माधवीच्या सासुबाई किचन मध्ये आल्या आणि अगदी रागातच स्वयंपाकाची तयारी करू लागल्या. मागच्या अनेक वर्षांपासून स्वतः स्वयंपाक न केल्याने त्यांना आताशा या कामांची सवय राहिलेली नव्हती. त्यामुळे त्यांची खूप चिडचिड होत होती. आणि म्हणूनच हाताला येईल ते भांडे आदळत आपटत कशीतरी स्वयंपाकाची तयारी करत होत्या. माधवी किंचित भेदरलेल्या नजरेने एका कोपऱ्यात उभी राहून त्यांच्याकडे बघत होती. शेवटी न राहवून ती त्यांना म्हणाली.
“आई…स्वयंपाक तयार आहे…मी सकाळीच उठून केलाय…”
माधवीचे बोलणे ऐकताच तिच्या सासूला राग अनावर झाला आणि म्हणाली.
” नकोय आम्हाला तुझ्या हातचे जेवण…आम्ही करून घेऊ आमचं काहीतरी…तू फक्त स्वतःच बघ…नवऱ्याला तर गिळलस…आता मजेत जेवण गिळत जा…”
” असं का म्हणताय आई…मी असं काय केलंय…माझ्या हातून काही चूक घडली का…?” माधवीने विचारले.
” तुझ्या हातून कसल्या चुका होणार आहेत…चूक तर आम्ही केलीय…म्हणूनच तुझ्यासारख्या पांढऱ्या पायाच्या पोरीला घरची सून करून घेतली…” सासुबाई पुन्हा एकदा रागात म्हणाल्या.
सासूबाईंच्या तोंडून स्वतःबद्दल असे काही ऐकल्यावर माधुरीला रडू अनावर झाले. ती किचन मधून तडक तिच्या बेडरूम मध्ये निघून गेली आणि उशीत तोंड खुपसून रडू लागली. जेणेकरून तिच्या रडण्याचा आवाज तिच्या पाच वर्षाच्या मुलीने भार्गवीने ऐकू नये.
माधवी एक सत्तावीस वर्षांची विधवा होती. तिच्या नवऱ्याचे मिलिंदचे दोन महिन्यांपूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. तेव्हा तिच्या सासू सासर्यांनीच तिला सांभाळले होते. मिलिंद नंतर तिला त्यांचाच आधार होता पण आज मात्र तिच्या सासुबाई काहीतरी वेगळेच बोलून गेल्या होत्या.
माधवीच्या सासुबाई आधी अजिबात अशा वागल्या नव्हत्या. लग्नाला आठ वर्ष झाल्यावर आज पहिल्यांदा तिने त्यांच्या तोंडून स्वतःविषयी इतकं कटू काहीतरी ऐकलं होतं. मिलिंद गेल्यावर त्यांनी त्यांना खूप दुःख झाले होते. तरीही त्याच जाणं त्यांनी हळूहळू का होईना स्वीकारले होते. मिलिंदच्या मागे माधवी आणि भार्गवीची जबाबदारी आपलीच आहे हे त्या जाणून होत्या.
पण गेल्या काही दिवसात माधवीची मोठी जाऊ अलका सतत येऊन सासूबाईंच्या मनात माधवी बद्दल काहीबाही भरवू लागली होती. दुखत सांत्वन करत असतानाच माधवी बद्दल काहीतरीच वाईट बोलायची. आणि आधीच अनावर झालेल्या दुःखामुळे सासुबाई हळूहळू का होईना अलकाच्या बोलण्यात येऊ लागल्या होत्या.
एक मुलगा गेल्यावर दुसऱ्या मुलाचा आधार शोधताना त्याच्या कुटुंबाला आपलंसं करून माधवीला परकी असल्यासारखी वागणूक देत होत्या. अलका सांगायची की माधवीच्या नशिबात नवऱ्याच सुख नसेल म्हणूनच भाऊजी इतक्या लवकर देवाघरी गेले. आणि आता आपल्याला अलका आणि अजयचा आधार लागणार आहे हे जाणून त्या अलकाच्या सगळ्याच गोष्टी मनावर घेऊ लागल्या होत्या.
माधवी आणि मिलिंदचे लग्न झाल्यावर अवघ्या तीन महिन्यातच अलका तिच्या नवऱ्यासोबत वेगळ्या घरात राहू लागली होती. अर्थात हे नवीन घर सुद्धा अजयच्या वडिलांच्या मालकीचं होतं. पण अलकाला आता सासू सासर्यांची जबाबदारी नको होती.
ती जेव्हा सासू सासऱ्यांसोबत राहायची तेव्हा सुद्धा तिने कधीच मनापासून सासू सासऱ्यांची सेवा केली नव्हती. तिला मुळात एकत्र राहायचं नव्हतंच. पण माधवी आणि मिलिंद चे लग्न झाल्यावर ते तिने बोलून सुद्धा दाखवलं. आणि तिने एकत्र राहायला दाखवलेल्या अनास्थेमुळे तिच्या सासू सासऱ्यांनी सुद्धा याला विरोध केला नाही.
पण माधवीने मात्र सासू सासाऱ्यांना खूप चांगले सांभाळले. अगदी आई वडीलांसारखा मान दिला. आणि लवकरच साऱ्यांना आपलेसे केले. तेव्हापासून दोघीही सासू सूना मायलेकींसारख्या वागायच्या. पण सगळं काही सुरळीत सुरू असताना भरल्या संसारातून मिलिंद निघून गेला.
सुरुवातीला सासू सासर्यांनी माधवी ला खूप आधार दिला. पण मिलिंदच्या जाण्याने अलकाच्या डोक्यात मात्र वेगळीच कल्पना आली. सासऱ्यांना मिळणारी पेन्शन. त्याचं राहतं घर. आणखी काही प्रॉपर्टी हे सगळं तिचे सासू सासरे मिलिंदच्या माघारी माधवी आणि भार्गवीला देतील.
म्हणून जर माधवीला सासू सासर्यांनी काहीही न देता तिला तिच्या माहेरी पाठवले तर ह्या सगळ्यांवर आपलाच अधिकार होईल असे वाटून तिने तिच्या सासू सासऱ्यांना आपल्या बाजूने आणि माधवीच्या विरोधात उभे करायचे ठरवले. आणि हळूहळू का होईना तिचा हेतू साध्य होत होता.
माधवीची सासुबाई तिच्याशी बोलताना सतत मिलिंदच्या जाण्याला तुझा पायगुण जबाबदार आहे असे म्हणायच्या. एके दिवशी काही कामानिमित्ताने अलका सकाळीच तिच्या सासूच्या घरी आली. त्या दिवशी सवयी प्रमाणे सासुबाई किचन मध्ये स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना पाहून अलका म्हणाली.
” काय वाईट दिवस आले आहेत ना आई तुमच्यावर…घरी सून असून सुद्धा तुम्हाला स्वयंपाक करावा लागत आहे…मला तर हे सगळं बघवत सुद्धा नाही आहे…”
आधीच नाराज असलेल्या सासूबाईंना तर आता बोलण्याचे कारणच मिळाले. त्या म्हणाल्या.
” हो ग…वाईट दिवस तर आले आहेत…म्हणून सतत नको असताना सुद्धा मला वारंवार हीचं तोंड पाहावं लागतंय…देव सुद्धा कोणत्या वाईट कर्माची शिक्षा देतोय देव जाणे…”
” मग जर तुम्हाला हिचं तोंड पाहायचंच नसेल तर कशाला पाहताय आई…तुम्ही कशाला हिच्या सोबत एकच घरात राहताय…” अलका म्हणाली.
” बरोबर आहे तुझं…माझा मोठा मुलगा असताना मला काय गरज आहे हिच्यासोबत राहण्याची…आम्ही दोघे आजच बॅग भरून तुझ्यासोबत राहायला येतो…” सासुबाई म्हणाल्या.
हे ऐकून अलका ला धक्काच बसला. तिला वाटले होते की सासुबाई माधवी ला या घरातून काढून देतील. पण सासुबाई तसे न करता स्वतःच हे घर तिच्या ताब्यात सोडून अलका सोबत जायचं म्हणत होत्या. सासू सासर्यांची जबाबदारी नको म्हणूनच तर तिने स्वतःचा वेगळा संसार थाटला होता. पण पुन्हा सासुबाई सोबत राहायला येणार म्हटल्यावर तिला धडकीच भरली. ती सासूबाईंना म्हणाली.
” तुम्ही कशाला स्वतःच घर हिच्या ताब्यात देऊन जाताय आई…त्यापेक्षा हीलाच काढा तुमच्या घरातून बाहेर…नाहीतर हिला तर आयतच हे घर मिळून जाईल…”
” मुलगाच नाही म्हटल्यावर घराचं काय करणार आहोत आम्ही…आम्हाला नकोय काहीच…तसंही हे घर मिलिंद आणि माधवीच्या नावावर आहे आधीच…आम्हाला तर आता आमच्या मोठ्या मुलासोबत राहायला जायचंय…” सासुबाई म्हणाल्या.
घर मिलिंद आणि माधवी च्या नावावर आहे हे अलका ला अजिबातच माहीत नव्हते. आणि म्हणूनच ती मोठ्याने ओरडतच म्हणाली.
” हे घर तर बाबांच्या नावावर होते ना…मग भाऊजी आणि हिच्या नावावर कधी केले…?”
“एक वर्ष झालं असेल…एक घर अजय आणि तुझ्या नावाने केलं म्हणून तुझ्या सासाऱ्यांनी मागच्या वर्षी हे राहतं घर मिलिंद आणि तिच्या नावाने केलं…पण मला आता यावर काहीच बोलायचं नाही…मी बॅग भरायला घेते…” सासूबाईंनी माहिती दिली.
अलकाला हे माहीत पडल्यावर खूप मोठा धक्का बसला. तिला तर आता स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतल्या सारखे झाले. तिला खूप राग आला आणि रागातच ती म्हणाली.
” वा वा सासुबाई…म्हणजे हे घर तिच्या घशात घालणार आणि मला आजन्म तुमच्या हाताखालची मोलकरीण बनवून ठेवणार…मला काय मूर्ख समजलात काय तुम्ही…”
अलकाचे असे उद्धट बोलणे ऐकून सासूबाईंना धक्काच बसला. त्या तिला म्हणाल्या.
” अगं हे काय बोलत आहेस…आता तू आणि अजयच तर आमचं सर्वस्व आहात…तूच असं म्हणशील तर आम्ही कुणाकडे पाहून जगणार…तूच तर इतकी दिवसांपासून म्हणते आहेस ना की यापुढे तुम्ही आमचा आधार बनणार म्हणून…”
” मला काय वेड बीड लागलंय की काय तुम्हाला सोबत घेऊन जायला…हे घर जर आम्हाला मिळालं असतं तर विचार तरी केला असता…आणि राहिली गोष्ट मी तुमचा आधार बनण्याची तर इतकी वर्ष जिने तुमची मनापासून सेवा केली त्या माधवी ला तुम्ही क्षणात परके केले…तर मला कुठून आपलं समजणार आहात…” अलका रागारागाने म्हणाली.
अलका चे बोलणे ऐकुन माधवीच्या सासूबाईंना खूप मोठा धक्का बसला. तिच्या गोड बोलण्यामागील कारण आता त्यांना लक्षात आले होते. अपेक्षाभंग झाल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसून येत होते. अवसान गळलेल्या अवस्थेत त्या तशाच मटकन खाली बसल्या त्यांना तसे पाहून माधवीला खूप वाईट वाटत होते.
अलका सासूबाईंशी बोलताना खूप उद्धटपणे आणि विचित्र हातवारे करत बोलत होती. आतापर्यंत मोठ्या जावेच्या नात्याची मर्यादा होती म्हणून ती गप्प बसलेली होती. मात्र सासूबाईंना असे बोलल्यावर तिला राहवले गेले नाही. ती अलकाला म्हणाली.
” बस करा ताई…आईंना तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय…तुम्ही असे नका बोलू त्यांच्याशी…”
माधवीचे बोलणे ऐकुन अलका म्हणाली.
” अगं इतके दिवस घालून पाडून बोलल्या ह्या तुझ्याशी… जिचा नवरा गेलाय तिला आधार देण्या ऐवजी छळलं ह्यांनी…आणि तू ह्यांची बाजू घेऊन माझ्याशी वाद घालत आहेस…”
” ते काहीही असू द्यात…ह्या माझ्या आई सारख्या आहेत आणि ह्यांना कुणीही असे बोललेले मला चालणार नाही…” माधवी म्हणाली.
” तू पण एक नंबरची मूर्ख आहेस…” असे म्हणून अलका तावातावाने निघून गेली. माधवीने तिच्या सासूबाईंना बघीतले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. ती त्यांना म्हणाली.
” आई…तुम्ही ताईंच्या बोलण्याचे वाईट नका वाटून घेऊ…”
” तिच्या बोलण्याचे वाईट वाटत नाहीय ग पोरी…माझी वागण्याचे वाईट वाटत आहे…मी किती जास्त वाईट वागली तुझ्याशी… अलकाच्या बोलण्यात येऊन तुला काय नाही बोलले… पांढऱ्या पायाची, अपशकुनी, नवऱ्याला गिळलस आणि काय काय… इतकंच काय तर भार्गवीला सुद्धा पूर्वीप्रमाणे जीव लावला नाही…तुला जेव्हा माझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तुला एकटं पाडलं…तुझ्याशी नजर मिळवायची सुद्धा लायकी नाही ग माझी…” सासुबाई रडत म्हणाल्या.
” नाही आई…मी समजू शकते…मिलिंदच्या जाण्याने तुम्ही खूप दुखी होतात…आणि तुमच्या मनस्थितीचा फायदा घेऊन ताईंनी तुमच्या मनात नको ते भरवले… खरं सांगायचं म्हणजे मला तुमच्या बोलण्याचे इतके वाईट वाटले नाही जितके तुम्ही माझ्यापासून दूर जाल या गोष्टीचे वाटले…मला तुमच्याकडून काहीच तक्रार नाही आई…” माधवी तिच्या सासूबाईंचे अश्रू पुसत म्हणाली.
आणि त्या सरशी सासुबाई तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागल्या. त्यांना तसे पाहून माधवीला सुद्धा भरून आले. आणि त्या अश्रूंनी त्यांच्या नात्यात आलेल्या कटुतेला धुवून टाकले.
माधवीच्या सासूबाईंना आयुष्याचा एवढा मोठा अनुभव असून सुद्धा त्यांच्याकडून माधवी आणि अलका मध्ये पारख करण्यात चूक झाली. त्या चांगलं आणि वाईट ओळखू शकला नाहीत. ही चूक कोणाकडूनही होऊ शकते. पण चूक लक्षात आल्यावर वेळीच सावरणे शहाणपणाचे ठरते.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.