शामराव दवाखान्यात एका बेंचवर बसून होते. त्यांची एकुलती एक मुलगी रुपाली आज मरणाच्या दारात उभी होती. तिची अवस्था पाहून त्यांना मोठमोठ्याने रडावेसे वाटत होते. पण त्यांच्या पत्नीला आणि मुलांना सुद्धा त्यांनाच सांभाळायचं होतं. शिवाय रूपालीची दीड वर्षांची मुलगी सुद्धा आईविना रडत होती. सारखी आईकडे धाव घ्यायची.
” कावेरी, तू काळजी नको करू. आपल्या रूपालीला काहीच होणार नाही. एकदम ठीक होईल बघ ती..” हे बोलताना शामरावांना एकदम भरून आलं.
” पण असं कसं झालं हो. सकाळी तर चांगली होती. माझ्या फुलासारखा पोरीला किती त्रास होत असेल.” कावेरी ताई धाय मोकलून रडायला लागल्या.
रुपाली ही शामराव आणि कावेरीताईंची थोरली मुलगी. तिला तिच्या पेक्षा लहान एक भाऊ होता संकेत. शामरावांच कुटुंब तस खूप मोठं होतं. आई, बाबा, दोन भाऊ, त्यांच्या बायका, मुलं. सर्वजण अगदी आनंदाने एकत्र राहत. त्यांची वडिलोपार्जित बरीच शेती होती. अगदी संपन्न घर होतं. घरात अगदी कशाचीही कमी नव्हती.
बघता बघता रुपालीच लग्नाचं वय झालं. रुपाली ही तिच्या बहीण भावांपैकी सर्वात मोठी. तिच्यासाठी भरपूर स्थळं पाहिली. शामरावांना त्यांच्या लाडक्या लेकीसाठी एक सर्वगुणसंपन्न असा मुलगा हवा होता.
त्यांचा हा शोध वैभव वर येऊन थांबला. वैभव चांगली नोकरी करायचा. शिवाय घर सुद्धा चांगलं होतं. घरातील जवळपास सर्वच जण नोकरी करायचे. एकदम सुखवस्तू कुटुंब. त्यांना सुद्धा रूपाली पसंत पडली.
चांगला मुहूर्त पाहून रूपाली आणि वैभवचं लग्न झालं. शामरावांनी लग्नात भरपूर हुंडा दिला. लग्नसुद्धा अगदी धूमधडाक्यात लावून दिलं. रूपाली सासरी नांदायला गेली. रुपाली ही घरातल्या प्रत्येक कामामध्ये हुशार होती. स्वयंपाकापासून ते घर टापटीप ठेवण्यापर्यंत सगळी कामे अगदी मन लावून करायची. तक्रारीसाठी कुठेच जागा नव्हती.
नवीन लग्न झालेलं असल्यामुळे रूपाली जेव्हा जेव्हा माहेरी जायची तेव्हा तेव्हा शामराव मुलीला आणि जावयाला काहीतरी महागडी भेटवस्तू देऊनच पाठवत. आता मात्र जावयाला त्यांच्या कडून जितकं मिळेल तितकं कमीच वाटू लागलं. शामरावांच वैभव त्याच्या नजरेत भरलं. वैभव च्या घरच्यांचा देखील आधीपासूनच शामरावांच्या संपत्तीवर डोळा होताच. रूपालीला सून करून घेण्यामागे त्यांचा हाच उद्देश होता. वैभव च्या घरचे सर्वजण नोकरी करायचे तरीही शामरावांच्या इस्टेटीवर त्यांची नजर होती.
सुरुवातीला त्यांनी रूपालीला नवीन गाडी घेण्यासाठी कमी पडत आहेत म्हणून दोन लाख रुपये आणायला सांगितले. रूपालीला वाईट वाटले. पण तरीही तिने शामरावांना जाऊन तिच्या घरच्यांनी मागणी सांगितली. शामरावांनी सुद्धा आनंदाने त्यांची मागणी पूर्ण केली.
पण पुढे त्यांची मागणी वाढतच राहिली. कधी नवीन प्लॉट घ्यायचा आहे तर कधी भावाच्या नोकरीचे पैसे भरायचे आहेत. शामराव त्यांच्या इतक्या मागण्या मान्य करू शकणार नव्हते कारण त्यांच्या संपत्तीत त्यांच्या इतर भावांचा आणि त्यांच्या मुलांचा सुद्धा वाटा होता. आता त्यांचे भाऊ सुद्धा कुरबुर करू लागले होते. घरात भांडणे होऊ लागली.
शामरावांनी त्यांची अडचण वैभवला समजावून सांगितली. तात्पुरता वैभव मानला देखील पण मनातून तो चिडला होता. पण अशातच रूपालीला दिवस गेले. त्यामुळे हे प्रकरण काही दिवस शांत होते. नऊ महिन्यांनी रूपालीने सुंदर मुलीला जन्म दिला. तिचे नाव तिने हौसेने परी ठेवले. तिला वाटले आता सर्वकाही सुरळीत होईल.
पण आता परत वैभव च्या घरच्यांनी रूपालीला तगादा लावला. नवीन फ्लॅट घ्यायचाय. पैसे कमी पडत आहेत. तुझ्या वडिलांकडून मागून आण. रूपालीने तिच्या वडिलांना पैसे मागण्यास नकार दिला. आणि तेव्हापासून रूपालीला त्रास देण्याची सुरुवात झाली.
तिला उठता बसता बोलू लागले. तुला नीट स्वयंपाक येत नाही. भांडीसुद्धा घासल्यावर खरकटीच असतात. मुलगी सतत रडत असते. सारखे या ना त्या कारणावरून तिला त्रास द्यायचे. पुढे पुढे तर तिच्यावर हात उचलायला पण मागेपुढे पाहत नसत. तिची नणंद त्याच शहरात राहायची. तीसुद्धा अधूनमधून येऊन रूपालीला त्रास द्यायची.
रूपाली सर्वकाही सहन करत होती. पण एके दिवशी तिच्या सासूने एका क्षुल्लक कारणावरून वाद घालत तिला माहेरी सोडायला सांगितले. वैभवने सुद्धा काही मागचा पुढचा विचार न करता तिला माहेरी आणून सोडले. शामरावांना आता कल्पना आली होती की ह्यांना फ्लॅट साठी पैसे हवेत म्हणून मुलीला माहेरी आणून सोडलय. पण घरी वाद नकोत म्हणून त्यांनी शेतीच्या उत्पन्नातून आलेले पैसे न घेता त्यांनी त्यांच्या पत्नीचे कावेरीचे काही दागिने मोडले आणि रूपालीला पैसे दिले.
” हे पैसे तू तुझ्या घरच्यांना दे.” शामराव म्हणाले.
” पण मला हे नको बाबा.” रूपाली डोळ्यात पाणी आणत म्हणाली.
” तू इथली काळजी नको करू. हा तुझा बाप समर्थ आहे. तुला कशाचीही कमतरता होऊ देणार नाही.”
” पण बाबा ते लोक सतत तुमच्याकडे काहीबाही मागतच राहतील. मलासुद्धा आता तिथे रहावस वाटत नाही. मी इथे आपल्याच घरी राहिली तर नाही का चालणार.” रूपाली डोळ्यात पाणी आणत म्हणाली.
” नाही ग बाळ, असं बोलू नये. अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कुणी आपला भरला संसार सोडून येत असतं का. सुरुवातीला असं चालायचं च. तू काळजी नको करू. तू जा तुझ्या सासरी. बाकी त्यांच्याशी मी बोलतो. ” शामराव म्हणाले.
रूपालीची सासरी जायची इच्छा नव्हती. पण तरीही तिच्या बाबांच्या म्हणण्याप्रमाणे ती तिच्या सासरी गेली. शामराव सुद्धा तिच्या सासरी गेले. त्यांना फ्लॅट घ्यायच्यासाठी पैसे दिले. आणि पोरीला चांगलं वागवा अशी विनंती केली.
आणखी काही दिवस रूपालीचा संसार बरा सुरू होता. बघता बघता परी एका वर्षाची झाली होती. तिचा पहिला वाढदिवस अगदी थाटात साजरा झाला. सर्वकाही ठीक चालले होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.
अचानक वैभवची नोकरी गेली. वैभव आता घरीच राहायचा. नवीन नोकरीचा शोध घेत होता. त्यामुळे वैभव सतत चिडचिड करायचा. रूपाली त्याला समजवायची. पण तो तिलाच घालून पाडून बोलायचा.
पण अचानक वैभव तिच्याशी फार गोड बोलायचा. तिच्या घरचे सुद्धा तिला फार लाडीगोडी लावायचे. रूपाली त्यांच्या विचित्र वागण्याने भांबावून गेली होती. पण लवकरच तिला तिच्या घरच्यांच्या बदललेल्या वागणुकीचे रहस्य कळले.
वैभवला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी तिच्या बाबांकडून पैसे मागण्याचा रूपालीच्या सासरच्यांचा हेतू होता. आणि त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी ते रूपालीला लाडी गोडी लावत होते. रूपालीला आता सर्व कळलं होतं. रूपालीच्या सासू सासर्यांकडे सुद्धा बक्कळ पैसा होता. पण त्यांना स्वतःच्या जवळचा एकही पैसा खर्च करायचा नव्हता. जणूकाही वैभवचे पुनर्वसन ही त्याच्या सासऱ्यांची एकट्याची जबाबदारी होती. पण यावेळी मात्र रूपालीने ठामपणे नकार दिला. मी माहेरून पैसे मागणार नाही हे तिने सर्वांना सांगितले.
आणि परत तिचा छळ सुरू झाला. शारीरिक आणि मानसिक छळाला ती सहन करत होती. पण यावेळी तिचा राग तिच्या घरचे तिच्या मुलीवर काढू लागले. ती बिचारी एक वर्षाची परी फार रडायची. तिला सतत येताजाता धपाटा घातला जायचा. पैशाच्या हव्यासापोटी ही माणसे सैतान झाली होती. त्यांना चांगलं वाईट काही कळत नव्हतं.
वैभवला रूपाली आणि परीचा त्रास दिसत नव्हता. रूपालीने तिच्या घरून पैसे आणावे हीच त्याची इच्छा होती. आता मात्र रूपाली स्वतःच तिच्या माहेरी निघून गेली. घरी आल्यावर तिने सर्वकाही तिच्या घरच्यांना सांगितले. शामरावांना हे ऐकुन खूप दुःख झाले.
आता आपण रूपालीला परत पाठवायचे नाही हा निर्धार शामरावंनी केला. आणि बघता बघता चार महिने उलटून गेले. पण रूपालीच्या घरून तिला घ्यायला कोणीच आलं नाही. रूपालीला वाईट वाटत होतं पण माहेरी आल्यामुळे ती सुखी होती. माहेरी तिला कोणताच त्रास नव्हता. तिला आणि परीला सर्वजण जपत.
मात्र जसजसे दिवस जात होते तसतसे गावातील लोक रूपाली बद्दल कुजबुज करत होते. हीचीच काहीतरी चूक असेल म्हणूनच नवऱ्याने हिला टाकली अशीच चर्चा रंगलेली असायची. चेहऱ्यावर तिच्यासाठी सहानुभूती दाखवायचे मात्र मागे तिलाच बोल लावायचे.
शेवटी तिच्या आजीने तिला एकदा समजावून सांगायचे ठरवले. एकदा सासरी जाऊन बघ म्हणाले. लग्न झाल्यावर तेच मुलीचं घर असतं. थोडफार तर मुलींना सहन करावच लागतं. आमच्या वेळी तर सासवा फार वाईट होत्या. तुमच्या वेळी तरी बरं आहे. मुलीचा विचार कर. तुझ्यामागे तुझ्या इतर बहिणी सुद्धा आहे. उद्या त्यांचेही लग्न करायचे आहे. उगाच त्यांच्या लग्नात अडचण नको. एकदा तू तुझ्या घरी जावून तर बघ. तुझ्या घरचे सर्वकाही विसरले असतील. ते तुला घरात घेतील. आम्ही समजावून सांगू त्याला. आणि पुढे त्यांनी काही त्रास दिला तर तू परत ये. मग तुला मी जायला सांगणार नाही. तिच्या काकूंनी सुद्धा आजीच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
पण रूपालीची जायची इच्छा होत नव्हती. मात्र सर्वांचे म्हणणे आहे की फक्त एकदा जाऊन बघ. त्यांनासुद्धा नातीची आठवण येत असेल. बरेच दिवस झालेत. ते एव्हाना सर्वकाही विसरले देखील असतील.
आता रूपालीच्या आईने देखील तिच्या बाबांकडे विषय काढला. एकदा मुलीच्या घरी जावून बोलून पाहा. त्यांचं म्हणणं काय आहे ते तरी कळेल. पण शामरावांना ते पटत नव्हतं. तरीही सर्व म्हणत आहेत तर एकदा जाऊन बघायला हरकत नाही म्हणून ते रूपालीच्या सासरी गेले.
रूपालीच्या सासरी सर्वजण त्यांच्याशी थंडपणे पण चांगले बोलले. म्हणाले रूपालीला आणि परीला परत पाठवा. झालं गेलं विसरून जाऊ. आणि नव्याने सुरुवात करू. पण त्यांचे हावभाव त्यांच्या बोलण्याला विसंगत वाटत होते.
शामराव घरी आले आणि त्यांनी घरच्या मंडळींना सर्वकाही सांगितले. रूपालीला आणि परीला परत बोलावत आहेत हेदेखील सांगितले. रूपालीला खरंतर जायची मुळीच इच्छा नव्हती पण परीच्या विचाराने आणि गावातील लोक नाव ठेवतात म्हणून ती एकदाची जायला तयार झाली. तिला वाटले कदाचित यावेळेला सर्वकाही ठीक होईल.
शामरावांची सुद्धा इच्छा नव्हती आपल्या लाडक्या लेकीला परत पाठवण्याची. पण लेक म्हणजे परक्याच धन. किती दिवस तिला तिच्या संसारापासून दूर ठेवायचं. ह्या विचारांनी शामराव सुद्धा तयार झाले.
आणि दोन दिवसांनी रूपालीची सासरी पाठवणी झाली. यावेळेला रूपालीला सोडायला तिचा भाऊ सोबत गेला होता. रूपालीला सोडून तो दुपारी घरी परत आला होता. शामराव आणि कावेरी ताईंना सकाळपासून अगदी हुरहूर लागली होती. रूपालीची काळजी दोघांच्याही डोळ्यात दिसत होती. पण ते एकमेकांशी याबद्दल बोलत नव्हते.
तोच संध्याकाळी त्यांच्या घरचा फोन खणानला. आणि फोनवर समोरून जे ऐकले त्यामुळे कावेरी ताईंनी हंबरडा फोडला. रूपालीच्या शेजारच्यांचा फोन होता. रूपालीला जळालेल्या अवस्थेत दवाखान्यात घेऊन गेल्याचा. त्यांना लवकरात लवकर दवाखान्यात बोलावले होते.
हे ऐकताच सर्व कुटुंब हादरून गेले. सकाळीच त्यांनी तिला हसतखेळत निरोप दिला होता. सुखी जीवनाचा आशीर्वाद दिला होता आणि आता…
जसा त्यांना निरोप मिळाला तसे सर्वजण धावतच शहरात असलेल्या दवाखान्यात गेले. रूपालीला पाहून त्यांना धडकीच भरली. एकदम फुलासारखी नाजूक असणारी रूपाली आज अशा विद्रूप अवस्थेत दवाखान्यात मृत्यूच्या दारात उभी होती.
दवाखान्यात वैभवच्या घरून फक्त तिचे सासू आणि सासरे आलेले होते. रूपालीच्या आई बाबांना पाहून त्यांनी रूपालीने हे खूप वाईट केले एवढं बोलून परीला त्यांच्या हवाली केले. आणि काही लागले तर आम्हाला सांगा असे म्हणून दवाखान्यातून निघून गेले.
हे लोक इतके शिक्षित असूनही इतके निष्ठुर कसे याचं शामरावांना नवल वाटले. ते जणू काही फक्त परीला त्यांच्याकडे देण्यासाठीच थांबले होते. परी एकसारखी रडत होती. बऱ्याच वेळचे तिने काहीच खाल्ले नव्हते. कावेरी ताईंच्या हे लक्षात आले आणि त्यांनी परीला बिस्किटे खाऊ घातली. बिस्कीट खाऊन झाल्यावर परीचे रडणे थांबले. ती तिच्या आजीला घट्ट बिलगली. कावेरी ताईंना परीला पाहून आणखी रडू आले.
दवाखान्यात पोलिस आलेले होते. रूपाली आता थोडी थोडी बोलत होती. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. रूपालीने सांगितले. ” ती घरी गेल्यावर तिच्या घरच्यांनी तिच्याशी खूप भांडण केले. नवऱ्याने आणि सासूने तर मारहाण सुद्धा केली. मग थोडावेळ सर्वजण शांत होते. आणि त्यानंतर संध्याकाळी अचानक ती रूम मध्ये असताना त्यांनी तिच्यावर रॉकेल ओतले आणि तिला आग लावून रूमचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. ती जोरजोरात ओरडत होती. थोड्या वेळात तिचा आवाज ऐकुन तिच्या शेजारी राहणारे लोक धावून आले तेव्हा बघतात तर रूमचा दरवाजा बाहेरून बंद होता आणि आतमध्ये रूपाली जळत होती. घरची मंडळी हॉलमध्ये बसून होती पण काहीच हालचाल करत नव्हती. शेजाऱ्यांनी लगेच दरवाजा उघडला आणि अँम्बुलन्सला फोन केला. आणि मग त्यांनीच रूपालीला दवाखान्यात आणले होते.
रूपालीच्या शेजाऱ्यांनी सुद्धा तिच्या घरच्यांविरुद्ध साक्ष दिली होती. रूपालीला त्यांनी जाळून मारण्याचा प्रयत्न केला हे आता स्पष्ट झाले होते. रूपालीला तिच्या सासरी पाठवण्याचा शामराव आणि कावेरी ताईला खूप पश्चात्ताप झाला होता. आज त्यांची लाडकी लेक अशा विचित्र अवस्थेत पडून होती.
पोलिसांनी लगेच पुढील कारवाई केली आणि तिच्या सासरच्या लोकांना अटक केली. तिच्या सासरच्या लोकांना वाटले होते की रूपाली वाचणार नाही. आणि ते लोक अडकणार सुद्धा नाही. पण त्यांच्या शेजाऱ्यांनी ऐन वेळी तिला वाचवून त्यांचा हेतू विफल केला होता. वैभव तर आधीच फरार झाला होता. पण पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी त्याला शोधून काढले. आता ते सर्व तुरुंगाच्या आत होते.
रूपाली वर उपचार सुरू होते. पण दोन दिवसांनी रूपाली हे जग सोडून निघून गेली. पण जाता जाता परीची जबाबदारी शामराव आणि कावेरीताईंवर टाकून गेली.
शामराव मनातून पूर्णपणे खचले होते. ते वारंवार रूपालीच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार ठरवत होते. त्यांनी तिला पाठवलच नसतं तर किती बरं झालं असतं. पण आता या गोष्टींचा विचार करून काहीएक उपयोग नव्हता. त्यांना आता परीचा सांभाळ करायचा होता. जी चूक त्यांनी रूपालीच्या बाबतीत केली होती ती परीच्या बाबतीत मुळीच होऊ द्यायची नव्हती.
त्यांनी परीला उत्तमरित्या सांभाळले. परीला लहानाची मोठी केली. परी हुबेहूब रूपालीसारखी दिसायची. तिला पाहून शामराव रूपालीच्या आठवणींमध्ये हरवून जायचे.
©आरती लोडम खरबडकर.
Truth