” हे बघ… आपलं लग्न झालंय हे मला मान्य आहे पण ते कोणत्या परिस्थीती त झालंय हे सुद्धा तुला चांगलेच माहिती आहे…त्यामुळे माझ्याकडून तू काही फारशा अपेक्षा न केलेल्या बऱ्या…”
” म्हणजे…?” त्याचे बोलणे न समजल्याने नंदिनीने विचारले.
” हे बघ…मला माहिती आहे की तुला सगळं कळतंय…उगाच न कळल्याचा आव नकोस आणू…” नकुल चिडत म्हणाला.
” स्पष्ट सांगशील का जरा…?” नंदिनीने विचारले.
” हे बघ…तुझ्या या अशा भोळ्या चेहऱ्याला पाहून माझी आई भुलत असेल पण मी नाही…तुम्ही तुमच्या सोयीने माझ्या आई बाबांचा वापर करून घेतलात…त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतलास…तू रवीला आधी होकार दिलास…त्याच्याशी फोनवर बोलणं सुद्धा सुरू होतं तरीही ऐन वेळेवर लग्नाला नकार दिलास…फोनवर बोलत होतात म्हणजे तुला त्याच्या स्वभावाचा अंदाज आलाच असेल ना आधी…मग तेव्हा का नाही नकार दिला त्याला…?” नकुल म्हणाला.
” हे बघ…पहिली गोष्ट म्हणजे माझं लग्न माझ्या बाबांनी ठरवलं…आणि मी काही त्याच्याशी रोज फोनवर बोलत नव्हते…फक्त एकदा अन् ते ही फक्त एक मिनिट बोललो होतो आम्ही…अन् तो दारू पितो किंवा तो समोरासमोर कसा दिसतो हे मला माहिती नव्हतं आधी…” नंदिनी स्पष्टपणे बोलली.
” मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही…म्हणून माझ्याशी फक्त कामाशी काम ठेवायचं…आई बाबांसमोर चागलं वागायचं अन् इथे रूम मध्ये आल्यावर मात्र आपण एकमेकांचे नवरा बायको नाही असे वागायचे…” नकुल म्हणाला.
” ठीक आहे…जस तुला बरं वाटेल तसं…” नंदिनी त्याच्याकडे न पाहता म्हणाली. पण त्याच्यापासून नजर चोरून स्वतःच्या डोळ्यांच्या कडा अलगद बोटाने टिपल्या.
नकुलचे आणि तिचे लग्न ही तिच्यासाठी तरी सध्या एक तडजोड होती. ती सध्यातरी नकुलच्या प्रेमात वगैरे नसल्याने तिला नकुलच्या बोलण्याचे फारसे वाईट वाटले नव्हते पण त्याच्या बोलण्याने तिला तिच्या बाबांची आठवण आली होती. कारण तिचे बाबाही तिला असेच चुकीचे समजत असणार असा विचार करून ती मनातून खूप दुःखी होत होती.
तिने सगळे सामान व्यवस्थित लावले आणि आत्याची मदत करायला म्हणून पुन्हा स्वयंपाकघरात गेली. तिला असे नाराज पाहून आत्या म्हणाली.
” काय ग नंदिनी…काय झालंय…?तू नाराज दिसते आहेस…नकुल काही बोलला का…?”
” नाही आत्या…नकुल काही बोलला नाही…ते मला घरची आठवण येत होती म्हणून…” नंदिनी बळेच हसत म्हणाली.
” तू काळजी नकोस करू नंदिनी…मी ओळखते ना प्रकाशला…त्याचा राग कमी होईल तेव्हा स्वतःच तुला भेटायला येईल…आणि आईची आठवण आली तर तिला फोन करून घेत जा…” आत्या म्हणाली.
” हो…” नंदिनी हळूच म्हणाली.
” आणि आणखी एक…” आत्या म्हणाली.
” काय…?” नंदिनीने विचारले.
” नकुल आता तुझा नवरा आहे…त्याला आरेतुरे अशी हाक मारायची नाही.. तुम्हाला असे म्हणायचे…” आत्या म्हणाली.
” हो आत्या…” नंदिनी दाताखाली जीभ चावत म्हणाली.
आणि दोघीही कामाला लागल्या. त्यानंतर सगळ्यांनी जेवण केले आणि झोपायला निघून गेले. नकुल आणि नंदिनी प्रचंड असहज होत होते. नंदिनीने समोर जाऊन स्वतःहून स्वतःचे अंथरूण जमिनीवर अंथरले आणि तिथेच झोपली. आता नकुलची असहजता जरा कमी झाली होती.
इकडे उषाताई घरून निघून गेल्याने घरातली व्यवस्था मोडकळीस आल्यातच जमा होती. प्रकाशरावांच्या आईला तर उषाताई सून बनून आल्यापासून कधीच काही करावे लागले नव्हते. अगदी उषाताई आजारी असली तरीही त्यांनी कधीच उषाताईंना कामाच्या बाबतीत कुठलीही मदत केली नव्हती.
पण आता मात्र सगळं काही त्यांनाच करायचं होतं. दोनच दिवसात त्यांनी हात टेकले. प्रकाश रावांनही चुटपुट लागली होती. कारण एवढ्या वर्षांची सोबत अशी सहजासहजी सुटत नाही. ते उषाताई वर रागावलेले असले तरी त्यांचं आपल्या बायकोवर प्रेम होतं. सोबतीची सवय होती.
त्यांना ही वाटायचे की उषाताईंना जाऊन परत घेऊन यायचं म्हणून. पण त्यांच्यातला पुरुषी अहंकार त्यांना तसे करू देत नव्हता. इकडे आजी मात्र सतत म्हणायच्या की जाऊन उषाला परत घेऊन ये. पण जिला स्वतःहून माहेरी पाठवलंय तिला स्वतः जाऊन घेऊन येणे त्यांना कमीपणाचे वाटत होते.
उषाताईंच्या घरच्यांना सुद्धा असेच वाटत होते की जोपर्यंत प्रकाशराव स्वतः उषाला घ्यायला येत नाही तोपर्यंत तिने जाऊ नये म्हणून. उषाताई नंदिनीशी बोलायच्या पण त्यांनी तिला हे समजू दिले नाही की बाबांनी तिला रागाने माहेरी पाठवलंय म्हणून.
नंदिनी आणि नकुल एकमेकांशी फक्त कामापुरते बोलायचे. पण सरलाताईंशी मात्र नंदिनीची गट्टी जमली होती. ती दिवसभर त्यांच्या मागे मागे राहायची. नकुल आणि नंदिनी मधील वागणे सरलाताईंच्या लक्षात येत होते पण सध्या त्यांना त्यांचा वेळ देणेच योग्य राहील असे त्यांना वाटत होते.
नंदिनी आता घरात चांगलीच रुळली होती. छान साडी घालून तयार व्हायची. आल्या गेल्या पाहुण्यांचे स्वागत करायची. घरात कामांना मदत करायची आणि कधीतरी आत्यासोबत शेतात जाऊन मस्तपैकी फिरायची. तिथेच जेवण करून मग संध्याकाळी दिवेलागणीच्या आधी घरी हजर व्हायच्या.
गावातील बायकांना नंदिनी चे फार कौतुक वाटायचे. एवढीशी पोर पण वागण्या बोलण्यात खूप हुशार होती. तिचे असे एखाद्या दारुड्या मुलासोबत लग्न झाले असते तर तिच्या आयुष्याची नासाडी झाली असती असे वाटून तर अनेकांना सरलताईंचा निर्णय खूप योग्य वाटत होता.
गावात सुद्धा सुनील राव एक चांगले व्यक्ती म्हणून आधीच नावारूपास आले होते. पण त्यांच्या या कृतीने त्यांच्याबद्दल चा आदर आणखीनच वाढला होता. नकुल ला आधी वाटायचे की त्याचे मित्र त्याला हसतील. आजूबाजूचे लोक चिडवतील पण असे काहीच झाले नाही.
उलट त्याच्या लग्नाच्या निर्णयाने सगळ्यांनाच त्याचे कौतुक वाटले होते. त्यामुळे त्याचा नंदिनीवरचा राग हळूहळू का होईना ओसरत होता. नंदिनी सगळ्यांशी किती मिळून मिसळून वागते हे तो पाहत होता. पण सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी नंदिनी आपल्याशी मोकळी बोलत नाही हे त्याच्या लक्षात येत होते.
इकडे प्रकाशरावांच्या घरात मात्र काहीच आलबेल नव्हतं. घरातील कामे आजीच्याने आता होत नसत. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आपण उषाला माहेरी पाठवले हे आठवून आजीला खूप पश्चात्ताप व्हायचा. त्यापेक्षा तिला इथे घरीच ठेवून रोज सूनावता आले असते. तिच्यामागे आणखी कामे लागली असती.
घरासोबतच शेतीची कामे सुद्धा करून घेतली असती. तिला पाहून प्रकाशचा राग सुद्धा धगधगत राहिला असता. पण आता ती नाहीये तर आपला प्रकाश सुद्धा झाल्या प्रकारात आपली काही चूक आहे का ह्याचे आत्ममंथन करत होता हे आजी जाणून होती.
इकडे आपण घरातील कामे करत आहोत अन् तिकडे ती माहेरी मज्जा असेल ह्या विचाराने आजीचे डोके दुखायचे. अशातच रक्षाबंधनाचा सण जवळ आला. एरव्ही पोस्टाने राखी पाठवणाऱ्या शालू आत्याने यावेळी मात्र भावाजवळ यावेळी तू स्वतः ये म्हणून तगादा लावला.
त्याला कारणही तसेच होते. नंदिनी आणि उषाताईंमुळे आपला जो अपमान झालाय त्याचा मोबदला त्यांना घ्यायचा होता. उषाताईंना प्रकाशरावांनी माहेरी पाठवलंय हे तर त्यांच्या आईकडून शालू आत्याला समजले होतेच पण तरीही प्रकाश रावांच्या मनात त्यांना बायको अन् मुलीबद्दल आणखीनच विष पेरायचे होते.
त्यांनी स्वतःहून प्रकाशरावांचे ट्रेनचे रिझर्व्हेशन करवून घेतले होते. आपल्या घरी इतका अपमान होऊनही आपल्या बहिणीने इतक्या प्रेमाने आपल्याला बोलावले म्हटल्यावर प्रकाशराव सुद्धा आनंदाने जायला तयार झाले. आपली बहीण एवढ्या दूर राहते तरीही तिला तिच्या भावाची आठवण येते हे सुद्धा त्यांच्यासाठी काही कमी नव्हते.
ते इंदूरला गेले तेव्हा शालू ताईंनी हसत त्यांचे स्वागत केले. त्यांना चहापाणी दिले आणि पांहुण्यांच्या खोलीत त्यांचे सामान ठेवून दिले. शालूताईंचा नवरा आणि मुलगा दोघेही त्यांच्या बांधकाम व्यवसायाच्या ऑफिसमध्ये गेले होते. संध्याकाळी दोघेही घरी करत आले. प्रकाशरावांशी औपचारिक बोलणे झाले आणि दोघेही आपापल्या खोलीत निघून गेले. जेव्हा राखी बांधली तेव्हा प्रकाशराव म्हणाले.
” मी उद्या सकाळी निघतो ताई…”
” एकट्या लवकर कशाला…? दोन चार दिवस थांबून जा…” शालूताई म्हणाली.
” अगं पण कशाला…राखी बांधून झाली…तुझी ख्यालखुशाली कळली… तुझं सगळं चांगलं चाललंय ते पाहून आनंद झाला…आणि तसेही शेतीची कामे सुरूच आहेत तिकडे…” प्रकाशराव म्हणाले.
” अरे थांब ना…इतक्या दिवसांनंतर आला आहेस तर थोडा थांबून जा…उद्या तुला एका ठिकाणी नेणार आहे…तुलाही जरा बरं वाटेल…” शालूताई म्हणाली.
मग प्रकाशराव सुद्धा त्यांचा हट्ट मोडू शकले नाहीत आणि थांबायला तयार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी शालू ताईंचा नवरा आणि मुलगा ऑफिस ला गेल्यावर शालूताई प्रकाशरावांना सोबत घेऊन बाहेर जायला निघाल्या. त्यांनी विचारले की आपण कुठे जातोय पण शालू ताईंनी काही विशेष सांगितले नाही.
दोघेही एका मोठ्या बिल्डिंग समोर येऊन थांबले. ही बहुमजली इमारत पाहून प्रकाशराव सुद्धा थक्क झाले. शालू ताई त्यांना घेऊन लिफ्टमधून सहाव्या मजल्यावर घेऊन गेली. तिथे एक मोठा बंगलासदृश्य फ्लॅट होता. शालू ताईंनी बेल वाजवली तेव्हा एका बाईने दार उघडले. त्यांना पाहून प्रकाशरावांना एकदम धक्काच बसला.
क्रमशः
©®आरती निलेश खरबडकार.
कोण असेल ही बाई…? शालूताईंचा प्रकाशरावांना इथे आणण्यामागील उद्देश काय असेल…? ह्याचा उषाताई आणि नंदिनीच्या आयुष्यावर काही परिणाम होईल का…?” जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग वाचायला विसरू नका.