“तुला किती दिवसांपासून सांगतेय प्रताप…अरे निदान आता तरी लग्न करून घे…चांगला 30 वर्षांचा झाला आहेस तू…” प्रतापची आई.
“काय ग आई…आज सकाळी सकाळी तोच विषय पुन्हा…आपण नंतर बोलू ना यावर कधीतरी.” प्रताप आईला म्हणाला.
“नंतर कधी बोलायचं… तुझ्यासोबतच्या सर्व मुलांची लग्न उरकली आहेत…आधी म्हणायचास आधी नोकरी लागू दे…आता तर चांगला साहेब झालास तू…मग काय हरकत आहे लग्न करायला…” प्रतापची आई प्रतापला म्हणाली.
” मला आता जरा महत्त्वाच्या कामानिमित्ताने लवकर जायचं आहे…आपण पुन्हा कधीतरी बोलू या विषयावर…”
” हेच बोलून मला टाळत असतोस तू…तुम्हा पोलिसांची ड्युटी म्हणजे सतत काहीतरी महत्त्वाचं असतं हे मला कळतं…पण म्हणून तुला लग्नाचा विचार करायला देखील वेळ मिळत नसेल का ?” प्रतापच्या आईने विचारले.
” आई आपण या विषयावर नक्कीच बोलू…पण आज नाही…आज मी खरंच घाईत आहे…पुन्हा कधीतरी बोलूया…” प्रताप लग्नाचा विषय टाळत म्हणाला.
त्यानंतर नाश्ता करून प्रताप घरून ड्युटीवर जाण्यासाठी निघाला. मनात मात्र आईचे बोलणे आठवत होते. आई सुद्धा काही चुकीचं बोलत नाही आहे. मी एकुलता एक असल्याने तीनेसुद्धा स्वप्नं पाहिली असतील. सुनेची, नातवंडाची.
विचारांच्या तंद्रीतच तो पोलिस स्टेशन मध्ये पोहचला. तो येऊन पाच मिनिटेच झाली असतील तेवढ्यात पोलिस स्टेशन मध्ये एक महत्त्वाचा फोन आला. इथून जवळच असलेल्या एका गावात शेतीच्या मालकी हक्कावरून दोन भावांमध्ये वाद सुरू होता. त्याचे पर्यावसान आज दोन गटांमधील हाणामारीत झाले होते. तातडीने निघावे लावणार होते.
प्रताप लगेच तिथे जाण्यासाठी निघाला. सोबत त्याची पूर्ण टीम होती. पंधरा एक मिनिटात ते घटनास्थळी पोहोचले देखील. एकाला जरा जास्तच मार लागला होता. तर तीन ते चार जण किरकोळ जखमी होते. तातडीने अंबुलन्स बोलावून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून बाकीची कारवाई पूर्ण करून, पोलिस परत निघून आले.
जखमींचा जबाब नोंदवण्या करिता प्रताप हॉस्पिटल मध्ये पोहचला. ज्यांना जास्त मार लागला होता त्यांची भेट घ्यायला तो त्यांच्याजवळ गेला. इतक्यात त्यांची विचारपूस करायला आलेल्या स्त्री कडे त्याचे लक्ष गेले. आणि तो काही क्षणांसाठी स्तब्ध झाला.
ती स्त्री दुसरी कुणी नसून मीरा होती. तिला पाहताच त्याच्या भूतकाळाच्या आठवणी परत एकदा ताज्या झाल्या. तिला सुद्धा त्याला पाहून तितकाच मोठा धक्का बसला होता. कारण दोघांनीही या भेटीची कधीच अपेक्षा केली नव्हती. पण प्रसंग निराळा होता. त्यामुळे दोघांनीही स्वतःला सावरले. त्या हाणामारीत जे जखमी झाले होते ते मिराचे मामा होते. ती काहीही न बोलता मागे सरली आणि तिच्या मामांचा निरोप घेऊन तिथून निघून गेली.
प्रतापने सुद्धा तिच्या मामांचा जबाब घेतला आणि तिथून निघून आला. प्रतापच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. कारण इतक्या वर्षांपासून जी गोष्ट विसरण्याचा तो प्रयत्न करतोय ती अशी मूर्तिमंत रुप घेऊन त्याच्या समोर येऊन उभी ठाकली होती. प्रतापच्या मनात अनेक प्रश्न होते. तिने अचानकपणे लग्न का केले हे कोडं त्याला अजूनही उलगडत नव्हतं. त्याला मीराला खूप प्रश्न विचारायचे होते. पण इतक्या वर्षांनी ती दिसल्यावर तिच्याशी कसं बोलावं हे प्रतापला सुचत नव्हतं.
मीरा आणि प्रताप एकाच शाळेत शिकायचे. मीरा गरीब घरची पण अगदी हुशार मुलगी. प्रताप आणि मीरा यांची घट्ट मैत्री होती. इतकी की त्यांना पाहणाऱ्यांना वाटायचे की दोघे एकमेकांच्या आकंठ प्रेमात आहेत. पण त्यांच्या मते ते फक्त चांगले मित्र होते.
मग ते कॉलेजला जायला लागले आणि तिथे त्यांना आणखी काही मित्र मैत्रिणी मिळाल्या. कामिनी सुद्धा त्यांपैकीच एक. कामिनी प्रतापशी जरा जास्तच जवळीक साधायची. ते मीराला अजिबात आवडत नसे. पण ती काही बोलायची नाही.
पण एके दिवशी मात्र तिच्या संयमाचा बांध फुटला. कॉलेज मध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात होता. आणि अचानकपणे कामिनी ने सर्वांसमोर प्रतापला लाल गुलाब दिला आणि प्रपोज केले. प्रतापसाठी हे सर्व अनपेक्षित होते. कारण त्याच्यासाठी कामिनी फक्त एक चांगली मैत्रीण होती. तो तिला नाही म्हणणार इतक्यात मीरा समोरून ताडताड करत आली आणि कामिनीच्या हातातील फुल हिसकावून घेतले. आणि म्हणाली.
” प्रताप फक्त माझा आहे…त्याच्यावर फक्त माझाच अधिकार आहे…”
” पण तूच तर म्हणाली होती ना की तुम्ही फक्त फ्रेंड्स आहात…”
” हो.. प्रताप माझा सर्वात चांगला मित्र आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे…त्यामुळे यापुढे त्याच्यापासून जरा लांब राहायचं…” मीरा रागाने म्हणाली.
प्रताप मीराकडे पाहतच राहिला. तिला इतकं रागावलेले त्याने पहिल्यांदाच पाहिले होते. आणि तिच्या या रूपाच्या तो प्रेमात पडला होता. मीराला सुद्धा आपण काय बोलून गेलो याची जाणीव झाली आणि ती ओशाळून तिथून निघून गेली. आणि तिथून सुरू झाली प्रताप आणि मीराची प्रेमकहाणी.
मग काय. हे दोघेही कॉलेज मध्ये पूर्णवेळ सोबतच असायचे. जेवण, अभ्यास सर्वकाही सोबतच. दोघांच्या निखळ मैत्रीला अवखळ प्रेमाची किनार लाभली पण ते दोघेही त्यात वाहवत गेले नाही. त्यांनी त्यांच्या अभ्यासाला प्राथमिकता दिली आणि जोरात अभ्यास चालू केला. दोघांचेही एकच स्वप्न होते. स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस अधिकारी होण्याचे. दोघेही एकमेकांच्या स्वप्न स्वतः जगत होते.
दोघांच्याही बारावीच्या परीक्षा झाल्या. बारावीनंतर दोघांनीही आर्ट्स ला प्रवेश घ्यायचा आणि सोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करायची हे ध्येय त्यांनी आधीच ठरवले होते. निकाल लागायला अजुन वेळ होता.
त्यामुळे प्रताप आणि मिराची दोन महिने भेट होणार नव्हती. मीराच्या मामेबहिणी चे लग्न ठरले होते. आणि त्या लग्नासाठी मीराच्या घरचे सर्व तिच्या मामांच्या गावी जाणार होते. मीरा खूप उत्साहात होती. दोन महिन्यांनी परत भेटायचे वचन देऊन मीरा मामांच्या गावी निघून गेली. त्यादिवशी प्रतापने मीराला पाहिले ते शेवटचे. त्यानंतर मीरा परत आली नाही…बातमी आली ती फक्त मिराच्या लग्नाची.
आणि या बातमीने प्रताप पूर्णपणे हेलावून गेला होता. पुढचे कितीतरी महिने लागले त्याला सावरायला. पण त्या भूतकाळाच्या आठवणीत तरी किती काळ राहणार होता तो. शेवटी त्याच्या काहीतरी जबाबदाऱ्या होत्या. आई वडिलांना सांभाळायचं होतं. उशिरा का होईना तो या सर्वांमधून बाहेर पडला आणि अभ्यासाला लागला. खूप मेहनत करून चांगल्या मार्कांनी पास झाला आणि पहिल्याच प्रयत्नात पोलीस अधिकारी झाला.
आज त्याच्या आयुष्यात सर्वकाही होते, फक्त प्रेम नव्हते. प्रताप आयुष्याबद्दल समाधानी होता पण खुश नव्हता. आजवर काहीतरी कारणे देऊन लग्नाचा विषय टाळला होता त्याने. पण शेवटी किती वेळ तो हे सर्व टाळणार होता. आईवडिलांचा विचार करून कधीतरी त्याला लग्न करावेच लागणार होते. आणि हे त्याला पक्के माहिती होते.
पण इतक्या दिवसानंतर मीराला पाहून तो डिस्टर्ब झाला होता. त्याचे रोजचे रूटीन सुरू होते पण भूतकाळातील काही प्रश्नांनी पुन्हा डोके वर काढले होते. ह्या घटनेला आठ दिवस उलटून गेले होते. एके दिवशी अचानक कुणी स्त्री पोलिस स्टेशन ला आली आणि तिला प्रताप सरांना भेटायचे आहे असे सांगू लागली. प्रतापला जेव्हा हा निरोप मिळाला तेव्हा त्याने त्या महिलेला त्याच्या केबिन मध्ये बोलावून घेतले.
“आत येऊ का..?” तिने विचारले.
” येस… कम इन.” त्याने तिच्याकडे न पाहता उत्तर दिले.
ती आली आणि त्याच्या टेबल समोर उभी राहिली. त्याने हातातील फाईल मधून डोके वर काढून तिच्याकडे पाहिले. ती मीराच होती. तिला पाहून त्याला आश्चर्य वाटले.
” तू…आणि इथे…” प्रतापने विचारले.
” हो…तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून.”
” बस ना.”
ती त्याच्या टेबल समोर असलेल्या खुर्चीवर बसली.
” काय बोलायचं होतं तुला..?” प्रताप ने विचारले.
” सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन…तू जे स्वप्न पाहिलं ते तू पूर्ण करून दाखवले…” मीरा म्हणाली.
” थँक यू…पण तुला सुद्धा पोलिस अधिकारी व्हायचे होते ना…?” प्रताप.
” हो पण आपली सगळी स्वप्ने पूर्ण होतातच असे नाही ना…” मीरा.
” हो…कारण तू स्वप्न पूर्ण करायचे सोडून लग्न करून मोकळी झालीस…” प्रताप खोचकपणे म्हणाला.
” लग्न करण्याचा निर्णय माझा स्वतःचा नव्हता…तशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून मला लग्न करावे लागले…” मीरा म्हणाली.
” म्हणजे…मला कळलं नाही…असे नेमके काय घडले होते की तुला तडकाफडकी लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला…” प्रताप ने विचारले.
” तुला तर माहिती आहे की माझे आईवडील मी लहान असतानाच एका अपघातात गेले. तेव्हापासून माझ्या मामांनीच माझा सांभाळ केला. अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे. मामा अन् मामींनी मला माझ्या आईवडिलांची कमी कधी जाणवू दिली नाही…” मीरा म्हणाली.
” मग..?”
” माझ्या मामाच्या मुलीचे लग्न ठरले होते. मामांच्या गावी जाऊन मोठ्या जल्लोषात लग्नाची तयारी सुरू होती. गावोगाव चे पाहुणे आले होते. मामा खूप आनंदात होता. पण त्यांच्या आनंदाला कुणाची तरी दृष्ट लागली.” मीरा म्हणाली.
” म्हणजे… नेमकं काय घडलं ?” प्रताप ने विचारले.
” लग्न व्हायच्या एक दिवस आधी म्हणजे हळद लागल्यावर गुड्डीताई तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. रात्रभर तिला शोधलं पण ती काही सापडली नाही. आणि सकाळीच नवरदेव त्याच्या घरून सर्व लवाजम्यासह निघाला होता.
मामांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुड्डीताईला शोधलं पण काही उपयोग झाला नाही. शेवटी हा हा म्हणता ही बातमी पूर्ण गावात पसरली. आणि वरातीला सुद्धा ही बातमी कळली. आणि सर्वांनी मामाला आणि मामीला बोलायला सुरुवात केली. लग्नासाठी पूर्ण मंडप सजलेला होता.
नवऱ्या मुलाकडचे आणि जवळचे नातेवाईक सुद्धा मामाला नको नको ते बोलत होते. मामाला ते सहन झाले नाही आणि तो एका रूम मध्ये जावून गळफास घेणार इतक्यात मामी आणि मी वेळेवर तिथे पोहचलो आणि त्यांचा जीव वाचला. त्यांची ती परिस्थिती पाहून कुणीतरी त्यांना गुड्डीताईंच्या जागी माझं लग्न लावून देण्याचा सल्ला दिला. आणि मामांनी अगदी केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहिले.
मी मामांना त्या अवस्थेत पाहू शकत नव्हते. संपूर्ण आयुष्य सन्मानाने घालवलेल्या माझ्या मामावर आज मान खाली घालायची वेळ आली होती. मला त्याक्षणी फक्त माझ्या मामाची लाचारी दिसली. त्यावेळी मामांनी मला जीव द्यायला सांगितला आता तर मी तो ही दिला असता. पण मामांनी मला एकच विचारले तू लग्नाला तयार आहेस का म्हणून. मी मानेनेच होकार दिला. नवरदेवा कडील मंडळी सुद्धा तयार झाली. आणि माझं लग्न झालं..” मीरा म्हणाली.
” काय…इतकं सगळं घडलं आणि तू मला सांगितले सुद्धा नाही…” प्रताप म्हणाला.
” हे सर्व इतक्या घाई घाईने झालं की मला वेळच मिळाला नाही तुला सांगायला आणि लग्न झाल्यावर तुला फोन करणे चुकीचे ठरले असते…” मीरा म्हणाली.
” सॉरी…मला यातले काहीच माहिती नव्हते आणि गैरसमजामुळे मी आजवर तुलाच चुकीचं समजत होतो. अगदी प्रेम या गोष्टीवरून विश्वास उडाला होता माझा. “
” चूक ना तुझी होती ना माझी…जे काय घडलं ते नशिबानेच घडलं…सुरुवातीला मला खूप त्रास झाला या सर्वांचा…ताई ऐन वेळी पळून गेल्यामुळे माझ्या सासरचे सुद्धा आमच्यावर खूप नाराज होते आणि तो सर्व राग ते माझ्यावर काढायचे…पण या सर्वांमध्ये विवेक म्हणजेच माझे मिस्टर ठामपणे माझ्या बाजूने उभे राहिले…त्यांनी सर्वांचा विरोध पत्करून मला पुढील शिक्षण घ्यायला लावले…मी पोलिस अधिकारी तर नाही झाले पण एक शिक्षिका नक्की झाले…शेवटी घरच्यांनी यांच्यापुढे हार मानली अन् मला खुल्या मनाने स्वीकारले…विवेक सारखा जोडीदार मिळाल्याने मी धन्य झाले…इतकं झाल्यावरही मी त्यांच्या प्रेमात पडले नाही तर नवलच…सहवासातून प्रेम आणखीच फुलत गेले…
गुड्डीताई मुंबईला पळून गेली होती…पण तिचा संसार काही जास्त काळ टिकला नाही…अवघ्या वर्षभरात ती माहेरी परतली…मामांनी तिला माफ केले आणि पुढे एक साजेसा मुलगा पाहून तिचे लग्न लावून दिले…आणि रिटायर्ड झाल्यापासून ते गावी शेती पाहतात..” मीरा ने सांगितले.
” तू आनंदात आहेस हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला आहे…” प्रताप म्हणाला. मात्र मनातून कुठेतरी त्याला मीराच्या नवऱ्याबद्दल असूया निर्माण झाली होती. विवेकबद्दल बोलताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती.
” होय…लग्न झाल्यावर मला अजिबात वाटले नव्हते की मी विवेकवर इतके प्रेम करेल. पण आयुष्याने मला दुसरी संधी दिली आणि मी सुद्धा खुल्या मनाने त्या संधीचा स्वीकार केला. कधीकधी आपल्याला कर्तव्य म्हणून आपल्या प्रेमाला विसरावं लागतं. पण जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. तू सुद्धा भूतकाळातील कटू आठवणी विसरून तुझ्या वर्तमानात जे घडतंय त्याचा स्वीकार कर. आयुष्याला दुसरी संधी देऊन बघ.” मीरा म्हणाली.
” म्हणजे तुला माझ्याबद्दल बरंच काही कळलं आहे…” प्रताप म्हणाला.
” होय…मला माहिती आहे की तू अजून लग्न केले नाहीस…मला कामिनी भेटली होती… माझं लग्न झाल्यावर तू स्वतःची जी हालत करून ठेवली होतीस ते सुद्धा तिने मला सांगितलं…त्या दिवशी हॉस्पिटल मध्येच मी तुझ्याशी बोलणार होते पण मामांची तब्येत बरी नसल्या कारणाने मला ते ठीक वाटलं नाही. म्हणून आज तुझ्याशी बोलायला इथेच आले. ” मीरा म्हणाली.
” खरंच थँक्यू मीरा…तू आज माझे डोळेच उघडले स. कधीकधी आपल्या आनंदापेक्षा आपल्या जिवलगांचा आनंद महत्त्वाचा असतो… मी स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत बसलो आणि माझ्यासोबत माझ्या घरच्यांना सुद्धा नकळतपणे माझ्या दुःखाची झळ बसत होती…तू मात्र स्वतःच दुःख विसरून आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले…आणि तुझ्या जवळच्या लोकांना सुद्धा आनंद दिला…तुझ्या पुढील वाटचाली साठी तुला खूप खूप शुभेच्छा…तू नेहमीच आनंदात राहा…” प्रताप म्हणाला.
” थँक्यू प्रताप…निघते मी… ऑल द बेस्ट…” असे म्हणत मीरा तिथून निघून गेली.
आणि इतक्यात प्रतापचा मोबाईल वाजला. बघतो तर त्याच्या आईचा फोन होता.
” हॅलो…”
” हॅलो प्रताप…अरे बाळा तुझ्या मावशीने तुझ्यासाठी एक छान स्थळ सुचवले आहे…तू हो म्हणत असशील तर या रविवारी मुलीला पाहायला जायचे का…?”
” हो आई…तुला जर ठीक वाटत असेल तर जाऊ मुलगी पाहायला…”
” खरंच…तू हो म्हणत आहेस…म्हणजे तू लग्नाला तयार आहेस…?” विश्वास न बसल्यासारखे त्याच्या आईने पुन्हा विचारले.
” हो आई…पण मुलगी मात्र तुलाच निवडावी लागेल माझ्यासाठी…”
” हो बाळा…मी कळवते मावशीला… चल बाय…घरी आल्यावर बोलू…”
” बाय आई…”
एवढे बोलून प्रताप ने फोन ठेवला. आईच्या आवाजात आज वेगळाच आनंद जाणवला त्याला. तो सुद्धा भूतकाळातील मरगळ झटकून नवीन आयुष्याचे स्वागत करायला तयार झाला.
बरेचदा आपण उगाच भूतकाळ कुरवाळत बसतो आणि अनवधानाने आपल्या भविष्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून वेळीच सावरणे गरजेचे.
समाप्त.
आरती निलेश खरबडकर.
photo credit -pixel
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला लाईक करा.
Great thoughts 👍