जयाचे मागच्या वर्षीच लग्न झाले होते. लग्न अगदी थाटामाटात पार पडले होते. दोघांचे लव्ह मॅरेज होते. लग्नात ताई खूप खुश दिसत होती. पण तिच्या सासूला मात्र ती पसंत नव्हती. पण आपल्या मुलाच्या पसंती समोर त्या जास्त बोलल्या नाही.
जयाच्या लग्नापासूनच तिच्या आणि तिच्या सासुमध्ये खटके उडायला लागले होते. सासूबाईंना तिच्या प्रत्येक कामामध्ये चूक दिसायची. जयाचे तिच्या नवर्यावर खूप प्रेम होते. त्यामुळे ती सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची.
जयाला एक मोठी नणंद होती ती सुद्धा तिच्या नवऱ्यासोबात त्याच शहरात राहायची. ती दर दिवसाआड माहेरी यायची आणि तिच्या आईसोबत मिळून जयाला त्रास द्यायची. जयाला मात्र नेहमी वाटायचे की हे दिवस सुद्धा निघून जातील. आणि तिच्या सासूबाई तिला आपलं मानतील.
तिने यातलं काहीच तिच्या नवऱ्याला सांगितलं नव्हतं. तिला वाटायचं की सासू सूनांच्या भांडणात नवऱ्याला का ओढायचं. त्याला या छोट्या मोठ्या गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून तिने त्याला काहीच सांगितले नाही.
सहा महिन्यापूर्वी जया तिच्या फायनल इअरच्या परीक्षेसाठी माहेरी आली होती. जया जवळपास महिनाभर माहेरी होती. जेव्हा ती सासरी जायला निघाली तेव्हा सासरहून निरोप आला की आता तिला तिच्या माहेरीच ठेवा. सासरी पाठवायची काही गरज नाही.
जयाने तिच्या नवऱ्याला फोन केला तेव्हा तो सुद्धा असचं म्हणाला की तू माझ्या आई आणि बहिणीला खूप त्रास दिलास. माझ्या आईने आणि बहिणीने मला सर्व सांगितले आहे. तू माझ्या ताईला सुद्धा नको ते बोललीस. आता माझ्या घरी यायचं नाही. मला तुझ्यापासून घटस्फोट हवाय.
जयाला आता कळून चुकले होते की तिच्या सासूने आणि नणंदने तिच्या नवऱ्याचे तिच्याविरुद्ध कान भरले आहेत. तिने तिच्या नवऱ्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. आजवर आपल्यावर प्रेम करणारा नवरा देखील आपल्याला समजून घेत नाहीय या विचाराने जयाचे मन खिन्न झाले. त्याने तिला किती वचने दिली होती. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. सातजन्मीची साथ देणार होता. तो तिचा लग्नाचा नवरा असूनदेखील त्याने तिच्यावर विश्वास दाखवला नाही. त्याने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला.
जया मात्र अजूनही नवऱ्याच्या प्रेमात वेडी होती. तिला वाटायचे आज ना उद्या सर्व ठीक होईल. तिने नवऱ्याला घटस्फोट द्यायला नकार दिला. आणि तेव्हापासून तिच्या कोर्टात चकरा सुरू झाल्या. आरोप प्रत्यारोप सुरू झाले. जयाच्या सासरच्यांनी तिला नांदवायला नकार दिला.
जया मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. तिला परत तिच्या नवऱ्याच्या घरी जायचे होते. तिला वाटायचे की आज ना उद्या तिच्या नवऱ्याचे मतपरिवर्तन होईल. त्याच्या मनातील प्रेम पुन्हा जागृत होईल आणि तो मला त्याच्या घरी घेऊन जाईल.
कोर्टात केस सुरूच होती. आणि इतक्यात जयाला समजले की तिच्या नवऱ्याने गुपचूप लग्न केले म्हणून. जयाच्या पायाखालची जमीनच सरकली. जया आतून पार तुटली. मात्र तरीही तिचा निर्णय बदलला नाही. तिला त्याच्याच घरी परत जायचे होते. ती तिचा अट्टाहास सोडतच नव्हती.
तिला अजूनही वाटायचे की ती तिच्या नवऱ्याच्या घरी गेली तर नवरा सर्व काही विसरून पुन्हा तिच्यावर प्रेम करेल. ती वास्तविकता स्वीकारत नव्हती. तिच्या घरचे तिला समजावून थकले होते. पण ती अगदी इरेला पेटली होती. तिच्या प्रेमाची जागा आता हट्टाने घेतली होती. मी काहीही करून त्याच्या घरी परत जाईल आणि सर्व काही पूर्ववत होईल हे ती स्वतःच्या मनाला समजावत होती.
तिच्या घरच्यांना वाटायचे की तिने आता मुव्ह ऑन व्हावं. आयुष्याची नव्याने सुरुवात करावी. स्वतःच्या करीयर कडे लक्ष द्यावं. पण जया कुणाचेच काही ऐकत नव्हती. तिच्या आयुष्यातील ऐन उमेदीच्या काळ ती कोर्टात चकरा मारण्यात आणि तिच्या नवऱ्याने मन वळवण्यात घालवत होती.
मात्र तिचा नवरा आता आयुष्यात खूप पुढे गेला होता. तो आता परत जयाकडे येणे शक्य नव्हते. त्याला त्याच्या दुसऱ्या बायको कडून मुलगा सुद्धा झाला होता. आणि त्याच्या मनात जर जयाबद्दल प्रेम असते तर त्याने कधीच दुसरे लग्न केले नसते. त्याच्या आयुष्यात आता जया साठी कुठलेच स्थान नव्हते. पण जयाला हे कळत नव्हते.
जयासाठी बरीच स्थळे येत होती. तिच्या आई बाबांनी तिचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. पण जयाने ऐकले नाही.
दिवसामागून दिवस जात होते. कोर्टात केस सुरू होऊन आता आठ वर्ष होत आली होती. जया अजूनही कोर्टात जात होती. अजूनही आरोप प्रत्यारोप व्हायचे. पण तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचे पुरावे ती कोर्टासमोर सादर करू शकली नाही. आणि तिच्या नवऱ्याचे मन सुद्धा वळवू शकली नाही.
तिच्या भावाचे नुकतेच लग्न झाले होते. त्यांचा नवीन संसार फुलत होता. तिची वहिनी नवीन असताना सर्व ठीक सुरू होते. मात्र तिच्या वहिनीला आता या कायमच्या माहेरी असणाऱ्या नणंद ची अडचण वाटत होती. ती या ना त्या कारणाने जया ताईला टोमणे मारायची. तिला घालून पााडून बोलायची. जयाच्या आईला हे पाहवले नाही. एके दिवशी ती न राहवून जयाला म्हणाली.
” जया, आता तरी तू तुझा नवऱ्याच्या घरी जाण्याचा अट्टाहास सोडून दे. जे काही झालं आहे ते स्वीकार कर आता. स्वीकार कर की तुझ्या नवऱ्याचे आता तुझ्यावर प्रेम नाही. तो त्याच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलाय. त्याने स्वतःचा एक वेगळा संसार थाटला आहे आणि त्या संसारात तुला जागा नाहीय. आम्ही काय तुला आयुष्यभर पुरणार नाही. आणि तुझा भाऊ आणि वहिनी तुला आयुष्यभर सांभाळतील याची सुद्धा शाश्वती नाही. आम्हाला तुझी खूप काळजी वाटते बाळा. अजूनही वेळ गेली नाही. फक्त तीस वर्षांची आहेस तू. तुझ्या भूतकाळा तून बाहेर ये. स्वतःला या खोट्या आशेच्या जंजाळातून बाहेर काढ. घटस्फोट दे त्याला. मुक्त हो. आयुष्याची नवी सुरुवात कर. आयुष्य भरभरून जग. “
जयाला तिच्या आईचे म्हणणे पटत होते. पण ती काही केल्या तिच्या भूतकाळाच्या कोषातून बाहेर येत नव्हती. शेवटी तिने तिच्या आयुष्याचा निर्णय तिच्या आई वडिलांवर सोपवला. तिने त्यांना सांगितले की यापुढे ते जे काही म्हणतील ते करायला ती तयार आहे.
जयाच्या वडिलांनी तिला तिच्या नवऱ्याला घटस्फोट द्यायला सांगितला. जयाने जास्त आढेवेढे न घेता त्याला घटस्फोट दिला. त्यानंतर वडिलांनी तिला एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळवून दिली. लहान मुलांच्या सहवासात जया तिचं दुःख विसरून जायची.
हळूहळू ती मोकळी व्हायला लागली. आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीं मधील आनंद अनुभवू लागली. ती आता खुलायला लागली होती. तिचे आईवडील तिच्यातला हा बदल पाहून सुखावत होते.
एके दिवशी जयाच्या घरी तिच्या वडिलांचे मित्र आले होते. त्यांनी तिला पाहिले. तिच्याबद्दल त्यांना आधीच सर्वकाही माहिती होते. पण आज आत्मविश्वासाने भरलेली जया त्यांना भावली होती. त्यांनी त्यांचा मुलगा विजय साठी जयाला मागणी घातली.
जयाचे वडील विजयला ओळखायचे. विजय चांगला मुलगा होता. पण नोकरी लागल्यावर लग्न करेन या त्याच्या निर्णयामुळे तो आतापर्यंत अविवाहित होता. त्याला मागच्या वर्षी सरकारी नोकरी लागली होती. तो जेमतेम जयाच्या वयाचा होता. जयाच्या वडिलांनी विजयच्या बद्दल जयाशी बोलायचे ठरवले.
जयाने सुरुवातीला नकारच दिला. पण तिच्या वडिलांनी तिला समजावून सांगितले तेव्हा ती विजयला भेटायला तयार झाली. विजयला भेटल्यावर तिला तो चांगला मुलगा वाटला. अखेर हो नाही करता करता तिने लग्नाला होकार दिला.
जया आणि विजयचे लग्न झाले होते. जयाच्या आधीच्या लग्नाचा अनुभव फारसा चांगला नसल्याने ती तिच्या या लग्नाबाबत सुद्धा थोडी साशंक होती. मुळात तिचा प्रेमावर विश्वास राहिला नव्हता. पण तिच्या आईवडिलांना मात्र विश्वास होता की जया विजय सोबत खुश राहील. आणि त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून जयाने तिच्या नवीन संसाराला सुरुवात केली.
विजय खूप चांगल्या स्वभावाचा होता. जयाच्या जखमांवर त्याने आपल्या प्रेमाची फुंकर घातली. हळूहळू जया विजयच्या प्रेमात पडली. गेली अनेक वर्षे तिच्या आयुष्यात असलेला अंधार विजयच्या येण्याने दूर झाला होता. जयाला खऱ्या अर्थाने जोडीदार मिळाला होता. अनेक वर्षांपासून हुलकावण्या देणारे संसारसुख तिच्या ओंजळीत येऊन पडले होते. ती आता त्याला भरभरून जगत होती.
जयाने तिच्या आयुष्यातील आठ वर्षे अशा व्यक्तीच्या मागे वाया गमावली ज्याला तिच्या प्रेमाची कदर नव्हती. पण दहा वर्षांनी का होईना तिने तिच्या भूतकाळात बाहेर येऊन तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. आणि आज ती सुखी होती.
समाप्त.
आरती निलेश खरबडकर.