अनुच्या लग्नाला १५ दिवस झाले होते. घरी तसे सर्वजण चांगले होते. एव्हाना सर्व पाहुणे निघून गेले होते. घरच्यांनी अनु आणि आशिष ला बाहेर फिरायला पाठवायचे ठरवले. आशिष ने कामाचे निमित्त्य सांगून बाहेर फिरायला जाणे टाळले. अनु ला वाटले की कामाचा ताण असेल.
पण हळूहळू तिला जाणवायला लागले की आशिष तिला सतत टाळण्याचा प्रयत्न करतोय. तो कधीच तिच्याशी मनमोकळेपणाने बोलत नव्हता. ती काही बोलली तर फक्त हो किंवा नाही एवढं उत्तर देई.
न राहवून तिने एके दिवशी त्याला विचारलेच की तो तिच्याशी व्यवस्थित बोलत का नाही. सुरुवातीला तो म्हणाला की अस काहीच नाही. कामाचा ताण जास्त असल्यामुळे मी तुला जास्त वेळ देऊ शकलो नाही. अनु ला त्याचे म्हणणे पटले.
तिला वाटले की जसे दिवस हळूहळू पुढे जातील तसा त्यांच्यातील दुरावा कमी होईल. पण तसे काही घडलेच नाही. आशिष फक्त कामापुरते बोलायचा. कधी मनमोकळ्या गप्पा मारल्या नाहीत की कधी कुठे फिरायला गेले नाहीत.
अनु दिवसभर घरची कामे करायची त्यामुळे वेळ कसा निघून जायचा ते कळायचं नाही. पण रात्री मात्र तिच्या डोक्यात विचारांचं गोंधळ चालायचा. शेवटी न राहवून तिने परत एकदा विचारले की तुम्हाला कसलं टेन्शन आहे का..?
तेव्हा त्याने सांगितले की त्याचे प्रीती नावाच्या एका मुलीवर खूप प्रेम होते.परंतु त्याच्या घरच्यांना ती पसंत पडली नाही. म्हणून तो तिच्याशी लग्न करू शकला नव्हता. घरच्यांनी अनु ला त्याच्यासाठी पसंत केले आणि अनु त्याची बायको झाली. पण तो प्रीती ला अजूनही विसरू शकला नव्हता.
” तू माझी बायको आहेस… आणि मी तुला सुखी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन… पण प्रितीची आठवण मात्र मनातून जात नाहीय… मला थोडा वेळ दे…मी प्रीतीला विसरण्याचा प्रयत्न करतोय…” आशिष म्हणाला.
अनु च्या पायाखालची जमीनच सरकली. तिने पाहिलेल्या सुंदर संसाराची स्वप्ने जणू आज उधळली होती. ती काहीच बोलली नाही. पण रात्रभर तिच्या डोक्यात विचारांचं थैमान सुरूच होतं. तिने आशिष ला वेळ देण्याचं ठरवलं.
ती सकाळी उठली ती एक वेगळाच निर्धार करून. तिने रोजच्या प्रमाणे आपली सर्व कामे आटोपली आणि तिच्या माहेरी फोन करून तिची काही पुस्तके बोलावली. दुसऱ्याच दिवशी तिचा भाऊ तिची पुस्तके घेऊन आला. आणि अनु ने पुस्तके वाचायला सुरुवात केली.
रोज थोडा वेळ काढून अनु पुस्तके वाचायची. त्यामुळे तिचा वेळ कसा जायचा ते कळायचं देखील नाही. आता ती सुद्धा आशिष सोबत फक्त कामापुरते बोलायची. आशिष ला तिच्यातील फरक जाणवला होता.
अनु ने तिच्या स्वभावाने घरातील सर्वांची मने जिंकली होती. घरातील सर्व कामे ती न थकता अगदी आनंदाने करायची. थोरा मोठ्यांना मान द्यायची. आलेल्या पाहुण्यांचे सर्व काही अगदी मन लावून करायची. आणि वेळ मिळाला की ती पुस्तके वाचायची.
हे सर्व आशिष बघत होता. आता आशिष स्वतःहून अनुशी बोलायला लागला. ऑफिस मधल्या गप्पा तिला सांगू लागला. त्यांच्यामध्ये छान मैत्री जमली होती. अनुचा स्वभाव आशिष ला आवडायला लागला होता. असेच दिवस जात होते.
एके दिवशी अनु तिच्या मैत्रिणीला भेटायला म्हणून बाहेर गेली. घरची सर्व मंडळी सुद्धा एका कार्यक्रमाला बाहेरगावी गेली होती. आशिष ला सुट्टी असल्यामुळे तो घरीच होता. बराच वेळ उलटून गेला पण अनु घरी आलीच नव्हती.
आशिष ला तिची काळजी वाटली म्हणून त्याने तिला फोन केला. पण तिचा फोन काही लागत नव्हता. आशिष ला आता तिची खूप काळजी वाटायला लागली. ती ठीक तर असेल ना. तिला काही झाले नसेल ना. असे एक ना अनेक विचार त्याला यायला लागले.
त्याने थोडा वेळ तिची वाट बघितली आणि परत एकदा फोन केला. अजूनही तिचा फिने लागत नव्हता. आता मात्र आशिष तिला शोधायला म्हणून बाहेर पडला. पण तिच्या मैत्रिणीचा पत्ता त्याला माहिती नव्हता. तरीही तो दूरवर जाऊन तिला शोधत होता.
बराच वेळ झाला तरीही तिचा फोन लागत नसल्याने तो कासावीस झाला. त्याच्या मनात नको ते विचार येत होते. बराच वेळ बाहेर शोध घेतल्यावर तो थकून घरी आला. घरी बघतो तर दरवाजा उघडलेला होता. आतमध्ये बघतो तर अनु घरी आलेली होती.
अनुला पाहताच आशिष चा जीव भांड्यात पडला. त्याने तिला घट्ट मिठी मारली. त्याला काय झाले हे अनु ला नेमके समजले नव्हते.
“इतका उशीर का झाला तुला? आणि तुझा फोन का लागत नाहीय?” आशिष म्हणाला.
” गप्पा मारताना वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. आणि फोन चार्ज करायचं विसरले होते ” अनु म्हणाली.
आशिष ने तिला पुन्हा मिठी मारली आणि म्हणाला
” मला माफ कर. मी तुझ्याशी नीट वागलो नाही. पण तू जेव्हा माझ्या समोर नव्हतीस तेव्हा मला कळलं की तू माझ्यासाठी काय आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्लीज पुन्हा मला सोडून कुठेच जाऊ नकोस.”
” नाही जाणार. कुठेच नाही जाणार” त्याची मिठी आणखी घट्ट करत अनु म्हणाली.
आज खऱ्या अर्थाने अनु च्या संसाराची सुरुवात झाली होती.
क्रमशः
©®आरती लोडम खरबडकर.
फोटो साभार pinterest