सुजयला जाऊन पंधरा दिवस झाले होते. सुरेखा अजूनही सावरली नव्हती. सुजय आता या जगात नाही हे अजूनही तिने स्वीकारलं नव्हतं. तिची नऊ वर्षांची मुलगी स्वरा देखील या सर्वांमुळे खूप कावरीबावरी झालेली होती. आधी वडिलांचे या जगातून जाणे आणि आईची अवस्था सुद्धा खूप बिकट होती. घरी आलेले पाहुणे निघून जात होते. तिने तिच्या दादा आणि वहिनीला आम्हाला काही दिवस माहेरी घेऊन चल अशी विनंती केली. पण वहिनीला वाटले की एकदा घरी घेऊन गेलो तर दोघी मायलेकींची जबाबदारी आपल्यावरच पडेल म्हणून सध्या आमची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे सांगत त्यांनी दोघींना घरी नेणे टाळले.
सुरेखाच्या सासूबाईंना सुद्धा तिने घरी थांबण्याची विनंती केली होती.
” आई…काही दिवस थांबा ना इथेच…मला आणि स्वराला खूप एकटं एकटं वाटतयं…आम्हाला तुमच्या आधाराची खूप गरज आहे आता…”
” मला नाही जमणार…घरी स्वातीच्या ( सुरेखाची जाऊ ) अंगावर सगळी कामे पडतात…आणि मला इथे राहायची सवय नसल्याने इथे करमणार नाही…” सासुबाई म्हणाल्या.
” आई मग आम्ही दोघी येऊ का काही दिवस तुमच्यासोबत राहायला…” सुरेखा म्हणाली.
” नको ताई…तुम्हाला तर माहिती आहे ना आपलं ते घर थोडं लहान आहे…म्हणूनच तर भाऊजींनी आणि तुम्ही हे छोटंसं घर घेतलं इकडे…आणि तिकडे तुमच्या जुन्या खोलीत आता मुलं राहतात…त्यापेक्षा आम्हीच अधून मधून इकडे येत जाऊ…” सुरेखाची जाऊ स्वाती मध्येच म्हणाली.
आधीच दुःखात असलेल्या सुरेखाला स्वातीचे बोलणे फार लागले. ती पुढे काही बोलूच शकली नाही. तिची सासू, दिर आणि जाऊ निघून गेले.
सुरेखा आणि सुजयचे पंधरा वर्षांपूर्वी अरेंज मॅरेज झाले होते. स्वाती फार बोलकी होती आणि सुजय खूप कमी बोलायचा. पण दोघांनीही एकमेकांना मनापासून स्वीकारले आणि त्यांचा प्रेमाचा प्रवास सुरू झाला. स्वातीच्या सासुबाई खूप कडक स्वभावाच्या. पण सुरेखाने त्यांना कधी तक्रारीला जागा दिली नाही.
दोघांचा संसार फुलत होता. पण लग्नाला वर्ष झाले तरी पाळणा हलला नाही म्हणून सुरेखाचा सासरी छळ सुरू झाला. तिला मूल होत नाही म्हणून काहीबाही बोलणे, टोमणे मारणे सुरु झाले. काही दिवसांनी तिच्या दिराचे लग्न झाले आणि तिला वर्षभरातच मुलगा झाला.
सुरेखाला खूप आनंद झाला. तसेही तिला लहान बाळाचे खूप कौतुक होते. पण सासुबाई मात्र सुरेखाला त्या लहान बाळाला जवळ घेऊ द्यायची नाही. सासूच्या पाठोपाठ तिची जाऊ सुद्धा तिला तुसडेपणाची वागणूक देऊ लागली. सुरेखाची मनातल्या मनात घुसमट होत होती. बोलकी सुरेखा हळूहळू अबोल होत होती.
सुजयला तिने न सांगताही तिच्या वेदना कळत होत्या. आई सुरेखाला चांगली वागणूक देत नाही हेसुद्धा त्याला कळत होतेच. म्हणून त्याने सुरेखाला घेऊन वेगळे राहायचे ठरवले. आपले घर थोडे लहान पडत आहे म्हणून जवळच एक फ्लॅट घेणार असल्याचे सांगून तो सुरेखाला घेऊन घराबाहेर पडला.
सुजय आणि सूरेखाचा नवीन जागेत संसार सुरू झाला. पदरात मुल नाही ह्याचं दुःख होतंच पण हळूहळू तिच्या या दुःखावर सुजयने आपल्या प्रेमाची फुंकर घातली. जसजसा काळ जात होता तसतशी सुरेखा या दुःखातून बाहेर येत होती.
सुजय आणि सुरेखाच्या लग्नानंतर सहा वर्षांनी अगदी अनपेक्षितपणे त्यांच्या आयुष्यात लहान बाळाची चाहूल लागली. या गोड बातमीने दोघेही आनंदले. काही दिवसांनी सुरेखा ने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि दोघांनीही मिळून तिचे नाव स्वरा ठेवले.
सुरेखाच्या सासूबाईंना त्यांच्या नातवाचे जितके कौतुक होते तितके नातीचे अजिबात नव्हते. त्या स्वराला पाहायला आल्या तेव्हा म्हणाल्या होत्या की इतक्या वर्षांनी मुल झालं पण काही फायदा नाही झाला. देवाने मुलगीच पदरात टाकली. त्यांचे बोलणे सुरेखा आणि सुजयला अजिबात आवडले नाही. पण दोघेही काही बोलले नाहीत.
तेव्हाही सुजय आणि सुरेखाच्या आनंदात त्या मनापासून सामील झाल्या नव्हत्या आणि आज जेव्हा सुजय या जगात नाही आणि त्यांच्या नातीला आणि सुनेला त्यांच्या आधाराची गरज आहे तेव्हा ही त्यांनी ह्या दोघींना परके केले होते. सुरेखाला खूप एकटे वाटत होते. पण दोघीही मायलेकी एकमेकींचा आधार बनल्या होत्या. हळूहळू दिवस जात होते आणि दोघीही दुःखातून सावरत होत्या.
सुरेखाकडे आता थोडेच पैसे शिल्लक उरले होते. सुजय नोकरी करत होता तेव्हा गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतर खर्च भागवताना महिना संपल्यावर अगदी थोडीच रक्कम शिल्लक असायची. त्या जमा पैशांवर कसतरी सर्व खर्च भागत होते. सर्व नातेवाईकांनी आधीच पाठ फिरवली होती. आता एखादी नोकरी शोधावी असा विचार सुरेखाने केला. आणि एके दिवशी अचानकच त्यांना कळलं की सुजयने त्याचा जीवन विमा उतरवला होता. आणि त्याचे जवळपास एक कोटी या दोघींना मिळणार होते.
सुजयने इतका दूरचा विचार आधीच करून ठेवला होता ह्याची सुरेखाला कल्पना सुद्धा नव्हती. या पैशाने सुजयची कमतरता कधीच भरून निघणार नव्हती. पण भविष्यात दोघींना कुणासमोर हात पसरवण्याची आता गरज उरली नव्हती.
सुजयच्या विम्याचे एक कोटी रुपये सुरेखाला मिळालेत ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सगळ्या नातेवाईकांमध्ये पसरली. ज्यांनी कधी सुरेखाशी दोन शब्द प्रेमाने बोलले नसतील ते देखील आता स्वतःहून तिच्याशी बोलायला येत होते. सुरेखाला सर्वांचे बदललेले वागणे कळत होते. लोकांना माणसांपेक्षा पैशांची भाषा लवकर कळते हे तिला कळून चुकले होते.
एके दिवशी अचानक तिचा भाऊ अन् वहिनी तिच्या घरी आले. वहिनी तर आल्या आल्या सुरेखाच्या गळ्यात पडून रडायला लागली. आणि म्हणाली…
” सुरेखा…तुझी अवस्था आता बघितल्या जात नाही ग…तू आमच्याबरोबर घरी राहायला चल…तुम्हा दोघींना तिथे येऊन फार बरे वाटेल…”
” अगं पण वहिनी…मी तुला आधी म्हणाले तेव्हा तू मला नकार दिला होतास ना घरी न्यायला…तू म्हणाली होतीस की आम्हा दोघींना ठेवणे तुम्हाला परवडणार नाही कारण तुमचीच परिस्थिती सद्या फारशी चांगली नाहीय..”
” अगं… परिस्थितीच काय आहे…आज चांगली तर वाईट…पण म्हणून कुणी आपल्या घरच्यांची अशी साथ सोडत नाही… आणि आधी मला असे वाटले होते की माझ्या लहान मुलांमध्ये स्वरा रमणार नाही…पण आई सोबत असली की मुलं कुठेही रमतातच…म्हणून म्हणतेय तुम्ही दोघीही आताच चला माझ्यासोबत घरी…” सुरेखाची वहिनी म्हणाली. भावाने सुद्धा तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. इतक्यात तिच्या भावाने विचारले..
” सुरेखा…तुला सूजयच्या विम्याचे एक कोटी रुपये मिळालेत ना…त्या पैशाचं काय करायचं ठरवलं आहेस…?”
” दादा…माझ्या दिरांना काहीतरी नवीन व्यवसाय करायचा होता म्हणून त्यांनी माझ्याकडून उसने म्हणून घेतले आहेत ते पैसे…” सुरेखा जाणूनबुजून खोटे बोलली.
” काय…तू तुझ्या दिराला एक कोटी रुपये देऊन दिलेस… वेडी आहेस का तू…तुला काही कळतं की नाही…आता तो काही पैसे परत देणार नाही…एवढे पैसे पाहिले की कुणालाही लोभ सुटणारच…” दादा रागाने म्हणाला. वहिनी सुद्धा रागाने सुरेखाकडे पाहू लागली.
” ते म्हणालेत की पैसे परत देतील म्हणून…ते जाऊदेत…तुम्ही आम्हाला घ्यायला आलात ना…मी लगेच बॅग भरायला घेते…”
” आता त्याची काही एक गरज नाही…ज्यांना पैसे दिलेत त्यांच्याकडेच जा की बॅग भरून राहायला…पैसे देताना दादा वहिनींची आठवण नाही आली…” वहिनी रागाने म्हणाली. आणि दादा वहिनी दोघेही घराबाहेर निघून गेले.
काही दिवसांनी सुरेखाचा दिर आणि सासू तिच्या घरी आले आणि तिला स्वतःच्या घरी चल म्हणाले. त्यावर सुरेखा म्हणाली…
” पण आई…आपलं घर तर खूप लहान आहे ना…शिवाय सद्या एकही रूम रिकामी नाही आमच्यासाठी…मग कसं यायचं आम्ही…?”
” तुम्ही दोघिपण माझ्या खोलीत राहा…नाहीतरी माझी खोली बरीच मोठी आहे…तुम्ही दोघी तर आरामात राहू शकाल तिथे…” सुरेखा ची सासू म्हणाली.
” ठीक आहे आई…मी लगेच बॅग भरायला सुरुवात करते…” सुरेखा म्हणाली.
” वहिनी…सर्व काही व्यवस्थित भरा…म्हणजे कपडे आणि पैसे जे काही असतील ते…” सुरेखाचा दिर म्हणाला.
” पैसे वगैरे तर नाहीत…पण बाकी सामान मी व्यवस्थित भरून घेते…तुम्ही काळजी करू नका…” सुरेखा म्हणाली.
” मग दादाच्या विम्याचे जे पैसे तुम्हाला भेटलेत ते कुठे ठेवलेत…”
” ते मी स्वराच्या नावाने बँकेत गुंतवले आहेत…त्यावर मिळणाऱ्या व्याजावर स्वराच्या शिक्षणाचा खर्च भागेल…आणि भविष्यात तिच्याच कामी येतील…” सुरेखा म्हणाली.
” अगं… मुलीच्या नावाने इतके पैसे गुंतवायचे नसतात… .मुलींचं काय गं…त्या परक्याचे धन असतात…त्यापेक्षा तु तुझ्या दिराला पैसे दे…तो योग्य ठिकाणी वापरेल ते पैसे…म्हणजे घरचे पैसे घरीच राहतील…आणि शिवाय तुम्हा दोघींची जबाबदारी सुद्धा आम्ही घेणारच आहोत…स्वराच्या लग्नाची तू काळजी करू नकोस…ती मोठी झाली की एखादा चांगला मुलगा बघून तिचं लग्न लावून देऊ…” सुरेखा च्या सासुबाई म्हणाल्या.
” पण आई…आता चार पाच वर्षे तरी ते पैसे काढता येणार नाहीत…पुढे पाहू आपण काय करायचं ते…आता कशाला तो पैशांचा विषय…आधी आपण घरी जाऊ आणि निवांत कधीतरी या विषयावर बोलू…” सुरेखा म्हणाली.
” पैसे गुंतवायच्या आधी आम्हाला विचारले का तू…आणि माझ्या मुलांच्या पैशांवर आमचा सुद्धा हक्क आहे…ते पैसे त्याच्या भावाला मिळायला हवे…तू काहीही कर आणि ते गुंतवलेले पैसे परत आण…त्याशिवाय तू घरी यायचे नाहीस…” सुरेखाच्या सासुबाई रागाने म्हणाल्या.
सासूबाईंचे बोलणे ऐकुन सुरेखा ला राग आला. ती म्हणाली…
” आई… जसा मुलाच्या पैशांवर तुमचा अधिकार आहे ना तसाच त्याच्या जबाबदाऱ्या सुद्धा तुम्हीच पेलायला पाहिजेत…सुजय गेल्यापासून आजवर तुम्ही साध्या एका शब्दानेही आमची चौकशी केली नाही…आजवर कधीच माझ्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला नाही…कधीच आम्हाला जवळचं मानलं नाही…आणि आता जेव्हा आमच्याकडे पैसे आहेत तेव्हा मात्र तुम्हाला तुमचा अधिकार आठवतोय…नकोय मला तुमचा खोटा आधार…जिथे माणसांची किंमत कमी आणि पैशांची जास्त आहे अशा घरी आम्हाला यायचे नाही…आजवर आम्ही जसे जगलो तसे यापुढेही जगू…तुम्ही आता येऊ शकता…” सुरेखा निर्धाराने म्हणाली.
सुरेखा चे बोलणे ऐकुन दोघेही खाली मानेने तिथून निघून गेले. सुरेखाला मात्र जगाची ही रीत पाहून खूप दुःख झाले. उगवत्याला नमस्कार करतात आणि मावळत्याकडे पाठ फिरवतात. अगदी आपलेच लोक आपली परिस्थिती वाईट असली की साधं विचारत सुद्धा नाहीत. इथे माणसांपेक्षा पैशांची किंमत जास्त आहे असे वाटून सुरेखाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो credit – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक आणि फॉलो करा.
खूप छान.