थोड्या वेळाने साकेत जेव्हा घरी आला तेव्हा त्याला घराला कुलूप दिसले. तेव्हा त्याने स्नेहलला कॉल केला. कॉल केल्यावर त्याला कळले की स्नेहलची तब्येत बरी नसल्याने तिला हॉस्पिटल मध्ये नेलय. साकेत सुद्धा थोड्याच वेळात हॉस्पिटल मध्ये पोहचला. तिथे तो स्नेहल ला भेटला आणि म्हणाला…
” तुला सांगितले होते ना मी आराम करायला…तू ना अजिबात ऐकत नाहीस…बघ तब्येत झालीच ना खराब…”
” तब्येत तर आधीच खराब होती…आणि ते काय आपल्या हातात असतं का…?” स्नेहल कोरडेपणाने म्हणाली.
” मला आधी का नाही सांगितले…?”
” तुला सकाळीच कॉल केला होता मी…तू उचलला नाहीस…आणि कॉल बॅक पण केला नाही…”
” अगं माझ्या लक्षातच राहिलं नाही बघ…”
” आपल्या घरी आजारी बायको आहे…लहान मुलगा आहे…कधीही गरज पडू शकते…तू बाहेर होतास तर निदान फोन तरी उचलू शकत होतास ना…आणि गेल्यापासून तू एकदा तरी फोन करून माझी तब्येत किंवा अथर्व बद्दल विचारले नाहीस…”
” कारण मला माहिती आहे की तू एक जबाबदार व्यक्ती आहेस…तू मॅनेज करशील म्हणून…”
साकेत चे हे बोलणे ऐकून स्नेहल ला मनापासून त्याचा राग आला. ती काही बोलणार त्या आधीच तिचा दादा तिथे आला. आणि दादाच्या पाठोपाठ अथर्व ला बाहेर खेळायला घेऊन गेलेली स्नेहल ची आई सुद्धा तिथे आली. साकेत ने दोघांनाही नमस्कार केला. तेवढ्यात नुकताच डॉक्टरांना भेटून आलेला तिचा दादा म्हणाला.
” स्नेहल…डॉक्टर सांगत होते की सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत…फक्त हाताला जो मार लागला आहे त्यासाठी तुला काही दिवस आराम करावा लागेल…आणि ही काही औषधं लिहून दिली आहेत…”
” ठीक आहे दादा…” स्नेहल म्हणाली.
इतक्यात स्नेहलची आई म्हणाली.
” जावई बापू…तुम्हाला काही हरकत नसेल तर मी काही दिवसांसाठी स्नेहल ला घरी घेऊन जाते…तिथे तिला जरा आराम ही मिळेल…”
” का नाही…उलट चांगलच आहे…घरी तिचा आराम होणार नाही…तुम्ही घेऊन जा तिला…” साकेत म्हणाला.
स्नेहल मात्र गप्प होती. थोड्या वेळाने ते सगळेच गाडीने घरी गेले आणि तिथून तिची बॅग घेऊन स्नेहल अथर्व सोबत तिच्या आईच्या घरी निघून गेली. माहेरी येऊन स्नेहल ला थोडे बरे वाटले. स्नेहल ची वहिनी स्वभावाने खूप चांगली होती. दोघींमध्ये ही मैत्री चे नाते होते. अथर्व सुध्दा मामाच्या मुलासोबत रमला.
साकेत मात्र इकडे आरामात राहत होता. रोज बाहेर जेवण करणे, रात्री उशिरा पर्यंत मित्रांसोबत पार्टी करणे, त्यानंतर सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर फिरायला जाणे हा तर त्याचा नित्यक्रम बनला होता. आता घरी लवकर ये म्हणायला स्नेहल घरी नव्हती आणि ह्या गोष्टीचा तो पुरेपूर आनंद घेत होता.
साकेत दोन तीन दिवसांमधून एकदा स्नेहलला कॉल करायचा आणि जेमतेम बोलून फोन ठेवून द्यायचा. पण हळूहळू साकेत च्या लक्षात आले की यावेळेला स्नेहल स्वतःहून अजिबात कॉल करत नाही आहे. आधी माहेरी गेली की दिवसातून निदान दोनदा तरी कॉल करायची. पण यावेळेला मात्र गेली तेव्हापासून एकही कॉल केला नव्हता. त्याने विचार केला की या रविवारी तिच्या माहेरी जाऊन तिला परत घेऊन येऊ.
आणि रविवारी तो स्नेहलच्या माहेरी गेला. तेव्हा त्याला कळले की स्नेहल अथर्वला घेऊन तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. त्याने तिला कॉल केला पण तिने तो रिसिव्ह केला नाही. थोड्या वेळाने तिचा कॉल आला. तेव्हा त्याने सांगितले की तो आज तिला घ्यायला आला आहे. त्यावर स्नेहल म्हणाली की अजुन काही दिवस तिला माहेरीच राहायचं आहे आणि तिला यायला थोडा उशीर होईल त्यामुळे ती निघून गेला तरी चालेल.
स्नेहल त्याच्याशी इतकी रुक्षपणे आधी कधीच वागली नव्हती. तिच्या या वागण्याचे त्याला नवल वाटले. त्याने थोडा वेळ तिची वाट पाहिली आणि तो निघून गेला. स्नेहल ने आज चक्क त्याला दुर्लक्षित केले होते. आधी त्याने तिच्यासोबत वेळ घालवावा म्हणून सतत त्याच्या मागेपुढे करणारी ती आता स्वतः त्याला टाळत होती.
साकेत ला मात्र सारखे स्नेहल चेच विचार येत होते. आधी दोन तीन दिवसातून तिला कॉल करणारा साकेत आता दिवसातून दोनदा तिला कॉल करायला लागला होता. स्नेहल च्या विचाराने त्याला आता बाहेरचे जेवण सुद्धा गोड लागत नव्हते. तो पार्टीत असला तरीही त्याच्या डोक्यात स्नेहल च असायची.
आता त्याला अथर्व ची सुद्धा खूप आठवण येत होती. घरात असताना सतत त्याच्या मागेपुढे बाबा बाबा म्हणत फिरणारा अथर्व गेला तेव्हापासून फोन वर त्याच्याशी बोलला देखील नव्हता. तेच शब्द ऐकण्यासाठी आता साकेत चे कान आतुरले होते. त्याने वेळ न घालवता पुन्हा पुढील रविवारी स्नेहल च्या माहेरी भेट दिली.
यावेळेला मात्र स्नेहल घरीच होती. त्याला पाहून ती एकदमच औपचारिक हसली. त्याच्या सरप्राइज विजिट चा त्याला वाटला होता तेवढा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. आज त्याने अथर्व साठी काही खेळणी सुद्धा आणली होती. पण आधी बाबाला पाहून त्याच्या जवळ जाण्यासाठी हट्ट करणारा अथर्व आज मात्र बाबा जवळ न जाता आजोबांच्या मांडीवरच बसून होता.
साकेत आज सुद्धा स्नेहल ला घरी म्हणाला की मी तुला घरी घेऊन जायला आलोय. त्यावर ती पुन्हा म्हणाली की तिच्या भावाच्या मुलाच्या शाळेला सध्या सुट्टी आहे. अथर्व ला सुद्धा खेळायला सोबत होईल. म्हणून आणखी काही दिवस ती माहेरीच राहणार आहे. तिच्या या वागण्याचे आजही साकेतला खूप वाईट वाटले. तो जेवण न करताच तिथून निघून गेला.
आता मात्र बेफिकीर असणाऱ्या साकेतला सतत स्नेहल आणि अथर्वची आठवण येत होती. जोवर स्नेहल साकेत च्या मागेपुढे करायची तोवर त्याने कधीच तिच्याकडे लक्ष दिले नव्हते. आणि आज जेव्हा ती त्याला टाळत होती तेव्हा मात्र त्याच्या लक्षात तिच्याशिवाय आणखी काहीच येत नव्हते. साकेतने फोन केल्यावर स्नेहल थोडीफार बोलायची पण त्या बोलण्यात आधीप्रमाने प्रेमाचा ओलावा साकेतला जाणवत नव्हता.
त्या पुढच्या रविवारी मात्र साकेतने तिच्या घरी जाण्याआधी तिला कॉल केला. आणि विचारले की आज तुला घ्यायला आलो तर चालेल ना. त्यावर मात्र स्नेहल ने उत्तर दिले आज ती तिच्या काही मैत्रिणींसोबत बाहेर जात आहे. आज येऊ शकणार नाही.
तिच्या या उत्तरावर साकेत खूप चिडला. त्याने ठरवले होते की तो यापुढे तिला स्वतःहून कॉल करणार नाही आणि घ्यायला सुद्धा जाणार नाही. त्याने एक दिवस तिला कॉल केला देखील नाही. पण त्याने फेसबुक वर स्नेहलचे तिच्या मैत्रिणींसोबतचे फोटो पोस्ट केले आणि साकेतला आणखीनच वाईट वाटले. त्याला वाटले की आपण इतके हिच्या आठवणीत तळमळत आहोत आणि ही मात्र आनंदाने बाहेर फिरतेय. स्नेहलच्या विचारात साकेतने मागील दोन आठवड्यांपासून त्याच्या मित्रांसोबत बाहेर जाणे सुद्धा टाळले होते. आणि एकही पार्टी अटेंड केली नव्हती. पण स्वतःमध्ये झालेला बदल अजूनही त्याच्या लक्षात आलं नव्हता.
त्यानंतर पुढील शनिवारी तो स्वतःच कुणालाही न सांगता त्याच्या सासुरवाडीला मुक्कामी पोहचला. साकेत आजवर कधीच त्याच्या सासरी मुक्कामी न राहिल्याने त्याला आज मुक्कामी आलेलं पाहून घरच्यांना खूप नवल वाटले होते. आणि तितकाच आनंद ही झाला होता. स्नेहल च्या चेहऱ्यावर वगळता आज घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर त्याला पाहून आनंद दिसत होता. सासरी साकेत चा खूप चांगला पाहुणचार करण्यात आला. पण स्नेहल मात्र त्याच्याशी जास्त काही बोलत नव्हती.
शेवटी रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा ती शतपावली करायला घरच्या टेरेसवर गेली तेव्हा साकेत सुद्धा तिच्या मागे गेला आणि तिला एकांतात गाठलेच. त्याला असे अचानक मागे बघून स्नेहल आधी गोंधळली पण नंतर ती गप्प एका जागी उभी होती. ती गप्प होती म्हणून साकेत नेच बोलायला सुरुवात केली.
क्रमशः
तुझ्या आयुष्यात माझी जागा काय ? – भाग ३ (अंतिम भाग)