आज निशा च्या घरी पाहुणे येणार होते. तिची दूरची आत्या आणि मामा. निशाच्या आईने सगळी आवराआवर करून ठेवली होती. निशा आणि तिच्या लहान बहिणीने समिक्षाने तिच्या आईला स्वयंपाकात मदत केली होती. सर्वकाही तयार होते. इतक्यात निशाचे बाबा पाहुण्यांना घेऊन घरी आले. पाहुण्यांना चहापाणी दिले आणि थोड्या वेळात लगेच जेवण झाले. जेवण झाल्यानंतर सर्वजण हॉल मध्ये बसून गप्पा मारायला लागले. नीशाच्या मामांनी निशा आणि समीक्षा च्या शिक्षणाबद्दल चौकशी केली. निशा दिसायला सुद्धा सुंदर होती. गप्पांच्या ओघात मामांनी निशा साठी एक स्थळ सुचवले. आत्याने सुद्धा त्यांना दुजोरा दिला. इतक्यात निशा ने मामांना सहज म्हणून विचारले…
” मुलगा काय करतो ?”
” एका मोठ्या कंपनीत कामाला आहे ?” मामांनी रागाचा कटाक्ष टाकत उत्तर दिले.
मामांना राग आलाय हे निशाच्या लक्षात आले. पण नेमका कशाचा राग आलाय ते कळत नव्हते. म्हणून निशा तिथून निघून सरळ तिच्या रूम मध्ये गेली. आणि पाहुणे निघायच्या वेळेवरच बाहेर पडली. तिने पाहुण्यांना नमस्कार केला आणि पाहुणे निघून गेले. जाताना मामांनी निशाकडे पाहून पुन्हा एक रागाचा कटाक्ष टाकला. ते निघून गेले पण निशा मात्र या विचारात पडली की तूच नेमकं काय चुकलं. मामांना कशाचा राग आला असेल. पण तिला काही कळत नव्हतं. या घटनेला बरेच दिवस उलटून गेले आणि निशा हे मामांच प्रकरण विसरून गेली.
काही दिवसांनी तिच्या घरी तिचे काका, काकू आले होते. निशाच्या काकूची अन् निशाची छान मैत्री होती. निशा तिच्या काकू सोबत गप्पा मारत बसली होती. इतक्यात काकूंनी आत्या अन् मामांचा विषय काढला.
” मागच्या महिन्यात कुसुम आत्या आणि मनोहर मामा आले होते तुमच्याकडे.”
” हो ग काकू.” निशा म्हणाली.
” तेव्हा काही झालं होत का ?”
” नाही ग…पण तू का विचारतेस ?” निशाने विचारले.
” काही दिवसांपूर्वी ते काही कामानिमित्त आमच्याकडे आले होते. तेव्हा सांगत होते दिनकर ची मुलगी निशा फार आगाऊ मुलगी आहे म्हणून.”
” पण ते असे का बोलले असतील. मी तर त्यांना वाईट वाटेल असे काहीच बोलले नाही.”
” त्यांनी तुझ्यासाठी एक स्थळ सुचवलं होतं.”
” हो…मग ?
” आणि तू विचारले की मुलगा काय करतो ते.”
” हो.”
” त्याच गोष्टीचा राग आलाय त्यांना. मुलींना काय करायचं म्हणे हे सगळं विचारून. आजकालच्या मुली स्वतःला खूप हुशार समजतात. आमच्या वेळी तर लग्न झाल्यावरच नवऱ्याला पहायच्या. पण आता स्वतःच्या लग्नाची बोलणी देखील करायला लागल्यात.”
” अग, मी सहज बोलून गेले…तेव्हा माझ्या लक्षातच आले नाही बघ. मला वाटलं माझ्यासाठी स्थळ सुचवत आहेत तर मुलगा काय करतो हे विचारायला काही हरकत नाही. पण आपण बोलताना जरा जपून शब्द वापरायला हवे हे आज मला कळले आहे.”
” हो ग, आपण बोलताना जरा जपूनच बोलायला हवे. त्यांच्या काळात मुली मोठ्यांसमोर जास्त बोलत नव्हत्या. म्हणून त्यांना आजकालच्या मुलींकडून देखील तीच अपेक्षा आहे. यामध्ये ना त्यांची चूक आहे ना तुझी. एकाच गोष्टीकडे बघण्याचा तुमच्या दोघांचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे हे घडतंय.”
” हो…ते पण आहेच. पण यापुढे मी त्यांच्यासमोर बोलताना थोडी काळजी घेईल.”
————————————————————-
सहा महिन्यांनंतर
निशा तिच्या कुटुंबासह एका नातेवाईका च्या लग्नात आलेली होती. तिथे कुसुम आत्या आणि मनोहर मामा देखील आलेले होते. त्यांच्या सोबत त्यांचा मोठा मुलगा निखिल, सून वेदिका आणि त्यांचा लहान मुलगा आदित्य हेदेखील आलेले होते. त्यांचा मोठा मुलगा खरेदी विक्री च्या व्यवसायात होता आणि आदित्य सरकारी नोकरीमध्ये एका मोठ्या पदावर कार्यरत होता. निशाने मनोहर मामांना बघितले व त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांना नमस्कार केला. मनोहर मामांनी चेहऱ्यावर खोटे हसु आणत तिला आशीर्वाद दिला. मात्र त्यांच्या मनात निशाबद्दल असलेला पूर्वग्रह कायम होता. मात्र निशाला वाटले की मामा मागचे सर्व विसरले असतील. आणि तिच्या मनावरील दडपण थोडे कमी झाले.
मनोहर मामांच्या मुलाने म्हणजेच आदित्यने निशाला बघितले. तो तिच्याशी बोलायला आपणहून तिच्याजवळ गेला. गोरा रंग, मोकळे केस, गालावर पडणारी खळी, तिच्या बोलण्यात असलेला आत्मविश्वास आणि तीच ते खळखळून हसणं. आदित्य अगदी भारावून गेला होता. घरी गेल्यावर आदित्यच्या विचारांमध्ये फक्त निशाच होती. तिला आठवून आदित्य स्वतःशीच हसायला लागला. त्याच्या नजरेसमोरून ती काही जात नव्हती. आपण प्रेमात पडलोय याची जाणीव आदित्यला झाली. आणि आपल्या प्रेमाची कबुली त्याने त्याच्या आईकडे म्हणजेच कुसुम आत्या कडे दिली. आणि आपल्याला निशासोबत लग्न करायचे अशी इच्छा देखील बोलून दाखविली. आदित्यची आई आता एका वेगळ्याच पेचात सापडली होती. आपल्या नवऱ्याला निशा फारशी आवडत नाही हे त्यांना ठाऊक होते. मात्र आदित्यचे देखील निशावर मनापासून प्रेम आहे हे देखील त्यांना जाणवले. त्यांना देखील निशा आवडायची. त्यांनी आदित्यच्या वडिलांकडे याविषयी बोलण्याचे ठरविले.
आदित्यच्या आईने त्याच्या वडीलांजवळ आदित्य आणि निशा च्या लग्नाचा विषय काढला. सुरुवातीला त्यांनी हा विषय धुडकावून लावला पण आदित्यला निशा आवडली हे कळल्यावर त्यांचा नाईलाज झाला. आदित्य तसा खूप लाजाळू मुलगा. त्याने आजवर कधीही कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही. आज पहिल्यांदा त्याने स्वतःसाठी काहीतरी मागितले होते. आणि आदित्यच्या आईने देखील त्यांची समजूत काढली. आजकालच्या मुली बोलायला जरा मोकळ्या आहेत. हळूहळू तीही शिकून घेईल सर्व. तशी मुलगी मनाने चांगली आहे. आणि थोड्या नाईलाजाने का होईना मनोहर मामा आदित्यचे स्थळ घेऊन निशा च्या घरी गेले.
निशा च्या घरी सर्वांना आदित्य पसंत पडला होता. शिवाय हे स्थळ त्यांच्या ओळखीतील होते. निशाला सुद्धा आदित्य आवडलेला. त्यामुळे त्यांनी लवकरच साखरपुडा उरकून घेतला. आणि दोन महिन्यांनी आदित्य व निशाचे लग्न पार पडले. लग्नात आदित्य खूप खुश होता. त्याला पाहून त्याचे आईवडील सुद्धा खुश होते. पण आदित्यच्या वडिलांच्या मनात मात्र निशासाठी पूर्वग्रह होताच.
निशा च्या घरी सर्वांना आदित्य पसंत पडला होता. शिवाय हे स्थळ त्यांच्या ओळखीतील होते. निशाला सुद्धा आदित्य आवडलेला. त्यामुळे त्यांनी लवकरच साखरपुडा उरकून घेतला. आणि दोन महिन्यांनी आदित्य व निशाचे लग्न पार पडले. लग्नात आदित्य खूप खुश होता. त्याला पाहून त्याचे आईवडील सुद्धा खुश होते. पण आदित्यच्या वडिलांच्या मनात मात्र निशासाठी पूर्वग्रह होताच.
आता पुढे….
लग्न झाल्यावर निशा तिच्या सासरी छान रुळली. आदित्य खूप चांगला नवरा होता. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा. तिची काळजी घ्यायचा. निशासुद्धा आदित्यवर खूप प्रेम करायची. दोघांचा अगदी राजाराणी चा संसार सुरू होता. निशाच्या सासूबाई सुद्धा निशावर खूप खुश होत्या. निशा सर्वगुणसंपन्न होती. फक्त थोडी बडबड जास्त करायची. तिच्या मनात असलेलं ती पटकन बोलून द्यायची. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता.
आदित्यच्या वडिलांनी निशाला अजूनही मोकळेपणाने स्वीकारलेले नव्हते. ते तिच्याशी आदराने बोलायचे मात्र त्यांना काहीही काम असले की ते त्यांच्या मोठ्या सुनेला म्हणजेच कोमलला सांगायचे. निशाला थोड वेगळं वाटलं पण आपण सध्या या घरात नवीन असल्यामुळे असे असेल म्हणून तिने जास्त लक्ष दिले नाही.
इकडे तिची जाऊ वेदिका मात्र निशाला तोरा दाखवायची. निशा तिच्यासोबत मनमोकळेपणाने बोलायची मात्र ती अगदीच मोजके बोलायची. पण निशाला कधी वाईट वाटले नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो हे ती जाणून होती. शिवाय नवऱ्याच तिच्यावर असलेलं प्रेम आणि सासूबाई चा भक्कम आधार हे तिच्यासाठी खूप होतं.
काही दिवसांनी आदित्यची बदली बाहेरगावी झाली. आदित्य आणि निशा आता बाहेरगावी शिफ्ट झाले. दोघेही अधूनमधून घरी चक्कर मारायचे. सर्वकाही ठीक चालले होते.
मात्र अचानक एके दिवशी निशा च्या सासूबाई घरात पाय घसरून पडल्या. आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. दोन दिवस त्या दवाखान्यातच होत्या. आदित्य आणि निशा लगेच त्यांना भेटायला आले. दोन महिन्यांचे प्लास्टर लागले होते. आता त्या फक्त एका जागी बसणार होत्या. डॉक्टरांनी पायाची जास्त हालचाल करायला मनाई केली होती.
त्यामुळे कामांचा अतिरिक्त भार आता वेदिकावर येणार होता. आधी घरातील जवळपास सर्वच कामे तिच्या सासूबाई करायच्या. घरी धुणी भांडी करायला एक मदतनीस होती. पण स्वयंपाक आणि वरची सर्व कामे आता वेदिकाला करावी लागणार होती. शिवाय सासूबाईंना भेटायला येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करायची ती वेगळीच.
आदित्य तीन दिवसांची सुट्टी घेऊन आला होता. उद्या तो आणि निशा परत जाणार होते. इतक्यात वेदिकाने आपल्या आईची तब्येत बरी नसल्याचे कारण देत आपण माहेरी जातोय हे सांगितले. तिच्या आईची तब्येत बरी नसल्याने कोणीच तिला अडवले नाही. मात्र आता घरी सर्वकाही पाहण्याची जबाबदारी निशाने स्वतःवर घेतली.
आदित्यला कामावर परत जायचे असल्याने तो एकटाच निघून गेला. निशा मात्र सासरी राहून तिच्या सासूबाईंची मनोभावे सेवा करीत होती. घरी आलेल्या पाहुण्यांच हसतमुखाने स्वागत करी. सकाळपासून निशा कामात असायची. तिला उसंत मिळाली की ती तिच्या सासू जवळ जाऊन बसायची. त्यांच्याशी गप्पा करायची. आदित्य सुद्धा सुट्टीच्या दिवशी घरी यायचा.
निशाचे सासरे निशाची धडपड पाहत होते. आपण निशाला चुकीचे समजले हे त्यांना कळून चुकले होते. फक्त एका छोट्याश्या गोष्टीसाठी आपण निशाबद्दल मनात पूर्वग्रह ठेवला याचे त्यांना वाईट वाटले. आता त्यांनासुद्धा निशाचे कौतुक वाटायला लागले.
बघता बघता दोन महिने संपले. आणि सासूबाईंच्या पायाचे प्लास्टर निघाले. तरीपण सासूबाईंना काही दिवस आरामाची गरज होती. आणि म्हणून निशा आणखी काही दिवस त्यांच्याकडेच राहणार होती. आदित्यला निशाचा खूप अभिमान वाटला. त्याची निवड सार्थ ठरली होती. निशाने घरी सर्वांची मने जिंकली होती.
आणि आता वेदिकासुद्धा घरी परत आली. तिच्या सासूबाईंच्या पायाच प्लास्टर सुटल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी ती घरी परतली. निशा ची सासूबाई ठणठणीत बऱ्या झाल्यानंतर निशा आदित्यकडे परत गेली. आणि सुट्टीमध्ये ते घरी येत असत.
पण निशा च्या सासरेबुवांना मात्र त्यांच्या मुलाच्या आदित्यच्या निवडीचा अभिमान वाटत होता. त्यांचा पूर्वग्रह चुकीचा ठरला होता. त्या दिवसापासून त्यांनी निशाला अगदी मुलीसारखं मानलं.