सकाळचे साधारण दहा वाजले असतील इतक्यात दारावरची बेल वाजली.
” एवढ्या सकाळी कोण आलं असेल?” असे म्हणत प्रकाश रावांनी दार उघडले समोर बघतो तर समोर अक्षय उभा होता प्रकाश राव यांनी त्याला बघताच मिठी मारली ”
“असा अचानक कसा आलास मला कळवायच तरी असतं. तुला स्टेशनवर घ्यायला आलो असतो. कशाला केली सकाळी सकाळी इतकी दगदग. लवकर वाहन पण मिळत नाही सकाळी.” प्रकाश राव म्हणाले.
” तुम्हाला आधीच कळलं असतं तर आता मला पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो मला कसा बघायला मिळाला असता.” अक्षय म्हणाला.
इतक्यात मालती ताई किचनमधून बाहेर आल्या अक्षयला पाहून त्यांना सुद्धा खूप आनंद झाला.
” अरे अक्षय असा अचानक आला.”
” हो मग… तुम्हाला सरप्राइज द्यायचं होतं मला.”
” बरं बाबा… बोलण्यात तुला कोणी हरवू शकतं का ?…आणि गोष्टी नंतर होतील. आधी तू हातपाय धू. मी तुझ्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते.” असं म्हणत मालती ताई आत मध्ये निघून गेल्या. अक्षय सुद्धा फ्रेश व्हायला गेला.
अक्षय प्रकाश यांचा भाचा त्यांच्या बहिणीचा मुलगा त्याचे आई-वडील एका अपघातात गेल्यानंतर प्रकाश रावांनी अक्षयचे पालन पोषण केले. त्याला लहानाची मोठे केले. शिकविले. चांगले संस्कार दिले. प्रकाशराव आणि मालती ताईंना दोन मुले. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचं लग्न झालं आहे. आणि मुलगा नोकरी निमित्ताने बेंगलोर ला असतो. अक्षय त्यांच्या सोबतच राहायचा.
अक्षय नुकताच सहा महिन्यांपूर्वी आर्मी मध्ये जॉईन झाला होता. त्याचं लहानपणापासूनचे स्वप्न होतं आर्मी मध्ये जाण्याचं. आणि त्याने ते पूर्ण देखील केलं होतं .अक्षय दोन ते तीन महिन्यातून त्याच्या मामा मामींना भेटायला यायचा आज सुद्धा त्यांना नकळत सरप्राईज दिलं होतं.
अक्षय साठी त्याचे मामा मामी त्याचे सर्वस्व होते. त्यांनी त्याला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले होते. स्वतःच्या मुलांमध्ये आणि अक्षयमध्ये त्यांनी कधीच फरक केला नाही. अक्षय सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करायचा.
आज अक्षय आल्यामुळे सर्वांनी मनसोक्त गप्पा मारल्या. मामींनी अक्षयला आवडते म्हणून शेवयांची खीर केली होती. गप्पांमध्ये दिवस कसा गेला ते कळलं देखील नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळीच मामा मामी लवकर उठून कुठेतरी जायची तयारी करत होते. अक्षय अजूनही झोपेतच होता. इतक्यात मामींनी त्याला आवाज दिला.
” अरे अक्षय…आम्ही गावाला जातोय… गायकवाडां च्या घरचे लग्न आहे. काल तुला सांगायचं विसरलो होतो…”
अक्षय झोपेतून उठला. मामा मामी संध्याकाळीच येणार होते. पूर्ण दिवस त्याला बोअर झाला असता. इतक्यात मामा त्याला म्हणाले.
” तू आज एकटाच घरी असशील. त्यापेक्षा तु सुद्धा चल आमच्यासोबत. नाहीतरी तू बरेचदा गावात आलेला आहेस. तुझे काही मित्र सुद्धा आहेत तिथे. सर्वांची भेट होईल. आणि तुला सुद्धा चांगलं वाटेल.”
” ठीक आहे मामा. मी पण येतो.” अक्षय म्हणाला.
एकटं घरी राहण्यापेक्षा मामा मामींसोबत गेलेलं बरं. तसेही त्याचे लहानपणीचे मित्र आहेत गावात. त्यांची सुद्धा भेट होईल. हा विचार करून अक्षय गावी जायला तयार झाला. तिघेही तयारी करून गावी पोहचले.
लग्न लागायला अजुन वेळ होता. अक्षय त्याच्या जुन्या मित्रांना भेटला. मामा मामी पाहुणे मंडळींना भेटण्यात व्यस्त होते. अक्षय सुद्धा त्याच्या मित्रांशी गप्पा मारत होता.
इतक्यात त्याचे लक्ष समोर गेले. समोरून एक मुलगी येत होती. येताना तिची नजर कावरी बावरी होत होती. ती अंग चोरून चालत होती. खाली मान घालून तिच्या सोबतच्या इतर बायकांसोबत ती चालत येत होती. शेवटी ती जिथे बायकांच्या बसण्याची व्यवस्था केली होती तिथे जाऊन एका कोपऱ्यात अंग चोरून बसली. ती अजुनही खालीच पाहत होती. जणूकाही इतरांपासून स्वतःला लपवत होती.
अक्षय ला तिच्या वागण्याचे नवल वाटले. ती असं का वागत आहे ह्याचे त्याला कोडे पडले. तो आता बारकाईने तिचे निरीक्षण करत होता. नाही म्हणता म्हणता त्याची नजर आपसूकच तिच्याकडे वळायची.
साधारण वीस बावीस वर्षांची मुलगी होती ती. दिसायला सुंदर, लांब केस, तिच्या डोळ्यात पाहणारा हरवून जाईल असे मोठे डोळे, चाफेकळी सारखे नाक, आणि गव्हाळ वर्ण. पण ती अशी का वागत होती. सर्वांपासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होती.
तिथे बसलेल्या बायका सुद्धा तिच्याकडे बघून कमी आवाजात एकमेकींना काहीतरी सांगत होत्या. अशाने तिला आणखीनच अवघड्यासारखं झालं होतं. आता अक्षयला आणखीच कुतूहल वाटलं. तिच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली.
इतक्यात त्याचा मित्र सत्या तिथे आला. अक्षय बराच वेळेपासून तिच्याकडे पाहतोय हे बहुधा त्याला कळलं असावं. त्याने अक्षयला नजरेनेच खुणावले. अक्षय ने काही नाही म्हणून नकारार्थी मान हलवली.
मग सत्या अक्षय ला घेऊन थोडा बाजूला आला. अक्षयला त्याने विचारले…
” मघापासून तू रिद्धी कडे एकसारखा बघत आहेस ?…काय झालं…?
“अच्छा तर तिचं नाव रिद्धी आहे. नाव छान आहे.” अक्षय मनातल्या मनात म्हणाला.
अक्षय काही बोलत नाही म्हटल्यावर सत्या ने त्याला पुन्हा विचारले.
” काय झालं…प्रेमात बिमात पडलास की काय तिच्या…”
” छे… काहीतरीच काय तुझं…ती आल्यापासून थोडीशी वेगळी वागत आहे…जणू काही कुणालातरी भित आहे…म्हणून पाहत होतो.” अक्षय म्हणाला.
” बरं झालं प्रेमात नाही पडलास ते.”
” का पण…जर प्रेमात पडलो असतो तर काय झालं असतं…?”
” तसं काही नाही पण ही अपशकुनी आहे असं म्हणतात…”
” पण असं का ?”
” अरे मागच्या वर्षी हीचं लग्न ठरलं होतं… कुसापुर च्या सावकाराच्या मुलासोबत…खूप मोठ्या घरात सून म्हणून जाणार होती…पण लग्नाच्या दोन दिवस आधीच त्या मुलाची तब्येत खराब झाली आणि तो मेला…लग्न तर झालेच नाही शिवाय अपशकुनी असल्याचा ठपका लागला…तेव्हापासून ही घरातच राहायची…कुठेच बाहेर यायची नाही…आज पहिल्यांदा बाहेर दिसत आहे…”
” पण ह्यात ती अपशकुनी आहे हे कसं काय म्हणू शकतोस..?”
” मी नाही सारा गाव म्हणतोय हिला अपशकुनी…त्या मुलाच्या घरच्यांनी सुद्धा हीलाच जबाबदार धरले होते…म्हणत होते की हीचा पायगुण बरा नाही…”
अक्षयला मात्र त्याच्या बोलण्याचे नवल वाटले. नवऱ्या मुलाची तब्येत खराब झाली ह्यात या बिचाऱ्या मुलीची काय चूक. इतक्या लहान वयात हे सर्व सहन करतेय. अजूनही समाज मुलीलाच अपशकुनी का मानतो.
त्याचं लक्ष पुन्हा तिच्याकडे गेलं. चेहऱ्यावर कुठेच तेज दिसत नव्हतं. ती ज्या कोपऱ्यात बसली होती अजूनही तिथेच होती. इतक्यात लग्नाच्या विधिंना सुरुवात झाली. आणि एकदाचे लग्न पार पडले. आणि रिद्धी लगेच तिथून निघून गेली. जेवण न करताच.
संध्याकाळी अक्षय मामा मामी सोबत घरी परतला. पण त्याच्या डोक्यातून मात्र रिद्धीचा विचार जातच नव्हता. अक्षयची आठ दिवसांची सुट्टी आता संपत आली होती.
(अक्षय आणि रिद्धी चं पुढे काय होईल हे पाहूया पुढील भागात…)
क्रमशः
अपशकुनी ? – भाग २
आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करा.