आज बाहेर घरातील सामानाच्या खरेदीसाठी गेलेली पल्लवी अगदी उत्साहात घरी आली होती. घरी आल्या आल्या तिने हातपाय धुतले आणि सरळ तिच्या पर्स मधील दागिना काढून देवासमोर ठेवला. आणि देवाला मनोभावे नमस्कार केला. त्यानंतर तिच्या सासूबाईंना नवीन दागिना दाखवायला घेऊन गेली. सासूबाईंच्या रूममध्ये जाऊन ती आनंदाने म्हणाली.
” आई…हे बघा…मला आज ह्यांनी हे मंगळसूत्र घेऊन दिलंय…सुंदर आहे ना…?”
तिची सासुबाई मात्र ते मंगळसूत्र एकटक पाहतच बसली. निदान दोन तोळ्याच मंगळसूत्र असेल असे त्यांच्या पारखी नजरेने वरूनच ओळखले. मंगळ सुत्राची डिझाईन सुद्धा खूप सुंदर होती.
” कसे आहे आई मंगळसूत्र…सुंदर दिसतेय ना…?” पल्लवीने पुन्हा विचारले.
” हो…खूप सुंदर आहे…” सासुबाई नकळतच म्हणाल्या.
सासूबाईंना मंगळसूत्र दाखवून झाल्यावर ती आनंदातच मंगळसूत्र घेऊन तिच्या रूम मध्ये निघून गेली. त्या दिवशी पल्लवी खूप आनंदात होती. तिचं लग्न झाल्यावर आज पहिल्यांदा पराग ने स्वतःहून तिच्यासाठी काहीतरी खरेदी केले होते. आणि ते सुद्धा इतके सुंदर मंगळसूत्र. पल्लवी तर आज खूप खुश होती. आनंदातच तिने सगळा स्वयंपाक तयार केला. तिला खुश पाहून परागला सुद्धा खूप आनंद झाला होता.
सर्वजण जेवायला बसले. पल्लवी नुसते आज मंगळसूत्र बद्दल बोलत होती. पराग आणि पल्लवी दोघेही जेवणाच्या टेबल वर बोलत होते पण सासुबाई मात्र आज गप्प होत्या. त्या काही जास्त बोलल्याच नाहीत. पण उत्साहाच्या भरात पल्लवीला ते लक्षातच आले नाही.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र सासुबाई आपल्याशी आधी प्रमाणे बोलत नाहीत हे पल्लावीच्या लक्षात यायला लागले. तिने सकाळी सासूबाईंना चहा दिला पण सासुबाई तिच्याशी काहीच बोलल्या नाहीत. त्यानंतर पल्लवीने त्यांना आज नाश्ता काय बनवू हे विचारले तेव्हा सासुबाई म्हणाल्या होत्या.
” तुझ्या मनाप्रमाणे कर…मला विचारायची काय गरज आहे…?”
हे ऐकून मात्र सासूबाईंच काहीतरी बिनसलंय हे पल्लवीच्या लक्षात आलं. तिने त्यांना विचारले…
” काय झालंय आई…माझं काही चुकलं का…?”
” तुझं कधी काही चुकू शकतं का…तुझ्या जागी तू बरोबरच आहेस हो…शेवटी आहेस तर सूनच ना…तुझे गुणधर्म कशी सोडणार तू…” सासुबाई फणकाऱ्याने म्हणाल्या.
” माझ्या कडून काही चूक झाली आहे का आई…तुम्हाला माझ्या एखाद्या गोष्टीचे वाईट वाटले आहे का… तसे असेल तर बोला मला…माझ्यावर रागवा…पण असा अबोला नका हो धरू आई माझ्याशी…” पल्लवी काकुळतीने म्हणाली.
” आता तुला माझा अबोला सहन होत नाही आहे…पण काल जेव्हा मंगळसूत्र आणायला गेलीस तेव्हा एका शब्दाने तरी विचारले का मला…विचारायचं तर सोड पण सांगितले तरी का मला…?” सासुबाई म्हणाल्या.
” आई…त्यांच्या मनात मला सरप्राइज द्यायचं आहे हे मला अजिबात माहिती नव्हतं…मला माहिती असतं तर मी सांगितलं नसतं का तुम्हाला…ह्यांनी अचानकच दुकानात नेले आणि मंगळसूत्र पसंत करायला सांगितलं…” पल्लवीने सांगितले.
” कालपर्यंत मला विचारल्या शिवाय घरात एक भाजीची जुडी सुद्धा न आणणारा माझा मुलगा मला न विचारता, न सांगता सोन्याची खरेदी करणे शक्य नाही…नक्कीच तूच त्याला माझ्यापासून लपवून खरेदीला घेऊन गेली असशील…तू माझ्या मुलाला माझ्यापासून लांब करायचा प्रयत्न करत आहेस हे काय मला कळत नाही का..”
एवढे बोलून सासुबाई रागातच तिथून निघून गेल्या. पल्लवी मात्र जागच्या जागीच स्तब्ध उभी होती कितीतरी वेळ. तिला विश्वास बसत नव्हता की आपल्या सासुबाई आपल्याला एवढं सगळं बोलून गेल्या. आजवर त्यांनी कशी एका शब्दानेही पल्लवीला दुखावले नव्हते. कधीच सासुरवास देखील केला नव्हता. किंबहुना तो करायला त्यांना तितकासा वेळच मिळाला नव्हता.
ती या घरात सून बनून आली तेव्हा तिचे सासरे आजारी होते. सासूबाईंचा पूर्ण वेळ त्यांची सेवा सुश्रुषा करण्यातच जायचा. पल्लवी आणि परागने सुद्धा त्यांची खूप सेवा केली. दोघी सासू आणि सूना एकमेकींचा आधार बनल्या. घरी परागची बहीण स्नेहापण होती पण ती कॉलेजमध्ये जात असल्याने घरातील जबाबदारी सांभाळायला कोणीतरी हवे म्हणून परागचे लवकर लग्न केले होते.
पुढच्या दोन वर्षात आजारी असणारे पल्लवीचे सासरे वारले आणि त्यांच्या जाण्याच्या दुःखाने तिच्या सासुबाई पार कोलमडून गेल्या. पण पल्लवी आणि परागने त्यांना सावरले. घरातील वडीलधारी व्यक्ती मरण पावल्यानंतर एका वर्षात लग्न करायची पद्धत असल्याने परागच्या बहिणीसाठी स्थळ पाहायला सुरुवात केली होती.
लवकरच स्नेहाला एक चांगले स्थळ चालून आले. मुलगा सुजय चांगला शिकलेला होता. चांगल्या नोकरीवर होता. घरचे सुद्धा खूप चांगले होते. दोन्हीकडून पसंती झाली आणि स्नेहाचे लग्न ठरले. मुलाकडच्यांनी स्नेहाच्या घरच्यांना हुंडा मागितला नव्हता. पण तरीही त्यांच्या घरचे पहिलेच लग्न असल्याने ते चांगले थाटामाटात व्हावे ही मुलाकडच्यांची इच्छा होती.
वडिलांच्या आजारपणात परागवर बरेच कर्ज झाले होते. तरीही त्याने त्याची थोडी बचत स्नेहाच्या लग्नासाठी करून ठेवलेली होती. परागने त्यांच्याकडील सर्व बचत स्नेहाच्या लग्नासाठी खर्ची घातली. तरीही काही पैसे कमीच होते. स्नेहासाठी दागिने बनवायचे होते पण परागचा तेवढा बजेट नव्हता.
पराग पैशांची सोय व्हावी म्हणून खूप प्रयत्न करत होता. पण आधीच त्याच्यावर थोडे कर्ज असल्याने पैशांची सोय लवकर होत नव्हती. पराग खूप टेन्शन मध्ये होता. तेव्हा पल्लवीने स्वतःहून तिचे चार तोळ्याचे लग्नात मिळालेले मंगळसूत्र परागजवळ दिले होते आणि म्हणाली की हे मोडून स्नेहासाठी दागिने बनवा. तेव्हा परागच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आले होते.
आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पल्लवी तिच्या लग्नातले दागिने देत आहे ह्या गोष्टीने पराग भारावून गेला होता. त्याने तिचे मंगळसूत्र घ्यायला नकार दिला तेव्हा तिने आग्रह करून त्याला ते घ्यायला लावले होते. तेव्हाच त्याने मनात ठरवले होते की आज ना उद्या तो नक्कीच पल्लवी साठी छान मंगळसूत्र करेन.
त्यानंतर स्नेहाचे थाटामाटात लग्न पार पडले. सगळे काही व्यवस्थित पार पडल्याने पल्लवीच्या सासूबाई निश्चिंत झाल्या. स्नेहाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले होते. आता कुठे पराग वरील कर्जाचे बोजे थोडे कमी झाले होते. म्हणून त्याने काल पल्लवीला खरेदीच्या नावाने बाहेर नेले आणि एक नवीन मंगळसूत्र घेऊन दिले.
पण सासूबाईंना हीच गोष्ट आवडली नव्हती. त्यांना न सांगता आजवर परागने काहीच केलेलं नव्हतं. त्यांना वाटत होते की पल्लवी त्याला स्वतःच्या बाजूने करेन आणि मग आपण एकटे पडू. आणि हाच विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आजवर आपलीशी वाटणारी सून आता त्यांना दुष्ट वाटू लागली होती.
पल्लवी मात्र त्या दिवशी खूप दुःखी झाली होती. तिला सतत वाटत होतं की सासूबाईंना कल्पना न देता सोन्याची खरेदी करून आणून आपण खूप मोठी चूक केली आहे. दिवसभर तिचे कुठल्याच कामात मन लागले नाही.
संध्याकाळी जेव्हा पराग घरी आला तेव्हा आपल्याच विचारात हरवलेल्या पल्लवीला पाहून त्याला आश्चर्य वाटले. सकाळपर्यंत हीच पल्लवी उत्साहाने आणि आनंदाने घरात वावरत होती आणि आता मात्र चेहरा पाडून बसली आहे ही बाब परागच्या लक्षात आली होती. त्याने तिला विचारले…
” काय झालंय पल्लवी…तू अशी विचारात हरवलेली का आहेस…?”
” काही नाही…सहजच आपलं…तुम्ही फ्रेश होऊन या मी लगेच चहा करते तुमच्यासाठी…?” पल्लवी विषय टाळत म्हणाली. कारण तिला परागला यातील काहीच सांगायचे नव्हते.
पराग सुद्धा मग जास्त काही न विचारता फ्रेश व्हायला निघून गेला. पण जेवणाच्या टेबल वर आई आणि पल्लवी मधला अबोला त्याला स्पष्ट जाणवला. तो जेवताना या विषयावर काही बोलला नाही पण जेवण झाल्यावर मात्र तो त्याच्या आईच्या रूममध्ये आला आणि आईला म्हणाला..
” काही झालंय का आई…तू आणि पल्लवी मघाशी एकमेकींशी अजिबात बोलत नव्हता…पल्लवी पण जरा उदास दिसत होती…काही घडलंय का..?”
” म्हणजे तुझ्या बायकोने पाठवले वाटतं तुला तिची वकिली करायला…आणि बायको उदास आहे ते पटकन लक्षात आलं तुझ्या…पण आपली आई कशी आहे ह्यावर काहीच लक्ष नाही…”
पल्लवी बद्दल आईच्या तोंडून असे काहीतरी पहिल्यांदाच ऐकत असल्याने पराग सुद्धा आश्चर्यचकित झाला. आई आणि पल्लवी म्हणजे सासू आणि सून कमी आणि मायलेकीच जास्त वाटायच्या. आजवर दोघींनी कधीही एकमेकांबद्दल तक्रार केली नव्हती. पण आज पहिल्यांदा आई पल्लवी बद्दल असलं काहीतरी बोलत होती. पण नेमकं काय झालंय ह्याचा अंदाज घ्यावा म्हणून पराग ने आईला विचारले…
” तुला कशाचा राग आलाय का आई…आणि पल्लवी ने खरंच मला काहीच सांगितले नाही…उलट तिने काही सांगितले नाही म्हणूनच तर मी इथे आलोय ना तुला विचारायला…” पराग म्हणाला.
” मग तिलाच विचारायचं असतं काय झालंय ते…तसेही तिच्यासाठी दागिना आणताना कुठे मला विचारलं होतं तू…”
क्रमशः
तिने आई मानलं पण तू सासूच राहिलीस – भाग २ (अंतिम भाग)