स्नेहलला आज उठायला जरा उशीरच झाला. ती घाईघाईने सगळी कामे आवरत होती. तिने पटापट कामे आटोपली. सार्थकला उठवले. त्याची तयारी करून दिली. त्याचा टिफीन भरला आणि त्याला स्कूल बस वर सोडून आली.
तिचा नवरा राघव अजूनही झोपेतच होता. त्याची आज घरापासून जवळच असलेल्या हॉटेलमध्ये मीटिंग होती. म्हणून तो आज इतक्या उशिरापर्यंत झोपलेला होता. तिने राघवला झोपेतून उठवले.
तो उठून त्याचं आवरायला गेला. स्नेहल परत तिच्या कामांमध्ये गुंतली. तिने राघवसाठी चहा नाश्ता तयार केला आणि पुढील स्वयंपाकाच्या तयारीला लागली. अकरा वाजता राघवसुद्धा त्याच्या मीटिंग साठी निघून गेला. आता ती घरी एकटीच होती.
स्नेहल, तिचा नवरा राघव आणि तिचा पाच वर्षांचा मुलगा सार्थक असे तिघेच घरी असतात. स्नेहल च्या लग्नाला आठ वर्षे झालीत. ती राघवसोबत लग्न करून या घरी आली तेव्हा हे कुटुंब बरेच मोठे होते. तिचे आजारी सासरे, एक लहान नणंद, एक दिर, तिचा नवरा आणि ती. तिच्या लग्नाच्या सहा महिने आधीच तिची सासू एका अल्पशा आजाराने मरण पावली होती. त्यामुळे राघवचे लग्न लवकर लावून दिले होते. घर सांभाळायला सून हवी म्हणून.
स्नेहल सासरी आली आणि सर्व जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारल्या. तिने मोठ्या हिमतीने सर्व घर सांभाळले होते. आजारी सासऱ्यांची सुश्रुषा केली. नणंद आणि दिराला अगदी स्वतःच्या बहीण भावाप्रमाणे सांभाळले.
तिच्या नणंदेला काम सांगितलेले राघवला आवडत नसे. म्हणून ती नणंदेला काहीही काम सांगायची नाही. दोन वर्षांनी तिचे सासरे देवाघरी गेले. नंतर सार्थकचा जन्म झाला. पुढे काही वर्षांनी नणंदेचे लग्न झाले आणि तिच्या दीराला सुद्धा दुसऱ्या शहरात नोकरी लागली. तो लग्न करून तिकडेच स्थायिक झाला. आणि घरात हे तिघेच उरले.
तेव्हापासून मात्र स्नेहलला थोडा आराम मिळाला. मुलगा शाळेत जायला लागल्यापासून तर स्नेहलकडे बराच वेळ शिल्लक असायचा. त्यामुळे ती अधून मधून सोसायटी च्या कार्यक्रमात जायची. तिच्या बऱ्याच मैत्रिणी बनल्या होत्या.
आज तिच्या शेजारच्या रेणू सोबत तिला बाहेर जायचे होते. रेणूला तिच्यासाठी थोडी खरेदी करायची होती. म्हणून रेणुला सोबत म्हणून स्नेहल तिच्यासोबत जायला तयार झाली. रेणुची खरेदी जवळपास पूर्ण झाली होती. शेवटी रेणूला सोनाराच्या दुकानातून काहीतरी घ्यायचे असल्यामुळे त्या दोघी सोनाराच्या दुकानातून गेल्या.
रेणूने स्वतःसाठी अंगठी बनवायला टाकली होती. तीच घ्यायला ती आली होती. स्नेहल दुकानात इकडे तिकडे बघत असताना तिची नजर एका सोन्याच्या कानातल्या वर गेली. तिला ते डिझाईन खूप आवडले. तिने त्याची किंमत विचारली असता सोनाराने सांगितले की पंचवीस हजाराला पडेल.
स्नेहल ला ती डिझाइन खूप आवडली पण तिच्याकडे पंचवीस हजार नव्हते.
तिच्याकडे आजवर घरखर्च झाल्यावर शिल्लक राहिलेले थोडेफार पैसे होते. दहा हजार असतील. आजवर तिने कधीच राघवला स्वतःच्या खर्चासाठी कधीच पैसे मागितले नव्हते. तिचे लग्न झाल्यापासून आजपर्यंत तिने राघवकडे कधीच कोणत्याच गोष्टीचा हट्ट केला नव्हता. कारण तेव्हा तशी परिस्थितीच नव्हती. घरी त्याचे वडील आजारी होते आणि दोन लहान भाऊ बहीण सुद्धा होते. त्यामुळे तिने त्याची परिस्थिती समजून घेत त्याला कधीच काही मागितले नाही. आताही गरजेनुसार सर्व वस्तू राघव स्वतःच आणून द्यायचा. नाहीतर तिच्यासोबत जाऊन घेऊन यायचा.
पण आता परिस्थीती बदलली होती. राघव च्या जबाबदाऱ्या आता कमी झाल्या होत्या. राघव ला पगार सुद्धा चांगला होता. त्यामुळे आता त्याला काही घेऊन मागायला काही हरकत नाही. तसंही लग्न झाल्यापासून त्याला कधी काहीच घेऊन मागितले नाही त्यामुळे जर मी राघवला काही घेऊन मागितले तर तो आनंदाने देईल असे स्नेहलला वाटले.
राघव आज लवकर घरी आला होता. स्नेहलने आज त्याच्या आवडीची मटर पनीर ची भाजी केली होती. जेवण झाल्यावर राघवचा मूड चांगला आहे हे पाहून तिने राघव समोर विषय काढला.
” अहो मी आज रेणूसोबत बाहेर गेले होते. तिकडे सोनाराच्या दुकानात सुद्धा आम्ही गेलो होतो. मला तिथे एक कानातले आवडले. पंचवीस हजारांचे होईल. माझ्याकडे आहेत दहा हजार. मला वरचे पंधरा हजार देणार का ?”
हे ऐकुन राघव एकदमच रागाने उठला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला.
” तुला शिल्लकची कामे करायला कोण सांगतं..?…कशाला जायचं दिवसभर बाहेर फिरायला…आणि लोकांचं पाहून आता तू सुद्धा नवऱ्याला पैसे मागणार का..?…कशाला हवं तुला सोनं..?…दोन वेळ चांगलं खायला मिळतं ना…बायकांना पण अक्कल नसते…कुणाकडे काही पाहिलं की ह्यांना पण तेच हवे असते…पैसे कमवायला किती मेहनत लागते माहिती आहे का…हे माझं घर काय तुझा बाप चालवतो का…घरात काय कमी आहे ग तुला…गरजेच्या सगळ्या वस्तू आणतोच की मी…दिवसभर घरीच असतेस…काम तरी काय आहे तुला…म्हणे मला पंधरा हजार पाहिजेत…” असे म्हणत राघव पाय आपटत त्याच्या रूम मध्ये निघून गेला.
स्नेहल मात्र अजूनही तिथेच उभी होती. तिला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. राघव तिला असे काहीतरी बोलेल हे तिच्या कधी मनातही आले नाही. तिने आजवर तिच्या घरासाठी खूप काही केले पण राघव ने तिची ही किंमत केली. राघवच्या मनात आपल्याबद्दल असे काहीतरी येऊ शकते ह्याची कल्पना पण नव्हती तिला.
इतक्यात तिथे सार्थक आला. त्याने तिला दोनदा आई म्हणून हाक मारली. स्नेहल तिच्या विचारात गुंतलेली होती. इतक्यात सार्थकने तिचा पदर खेचला तेव्हा ती भानावर आली. सार्थकला पाहून तिने तिचे अश्रू पुसले. आणि त्याला जवळ घेतले.
स्नेहलने सार्थकला जेवण भरवले आणि त्याला रूम मध्ये पाठवून ती किचन आवरायला गेली. पण तिचं आज कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हतं. सारखे सारखे राघवचे शब्द तिला आठवत होते.
सर्वकाही आवरून ती रुममध्ये गेली. राघव आणि सार्थक दोघेही झोपी गेले होते. तिने झोपायचा प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ. तिला काही केल्या झोप येत नव्हती. शेवटी पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला.
तरीही सकाळी लवकर उठून स्नेहलने सर्व कामे आटोपली. राघव ने दोन तीनदा तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण स्नेहल त्याच्याशी काहीच बोलली नाही. तिने पटापट सार्थकचे आवरले आणि त्याला स्कूलबस वर नेऊन सोडले. राघव सुद्धा ऑफिस ला निघून गेला.
घरी आल्यावर स्नेहलने तिच्या जुन्या मैत्रिणीचा नंबर शोधून तिला फोन केला.
” हॅलो…नंदिनी बोलतेय का ?”
” हो…आपण कोण..?
” अग मी स्नेहल बोलत आहे… ओळखलस का…आपण दोघीही शिवण क्लास ला सोबत जायचो… .?”
” हो ग स्नेहल…तुला कशी विसरणार मी…खूप छान कपडे शिवायचीस तू…तुला तर मी कितीदा म्हणाले होते की आपण दोघी मिळून एखादे बुटीक सुरू करू…पण तूच नाही म्हणायची..”
” अग तेव्हा घरी लग्नाचा विषय सुरू होता आणि लग्न झाल्यावर तर अजिबात वेळच नाही मिळाला.”
” हो का…आजकाल काय करत आहेस मग..?”
” काही नाही ग…घरीच असते…आता मुलगा शाळेत जायला लागलाय…त्यामुळे बराच वेळ उरतो माझ्याकडे…तू स्वतःचं बुटी क सुरू केलं हे ऐकलं होतं मी…म्हणून म्हटलं तुला विचारावं तुझ्याकडे माझ्यासाठी काही काम असेल तर…”
” अग का नाही…नक्कीच काम आहे माझ्याकडे…मी एक चांगली व्यक्ती शोधतच होते माझ्या कामासाठी…आणि तू आहेस म्हटल्यावर तर खूपच चांगले होईल…”
” मग मी आज येऊन भेटू का तुला…?”
” हो…मी माझ्या बुटिक चा अॅड्रेस पाठवते तुला…आज येऊन भेट मला…”
स्नेहल तिची कामे आवरून नंदिनीला भेटायला गेली. नंदिनी ने तिला कामाचे स्वरूप समजावून सांगितले. सुरुवातीला तिच्या कामाचा नमुना म्हणून तिला काही ड्रेस शिवायला सांगितले. स्नेहलकडे शिलाई मशिन होते. पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. आता मात्र तेच शिलाई मशीन स्नेहलला उपयोगी ठरले.
स्नेहलने शिवलेले ड्रेस नंदिनीला खूप आवडले. आता नंदिनी स्नेहलला अधूनमधून ड्रेस शिवायला द्यायची. स्नेहल आता महिन्याकाठी चार ते पाच हजार रुपये कमवायला लागली. राघवशी ती बोलायची पण अगदी तुटकपणे. तिच्या कामाबद्दल तिने त्याला काहीच सांगितले नव्हते. तरीही तिच्यात झालेला बदल राघवला कळत होता. त्याने केलेली चूक त्याला उमगली होती. त्याला तिची माफी मागायची बरेचदा इच्छा झाली पण त्याचा इगो आडवा यायचा.
एकदा नंदिनी स्नेहलच्या घरा जवळून जात होती. सहज म्हणून ती स्नेहलच्या घरी आली. नंदिनीला बघून स्नेहलला खूप आनंद झाला. इतक्यात राघव तिथे आला. स्नेहलने राघव आणि नंदिनीची ओळख करून दिली. राघव आणि नंदिनी बोलतच होते इतक्यात स्नेहल चहा आणायला म्हणून कीचन मध्ये गेली.
” तुम्ही आणि स्नेहल बालपणीच्या मैत्रिणी आहात…आणि एकाच शहरात राहता तरीपण कधी घरी आला नाहीत…” राघव म्हणाला.
” लग्न झाल्यावर आपापल्या संसारात गुंतलो होतो…बरेचदा आठवण व्हायची पण भेट मात्र झाली नव्हती…आता मात्र कामानिमित्ताने नेहमीच भेट होते..” नंदिनी म्हणाली.
” काम…कोणतं काम..?” राघवने विचारले.
” तुम्हाला तर माहिती असेलच…. माझं बुटीक आहे आणि स्नेहल अधूनमधून माझ्यासाठी ड्रेस शिवायच काम करते..खूप छान ड्रेसेस बनवते ती…तिला मी म्हटलं की तू पूर्णवेळ नोकरी कर माझ्याकडे…पण ती म्हणते की मी एवढ्यातच खुश आहे… आता तुम्हीच समजावून सांगा तिला…म्हणावं तिच्या हातात चांगली कला आहे तर कशाला वाया घालवायची…” नंदिनी म्हणाली.
राघवने होकारार्थी मान हलवली. आता त्याला कळलं होतं की स्नेहल फावल्या वेळात शिलाई करते. त्याला फार वाईट वाटलं. मला इतका जात पगार असून सुद्धा मी थोड्या पैशांसाठी स्नेहलला ओरडलो. मी जे बोललो ते खरंच खूप वाईट होते. आणि कदाचित म्हणूनच ती स्वतः काम करायला लागलीय.
राघव विचारातच होता. इतक्यात स्नेहल चहा घेऊन आली. नंदिनीने चहा घेतला आणि ती निघून गेली. ती जातच राघव मान खाली घालून स्नेहलच्या समोर उभा राहिला. आणि म्हणाला…
” मला माफ कर स्नेहल…मी त्या दिवशी तुला फार वाईट बोललो… मी फार चुकीचा वागलो ग…तू मला कधीच काही मागितलं नाहीस आणि जेव्हा पहिल्यांदा काही मागितले तेव्हा मी तुला फार घालून पाडून बोललो…खर सांगायचं म्हणजे हा पैसा, संपत्ती तुझ्यापुढे काहीच नाही…माझ्या आयुष्यात फक्त तुझ्यामुळेच बहार आहे…तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस…तुझ्यामुळे या घराला घरपण आहे…तू नाहीस तर मी काहीच नाही…मला खरंच माफ कर…तू मला हवी ती शिक्षा दे पण माझ्याशी बोल…”
” अहो…तुम्ही अशी माफी नका मागू…मला आधी तुमचा खूप राग आला होता…आणि म्हणूनच मी स्वतः काहीतरी काम करायचे ठरवले…आणि म्हणूनच नंदिनीसाठी काम करायला लागले…पण मग हळूहळू माझा राग कमी होत गेला…कारण रागानेच का होईना तुम्ही माझ्या लपलेल्या कलागुणांना वाव दिलात…आणि तुम्ही आजवर मला खूप चांगली साथ दिलीत…माझ्यावर खूप प्रेम केले…त्यामुळे तुमची एक चूक तर की माफ करूच शकते…नाही का…?” स्नेहल हसत म्हणाली.
” थँक्यू…मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही…” राघव कान पकडून म्हणाला.
” हो…पुन्हा अशी चूक केली तर मी माफ करणार नाही बरं…” स्नेहल खोटे रागावत म्हणाली.
” कधीच नाही करणार…”
राघवने असे म्हणताच स्नेहल त्याच्या मिठीत शिरली. दोघांमधील रुसवा आता दूर झाला होता. रागाची जागा पुन्हा प्रेमाने घेतली होती.
क्रमशः
©आरती लोडम खरबडकर.
Nice Story vahini…
Thanks Dada 😊