प्रतिभा आणि प्रकाशराव यांना घरी यायला थोडा उशीरच झाला होता. एव्हाना जवळचे सगळेच नातेवाईक प्रतिभाच्या आईकडून प्रतिभाची वहिनी म्हणजेच सुषमा शी भांडायला जमले सुद्धा होते. एखाद्या चांगल्या कामांसाठी भलेही थोडा उशीर होईल पण अशा न्याय निवाड्याच्या बैठकीला मात्र कुणी सहसा उशीर करत नाही.
पण यात मुख्य भूमिका होती ती म्हणजे प्रतिभा आणि प्रकाशरावांची. कारण आपल्या आईवर होणाऱ्या अन्यायाला ‘वाचा’ फोडण्याचे काम तिनेच केले होते. आपल्या आईला आपली वहिनी सुषमा किती छळते ह्याचे ‘ रसभरीत ‘ वर्णन कित्येक दिवसांपासून ती तिच्या नातेवाईकांमध्ये सांगत होती.
आणि प्रकाशराव वांनी सुद्धा स्वतः यामध्ये मध्यस्ती घेऊन आजची ही न्याय निवाड्याची बैठक आयोजित केली होती. पण त्यांना स्वतःला मात्र उशीर झाला होता इथे पोहचायला. किंवा त्यांनी स्वतः जाणूनबुजून उशीर केला होता. त्यांना उशिरा पोहचून आपल्यासाठी सगळी मंडळी खोळंबली आहेत आणि अजुन बैठकीला सुरुवात झालेली नाही हे पाहून मनातून फार बरे वाटले होते.
ते दोघेही आले आणि बैठकीला सुरुवात झाली. सुरुवात अर्थातच प्रकाशरावांनीच केली. ते म्हणाले.
” सुरेश…आमच्या कानावर बरेचदा आले की सासूबाईंना इथे त्रास होतोय…तुम्ही त्यांची नीट काळजी घेत नाही…तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती…”
” प्रकाशराव…असे काहीच नाही आहे…विषय अगदीच लहान होता…त्यावर चर्चा करण्या जोगे असे काही विशेष नव्हते.. ” सुरेश जरा ओशाळून म्हणाला.
” लहान विषय होता…या घरात आता आईच्या शब्दाला काहीच मान राहिलेला नाही आणि म्हणता विषय लहान होता…” प्रतिभा मध्येच रागाने म्हणाली.
” अगं प्रतिभा…आईने हट्टच असा केला होता की आम्ही तो पूर्ण नाही करू शकलो…” सुरेश म्हणाला.
” असा कोणता हट्ट केला होता आईने…तिने तर फक्त तुझ्या मुलीच्या लग्नासाठी स्थळ आणले होते ना…” प्रतिभा म्हणाली.
” पण अजून श्रेया शिकतेय…आणि ती फक्त एकवीस वर्षांची आहे…आम्हाला सध्या तिचे लग्न करायचे नाही आहे ताई…म्हणून फक्त आम्ही आईंना तसे स्पष्ट सांगितले एवढेच…” सुषमा म्हणाली.
” मी काय तिच्या वाईटासाठी म्हणत होते काय…अरे इतका चांगला मुलगा नंतर मिळणार नाही म्हणून म्हटले मी…आणि शिक्षण काय…घेईल की सासरी जाऊन…” सासुबाई रडके तोंड करत म्हणाल्या.
” सासरी जाऊन कुणाचं शिक्षण पूर्ण होत असतं का आई…मला पण लग्नाच्या आधी तुम्ही असेच म्हणाल्या होत्या ना की लग्नानंतर शिक्षण पूर्ण कर म्हणून…मी शिकू शकले का पुढे…?” सुषमा म्हणाली.
” तुझी गोष्ट वेगळी होती…तुला नीट घर सुद्धा सांभाळता येत नव्हते…आणि शिक्षणात काय दिवा लावला असता तू…” सासुबाई नाक मुरडत बोलल्या.
” तुम्ही निदान संधी तर द्यायला हवी होती…पण माझं जे झालं ते झालं… श्रेयाच्या बाबतीत मात्र आपण लग्नाला घाई करायला नको…आणि तिच्या सासरचे तिचे शिक्षण का करतील…देवाच्या कृपेने आपल्याकडे कशाची कमी थोडीच आहे…” सुषमा म्हणाली.
” मग हे सगळं काय मुलीवर उधळणार आहेस का…? माझा नातू आहे ना…त्याच्यासाठी काही शिल्लक ठेवणार आहात की नाही…?” सासुबाई म्हणाल्या.
दोघी सासू सूनांमधिल संभाषण आता भांडणाच्या दिशेने जात होते. सुषमाच्या सासुबाईचा स्वभाव आधीच जरासा तापट होता. पण सुषमा मात्र आधीपासूनच जरा शांत स्वभावाची होती. तिला सासुसमोर इतक्या मोठ्याने बोललेले आज पहिल्यांदाच पाहत होते सगळेच. म्हणून त्यांना थांबवावे म्हणून सुरेशचे मामा मध्येच म्हणाले.
” तुम्ही दोघी आता इथेही भांडणाला सुरुवात करू नका…आणि किती लहान गोष्ट आहे…मुलगी म्हटली की स्थळे तर येणारच ना…तुम्हाला पटत नसेल तर नकार द्यायचा आणि मोकळं व्हायचं…”
” आम्ही तेच केलं होतं…सासूबाईंना स्पष्टपणे सांगितले होते स्थळाला नकार द्या…पण त्या हट्टाला पेटल्या होत्या…निदान दाखवण्याचा कार्यक्रम तरी करुयात म्हणून…आता लग्न नाही करायचं म्हटल्यावर हा दाखवण्याचा कार्यक्रम तरी कशाला करायचा…पण एवढ्याशा गोष्टीवर मात्र सासूबाईंनी खूप त्रागा केला…दोन दिवस घरात जेवल्याच नाहीत…” सुषमा म्हणाली.
यावर मात्र सासुबाई जरा गोंधळली आणि म्हणाली.
” ही एकच गोष्ट नाही…आजकाल ही माझी कुठलीच गोष्ट ऐकत नाही…हिला एक सांगितले की ही दुसरेच काहीतरी करते…हिला मी एकदा म्हटले होते की आज वांग्याची भाजी कर तर हिने जाणून बुजून बटाट्याची भाजी केली होती…”
” कारण आई त्या दिवशी आपल्या घरी वांगे नव्हते…पण दुसऱ्या दिवशी केली होतीच ना मी वांग्याची भाजी…” सुषमा म्हणाली.
” बघितलं कशी उलट उत्तरं देते ही…एरव्ही आपण काहीही बोललो तरी अशीच उलटून बोलते…सासूला काही मान नाही ना काही नाही…” सासुबाई म्हणाल्या.
त्यावर सुरेश ने डोळ्यांनीच सुषमा कडे पाहिले आणि नजरेनेच तिला गप्प बसण्याचा इशारा केला. त्याच्या नजरेतील आर्जव बघून सुषमा सुद्धा गप्प बसली.
सुषमा ही सिंधूताईंची एकुलती एक सून. बावीस वर्षांपूर्वी सुरेशशी लग्नगाठ बांधून ती या घरात आली आणि इथलीच झाली. सिंधुताई खूप कडक स्वभावाच्या सासू होत्या. आणि त्यातच जेव्हा ही अल्लड सुषमा घरात आली तेव्हा ती सासूबाईंना खूप घाबरायची. घरात सासूबाईंचा शब्दच चालायचा. अगदी सुरेश आणि त्याचे वडील देखील त्यांच्या पुढे जास्त बोलायचे नाहीत. त्यामुळे सुषमा चे काही बोलणे म्हणजे निव्वळ अशक्य बाब होती.
आणि भरीस भर म्हणजे तिची नणंद प्रतिभा. तिचे तेव्हा लग्न झालेले नव्हते. पण दिवसभर वहिनीच्या मागे चुळबुळ करत फिरायची आणि संध्याकाळी आईला वहिनीच्या बारीक सारीक गोष्टी अगदी मीठ लावून सांगायची. मग सासुबाई सुषमावर चांगल्याच तोंडसुख घ्यायच्या.
अशातच सुषमाला दिवस गेले. सासूबाईंना कळले त्या दिवशीपासूनच सासूबाईंनी सुषमाला सक्त ताकीद देऊन ठेवली होती. पहिला मुलगाच व्हायला हवा. कारण काय तर त्यांनाही पहिला मुलगाच होता म्हणून. पहिलं गरोदरपण सुखाने अनुभवण्या ऐवजी पूर्ण तणावात गेलं सुषमाच. आणि जेव्हा श्रेयाचा जन्म झाला तेव्हा तर सासूबाईंचे रागाने तोंड फुगले होते.
दोन तीन महिने तर श्रेयाला त्यांनी जवळ सुद्धा घेतले नव्हते. आणि नंतर तिला थोडेफार खेळवायला लागल्या पण पहिलं नातवंडं म्हणून त्यांना श्रेयाचा जितका लळा लागला पाहिजे होता तितका कधी लागलाच नाही त्यांना. त्यानंतर मग प्रतीकचा जन्म झाला. आणि नातू पाहिल्यावरच सासूबाईंनी मोकळा श्वास घेतला. प्रतीक झाल्यानंतर तर त्यांनी श्रेयाकडे लक्ष देणेच सोडले.
प्रतीकचे नको ते आणि नको तितके लाड केले त्यांनी. बाहेरून काहीही आणलं की आधी प्रतिकलाच मिळायला हवं हा त्यांचा हट्ट असे. सुरेश आणि सुषमा दोघेही सासूबाईंनी काहीच बोलायचे नाहीत. पण सासुबाई श्रेया आणि प्रतीक मध्ये भेदभाव करत आहेत हे मात्र त्यांच्या नजरेतून सुटत नव्हते. एक दोन वेळा सुरेशने त्यांना समजावून बघितले पण त्या उलट त्याच्यावरच भडकल्या.
सुषमा आणि सुरेशला नेहमीच काळजी वाटायची की सासूबाईंच्या अशा वागण्याने दोघा बहीण भावांमध्ये अंतर येऊ नये. पण सुदैवाने दोघा बहीण भावांमध्ये खूप प्रेम होते. प्रतीक घासातला घास आपल्या बहिणीसाठी राखून ठेवायचा. सासूबाईंना मात्र हे कधीच आवडले नव्हते. पण त्यांना वाटायचे की कधीतरी ती तिच्या सासरी जाईल आणि सगळं काही तिच्या नातवाचे होईल.
क्रमशः
न्याय – भाग २ (अंतिम भाग)
खूप छान लिहिलंय