” सगळं काही निभावून गेलं ह्यातच सगळं काही आलं…तसे माझ्याकडे जास्त पैसे जमा नव्हते पण वेळेवर सोय झाली पैशांची…” संजय म्हणाला.
” कशी काय…?” सुगंधा ने विचारले.
” अगं जवळचं सोनं गहाण ठेवलं आणि बाकीच्या पैशांची सोय केली…आता जसे पैसे येतील तसे सोडवून आणेल…” संजय म्हणाला.
सोनं गहाण ठेवलं हे ऐकून दोन्ही मायलेकी एकदमच उडाल्या. सरला ताई संजयला म्हणाली.
” अरे स्वतःच्या आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते का तुझ्याकडे…माझे दागिने माझ्या परवानगी शिवाय गहाण ठेवले…नक्कीच तुझ्या बायकोने सांगितले असेल तुला असे करायला…तिचा तर आधीपासूनच माझ्या दागिन्यांवर डोळा होता…” सरला ताई मोठमोठ्याने ओरडत त्यांच्या दागिने ठेवलेल्या कपाटात जाऊन दागिने बघायला जातात.
इकडे सुगंधा सुद्धा संजयला बोलायची संधी सुद्धा न देता त्याला बोलत असते.
” मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती दादा…किती बदललास तू…बायकोच्या सांगण्यावरून आईचे दागिने गहाण ठेवलेस…आई बरोबरच सांगते वहिनी बद्दल…आईच्या दागिन्यांवर डोळा आहे तिचा…”
इकडे संजय आणि सीमा दोघेही आई आणि सुगंधाच्या अशा बोलण्याने दुखी होतात. आपण आईंची इतकी सेवा केली तरीही आई आपल्याला दागिन्यांसाठी हपापलेले समजतात ह्याचे सीमाला मनोमन वाईट वाटते. दोघेही स्तब्ध होऊन दोघींचेही बोलणे ऐकत असतात.
तिकडून सरला ताई दागिन्यांचा डबा हातात घेऊन येतात आणि संजयला म्हणतात.
” पण ह्यात तर दागिने जसेच्या तसेच पडून आहेत…”
” काय…” सुगंधा आश्चर्यचकित होत म्हणाली. ” मला पाहू दे. “
सुगंधाने सुद्धा बघीतले तर दागिने जसेच्या तसेच होते. दागिने पाहून दोघीही मायलेकी एकदमच शांत झाल्या. काय होतंय हे त्यांना अजिबात कळत नव्हते. शेवटी सुगंधाच म्हणाली.
” दागिने तर सगळे जागच्या जागी आहेत…मग तू काय गहाण ठेवलेस…?”
” सीमाने तिचा दागिना गहाण ठेवला आईच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी…” संजय खिन्नपणे म्हणाला.
” काय…माझ्यासाठी तिने तिचा दागिना गहाण ठेवला…” सरला ताईंनी अविश्र्वासाने विचारले.
” हो आई…जेव्हा तुझ्या उपचारासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नव्हते तेव्हा सीमाने काहीही विचार न करता तिचा दागिना मला आणून दिला आणि सांगितले की आताची पैशांची गरज हा दागिना गहाण ठेवून भागवा…आईच्या दागिन्यांना हात लावायचा तर विचार सुद्धा शिवला नाही तिच्या मनात…
इतकेच नाही तर या आधीही एकदा घरात पैशांची अडचण आली होती तेव्हा देखील तिने तिचा दागिना गहाण ठेवून गरज भागवली आहे…पण कधी अडचण तुझ्यापर्यंत पोहचू दिली नाही…तुला काळजी वाटायला नको म्हणून…आणि तू तिच्यावरच उलट दागिन्यांचा लोभ असण्याचा आळ घेत आहेस…
अगं मागच्या अनेक दिवसात तिने नीट झोप घेतली नाही…तू जेव्हा केव्हा तुला आवाज दिला तेव्हा तेव्हा ती तुझ्याजवळ हजर राहायची…दिवस पाहिला नाही की रात्र पाहिली नाही…आजवर कधीही तक्रारीचा एकही शब्द तिच्या तोंडून निघाला नाही…पण तू मात्र एकच गोष्ट मनात ठेवून आहेस…तू तिला कधीच समजून घेणार नाही आहेस का…?” संजय पोटतिडकिने म्हणाला.
संजयचे बोलणे ऐकून सीमाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. सुगंधा खजील झाली आणि सरलाताईंना त्यांच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला. सीमाने आजवर त्यांना खूप माया दिली होती. पण त्यांनी कधीच तिला मनापासून स्वीकारण्याचा प्रयत्न केला नाही. आजवर त्यांना वाटत होते की सीमाला सोन्याचा लोभ आहे. पण आज तिच्या कृत्याने त्यांचा तो गैरसमज दूर झाला होता. त्या सीमाला म्हणाल्या.
” मला माफ कर पोरी…गरज नसताना संशयाच आणि गैरसमजाचं भूत घेऊन वावरत होते मी…सोन्यासारखी सून मिळाली आहे त्याचे मोल न ठेवता सोन्याच्या दागिन्यांना जपत आले आहे मी…पण माझ्या आयुष्याची खरी मिळकत तर तुम्ही दोघे आहात…तू माझी जितकी सेवा केलीस तितकी तर अनेक जणी स्वतःच्या आईची देखील करत नसतील…
आईची काळजी करणारा मुलगा आणि सासूसाठी आपले स्त्रीधन गहाण ठेवणारी माझी सून हेच माझं खरं सोनं आहेत…मला आता यापुढे या दागिन्यांची गरज नाही…हे दागिने तू तुझ्याकडे ठेव…इतक्या दिवसात तुला प्रेम तर नाही देऊ शकले मी पण कदाचित ह्यामुळे माझं मन जरा हलकं होईल…” सरला ताई म्हणाल्या.
आज इतक्या दिवसांनी का होईना आपल्या सासूने आपल्याला आपले मानून काहीतरी देऊ केले ह्याचा सीमाला आनंदच झाला होता. पण तरीही तिला ते सोनं नको होतं. तिला मुळात दागिन्यांचा सोस नव्हताच. ती सासूबाईंना म्हणाली.
” आई…मला हे खरंच नको आहेत…कधीच नको होते…मला फक्त तुमचे प्रेमाचे दोन शब्द हवे होते…जे आज मी ऐकले आणि समाधान पावले…तुमचा आशीर्वादच माझ्यासाठी पुरेसा आहे…तुम्ही फक्त कायम माझ्या पाठीशी राहा…आणखी काहीही नको मला…”
सीमाचे बोलणे ऐकून तर सासूबाईंना तिचे फारच कौतुक वाटले. ही इतक्या कमी वयात इतकी समजूतदार कशी ह्याचे त्यांना फार नवल वाटले. आपण आयुष्याच्या संध्याकाळी सुद्धा एवढा समजूतदारपणा अंगिकारू शकलो नाही आणि ही या वयात चांगल्या वाईटाची जाणीव ठेवून आहे.
त्या दिवशीपासून सासूबाईंनी स्वतःच्या मनातील पूर्वग्रह बाजूला सारून मोकळ्या मनाने सीमाचा स्वीकार केला. सुगंधाने सुद्धा पुन्हा कधीच वहिनी बद्दल वाईट बोलले नाही. जे आपण आपल्या आईसाठी नाही करू शकलो ते वहिनीने एक सून म्हणून केले ह्याचा तिला सुद्धा अभिमानच वाटला. संजय तर दोघी सासू सुनेला एकत्र पाहून खूप खुश झाला होता.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकार.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.