्याच आवडी बदलल्या होत्या. आजपर्यंत ज्या बायकोचा साधेपणा त्याला आवडायचा आज तीच त्याला गबाळी वाटत होती. इतकी गबाळी की तिला कुठे सोबत घेऊन जायची देखील त्याला लाज वाटतेय.
मृणालला आज जुने प्रसंग आठवत होते. अबीरच्या जन्मानंतर तिला स्वतःकडे लक्ष द्यायला जमलेच नव्हते. आधी महेश आणि आता अबीर हे दोघेच तिचे जग होते. ह्या दोघांनी तिचे जग इतके व्यापून टाकले होते की स्वतःचा विचार करायला देखील तिच्याकडे वेळ नव्हता. आणि बाळंतपणानंतर वजन सुद्धा वाढलं होतं. पण मृणालने वाढत्या वजनाकडे सुद्धा लक्ष दिले नाही.
पण मृणालला आता तिची चूक लक्षात आली होती. तिने स्वतःचा विचार न करता सतत महेशला काय आवडेल ह्याचाच विचार केला होता आणि त्यानुसार वागत होती. पण आपण आपल्या नवर्यासाठी सर्वकाही करूनदेखील त्याला आपली काडीची ही किंमत नसेल तर तसे वागून उपयोग तरी काय.
तिने आता ठरवले होते की आतापासून तिला महेश आणि अबीर सोबत स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे. स्वतःच्या आवडीनिवडी जपायच्या आहेत. स्वतःला वेळ द्यायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशीपासून तिने तिचा विचार अमलात आणायला सुरुवात केली.
तिने घरकामात मदतीला एक बाई सांगितली. आणि तिच्या उरलेल्या वेळेत ती अबीर आणि स्वतःकडे लक्ष द्यायला लागली. तिने घरी योगा करायला सुरुवात केली.
ती आता रोज नियमितपणे वॉकिंग करायला बागेत जायची. ती तिच्या आवडीची पुस्तके वाचायची.
तिला लग्नाआधी डान्स करायला खूप आवडायचा पण लग्नानंतर तिला कधी वेळच मिळाला नव्हता. आता मात्र ती निवांत वेळेत मनमोकळेपणाने थिरकायची. हळूहळू मृणाल मध्ये बदल व्हायला लागला होता. तिच्यातला आत्मविश्वास हळूहळू वाढत होता.
नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे तिला तिचे वाढलेले वजन कमी व्हायला मदत झाली. आणि तिच्यातल्या आत्मविश्वासाने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती. आता तिने तिच्या राहणीमानात देखील थोडा बदल केला होता. मितभाषी असलेली मृणाल हळूहळू खुलत होती. जुन्या मैत्रिणींशी स्वतःहून बोलत होती. नवीन मैत्रिणी बनवत होती.
तिच्यातला बदल हळूहळू महेशच्या लक्षात आला. पण त्याच्या कटू बोलण्यामुळे मृणालमध्ये हा बदल झाला होता ह्या गोष्टींपासून तो अनभिज्ञ होता. मात्र या बदललेल्या मृणाल ला पाहून तो आनंदी होता.
एकदा महेश संध्याकाळी कामावरुन घरी परतल्यावर मृणाल ला पाहून तो चकित झाला. गुलाबी रंगाच्या वनपिस मध्ये मृणाल खूप सुंदर दिसत होती. त्यावर मोकळे सोडलेले तिचे लांब केस तिचे सौंदर्य आणखीनच खुलवत होते. महेशची नजर मृणालवरून हटत नव्हती. तिला तयार झालेले पाहून त्याने विचारले..
” कुठे बाहेर जात आहेस का..?”
” हो…मैत्रिणीच्या घरी जात आहे…आज तिचा वाढदिवस आहे…तिच्या घरी छोटीशी पार्टी आहे…दोन तासात जाऊन परत येईल…अबीर ला पण सोबत घेऊन जात आहे…तुमचा स्वयंपाक करून ठेवला आहे…गरम करून जेवून घ्याल…” मृणाल म्हणाली.
” थोडी थांब…मी पण येतो तुझ्या सोबत…एकटी कशी जाशील इतक्या दूर..” महेश म्हणाला.
” इथे बाजूच्याच सोसायटीत आहे तिचे घर…आम्ही जाऊ व्यवस्थित…तुम्ही आताच आला आहात…दमला असाल…मी येते जाऊन…” मृणाल म्हणाली.
” पण मी म्हणतोय ना की सोबत येतो म्हणून…” महेश मोठ्या आवाजात म्हणाला.
” तुम्हाला आठवतंय का मी पण एकदा असंच म्हणाले होते की तुमच्या सोबत बाहेर येते म्हणून…तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात ते आठवते का..?
तुम्ही म्हणाला होतात की एकदा स्वतःला आरशात बघ…तू खूप गबाळी आहेस… जाड आहेस… मला तुला सोबत घेऊन जायची लाज वाटते म्हणून…
आज मी तुम्हाला म्हणत आहे…तुम्ही पण स्वतःला एकदा आरशात बघा…डोक्यावर मोजता येतील एवढेच केस शिल्लक आहेत…पोटाचा घेर देखील सुटलाय…मलासुद्धा माझ्या मैत्रिणी मध्ये तुम्हाला मिरवायची लाज का वाटू नये मग..” मृणाल म्हणाली.
आणि महेशला त्याचे बोलणे आठवले. आपण त्यावेळी किती चुकीचे वागलो होतो ह्याचे त्याला वाईट वाटले. बायकोच्या दिसण्यावरून तिला वाट्टेल ते बोललो ह्याचे महेशला वाईट वाटले.
नुसती शरीरावरून तिची पारख केली पण तिच्या मनात आपल्याबद्दल किती प्रेम आणि समर्पण आहे ह्याची जाणीव मात्र ठेवली नाही ह्याचे त्याला वाईट वाटले. आपण किती स्वार्थी झालो होतो हे त्याला कळून चुकले. तो मृणालला म्हणाला…
“मला माफ कर…माझे खरंच चुकले…मी तुला वाट्टेल ते बोललो…मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे…तू मला सोबत घेऊन मिरवाव ह्या लायकीचा मी नाहीये…तू जा मी थांबतो घरीच…” महेश म्हणाला.
” तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली हीच माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे…आता जा आणि लगेच तयार व्हा…तुमचे कपडे वर काढून ठेवलेत…अर्ध्या तासात आपल्याला निघायचं आहे…लवकर तयार व्हा..” मृणाल म्हणाली.
” मग तू आधी जे काही बोललीस ते काय होतं..” महेश प्रश्नार्थक मुद्रेने मृणालकडे पाहत म्हणाला.
” म्हटलं जरा तुम्हालाही जाणीव करून द्यावी…आपल्या जोडीदाराने आपल्या दिसण्यावरुन आपल्याला हिणवले की कसे वाटते…बाकी कसेही दिसलात तरी माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे…आणि तुमच्या डोक्यावर केस नसले आणि तुमचे सर्व दात पडले तरीही माझे तुमच्यावरील प्रेम कधीच कमी होणार नाही…”
मृणाल ने असे म्हणताच न राहवून महेशने तिला मिठीत घेतले. आणि त्या मिठीत दोघांचे रुसवे फुगवे देखील आपोआप विरघळून गेले.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करा.
Khup chaan story 😊…etranna japta japta swtahkade lksh dyayla apan visrto pan ychi kimmat samorchyla asyala havi