कविता सातव्या वर्गात शिकणारी एक हुशार मुलगी होती. ती तिच्या आई, वडील व लहान भावासोबत एका छोट्याशा गावात राहायची. गाव शहरापासून वीस किलोमीटर च्या अंतरावर होत.
कविता तशी हुशार होती पण तिला एक वाईट सवय होती. ती घरातील प्रत्येक लहानसहान गोष्ट बाहेर सर्वांना सांगायची. घरात नवीन काहीही आणले तरी सगळीकडे सांगत सुटायची.
तिला कित्येकदा तिच्या आईने समजावून सांगितले की बाहेर सर्व सांगणे बरे नाही. प्रसंगी तिला ओरडली देखील. पण कविताची सवय मात्र जात नव्हती.
दिवाळी जवळ आली होती. आणि कविताचे आईबाबा तालुकाच्या ठिकाणी खरेदीला जाणार होते. कविताला सुद्धा सोबत घेऊन जायचं ठरलं. आणि बघता बघता खरेदीला जाण्याचा दिवस उगवला.
सवयीप्रमाणे कविताने तालुक्याच्या ठीकाणी खरेदीला जाणार असल्याची गोष्ट सगळीकडे पसरविली.
ते तालुक्याला जायला निघणार इतक्यातच शेजारची बंड्याची आई आली…आणि कविताच्या आईला म्हणाली…
” कविताची आई…तुम्ही तालुक्याला जात आहात तर ही माझी सामानाची यादी घेऊन जा…”
” अजुन काही नक्की नाही हो जायचं…” त्यांना टाळायचं म्हणून कविताची आई म्हणाली.
” अहो पण काल कविताच सांगत होती…उद्या सकाळीच निघणार आहोत म्हणून…” बंड्याची आई म्हणाली.
असे म्हणताच कविताच्या आईने कवितेकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. पण कविता चे तिकडे लक्षच नव्हते. मग ती बंडूच्या आईला म्हणाली.
” अहो बंडूची आई…तुम्हीपण जाणार आहात ना एक दोन दिवसात तालुक्याला…”
” आमचे हे ना जास्त वेळच देत नाही खरेदीला…खूपच घाई करतात…म्हणून मग दरवेळी काही ना काही राहून जातं…तुम्ही हे सामान घेऊन या…मग काही राहिलं आणायचं तर मी जाईल तेव्हा घेऊन येईल…” इति बंड्या ची आई.
यावर नेमके काय बोलावे हे कविताच्या आईला कळत नव्हते. बंड्याची आई एक दोन दिवसांनी जाणारच आहे तालुक्याला पण सामानाची यादी माझ्याकडे दिलीय.
म्हणजे मला स्वतःला जणू काही कामच नाही ह्यांचे सामान आणण्या शिवाय. पण करणार तरी काय. बंड्याची आई पूर्ण तयारीने आली होती. आणि कविताने तिला पक्की खबर दिली होती.
त्यामुळे कविताच्या आईसमोर नाही म्हणायचा पर्यायच नव्हता. नाईलाजाने कविताच्या आईने बंड्याच्या आईच्या सामानाची यादी घेतली.
बंड्याची आई घरातून गेली. कविताची आई कविताशी बोलणार इतक्यात शेजारच्या माला काकू हातात एक पिशवी घेऊन आल्या.
” अग सुनीता…घरात आहेस ना…?”
” हो काकू…घरातच आहे…आत या ना…” कविताची आई घरातून बाहेर येत म्हणाली.
” अग मला वाटलं गेलीस का निघून…” माला काकू म्हणाल्या.
” कुठे जाणार मी…घरीच आहे…” कविताची आई म्हणाली.
” अग काल कविताच म्हणाली होती की तुम्ही तालुक्याला खरेदीसाठी जाणार आहात म्हणून..” माला काकू म्हणाल्या.
” हो…म्हणजे जायचा विचार सुरू आहे…” कविताची आई म्हणाली.
” मग माझ्या ह्या चप्पला घेऊन जा ग दुरुस्तीला…” माला काकू.
” अहो पण काकू…इतक्या मोठ्या चपला…?” त्यांच्याकडे असलेल्या पिशवीच्या आकारावरून अंदाज बांधत कविताची आई म्हणाली.
” जास्त नाही ग…आमचे घरचे चार पाच जोड आहेत…”
” पण दोन दिवसांपूर्वी तुमची सून गेली होती ना तालुक्याला…त्यांनी का नाही आणल्या चप्पल दुरुस्त करून…?” कविताच्या आईने विचारले.
” अग ती काय माझं ऐकते का…गेली होती नट्टा पट्टा करून…तिला म्हटलं चप्पल दुरुस्त करून आण तर म्हणाली की एवढ ओझ मी नेणार नाही…आजकालच्या सूनाच फार आगाऊ आहेत ग…काहीच ऐकत नाहीत मोठ्यांच…पण तू खूप गुणाची आहेस…आजवर कोणत्याही कामासाठी मला नाही म्हटले नाहीस तू…मला तू अगदी माझ्या मुलीसारखी आहेस ग…” माला काकूंनी इमोशनल चौकार मारला. आणि कविताची आई त्यांना नाही म्हणू शकली नाही. त्यांनी माला काकू कडची चपलांची पिशवी घेतली आणि माला काकू निघून गेल्या.
कविताच्या बाबांनी मोटारसायकल काढली. कविता आणि तिचे आई बाबा असे तिघेजण मोटारसायकल नी तालुक्याला जायला निघाले. ते गावाची वेस ओलांडणार इतक्यात पाठीमागून सुलभाने आवाज दिला…
कविताच्या बाबांनी मोटारसायकल थांबवली. सुलभा जवळ येऊन म्हणाली.
” सुनीता वहिनी…मी आता तुझ्या घराकडेच यायला निघाले होते बघ…”
” काही काम होते का तुला ?” कविताच्या आईने विचारले.
” हो ग… काल कविता सांगत होती की तुम्ही तालुक्याला जाणार म्हणून…माझ्यासाठी एक फेअर अँड लव्हली ची क्रीम घेऊन येशील…पैसे मी देईल नंतर…” सुलभा म्हणाली.
” अग पण मागच्या वेळचे पैसे सुद्धा बाकी आहे तुझ्याकडे…” कविताची आई म्हणाली.
” आता एकदमच देईल ना…आपण शेजारीच तर राहतो…पैसे कुठं जाणार आहेत…” सुलभा म्हणाली.
” बरं आणते..” कविताची आई म्हणाली.
आणि ते तिघेही तालुक्याला जातात. एव्हाना कविताच्या आईला कविताचा खूप राग आलेला असतो. कविता घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते त्यामुळे अनेकदा मनस्ताप सुद्धा सहन करावा लागतो. तिची आई तिला काही बोलत नाही पण तिला अद्दल घडवायचा विचार करते.
तालुक्याला पोहचल्यावर ते शेजारच्या लोकांनी दिलेल्या लिस्ट प्रमाणे त्यांचं सामान देखील घेतात. तुटक्या चप्पला दुरुस्त करून घेतात.
कविताचे लक्ष मात्र नवीन कपडे कधी घेणार याकडे लागून असते. पण खूप वेळ झाला तरी तिचे आईबाबा कपड्यांच्या दुकानात जायचं नावच घेत नव्हते. शेवटी न राहून तिने विचारले,
” आई आपण नवीन कपडे कधी घेणार आहोत ?”
” घेणार होते…पण…”
” पण काय आई…? ” कविताने नाराजीने विचारले.
” अग आपण कपडे खरेदी करायला जाणार होतो बाळा पण इतकं सामान घेतलंय की कपडे घ्यायला पैसे शिल्लक उरले नाहीत. आपण जे आपल्या शेजाऱ्यांसाठी सामान घेतलंय त्याचे पैसे त्यांनी आपल्याला दिले की आपण पुन्हा शहरात येऊन कपडे खरेदी करू.” आई म्हणाली.
कविता हिरमुसली. आज नवीन कपडे घेणार म्हणून ती सकाळपासून खूप उत्साहात होती. तसं तिने सर्वांना सांगून ठेवले होते. पण असे काही होईल असा तिने विचारच केला नव्हता.
घरी येईपर्यंत कविता उदास होती. घरी आल्यावर देखील ती कोणाशीच काही बोलत नव्हती. हे पाहून तिची आई तिच्या जवळ आली आणि म्हणाली.
” हे बघ बाळा…आज आपण खरेदी करायला चाललोय हे जर तू सगळीकडे सांगितलं नसतं तर त्यांनी आपल्याकडे सामानाची यादी दिली नसती.
सामानाची यादी देताना कुणी सोबत पैसे देत नाही. सामान आणल्यावर त्याचा हिशेब करून ते पैसे देतात. बरेचदा तुम्ही आणलेली वस्तू आम्हाला आवडली नाही म्हणून नाक सुद्धा मुरडतात.
छोट्या मोठ्या वस्तूंचे पैसे द्यायला तयार लोक विसरतात सुद्धा. आणि त्यांना वारंवार पैसे मागणं बरं वाटत नाही. आणि आज आपल्याकडचे पैसे त्यांचं सामान घेण्यात संपले म्हणून आपण तुझ्यासाठी नवीन ड्रेस घेऊ शकलो नाही. म्हणून मी तुला नेहमी सांगते की घरातील प्रत्येक गोष्ट बाहेर सांगत जाऊ नकोस. ही सवय चांगली नाही.”
आता कविताला तिची चूक कळली. पुन्हा असे काही करणार नाही असे तिने आईला सांगितले. आणि आईने तिच्या नकळत आणलेला नवीन ड्रेस तिला दिला. आणी कविता खुप खुश झाली. त्यानंतर मात्र प्रत्येक गोष्ट बाहेर जाऊन सांगायची कविताची सवय मोडली.
©®आरती लोडम खरबडकर.
👍👍
Thanks 😊
👍👌
धन्यवाद
Nice story…..
Thanks