प्रतापने तिचे काहीही ऐकुन न घेता तिला गुन्हेगार ठरवले होते. तिने इतके दिवस सासूबाईंना आपली आई म्हणून त्यांच्या प्रत्येक टोमण्याकडे दुर्लक्ष केले होते. तिने त्यांची मुलगी बनण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता पण त्या मात्र तिची आई होऊ शकल्या नाहीत. आणि आज प्रताप ने तिचं मन दुखावलं होतं. सासूचे सततचे टोमणे, तिच्या माहेरच्या परिस्थिती बद्दल सतत होणारे भाष्य, आज तिच्या वडिलांचा झालेला अपमान आणि प्रतापने मारलेली थप्पड हे सर्व आठवून नेहा निराश झाली होती. तिच्या मनात नकारात्मक विचारांनी घर केले.
आता पुढे…
इतक्यात तिच्या सासऱ्यांना झालेला प्रकार कळला. त्यांनी तडक नेहाच्या वडिलांना फोन करून त्यांची माफी मागितली आणि काही दिवस नेहाला माहेरी नेण्याची विनंती सुद्धा केली. नेहाचे वडील नेहाला त्यांच्या घरी घेऊन गेले. माहेरी येऊन नेहाला थोडे बरे वाटले. नेहाने सासरे तिला भेटायला तिच्या माहेरी गेले. आणि नेहाची समजूत काढली. आणि मी सर्वकाही ठीक करेन असे आश्वासनही दिले.
इकडे प्रताप मात्र अजूनही रागातच होता. नेहाला माहेरी जाऊन आठवडा झाला तरीही प्रताप तिला भेटायला गेला नाही आणि तिला साधा फोनही केला नाही. नेहाने सुद्धा स्वतःहून प्रतापला फोन केला नाही.
नेहा रागावून माहेरी गेली होती. नेहाच्या सासूबाईंच्या मनाचेच झाले होते. मात्र तरीही तिच्या सासूबाईंना आनंद होत नव्हता. नेहा घरी नाही या गोष्टीचे मनोमन त्यांना दुःख झाले होते. पण याची जाणीव अजूनही त्यांना झाली नव्हती.
हळूहळू प्रताप चा राग शांत झाला. आणि आपण नेहा ला थप्पड मारल्याचा त्याला पश्चात्ताप व्हायला लागला. पण तरीही तो स्वतःहून तिला आणायला वा तिच्याशी बोलायला पुढाकार घेत नव्हता. मात्र त्याला मनोमन नेहाची आठवण येत होती. तिचं ते सतत त्याच्या मागेपुढे असणं, त्याच्या मनातलं सर्व तिला कळण, तिच्यासोबत घालवलेले प्रेमाचे क्षण सतत त्याला आठवायचे.
नेहाच्या सासूबाईंना सुद्धा नेहाची आठवण यायला लागली. नेहा त्यांना कधीच कुठल्याही कामाला हात लावू द्यायची नाही. सर्वकाही एकटीच सांभाळायची. त्यांचे बोलणे निमूटपणे ऐकुन घ्यायची. तरीही आई…आई…म्हणून सतत त्यांच्याभोवती मिरवायची. नेहा घरी असताना त्यांनी कधीच नेहाला समजून घेतले नाही पण आज ती नसताना त्यांना नेहाची खूप आठवण येत होती. प्रतापला सुद्धा नेहाची आठवण येत आहे हे नेहाच्या सासूबाईंना कळत होते.
इतक्यात एक दिवस अचानक प्रतापच्या वडिलांनी प्रताप आणि त्याच्या आईला हॉल मध्ये बोलावले आणि म्हणाले…
” हे प्रताप आणि नेहाच्या डिव्होर्स चे पेपर्स आहेत. प्रताप तू सही करून घे म्हणजे नेहाला पाठवता येईल.”
” पण बाबा…डिव्होर्स….हे काय बोलत आहात तुम्ही…?” प्रताप आश्चर्याने म्हणाला.
” मी तुम्हा दोघांच्या डिव्होर्स बद्दल बोलत आहे… आज नाहीतर उद्या हे करावच लागेल मग आजच का नको..?
आणि या फाईल मध्ये काही मुलींचे फोटो आणि बायो डाटा आहेत. तुम्ही दोघे बघा आणि एखादी मुलगी निवडा.” प्रतापच्या आईकडे फाईल सरकवत प्रतापचे बाबा म्हणाले.
” दुसरं लग्न…डिव्होर्स…हे काय बोलताय तुम्ही…” प्रतापची आई म्हणाली.
” अग नेहाला घरातून जाऊन आज दोन महिने झालेत. प्रताप तिला आणायला गेला नाही आणि बोलला देखील नाही. आणि नेहा स्वतः सुद्धा परत आली नाहीय. आणि तुसुद्धा तिला परत आणायचा विषय काढला नाहीस. याचा अर्थ असाच होतो ना की तुम्हा दोघांना सुद्धा ती या घरात नकोय. आणि प्रताप आणखी किती दिवस एकटा राहणार. कधीतरी त्याच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करावाच लागणार आहे…म्हणून मीच पुढाकार घेतला.” प्रतापचे बाबा म्हणाले.
” पण बाबा मला डिव्होर्स नकोय… माझं प्रेम आहे नेहावर. मला तिच्यासोबत रहायचंय.” प्रताप म्हणाला.
” पण तू एकदाही तिला न्यायला गेला नाहीस किंवा तिच्याशी बोलला देखील नाहीस. मग याचा अर्थ नेमका काय काढायचा.” प्रतापचे बाबा म्हणाले.
” नेहाने आईला उलटसुलट बोलायला नको होतं…ती जोपर्यंत आईची माफी मागणार नाही तोपर्यंत मी तिच्याशी बोलणार नाही.” प्रताप म्हणाला.
इतक्यात प्रतापची आई म्हणाली…” मला माफ करा…आज माझ्यामुळे माझ्या मुलाचा चांगला संसार मोडकळीस आलाय..”
” हे तू काय बोलत आहेस आई…तुझ्यामुळे काहीच नाही झालंय…जे काही झालं त्यामध्ये चूक नेहाची होती…तू वाईट नको वाटून घेऊस…”
” नाही रे बाळा…नेहा मला काहीही बोलली नाही…मी तुझ्याशी खोटं बोलले…तू माझा एकुलता एक मुलगा…इतका जास्त शिकला आणि मोठ्या नोकरीला लागला…तुझ्यासाठी एखादी श्रीमंत घराण्यातील मुलगी मला सून म्हणून पाहिजे होती…पण तुझ्या बाबांनी नेहाला तुझ्यासाठी पसंत केले…म्हणून मी ने हा चा राग राग केला…तिच्या छोट्या छोट्या चुकांना सुद्धा मोठं करून सांगितलं..पण तिने कधी तक्रार केली नाही…तिच्या चांगुलपणा कडे माझं कधी लक्षच गेलं नाही…त्या दिवशी सुद्धा ती मला काहीच बोलली नाही उलट मीच तिच्या वडिलांसमोर काहीबाही बोलले…पण ती निघून गेल्यावर मला माझी चूक कळते आहे…खरंच माझी चूक झाली…माझ्या मुलाचा घटस्फोट व्हावा असं मला कधीच वाटलं नाही…पण नकळत गोष्टी इतक्या बिघडवल्या मी…मला माफ कर प्रताप…मी माझ्या मुलाचा चांगला चाललेला संसार मोडायला निघाले होते…खूप मोठी चूक झाली माझ्या हातून…”
” नाही आई…चूक तर माझ्या हातून झालीय…मी ने हाचे ऐकुन घ्यायला पाहिजे होते…जे झालं ते शांतपणे समजून घ्यायला हवे होते…पण मी काहीही विचार न करता तिच्यावर हात उगारला…तिला किती दुःख झाले असेल…इतके दिवस मी तिच्याशी एक शब्द देखील बोललो नाही…तिला काय वाटत असेल…ती बोलेल माझ्याशी…मला माफ करू शकेल का ती….” प्रताप रडवेला होत म्हणाला.
” माफ करेल ती…आपण दोघेपण जाऊ तिची माफी मागायला… मी हात जोडून विनंती करेल तिला घरी यायची…” प्रतापची आई म्हणाली.
आणि ते सर्व लगेच नेहाला भेटायला तिच्या माहेरी गेले. नेहा तिच्या घराबाहेर असलेल्या झोपाळ्यावर बसून गाणी ऐकत होती. प्रतापला पाहून ती आतमध्ये निघून गेली. प्रताप आणि त्याचे आईबाबा सुद्धा तिच्या मागे घरात आले. नेहाच्या वडिलांनी त्यांचे हसून स्वागत केले त्यांच्या इथे येण्याचं कारण विचारलं.
” मला माफ करा…मी त्यादिवशी तुमच्यासमोर नको नको ते बोलले…नेहाला सुद्धा वाईट बोलले…आज माझ्यामुळे नेहा आणि प्रताप मध्ये दुरावा आलाय…माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला…मला माफ करा…” प्रतापची आई म्हणाली.
” तुम्ही माफी कशाला मागताय…छोट्या छोट्या गोष्टी तर होतच राहणार…आणि मला इतकं वाईट वाटलं नाही…तुम्ही मला माझ्या बहिणी सारख्या आहात…मला तुमचा राग आलेला नाही…” नेहाचे बाबा म्हणाले.
” हा तर तुमचा चांगुलपणा आहे…तुमच्यासारख्या चांगल्या माणसांना मी ओळखले नाही…खरी श्रीमंती ही संस्कारात असते हे मला आज कळले…” प्रतापची आई म्हणाली.
इतक्यात चहाचा ट्रे घेऊन नेहा तिथे आली. सर्वांना नमस्कार केला. आणि बाजूला जाऊन उभी राहिली. नेहाला पाहून प्रतापची खूप इच्छा झाली तिच्याशी बोलायची पण सर्वांसमोर तो काही बोलला नाही. इतक्यात प्रतापची आई नेहाला म्हणाली.
” नेहा…मला माफ कर…मी तुला समजू शकले नाही…तू नेहमी मला आई मानत आलीस आणि मी मात्र तुला मुलगी मानले नाही…पण आता मला माझी चूक कळते आहे…झालं गेलं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू…तू आपल्या घरी चल…तुझ्याशिवाय घर अगदी सूनेसूने आहे…”
नेहा त्यांचा हात हातात घेत म्हणाली…” आई तुम्ही माफी नका मागू…मी तुमच्यावर रागावलेली नाहीय…ते प्रताप मला खूप बोलले म्हणून मला राग आला होता आणि रागारागाने मी निघून आले…पण नंतर मलासुद्धा खूप वाईट वाटले…मी असं निघून यायला नको होतं…पण बरं झालं की बाबांनी (प्रताप च्या बाबांनी ) मला समजावून सांगितले…आणि म्हणाले की ते सर्व काही ठीक करतील…मला त्यांचा खूप आधार वाटला तेव्हा…आणि म्हणूनच मी निश्चिंत होते..”
” म्हणजे बाबांनी तुला समजावून सांगितले.” प्रताप आश्चर्याने म्हणाला. ” मग बाबा सकाळी ते डिव्होर्स पेपर्स का आणले होते तुम्ही.?”
” मुळात ते डिव्होर्स पेपर्स नव्हतेच…मी असेच काही नक्की पेपर्स तुझ्यापुढे ठेवले होते…त्याशिवाय तुझ्या मनात काय आहे हे तू बोलला नसतास…आणि शिवाय तुमच्या मातोश्रींचे मनपरिवर्तन झाले नसते…” प्रतापचे बाबा हसत म्हणाले.
आणि सर्वजण आनंदित झाले. नेहासुद्धा कसलेही आढेवेढे न घेता प्रतापच्या म्हणजेच तिच्या घरी गेली. तिला सासूबाईंच्या रुपात दुसरी आईच मिळाली होती. तिच्या सासरेबुवांची तर ती आधीच लाडकी होती. आणि प्रताप ने सुद्धा तिची माफी मागितली. नेहा आणि प्रताप यांचा राजाराणी चा संसार आत्ताशा सुरू झाला होता. पुढे नेहाने तिच्या घरच्यांच्या मदतीने स्वतःचे बुटीक सुरू केले. आज नेहा तिच्या घरच्यांच्या मदतीने स्वतःच्या पायावर उभी आहे.
नेहाच्या सासरेबुवांनी त्यावेळी परिस्थिती चांगल्या रीतीने सांभाळली. नेहाला समजून घेतले आणि प्रताप व नेहाच्या सासूबाईंना त्यांची चूक लक्षात आणून दिली. म्हणून नेहा आणि प्रताप आज सुखाचा संसार करत आहेत.
समाप्त.
©आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला लाईक करा.