मानसीचे बोलणे ऐकून मयंक ला धक्काच बसला. त्याला वाटले होते की मानसी थोडी रागवेन पण आपण तिला समजावून सांगू. पण मानसी इतक्या टोकाचा निर्णय घेईल ह्याचा त्याने विचारच केला नव्हता. ती रागाने तिथून निघून जायला लागली. मयंकने तिला थांबवायचा प्रयत्न केला पण ती थांबली नाही.
मानसी अशी वागेन अशी अपेक्षा मयंक ला नसल्याने मयंक आधी निर्धास्त होता पण ती त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यावर मात्र त्याला तिची खूप आठवण यायला लागली होती. त्याने तिला कॉल, मेसेजेस केले पण तिने कशालाही रिप्लाय दिला नाही. मयंक ला रात्रंदिवस मानसीच आठवायची. एव्हाना त्याचं लक्ष कशातच लागेना. त्याच्या घरच्यांना सुद्धा त्याच्या वागणुकीतील बदल लक्षात येत होता. पण हा ह्याच्या मनातलं कुणाला सांगत देखील नव्हता.
इतक्यात एके दिवशी त्याच्या भावाने त्याला विचारलेच…
” काही झालंय का मयंक…तू आजकाल उदास वाटतोस…सगळं काही ठीक आहे ना..”
” हो दादा…मी ठीक आहे…जरा कामाचं प्रेशर होतं म्हणून…” मयंक चेहऱ्यावर उसने हसू आणत म्हणाला.
” कामाचं जास्त टेंशन घ्यायचं नाही मयंक…कोणताही प्रश्न शांत डोक्याने सोडवला तर तो लवकर सुटतो…” दादा म्हणाला.
” हो दादा…मी लक्षात ठेवेन…” मयंक म्हणाला.
” दॅट्स लाईक अन् गूड बॉय…चल मी येतो…तुझ्या वहिनीला आणायला चाललोय तिच्या माहेरी…मी आणायला नाही गेलो तर आणखी आठ दिवस घरी यायचं नाव घेणार नाही ती…” दादा म्हणाला.
” दादा…तुला एक विचारू का..?” मयंक म्हणाला.
” विचार ना…”
” तुला नाही वाटत का की वहिनी तिच्या माहेरी आठ दिवस जास्त राहिली तर तू इथे शांततेने राहू शकशील…”
” असं काहीच नाही…तुझ्या वहिनी शिवाय मला इथे करमत नाही आणि मला माहिती आहे की तिला सुद्धा मला सोडून जात दिवस तिथे करमत नाही…” दादा म्हणाला.
” पण तुम्ही तर फक्त भांडणेच करत असता ना घरी…” मयंक म्हणाला.
” वेडा कुठला…त्याला भांडणे म्हणायची का…नवरा बायकोे म्हटले की अशी छोटी छोटी भांडणे चालायचीच…ह्यातूनच नाती आणखी घट्ट होतात…जिथे प्रेम असतं तिथे ही छोटी मोठी भांडणे होतातच…आणि खर सांगू का…भांडण झाल्यावर तिचा लटका राग घालवतो तेव्हा पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडतो… ती आहे म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे…आता तर तिच्या सोबती शिवाय आयुष्याची कल्पना सुद्धा करवत नाही…” दादा हसत म्हणाला.
” म्हणजे…तुला ह्या भांडणाचा काहीच त्रास होत नाही…?” मयंक ने विचारले.
” नाही…कारण मला माहिती आहे की ती जे काही बोलते ते फक्त माझ्या काळजीपोटी बोलते…माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी ती मला सतत स्वतःची काळजी घ्यायला सांगते…आणि की जेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यावरून ती माझ्याशी भांडते तेव्हा तिच्या प्रत्येक शब्दातून मला तिच्या माझ्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव होते…” दादा म्हणाला.
दादाचे बोलणे ऐकून मयंक विचारात पडला. त्याने किती चुकीचा विचार केला होता दादा आणि वहिनीच्या नात्याबद्दल. त्याने फक्त तेच पाहिलं जे त्याला दिसत होतं. पण त्यामागचं कारण कधीच त्याने समजून घेतलं नाही. आणि फक्त त्यावरूनच त्याच्या मनात लग्नाबद्दल भीती निर्माण झाली होती. आपण किती चुकीचे आहोत ह्याची जाणीव त्याला झाली होती. आपल्या चुकीच्या समजुती मुळे आपण मानसीला गमवायला निघालो होतो हे त्याच्या लक्षात येऊन त्याला स्वतःचाच राग आला.
त्याने वेळ न दवडता लगेच मानसीला कॉल लावला आणि नेहमीप्रमाणे तिने त्याच्या ह्या कॉलला देखील उत्तर दिले नाही. त्याच्या लक्षात आले की ही वेळ तिच्या ऑफिस सुटण्याची आहे. तो लगेच तिच्या ऑफिस कडे जायला निघाला. तो तिच्या ऑफिसच्या बाहेर पोहचला आणि तिची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही म्हणून ह्याने ऑफिस मध्ये जाऊन तिची चौकशी केली. तेव्हा समजलं की घरी काहीतरी कार्यक्रम असल्याने तिने ऑफिसमधून दोन दिवसांची सुट्टी घेतलीय.
ती भेटली नाही म्हणून तो थोडा उदास झाला. आणि दुसऱ्याच क्षणी त्याने तिच्या घरी जाण्याचा विचार केला. त्याला माहिती होते की तो समोर गेल्यावर ती त्याच्यावर चिडेल. त्याच्याशी भांडण करेल. पण तो आज तिचे सारे काही ऐकायला तयार होता.
तो लगेच तिच्या घरी जायला निघाला. मनात विचार सुरूच होते. घरी कार्यक्रम आहे म्हणजे नेमकं काय असेल. हिचं लग्न तर ठरलं नसेल ना. मी खूप उशीर तर केला नाही ना ह्या विचारांनी तो बेचैन झाला होता. त्याही परिस्थितीत तो वेगाने बाईक चालवत होता. त्याला वाटत होते की कधी एकदा मानसी ला पाहतो आणि कधी तिची माफी मागतो.
तो तिच्या घराबाहेर पोहचला आणि समोरचे दृश्य पाहून तो मनातून थोडा घाबरलाच. तिचे घर आज आतून बाहेरून खूप चांगले सजवले होते. बहुधा कार्यक्रम संपला असावा ह्याचा त्याने अंदाज बांधला. काही पाहुणे निघून गेले होते तर काही पाहुणे अजूनही घरातच होते. त्याची नजर सैरभैर होऊन फक्त मानसी लाच शोधत होती.
आणि त्याला ती दिसलीच. छान सजलेली. अंगावर निळ्या रंगाची गुलाबी काठ असलेली साडी, हातात त्यावर मॅचिग बांगड्या, केसांची छान वेणी घातली होती आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा लावलेला होता. कपाळावर चंद्रकोर आणि गालावर पडणारी खळी तिचे सौंदर्य खुलवत होती. तिला पाहून तो काहीसा मंत्रमुग्ध झाला होता. ती त्याला आजवर इतकी सुंदर कधीच वाटली नाही.
इतक्यात तिने ह्याला आवाज दिल्यावर हा भानावर आला. त्याने तिला एका बाजूला नेले आणि म्हणाला.
” आज घरी काही कार्यक्रम होता का..?”
” तुला काय त्याचे…?” तिने रागातच विचारले.
” तू मला इतक्या लवकर विसरली सुद्धा…?” तो काकुळतीने म्हणाला.
” तू काय बोलतो आहेस मला कळत नाहीय…आणि आधी मला सांग तू इकडे कसा आलास…काही काम होतं का..?” तिने जरा फण काऱ्यानेच विचारले.
” तू मला सोडून इतक्या लवकर साखरपुडा सुद्धा उरकून घेतलास…?” तो म्हणाला.
” माझा नाही… दादाचा साखरपुडा होता आज…” ती अजूनही रागातच होती.
हे ऐकून त्याच्या जीवात जीव आला. त्याने आनंदाने तिला मिठी मारली. काय होतंय हे न कळल्यामुळे ती गप्पच होती. पण त्याच्या मिठीत गेल्यावर तिचा राग कुठल्या कुठे निघून गेला. आपण घराबाहेर उभे आहोत हे लक्षात आल्याने तिने पटकन त्याला बाजूला केले.
” काय हे… असं रस्त्यावर कुणी कुणाला मिठी मारत का…?” ती लटक्या रागाने म्हणाली.
” मला माफ कर…मी तुझं खूप मन दुखावलं ना…पण खर सांगू का…मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही…तुला गमावण्याची च्या कल्पनेनेच जीव खालीवर होत होता…” तो म्हणाला.
” आता सांग नेमकं काय झालंय तुला…?” तिने विचारले.
तो काही बोलायच्या आतच तिचे वडील काही कामाने घराबाहेर आले. ह्याला पाहताच म्हणाले.
” मयंक…तू साखरपुड्याला आला नाहीस…मी मानसी ला सांगितले होते तुला बोलवायला तेव्हा तिने सांगितले की तू कामानिमित्ताने शहरा बाहेर गेला आहेस ते…”
” हो…काहीवेळा साठी दूर गेलो होतो…पण यापुढे कधीच दूर जाणार नाही…” मयंक म्हणाला.
त्याचं बोलणं न कळल्याने तिच्या बाबांनी विचारले…
” म्हणजे…?”
” म्हणजे बाबा मला आज तुम्हाला काहीतरी खूप महत्त्वाचे सांगायचे आहे…” मयंक म्हणाला.
” सांग ना..”
” माझं मानसी वर खूप प्रेम आहे…आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे…आणि त्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे…?” मयंक म्हणाला.
त्याच्या या अनपेक्षित बोलण्याने मानसी ला आश्चर्याचा धक्काच बसला. तिच्या वडिलांना मात्र ह्या दोघांबद्दल थोडीफार कल्पना आधीच असल्याने ते हसत म्हणाले.
” मला तर पहिल्या भेटीतच तू चांगला वाटला होतास…आणि मी तुला जेवढं ओळखतो त्यावरून तू मानसी ला सुखात ठेवशील ह्याची मला खात्री आहे…माझा तुमच्या लग्नाला होकार आहे.”
बाबांच्या तोंडून होकार ऐकून मयंकला खूप आनंद झाला. मानसी हे ऐकून लाजून घरात निघून गेली. मयंक घराबाहेरच तिच्या वडिलांच्या पाया पडला. तिच्या वडिलांनी त्याला मिठी मारली. आणि दोघेही हसत गप्पा करत घरात निघून गेले.
अशाप्रकारे मयंकला लवकरच त्याच्या चुकीची जाणीव झाल्यामुळे त्याने वेळेवरच आपल्या चुकीला दुरुस्त करत आपले प्रेम पुन्हा मिळवले.
समाप्त.
©®आरती खरबडकार.
फोटो – साभार गूगल.
अशाच नवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.
खुपच छान