रश्मी आज खूप खुश होती. बऱ्याच दिवसानंतर ती आज बाहेर गेली होती. तिचा नवरा सुबोध नाही म्हणाला पण तिने हट्ट केला. मागच्या चार महिन्यांपासून ती घराच्या बाहेर पडलेली नव्हती. काल मात्र सुबोध च्या मित्राच्या घरी एक लहानसा समारंभ होता. इथे तिच्या बऱ्याच मैत्रिणी झाल्या होत्या. त्यासुद्धा समारंभाला येणार होत्या. रश्मीला तिथे जाण्याचा मोह आवरला नाही. त्या मित्राचं घर सुद्धा फार दूर नव्हतं. म्हणून सुबोध सुद्धा तिला सोबत घेऊन गेला.
मात्र दुसऱ्या दिवशी सकाळीच रश्मीला पोटात दुखल्यासारख व्हायला लागलं. हलके ब्लड स्पॉट सुद्धा दिसले. रश्मी घाबरून गेली. काय करू आणि काय नको हे तिला सुचत नव्हतं. तिने लगेच सुबोधला झोपेतून उठवलं. आणि त्याला सर्व सांगितलं. तिला नुकताच सातवा महिना लागला होता. दुसऱ्या महिन्यात डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली तेव्हा बाळाची वार खाली (placenta previa) असल्याचे समजले. जरासुद्धा धक्क्याने गर्भपात होऊ शकला असता. डॉक्टरांनी कंप्लीट बेड रेस्ट सांगितला होता.
सुबोध तिच्यावर ओरडलाचं. “तुला सांगितलं होतं ना बाहेर नको येऊस म्हणून. पण तू हट्ट केलास. सतत धसमुसळेपणा करत असतेस. माझं तर कधीच ऐकत नाहीस. सकाळचे साडेपाच वाजलेत. इतक्या लवकर तर हॉस्पिटल उघडलं सुद्धा नसेल.”
रश्मी आता पुरती घाबरून गेली. लग्न होऊन दोन वर्ष होत आली होती पण रश्मीला दिवस राहिले नव्हते. कितीतरी देवांना नवस बोलली होती ती. शिवाय डॉक्टरांची ट्रीटमेंट सुद्धा सुरू होती. आता कुठे रश्मीला होणार होती. आणि तिच्या बेजबाबदार वागण्यामुळे आज तिच्या बाळाला धोका निर्माण झाला होता.
रश्मी स्वतःला दोष देत रडायला लागली. आपण रश्मीला बोललो याचे सूबोधला वाईट वाटले. त्याने रश्मीला आधार दिला. आणि म्हणाला” थोडा वेळ थांब आपण डॉक्टरांकडे जाऊ. सर्वकाही ठीक होईल. काळजी करण्यासारखं काही कारण नाही. तू थोडा आराम कर आपण थोड्या वेळाने डॉक्टरांकडे जाऊ.”
पण रश्मीला काही झोप येईना. ती एकसारखी रडत होती. आठ दिवसांपासून तिला बाळाची थोडीफार हालचाल जाण वायला लागली होती. पण आज तर तिला बाळाची हालचाल सुद्धा जाणवत नव्हती. तिने किती स्वप्ने रंगवली होती बाळासाठी. तिने देवाच्या धावा करायला सुरुवात केली. तिने गजानन महाराजांना साकडे घातले. ती मनोमन देवाच्या धावा करायला लागली.
तिला सर्व आठवायला लागले. डॉक्टरांनी आराम करायला सांगितल्यावर सुबोधने घरातील सर्व कामांची जबाबदारी स्वतःवर घेतलेली. घरात ती आणि तिचा नवरा दोघेच राहायचे. तसा गावाकडे त्यांचा मोठा परिवार होता पण तिचा नवरा नोकरी च्या निमित्ताने बाहेर राहायचा. आणि लग्न करून आल्यावर तीसुद्धा त्याच्यासोबत इथे आली. त्यामुळे त्या दोघांनाही फक्त एकमेकांचा आधार होता. त्याने गावाहून आईला बोलावणे पाठवले होते पण इतक्या लवकर येऊन काय करणार. निदान आठव्या महिन्यात येईल अस म्हणाली होती त्याची आई.
त्यामुळे सर्व जबाबदारी आपसूकच त्याच्या खांद्यावर येऊन पडली. तोसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने घर सांभाळत होता. कपडे आणि भांडी करायला एक मावशी यायच्या. पण स्वयंपाक करण्यापासून ते लादी स्वच्छ करेपर्यंत सर्व कामे सुबोध स्वतः करायचा. रश्मी सुद्धा तिला जमेल तशी मदत करायची.
रश्मीला काय हवं काय नको ते सर्व आवर्जून पाहायचा. ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलीला अशा अवस्थेत जपते त्याप्रमाणेच सूबोधने रश्मीला जपले होते. सुबोध ऑफिसला गेल्यावर दिवसभर रश्मी एकटीच घरी असायची त्यामुळे तिची सतत चिडचिड व्हायची. पण सुबोध मात्र तिला एखाद्या लहान मुलीप्रमाणे समजावून सांगायचा. हे सर्व आठवून रश्मी आणखीनच दुःखी झाली.
शेवटी एकदाचे आठ वाजले. सुबोध ने चहा केला. रश्मी थोडी फ्रेश झाली आणि तिने चहा घेतला. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. पण सुबोध तिला हिम्मत देत होता. रश्मीने तिचे आवरले आणि ती डॉक्टरांकडे जायला निघाली. मनात मात्र देवाच्या धावा सुरूच होत्या. “आता सर्वकाही ठीक असुदे…यापुढे मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही… बाळ होईपर्यंत घरातून पायसुद्धा बाहेर काढणार नाही..” रश्मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होती.
एकदाची रश्मी दवाखान्यात पोहचली. डॉक्टर आलेले नव्हते. रश्मी एखाद्या देवाप्रमाने डॉक्टरांची वाट बघत होती. अर्ध्या तासाने डॉक्टर आल्या. तिथल्या नर्स ने डॉक्टरांना रश्मिबद्दल कल्पना दिली आणि डॉक्टरांनी लगेच रश्मीला केबिनमध्ये बोलावले. डॉक्टरांनी रश्मीला चेक केले आणि म्हणाल्या ” मला तर काही प्रॉब्लेम वाटत नाही. तरीपण एकदा सोनोग्राफी करून घ्या. काही असेल तर ते आपल्याला लगेच कळेल.” डॉक्टरांनी असे म्हटल्यावर रश्मीला थोडे बरे वाटले.
रश्मी आणि सुबोध दवाखान्यातून सरळ सोनोग्राफी सेंटर वर गेले. तिथे आधीपासून अपॉइंटमेंट घ्यावी लागत असे. मात्र रश्मीच्या डॉक्टरांनी रश्मिसाठी त्यांच्याकडे शब्द टाकला होता म्हणून त्यांना दोन तासानंतरची वेळ मिळाली होती. ते दोन तास रश्मीच्या आयुष्यातील सर्वात कठीण वेळ होती. ती आणि सुबोध एकमेकांशी काहीही बोलत नव्हते. कारण दोघांच्याही डोळ्यात आसवे होती. आणि दोघेही एकमेकांपासून स्वतःचे अश्रू लपवत होते.
शेवटी त्यांचा नंबर आला. ते दोघेही आतमध्ये गेले. डॉक्टरांनी रश्मीला तपासले. तिची सोनोग्राफी करताना त्यांनी सुबोध ला सुद्धा केबिन मध्ये बोलावले होते. सुबोध आणि रश्मी त्यांच्या स्क्रीनवर त्यांच्या बाळाला पाहत होते. बाळ हालचाली करत होते. डॉक्टरांनी सांगितले की सर्वकाही व्यवस्थित आहे. बाळ एकदम स्वस्थ आहे. काळजी करण्याची काहीही गरज नाही.
हे ऐकुन सुबोध आणि रश्मीच्या जीवात जीव आला. दोघेही आनंदले. तिने मनोमन देवाचे आभार मानले. दोघेही आनंदाने घरी आले. पुढे रश्मीने एका सुदृढ मुलीला जन्म दिला. रश्मी आणि सुबोध आईबाबा झाले. त्यांच्या संसारात त्यांच्या मुलीच्या रूपाने जणू आनंदाने जन्म घेतला होता.