दुपारी सर्व कामे आटोपून दीपा तिच्या रूम मध्ये आराम करायला जाणार इतक्यात दारावरची बेल वाजली. दीपाने दरवाजा उघडला तर समोर तिची शेजारीण सुधा होती.
” मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागलीय. म्हणून मी माहेरी जातेय. एका महिन्यानंतर परत येईल. तोपर्यंत घराकडे जरा लक्ष ठेवशील.” सुधा म्हणाली.
” हो.” दीपाने होकारार्थी मान डोलावली.
एवढे बोलून सुधा निघून गेली. पण दीपा मात्र विचारत बुडून गेली. तिच्या सर्व मैत्रिणी उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत माहेरी जात असत. दीपा ला सुद्धा तिच्या माहेरची खूप आठवण यायची पण दीपा मात्र तिच्या लग्नानंतर कधीही माहेरी गेली नाही. त्याला कारण देखील तसच होतं. दीपाच्या नजरेसमोर आता सर्व भूतकाळ स्पष्टपणे दिसू लागला.
दिपाच्या वडिलांची खूप इच्छा होती की त्यांना एक मुलगी असावी. मात्र त्यांना दोन्ही मुलेच झाली. त्यांनी मुलीसाठी देवाकडे साकडे घातले आणि दोन मुलांच्या नंतर त्यांच्याघरी दीपाचा जन्म झाला. दिपा च्या वडिलांना खूप आनंद झाला. दीपा तिच्या आई वडिलांची खूप लाडकी होती. तिचे दोन भाऊदेखील तिच्यावर खुप प्रेम करायचे. दिपाच्या वडिलांना दिपाचे खूप कौतुक होते. दीपासुद्धा अभ्यासात खूप हुशार होती. तिच्या वडिलांनी तिचे सर्व लाड पुरवले. तिला चांगल्यातली चांगली गोष्ट मिळावी यासाठी ते सतत प्रयत्नशील असत.
दीपा शहरातल्या कॉलेजमध्ये शिकायला जाणारी गावातील पहिलीच मुलगी होती. घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी दीपाला शहरातल्या कॉलेजमध्ये शिकायला पाठवले होते. दीपा शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभी राहावी अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते.
दीपा कॉलेजमधील तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या आणि घटस्फोटीत असलेल्या प्राध्यापक अविनाश च्या प्रेमात पडली. तिला त्यांच्याशीच लग्न करायचं असल्याचं तीने घरच्यांना ठासून सांगितले. दीपाच्या वडिलांनी तिला विरोध केला. आपल्या लाडक्या लेकीचं लग्न एका घटस्फोटीत व्यक्तीशी लाऊन देणं त्यांना पटलं नाही. त्यांनी दिपाला समजावण्याचा प्रयत्न केला पण दीपा ने कुणाचेही काही ऐकले नाही. शेवटी जे व्हायला नको होते तेच झाले. दीपाने पळून जाऊन अविनाश सोबत लग्न केले. आणि परत कधीच घरी नाही गेली. एकदा तिने घरी फोन केला होता तेव्हा तिचे बाबा म्हणाले की ” तू आमच्यासाठी मेलेली आहेस. इथे तुझे कोणीच नाही. इथे परत फोन करायचा नाही.” आणि तेव्हापासून दीपाचे माहेर तिच्यापासून कायमचे दुरावले. या घटनेला चार वर्ष झाली होती. पण दीपा मात्र तिच्या माहेराला कायमची मुकली होती.
लग्न झाल्यावर दीपाला तिच्या आई वडिलांची खूप आठवण येई. तिची चूक तिच्या लक्षात आली होती. त्यांना पाहण्यासाठी ती आतुर झालेली असे. मात्र परत माहेरी जाण्याची तिची हिम्मत झाली नाही. तिच्या माहेराहून सुद्धा कोणी तिला भेटायला आले नाही. तिच्या मनाची होणारी घालमेल तिच्या नवऱ्याला अविनाशला दिसत होती.
संध्याकाळी अविनाश घरी आला तेव्हा तिचा पडलेला चेहरा पाहून त्याने विचारले.
“काय झाले.”
” कुठे काय ? काहीच नाही.” ती खोटे हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली.
” मी ओळखतो तुला… खरं सांग.” अविनाश म्हणाला.
आता मात्र दिपाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि तिने त्याला सुधाच्या माहेरी जाण्यामुळे आपल्याला देखील माहेरची आठवण येत असल्याचं सांगितलं.
” तू एकदा त्यांच्याशी बोलून तर बघ…चार वर्षे झालीत आता…ते तुला माफ करतील…हवं असेल तर मीसुद्धा येतो…आपण दोघे मिळून त्यांची माफी मागू.”
” खरंच…ते मला माफ करतील..” आणि दिपाला रडू कोसळलं.
पण तिच्या बाबांच्या समोर जायची तिची हिम्मत झाली नाही.
एकदा दीपा आणि अविनाश एका लग्न समारंभाला गेले होते. आणि तिथे दीपाचे बाबासुद्धा आले होते. दीपाने त्यांना पाहिले आणि त्यांना आवाज देत ती त्यांच्या दिशेने चालायला लागली. दिपाच्या बाबांनी तिला पाहिले पण तिच्या हाकेला ओ न देता ते तिथून निघून जायला लागले. दीपासुद्धा त्यांना आवाज देत वेगाने त्यांच्याकडे जात होती.
इतक्यात मध्येच एका खुर्चीमध्ये धडपडून दीपा खाली पडली. खाली पडताच ती मोठ्याने ” बाबा ” असे म्हणत विव्हळली. तिच्या विव्हळण्याच्या आवाजाने तिच्या बाबांनी मागे वळून पाहिले. दिपा च्या पायाला दुखापत झाली होती. हे बघून तिचे बाबा धावत तिच्याकडे आले आणि तिला कुठे लागले हे बघू लागले.
” लक्ष कुठे असते तुझ…? वेंधळेपणा करत असते नुसता..” तिचे बाबा म्हणाले. ” आता जास्त लागलं असतं म्हणजे “
इतक्यात अविनाश तिथे आला. त्याला पाहून दीपाचे बाबा भानावर आले. आणि तिथून जायला लागले. दीपाने तिच्या बाबांचा हात घट्ट पकडला. आणि म्हणाली.
” बाबा मला माफ करा… माझं चुकलं…मी अस करायला नव्हतं पाहिजे…मला तुमची खूप आठवण येते बाबा…मला माफ करा …” आणि दीपा बोलता बोलता रडायला लागली. तिला पाहून तिच्या बाबांना गहिवरून आलं. त्यांच्या हृदयाला पाझर फुटला. त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.
इतक्यात अविनाशने तिच्या बाबांच्या पायाला स्पर्श करीत त्यांना नमस्कार केला. अविनाशकडे पाहत दीपाचे बाबा तिला म्हणाले.
” जावईबापुंना घेऊन घरी कधी येणार आहेस..?”
हे ऐकुन दीपाला खूप आनंद झाला. तिने तिच्या बाबांना घट्ट मिठी मारली. दीपा आणि तिच्या बाबांनी आज आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. अविनाश मात्र त्यांना पाहून मनोमन खुश झाला.
आणि त्यादिवशी दीपा च हरवलेलं माहेर तिला पुन्हा मिळालं. आता दिपासुद्धा दर उन्हाळ्यात आणि दिवाळीत माहेरी जायला लागली. तिच्या आईवडिलांपासून लाड पुरवून घ्यायला लागली.