” तुला कितीदा सांगितलंय कीर्ती…असे कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत बोलणे बरे नाही…बोलणे तर बोलणे…तू तर स्वतःची पूर्ण माहिती देऊन टाकते समोरच्याला…निदान बोलण्यापूर्वी थोडा तरी विचार करावा…” कीर्तीची आई कीर्तीला समजावत म्हणाली.
” आई…तू पण ना…उगाच काळजी करतेस ग…आणि प्रत्येकाला संशयाच्या नजरेने बघणे काही बरे नाही…आणि की काय आता लहान आहे का…मला सर्व कळतं…सो यू डोन्ट वरी आई…” कीर्ती म्हणाली.
आज परत किर्तीने आईने दिलेल्या सल्ल्याकडे अतिकाळजी म्हणून दुर्लक्ष केले. कीर्ती फार बडबडी मुलगी. एकदा बोलायला लागली की मग आजूबाजूचे काहीच भान राहत नसे. मनाने खूप साधी. आणि अवघ्या जगाला स्वतः सारखं साधं सरळ समजायची. मग बोलता बोलता समोरच्याला स्वतःबद्दल सर्व माहिती देऊन मोकळी व्हायची. तिच्या या सवयीमुळे तिच्या आईला नेहमीच तिची काळजी वाटायची.
आजसुद्धा असेच काहीतरी घडले होते. दारात एक मुलगा पार्सल घेऊन आलेला होता. त्याने हिला एक ग्लास पाणी मागितले. हिने पाणी दिले तेव्हा ते पिता पिता त्याने बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या किर्तीकडून. कीर्ती मात्र समोरच्याला मदत करावी या उद्देशाने त्याच्याशी साधेपणाने बोलत होती. आईने हे पाहिले आणि त्यावरूनच दोघी मायलेकी मध्ये वरील संवाद घडून आला.
कीर्ती आईबाबांनी एकुलती एक लेक. लाडाकोडात वाढलेली. तिच्या बाबांचा फिरता जॉब होता. त्यामुळे ते बरेचदा घरी नसायचे. त्यामुळे तिच्या आईला काळजी वाटायची.
पण कीर्ती मात्र आईच्या सूचनांना फारशी गांभीर्याने घेत नसे. तिला वाटायचे की आई जुन्या विचारांची आहे. मुलींनी जास्त बोलू नये ह्या मताची आहे. म्हणून ती त्याकडे दुर्लक्ष करायची. पण एकदा कीर्तीच्या आयुष्यात असा प्रसंग उद्भवला की त्यामुळे तिला चांगलाच धडा मिळाला.
एके दिवशी अचानक तिला एका अनोळखी नंबर वरून ” मला तू खूप आवडतेस” असा मेसेज आला.
तिने लगेच त्या नंबर वर फोन केला तर समोरून कुणीच बोललं नाही. तिला वाटले की कुणाचा चुकून आला असेल म्हणून तिने फारसे लक्ष दिले नाही. त्यानंतर पुन्हा त्या नंबरवरून तिला मेसेजेस यायला लागले.
“ माझं तुझ्यावर प्रेम आहे. “
” तू फक्त माझीच आहेस. “
” मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो.”
“मला फक्त हो म्हण.”
” मी तुला आयुष्यात कशाचीही कमी पडू देणार नाही.”
” माझ्याशी लग्न कर.”
असे एकामागून एक मेसेज यायला लागले. त्या नंबर वर फोन केला तर कुणीतरी फोन उचलायचा आणि काहीही न बोलता परत ठेवून द्यायचा. आता मात्र कीर्तीला टेन्शन आले. तिला हे मेसेज कोण पाठवते आहे अन् कशाला पाठवत आहे ह्याचा थांगपत्ता तिला लागत नव्हता. शेवटी कंटाळून तिने तो नंबर ब्लॉक केला.
पुन्हा दुसऱ्या नंबर वरून तिला तेच मेसेज यायला लागले. तिने तो नंबरसुद्धा ब्लॉक केला. तेव्हा त्याने परत तिसऱ्या नंबर हून तिला मेसेज केला. आता मात्र कीर्ती घाबरली. ती गप्प गप्प राहायला लागली. तिचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. नीट जेवणही करत नव्हती. तिच्या आईला तिच्यातील फरक लक्षात येत होता.
तिच्या आईने कीर्तीला विचारायचा प्रयत्न केला. पण कीर्तीला वाटले की बाबा घरी नाहीत आणि आईला सांगितले तर ती खूप टेन्शन घेईल. आणि फक्त मेसेज येतोय त्याला काय घाबरायच. असा विचार करून तिने आईला यातलं काहीच सांगितले नाही. अभ्यासाचे टेन्शन आहे म्हणून विषय बदलून दिला.
काही दिवसांनी तिला विचित्र अनुभव यायला लागले. तिला सतत वाटायचं की कुणीतरी तिचा पाठलाग करत आहे. ती सतत मानसिक दडपणाखाली राहायला लागली. तिला रात्री चांगली झोपदेखील येत नसे.
एके दिवशी तिला एका नवीन अनोळखी नंबर वरून कॉल आला. तो समोरून बोलला…
” हॅलो…”
” हॅलो…कोण बोलत आहे..?”
” ते महत्त्वाचं नाही…मी जे बोलणार आहे ते महत्त्वाचं आहे…”
” कोण बोलत आहे…मला नाही बोलायचं तुझ्याशी…”
” बोलावच लागेल तुला…एकदा फोन कट करशील तर पुन्हा दुसऱ्या नंबर वरून करेन…पण जोपर्यंत तू माझं ऐकणार नाही तोपर्यंत मी फोन करतच राहणार…”
” काय बोलायचं आहे तुला…”
” आज बस मध्ये कोण्या मुलाशी बोलत होतीस तू…तू इतर कोणत्याही मुलाशी बोललेले मला आवडत नाही…तू आजपासून इतर कोणत्याही मुलाशी बोलायचं नाही…”
” मी कोणाशी बोलणार आणि कोणाशी नाही हे ठरवणारा तू कोण..?”
” माझं प्रेम आहे तुझ्यावर…”
” पण माझं नाही…मी तुला ओळखत सुद्धा नाही…माझा नंबर कुठून मिळाला तुला…आणि मला त्रास का देतो आहेस..?”
” मी अजिबात त्रास नाही देणार तुला…तू फक्त माझं ऐक…तू फक्त माझी बनून रहा…मी जे म्हणेल ते ऐक…कारण यापुढे तुझ्या आयुष्यात फक्त मीच असणार आहे…”
” फालतू बोलू नकोस…आणि यापुढे मला फोन करायची हिम्मत करू नकोस…”
एवढे बोलून कीर्ती ने फोन कट केला. आणि मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला. ती मनातून पुरती घाबरली होती. पण तिला तो आवाज थोडा ओळखीचा वाटला. ती विचार करत होती इतक्यात तिला आठवले.
मागे एकदा कीर्ती एकदा तिच्या मैत्रिणींसोबत एका पणीपुरीच्या स्टॉलवर गेली होती. तिथे पाणीपुरी खाताना तिची ओळख त्या पाणीपुरीवाल्याशी झाली. कीर्तीच्या नेहमीच्या सवयी प्रमाणे ती त्याच्याशी हसतखेळत बोलत होती. त्यानंतर ती आणि तिच्या मैत्रिणी तिथून निघून गेल्या.
त्यानंतर जवळपास महिनाभराने कीर्ती एकदा बसचा प्रवास करत असताना अचानकपणे तिला तो पाणीपुरी वाला दादा दिसला. कीर्तीला पाहून तो तिच्याकडे आला. आणि बोलला.
” तुम्ही इकडे कुठे जात आहात..?”
” इकडेच पुढच्या स्टॉप वर जात आहे…तिकडेच माझं कॉलेज आहे ना…”
” अच्छा…तुम्ही तिकडे जात आहात तर…”
” हो…तुम्हाला कुठे जायचयं..?”
” मीसुद्धा त्याच कॉलेजला जात आहे…माझ्या बहिणीला तिथे अडमिशन घ्यायची आहे म्हणून थोडी माहिती घ्यायला जात आहे…”
” अच्छा…”
” तुमची हरकत नसेल तर एक विचारू का..?”
” विचारा की दादा…”
” मला तुमचा फोन नंबर मिळेल का..? ..माझ्या बहिणीला जी काही माहिती हवी असेल ती तुमच्याकडून विचारेल ती…म्हणजे मला वारंवार त्या कॉलेजला चकरा माराव्या लागणार नाही…”
” हो…का नाही…मी तिला लागेल ती सर्व माहिती देईल…”
एवढे बोलून तिने एका कागदावर तिचा नंबर लिहिला आणि त्याला दिला. त्यानंतर दोन दिवस त्याच्या बहिणीचा फोन आलाच नाही. पुढे ती या गोष्टीला विसरली देखील. पण हा आवाज त्याच पाणीपुरी वाल्या दादांचा आहे असा तिला संशय आला.
दुसऱ्या दिवशी ती परत बसने कॉलेज ला जात असताना ती अगदी सावधपणे तिच्या आजूबाजूला लक्ष ठेवून होती. आणि इतक्यात तिला तो पाणीपुरी वाला दादा दिसलाच. तिने त्याच्यावर लक्ष ठेवले. ती सुद्धा त्याच स्टॉप वर उतरला जिथे ती रोज उतरायची. तिचा संशय खरा ठरला.
आता मात्र तिने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखले. तिने जराही वेळ न दवडता ही गोष्ट तिच्या आईच्या कानावर घातली. तिला वाटले आई आता ओरडणार. तुझ्या भोळ्या स्वभावामुळे हे सर्व झालंय म्हणून मलाच रागावणार. पण तिच्या आईने असे काहीच केले नाही. तिच्या आईने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिला समजून घेतले. ही वेळ तिला दोष न देता तिला या सर्वातून नाही काढण्याची आहे हे आईला कळून चुकले होते.
आईने ही गोष्ट कीर्तीच्या बाबांच्या कानावर घातली. कीर्तीचे बाबा हातचे काम सोडून घरी परत आले. त्यांनी यावर विचार करून यातून बाहेर निघण्याचा मार्ग काढायचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे कीर्तीचे त्या मुलाला स्वतःहून फोन केला. आणि सांगितले की तिने त्याच्या बद्दल खूप विचार केला तेव्हा तिला कळले की जो मुलगा तिच्याबद्दल इतका विचार करतो. तिच्यावर इतके प्रेम करतो तर तिलासुद्धा त्यांच्याबाबतीत विचार करायला काही हरकत नाही.
यावर तो मुलगा खुश झाला. त्याला वाटले कीर्ती त्याच्यावर भाळली आहे. आणि दोघांनी मिळून भेटायचे ठरवले. एका रेस्टॉरंट मध्ये भेटायचे नक्की झाले. इकडे कीर्ती च्या आईवडिलांनी पूर्ण तयारी करून ठेवली होती.
ठरलेल्या वेळेवर तो कीर्तीला भेटायला आला. कीर्ती त्याच्या आधीच येऊन बसली होती. तो आला आणि कीर्ती च्या टेबल जवळ जाऊन उभा राहिला.
” तुम्ही इथे..?” त्याला ओळखुन सुद्धा न ओळखल्यासारखे करत कीर्ती म्हणाली.
” तुला तो फोन करणारा मीच आहे…” तो म्हणाला.
” अच्छा… मग ते आधीच सांगितलं असतं तरी चाललं असतं…उगाच इतके दिवस नाव सांगितलं नाही… बरं तुमचं नाव काय…म्हणजे मी आधीसुद्धा विचारले नाही…”
” माझं नाव योगेश…त्या दिवशी पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हाच मला तू खूप आवडली होतीस…पण तुझ्या मनात माझ्याबद्दल नेमकं काय आहे ते मला माहिती नव्हते…म्हणून मी तुला माझी ओळख दाखवली नाही…”
” म्हणून तू खोटे बोलून माझा नंबर घेतलास…मला मेसेजेस केलेस…फोन करून धमकी दिलीस…माझा पाठलाग केलास…आणि तू याला प्रेम म्हणत आहेस…” कीर्ती आवाज वाढवत म्हणाली.
” जाऊदे…आता तू माझ्या प्रेमाचा स्वीकार केला आहेस यापेक्षा जास्त मला काहीही नको…पण तू असं आवाज चढवून बोलू नकोस…मला नाही आवडणार तू माझ्याशी असे बोललेले…आणि हे कपडे काय घातलेस ग…यापुढे जीन्स वगैरे नको घालू…मला नाही आवडणार…”
” तू जरा लिमिट मध्ये राहा…मी ऐकुन घेत आहे म्हणून काहीही बोलू नकोस…मला हे आवडत नाही म्हणून हे करायचे नाही…याच्याशी बोलायचं नाही…हे घालायचं नाही…स्वतः मात्र एका मुलीला हकनाक त्रास देताना तुला लाज वाटत नाही…हे असं निनावी फोन करून आणि मुलींचा पाठलाग करून त्यांना त्रास देणाऱ्या मुलासोबत मी कशाला बोलणार…तुझ्यासारख्या मुलावर प्रेम करणं तर दूर मला बोलायला सुद्धा आवडणार नाही…” कीर्ती चिडून म्हणाली.
तसा तो उठून उभा राहिला आणि तिला म्हणाला.
” मग मला इथे का बोलावलं आहेस…मला मूर्ख समजत आहेस का “…
आणि तो तिच्यावर रागातच धावून गेला…इतक्यात कुणीतरी जोरात त्याला मागे खेचले आणि काही कळायच्या आत त्याच्या श्रीमुखात एक जोरदार थप्पड लगावली…
त्याने चवताळून समोर बघितले आणि समोरची व्यक्ती बघून शरमेने मान खाली घातली. त्याला थप्पड लगवणारी त्याची आई होती. अचानकपणे आईला बघून तो ओशाळला. आईच्या पाठोपाठ त्याचे बाबा देखील समोर आले आणि त्यांनी सुद्धा त्याला एक ठेवून दिली.
योगेश च्या आईबाबांच्या पाठोपाठ आतापर्यंत तिथेच हजर असलेले कीर्तीचे आईबाबा सुद्धा समोर आले.
” लाज नाही वाटत तुला…घरी हीच्याच वयाची एक बहिण असताना तू असा दुसऱ्यांच्या मुलींना त्रास देतोस…” योगेश ची आई रागातच म्हणाली.
” आई…मी त्रास देत नाही आहे… माझं प्रेम आहे तिच्यावर…” योगेश गाल चोळत म्हणाला.
” हे असं प्रेम असतं का…जबरदस्ती कुणाला आपलं बनवता येत नाही…दुसऱ्यांच्या मुलींना त्रास देताना तुला काहीच कसं वाटत नाही…हेच शिकवलं का आम्ही तुला…”
” आई… माझं प्रेम आहे तिच्यावर…”
” ह्याला प्रेम नाही…विकृती म्हणतात…एखाद्या मुलीला नाहक त्रास देणे, तिचा पाठलाग करणे ही विकृती आहे…एकतर्फी प्रेम करणे हा गुन्हा नाही पण तोपर्यंत जोपर्यंत तुमच्या प्रेमाचा समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही…ह्या विकृतीला तुम्ही मुलं प्रेमाचं नाव देता…त्या मुलीला इतके दिवस किती मनस्ताप झाला असेल ह्याचा विचार तरी केला आहेस का तू…तिला सतत भीतीच्या छायेखाली राहावं लागलं…जिच्यावर प्रेम करतात तिला त्रास देतात का…प्रेमाची परिभाषा तरी कळते का तुम्हा मुलांना…”
” आई…मला माफ कर…मी भरकटलो होतो…मला माझी चूक कळली आहे…यापुढे मी असा कधीच वागणार नाही…” योगेश काकुळतीला येत म्हणाला.
” तुला कुणाची माफी मागायची असेल तर ती कीर्ती अन् तिच्या आईवडिलांची माग…कारण त्यांच्या मनात आले असते तर त्यांनी तुला सरळ पोलिसात दिले असते…पण त्यांनी आपल्या परिस्थितीचा विचार करून तुला समज द्यायची ठरवली…तुझ्यामुळे गेले कित्येक दिवस त्यांना मनस्ताप सहन करावा लागला असेल…” योगेश चे बाबा म्हणाले.
” काका…मला माफ करा… माझं खूप चुकलं… मला कीर्ती आवडायची म्हणून मी तिच्या मर्जीचा विचार न करता तिला त्रास दिला…कीर्ती…तू पण मला माफ कर…मी यापुढे कधीही तुला त्रास देणार नाही…मला आता कळत आहे की मी खूप वाईट वागलो तुझ्याशी…तुम्ही सर्वांनी माझी चूक मला लक्षात आणून दिली नसती तर कदाचित मला कधीच कळले नसते…” योगेश म्हणाला.
” तू चुकलास हे खरे आहे…पण योग्य वेळेत तुला तुझी चुक कळली यातच सर्व आले…आता पुन्हा कधीही कुणाशीही असे वागू नकोस…आणि प्रामाणिकपणे आयुष्याला सुरुवात कर…” कीर्तीचे बाबा म्हणाले.
योगेशला समज देऊन कीर्तीचे आईबाबा तिला सोबत घेऊन घरी आले. आज कीर्ती एका मोठ्या संकटातून बाहेर आली होती. आणि कीर्तीला तिच्या आयुष्यात एक मोठा धडा मिळाला होता.
स्वतःवर आलेल्या संकटाचा धीरोदात्तपणे सामना करणारी कीर्ती, मुलीवर आलेल्या संकटात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी कीर्तीची आई, आणि स्वतःच्या मुलाच्या चुकांवर पांघरूण न घालता त्याला कडक शब्दात समज देणारी योगेशची आई ह्या तिघी सुद्धा आदिमायेचे रूप वाटतात.
समाप्त.
photo credit-pixel
©®आरती निलेश खरबडकर.
(सर्व हक्क लेखिकेचे अधीन)