हक्काची सावली – भाग ९ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

 

तिथे बराच वेळ तमाशा घालून, लग्नाचा दबाव टाकून काहीच होत नाही हे बघून रघु आणि त्याची आई शेवटी परत गेले. पूजाची आई सुद्धा परत गेली. पण पूजा मात्र आता हट्टालाच पेटली होती की तिला प्रतीक्षासोबत रहायचे नाहीच म्हणून. रोहन ने तिला खूप समजावले पण ती काही ऐकायलाच फायर होत नव्हती.

 

शेवटी गणपतराव रोहनला म्हणाले की तू नोकरीच्या ठिकाणी भाड्याने खोली घे आणि तुझ्या बायकोला तिथे घेऊन जा. हे ऐकून पूजाला खूपच आनंद झाला. शेवटी ह्या सगळ्यांपासून दूर जाऊन राहणार या विचारानेच ती सुखावली. रोहनला मात्र प्रश्न पडला की एवढ्याशा पगारात शहरात राहण्याचा खर्च भागवायचा तरी कसा.

 

पण पूजा आता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने रोहनला शहरात एक खोली बघून तिथे राहायला जावंच लागलं. ज्या दिवशी पूजा सामान बांधून शहरात जायला निघत होती त्या दिवशी सुद्धा तिने मुद्दामहून प्रतिक्षा ला टोमणे मारले. तिला वाटत होते की इथून निघून तिने खूप मोठे काम केले आहे. आता या सगळ्यांपासून मोकळी होणार ह्याचा तिला आनंद झाला होता.

 

पूजा अन् रोहन सामान घेऊन शहरात राहायला गेले त्या दिवशी सगळं घर जणू खायला उठलं होतं. आपल्यामुळे हे घडतंय असं वाटून प्रतीक्षा खूप जास्त दुखी होत होती. आयुष्यात सगळीकडे अंधार आहे असे वाटल्यावर एक अशी घटना घडली ज्याने प्रतिक्षाचे पुढचे आयुष्य बदलून जाणार होते.

 

दुसऱ्या दिवशी प्रतीक्षाच्या घराबाहेर अचानक एक कार येऊन थांबली. प्रतीक्षाने बाहेर जाऊन बघितले तर ती अभिजीत ची कार होती. कारचा आवाज ऐकून सगळेच गोंधळले. त्या कार मधून बाहेर येणारी व्यक्ती पाहून मात्र सगळ्यांनाच धक्का बसला. त्या गाडीतून वनमालाबाई उतरल्या. त्यांच्या ड्रायवर ने त्यांना आधार देऊन गाडीतून बाहेर यायला मदत केली. त्यांना स्वतःहून नीट चालता सुद्धा येत नव्हते. त्या ड्रायव्हरच्या आधाराने प्रतीक्षाच्या घरापर्यंत चालत आल्या.

 

सगळे एवढे गोंधळले होते की त्यांनी वनमालाबाईंना घरात येऊन बसायला सुद्धा सांगितले नाही. वनमालाबाई स्वतःच आत जाऊन बसल्या. मग गणपतरावांनी त्यांना विचारले.

 

” तुम्ही…अशा अचानक ?”

 

मग वनमालाबाईंना दोन दिवसांपूर्वीची घटना आठवली. घरी वकील कसल्याशा कामानिमित्ताने आले होते. तेव्हा त्यांच्याकडून वनमालाबाईंना कळले की कागदोपत्री अभिजीत ची बायको अजून प्रतिक्षाच असल्याने त्याची सगळी संपत्ती आपोआप प्रतीक्षाच्या नावावर जाणार होती.

 

क्षणभर वनमालाबाई स्तब्ध बसल्या. त्यांच्या हातातून कागद खाली पडले. त्यांच्या डोळ्यांसमोर प्रतीक्षाचा चेहरा आला. तीच प्रतीक्षा जिला त्यांनी घराबाहेर काढलं. जिच्यावर अन्याय केला. आज सगळं तिचंच झालं होतं.

 

त्या रात्री वनमालाबाई झोपल्या नाहीत. त्यांच्या मनात सतत एकच विचार चालू होता की आपण तिच्याशी कसे वागलो. त्यांना पहिल्यांदा जाणवलं की संपत्ती, अहंकार, प्रतिष्ठा हे सगळं क्षणिक असतं. माणुसकीच शेवटी उरते. आणि ती त्यांनी गमावली होती. म्हणून आता आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी त्या ही सगळं प्रतीक्षा द्यायला तिच्या घरी आल्या होत्या.

 

हे सगळं त्यांनी प्रतीक्षाच्या घरी सगळ्यांना सांगितले. सगळे हे ऐकून थक्क झाले. नेमकं काय बोलावं हे त्यांना कळत नव्हते. प्रतिक्षाचं तर काही डोकं चालत नव्हतं. शेवटी गणपतराव म्हणाले.

 

” आम्हाला ह्यातलं काहीच नकोय. काय फायदा आता या सगळ्याचा. जे व्हायचं ते होऊन बसलं. अभिजीत आता या जगत नाही ह्याचं आम्हाला पण खूप वाईट वाटलं होतं. आता आम्हाला तुमच्याकडून काहीच नकोय…”

 

” पण ह्या सगळ्यांवर तिचा हक्क आहे. हे सगळं तिचंच आहे. आता मला तर या जगात कोणीच उरलेलं नाही. अभिजीत सुद्धा शेवटच्या दिवसात फक्त प्रतीक्षाचेच नाव घेत होता. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला होता. शिवाय प्रतिक्षाच त्याची कागदोपत्री वारस आहे. आधी तिचे हक्क हिरावून घेतल्याची खूप मोठी शिक्षा दिली आहे देवाने आम्हाला. आता मात्र तिचा हक्क मी तिला द्यायला आली आहे. तिने तो घेतला तर निदान सुखाने डोळे मिटू शकणार मी.” वनमालाबाई म्हणाल्या.

 

हे बोलताना वनमालाबाईंच्या डोक्यात अश्रू आले. त्या रडायला लागल्या. त्यांना इतकं हतबल, अशक्त, दुःखी, पश्चात्तापदग्ध पाहून प्रतीक्षाला गलबलून आलं. तिने त्यांचा हात हातात घेतला आणि ती रडू लागली.

 

” मला अभिजीतची संपत्ती नको होती. कधीच नको होती. मी त्यांच्या संपत्तीवर कधीच भाळली नव्हते. मला तर फक्त त्यांचे प्रेम हवे होते. त्यांची बायको म्हणून मानसन्मान पाहिजे होता. त्यांची सोबत पाहिजे होती. पण नशिबाने मला आधी त्यांची टाकलेली बायको म्हणून मिरवायला भाग पाडले. आणि आता त्यांची विधवा म्हणून. खूप राग यायचा मला तुम्हा दोघांचाही. पण ते गेल्यावर या रागाला, या संपत्तीला काहीच अर्थ राहिला नाही ना आई.” ती म्हणाली.

 

” मग कधीकाळी ज्याच्यावर तू एवढे प्रेम केले त्या तुझ्या नवऱ्याच्या मागे त्याच्या संपत्तीची वाताहत झालेली तू पाहू शकणार आहेस का. त्याचं सगळ वैभव धुळीस मिळालेलं पाहून त्याच्या आत्म्याला किती त्रास होईल. त्यामुळे हे सगळं तू सांभाळ, तू उपभोग घे या सगळ्यांचा. तेव्हा कुठे या सगळ्याचे सार्थक होईल.” वनमालाबाई म्हणाल्या.

 

आता मात्र प्रतीक्षा नाही म्हणून शकली नाही. तिने अभिजितच्या संपत्तीची आणि वनमालाबाईची काळजी घेण्याचे ठरवले. गणपतराव आणि शालिनीताईंनी सुद्धा मग यावर काही हरकत घेतली नाही. त्यानंतर प्रतीक्षा अधूनमधून वनमालाबाईंना भेटायला जायला लागली. मारण्या घरात गेल्यावर तिच्या जुन्या आठवणी पुन्हा डोके वर काढायच्या.

 

या घरात नवीन सून म्हणून आल्यावरचे नवीन दिवस, अभिजीतसोबत घालवलेले सुंदर क्षण, त्यानंतर या घरातून बाहेर काढले गेले तो क्षण, पुन्हा जेव्हा अभिजीतच्या दुसऱ्या लग्नाची बातमी आल्यावर ह्या दारात आत घ्या म्हणून केलेली विनवणी. सगळं सगळं तिला आठवत होतं. या घराचं रितेपण तिला जाणवत होतं. पण कुठेतरी या घराशी आपुलकी अजूनही तिच्या मनात होती.

 

वनमालाबाई आता पुरत्या बदलल्या होत्या. त्याचा अहंकार, तोरा, कडक स्वभाव ह्यातलं आता काहीच त्यांच्यात उरलं नव्हतं. प्रतीक्षा ला आता त्या मुलीप्रमाणे जपायच्या. त्यांच्या तब्येतीत सुद्धा आता पहिल्यापेक्षा सुधारणा दिसून येत होती. वनमालाबाईंनी प्रतीक्षाला पुढचे शिक्षण घेण्याबद्दल सुचवले. प्रतीक्षाने आता सगळं काही नव्याने शिकायची तयारी दाखवली होती. वनमालाबाईंनी प्रतीक्षाला अभिजितच्या प्रॉपर्टी बद्दल सुद्धा व्यवस्थित समजावून सांगितले होते.

 

सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. इतक्यात एक दिवशी ताडताड दार उघडून मनाली आत आली. तिला पाहून वनमालाबाई आणि प्रतीक्षा

दोघीही आश्चर्चकित झाल्या.

 

क्रमशः

हक्काची सावली – भाग १० ( अंतिम भाग )

 

Leave a Comment