” तुमच्या घरच्यांना काही कळतं की नाही. जाऊबाईंची लायकी तरी आहे का कार्यकारिणीत सामील व्हायची. कधी घराच्या स्वयंपाकघरातून बाहेर तरी आल्या का त्या. साधं कुणासमोर काय बोलावं आणि कसं वागावं हे सुद्धा नाही कळत त्यांना. आणि म्हणे त्यांना शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील करणार…” नंदिनी रागारागाने बोलत होती.
” तू शांत राहतेस का थोडावेळ. पप्पांनी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल. आणि तसंही आपल्या घरातील सर्व निर्णय पप्पाच घेतात. त्यामुळे आपण काहीही न बोललेले बरे…” राजन तिला समजावत म्हणाला.
” अहो पण त्यांना जर घरातील व्यक्ती पाहिजे असेल तर मी आहेच की. त्यांनी या पदासाठी माझा विचार करायला पाहिजे. मी जाऊबाई पेक्षा जास्त शिकलेली आहे. चारचौघात कसं वागावं हे मला त्यांच्यापेक्षा जास्त कळतं. आणि मी असताना पप्पांनी जाऊबाईंचा विचार का करायचा..?” नंदिनी अजूनही रागातच होती.
” म्हणजे पप्पांनी वहिनींचे नाव कार्यकारिणी साठी सुचवले याचा राग नाही आला तर तुझे का नाही सुचवले याचा राग आलाय तुला. हे बघ, वहिनी तुझ्यापेक्षा मोठ्या आहेत. आणि त्यांचा या घरातील मानही मोठा. शिवाय जर त्यांना कार्यकारिणीत सामील करायचा विचार पप्पांनी केलाय तर काहीतरी विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल.” राजन म्हणाला.
” पण मला अस वाटतं की वहिनी ही जबाबदारी सांभाळू शकणार नाहीत. त्यांना कशातल काहीच कळत नाही. त्यांना हे सर्व झेपावणार नाही. सतत किचनमध्ये राबणाऱ्या जाऊबाई ना यातलं काय कळणार…” नंदिनी राजनला समजावत म्हणाली.
“कार्यकारिणीत कोणालाही स्थान मिळो. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या शिक्षण संस्थेने प्रगती करायला हवी. यासाठी आपण सर्वांनीच मेहनत घ्यायला हवी. म्हणून तू हा विचार सोडून दे आणि तयारीला लाग. परवा कार्यकारिणीची बैठक आहे. आपण सुद्धा त्यांच्या सोबत जाणार आहोत.” राजन नंदिनीची समजूत घालत म्हणाला.
नंदिनी तेवढ्यापुरती गप्प बसली. पण मनातून ती हे मानायला तयार नव्हती की तिची गावंढळ जाऊ त्यांच्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील होणार होती. तिच्या मते हा तिचा अपमान होता. तिने ठरवलं होतं की काहीही करून हे पद तीच मिळवणार.
नंदिनी दोन वर्षांपूर्वी पाटलांची सून बनून या घरात आली होती. नंदिनी चांगली उच्चशिक्षित, श्रीमंत घरातून आलेली, आणि येताना सोबत भरपूर वैभव घेऊन आलेली. त्याशिवाय दिसायला अत्यंत सुंदर. आणि या सर्वांमुळे ती कमालीची गर्विष्ठ बनली होती. स्वतः पुढे तिला इतर सर्व कमीच वाटायचे.
वसुधा तिची मोठी जाऊ. दिसायला रेखीव, घरकामात निपुण, आणि स्वभावाने नम्र. वसुधाचे आईवडील ती लहान असतानाच गेले होते. त्यामुळे वसुधाचा सांभाळ तिच्या मामांनी केलेला. रावसाहेब यांनी तिला एका लग्न समारंभात पाहिले आणि आपला मुलगा अभय साठी तिला मागणी घातली.
वसुधा च्या मामांना तर खूप आनंद झाला. कारण रावसाहेब हे त्या गावातील एक मोठे प्रस्थ. त्यांची स्वतःची शिक्षण संस्था होती. आणि दिसमासाने ती संस्था प्रगती करत होती. आजूबाजू च्या गावात त्यांच्या शब्दाला मान होता. आणि त्यांनी स्वतःहून वसुधा ला मागणी घातली ही त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. वसुधाच्या मामांनी लगेच होकार दिला.
अभय आणि वसुधा हे घरातील मोठ्यांच्या मनाविरुद्ध नव्हते. त्यांच्यासाठी घरातील मोठ्यांचा निर्णय सर्वतोपरी होता. अभय आणि वसुधाचे लग्न झाले. आणि वसुधा त्या घरात छान रमली. रावसाहेब स्वभावाने कडक असले तरी ते मनाने मात्र खूप चांगले होते.
त्यांच्या पत्नी जानकीबाई ह्या चांगल्या कारभारीन होत्या. रावसाहेब त्यांच्या राजकारणात आणि समाजकारणात व्यस्त असायचे. त्यांचे घराकडे फारसे लक्ष नसायचे. पण जानकीबाईनी घराचा डोलारा छान चालवला होता. जानकीबाई सुद्धा स्वभावाने करारी होत्या. पण मनाने हळव्या होत्या.
वसुधा घरी सून बनून आल्यावर त्यांनी सुरुवातीला तिला घरची शिस्त शिकवताना थोडी कठोरता दाखवली. पण आईच्या मायेने त्यांनी तिला समजून देखील घेतले. आणि बघता बघता वसुधा सर्व कामांमध्ये निपुण झाली. कोणतेही काम ती चुटकीसरशी पूर्ण करायची.
तिच्या लाघवी स्वभावामुळे हळूहळू संपूर्ण कुटुंबाला तिचा लळा लागला. तिला कोणतेही काम करण्यात कमीपणा वाटत नव्हता. तिचे राहणीमान सुद्धा खूप साधारण होते. आणि गरजा देखील मर्यादित होत्या.
घरामध्ये सर्व कामांसाठी नोकर होते. पण वसुधा मात्र स्वतःचे काम स्वतःच करायची. आणि घरात सर्वांच्या आवडीनिवडी जपायची. घरातल्या सर्वांच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना खाऊ घालायला तिला फार आवडायचे.
नंदिनीचे मात्र सर्वकाही उलट होते. तिच्या लग्नाला फक्त चार महिने झाले होते. ती लग्न करून आल्यावर घरात जास्त काम करत नसे. आपण श्रीमंत घरची लेक म्हणून आपल्याला काम करायची गरज नाही असे तिला वाटायचे.
तिला वाटायचं वसुधा गरीब घरची आहे म्हणून ती जास्त काम करते. नंदिनी लहान असूनसुद्धा वसुधा ला राबवून घ्यायची. वसुधा मात्र नंदिनीला लहान बहिणी प्रमाने वागवायची. तिच्या आवडी जपायची. मात्र नंदिनीला वाटायचे की आपण प्रत्येक बाबतीत वसुधापेक्षा उजवे आहोत. त्यामुळे या घरातील प्रत्येक मान तिलाच मिळवा.
आणि आता तर तिला आयतेच कारण मिळाले होते. रावसाहेब यांनी वसुधा ला शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील करायचे ठरवले. नंदिनीला मात्र हा तिचा अपमान वाटला. तिला वाटले की मी इतकी हुशार, उच्चशिक्षित असताना हा मान तिच्या साधारण दिसणाऱ्या जाऊला मिळणे म्हणजे तिच्यावर अन्याय केल्यासारखे आहे.
नंदिनीने याबाबतीत राव साहेबांशी बोलायचे ठरवले.
रावसाहेब नुकतेच बाहेरून आले होते. आणि हॉल मध्ये बसून होते. नंदिनी हॉल मध्ये गेली आणि त्यांच्या बाजूने जाऊन उभी राहिली.
” मामंजी…तुमच्याशी थोडे बोलायचे होते…”
” बोला सूनबाई…” रावसाहेब म्हणाले.
” मी ऐकलंय की तुम्ही जाऊबाईंना आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील करून घेणार आहात…” नंदिनी म्हणाली.
” होय…बरोबर ऐकलंय तुम्ही..” रावसाहेब म्हणाले.
” पण त्यांनाच का ?…” नंदिनी म्हणाली.
” कारण आम्हाला त्या योग्य वाटतात म्हणून आम्ही त्यांची निवड केली…” नंदिनी च्या बोलण्याचा रोख लक्षात घेत रावसाहेब म्हणाले.
” त्या कशाने योग्य आहेत…त्यांना साधं कुणाशी धड बोलता देखील येत नाही…चारचौघात कसं वावरायचं हे देखील कळत नाही…त्यांनी आजवर स्वयंपाक घराच्या बाहेर पाय देखील ठेवलेला नसेल…त्या फक्त मानाने मोठ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांना मोठं पद देत आहात…पण त्यासाठी त्या योग्य नाहीत…” नंदिनी ने एकादमात बोलून टाकले.
” त्यांची योग्यता काय आहे आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला सांगू नका…” रावसाहेब आवाज चढवत म्हणाले.
रावसाहेब यांचा आवाज ऐकुन जानकीबाई आणि वसुधा तिथे आल्या.
” त्यांना तुम्ही कार्यकारिणीत सामील करून घ्याल तर तुमचं चारचौघात हसं होईल…” नंदिनी म्हणाली.
” खूप बोललात सूनबाई…मोठ्या सूनबाई तुम्ही बोललेले सर्वकाही निमूटपणे ऐकुन घेतात म्हणजे त्या मूर्ख आहेत…त्यांना काही कळत नाही असं नाही…त्या तुमच्याशी चांगल्या बोलतात कारण त्या मनाने फार चांगल्या आहेत…स्वयंपाक घरात राबायची त्यांना काही गरज नाही पण केवळ घरातल्यांना स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालायचे म्हणून त्या स्वयंपाकघरात राबतात…त्या सर्वांचं मायेने करतात…” रावसाहेब म्हणाले.
” त्या घरातलं सर्व छान करतात म्हणून त्यांना बाहेरची जबाबदारी नाही देऊ शकत…मी शिकलेली आहे…मला चारचौघात कसं बोलायचं हे कळते.. त्यामुळे सर्वात आधी या पदासाठी तुम्ही माझा विचार करायला हवा होता…जाऊबाई घरातील जबाबदारी सांभाळतील आणि आपल्या शिक्षण संस्थेत आम्ही लक्ष देऊ…” नंदिनी म्हणाली.
” सूनबाई…वसुधा कमी बोलतात याचा अर्थ त्यांना बोलता येत नाही असा होत नाही…तुम्ही या घरात यायच्या आधी आम्ही मोठ मोठे निर्णय घेताना वसुधाचा सल्ला घ्यायचो…आणि त्यांनी आम्हाला दिलेला सल्ला कधीही चुकीचा ठरला नाही…आणि राहिली गोष्ट त्यांच्या शिक्षणाची तर तुम्हाला काय वाटतं…त्या किती शिकल्या असतील…” रावसाहेब म्हणाले.
” त्यांच्याकडे बघूनच कळतं की त्या फार फार तर दहावी किंवा बारावी शिकल्या असतील…” नंदिनी वसुधाकडे पाहत म्हणाली.
” इथेच तर तुम्ही चुकलात…माणसाच्या राहणीमानावरून तुम्ही त्याच्या शिक्षणाबद्दल अंदाज लावताय…वसुधा समाजशास्त्र विषयात पी. एच. डी. आहेत…आणि त्यांनी त्यांचं लग्न झाल्यावर घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांचं पी.एच. डी. पूर्ण केलंय…पण त्या त्यांच्या शिक्षणाचा तोरा नाही मिरवत…साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्व मानतात त्या…त्यांना त्यांच्या शिक्षणाचा अहंकार नाही…तर शिक्षणामुळे त्यांच्यात नम्रपणा आलाय…आणि त्या कुठलेही काम करण्यात कमीपणा मानत नाहीत…हाच त्यांचा चांगुलपणा आहे…आणि त्यामुळे ह्या पदासाठी त्याच योग्य आहेत…” रावसाहेब म्हणाले.
वसुधा पी.एच. डी. आहे हे ऐकताच नंदिनी ला धक्का बसला. साधी सरळ दिसणारी, मोजके बोलणारी, स्वयंपाक घरात राबणारी तिची जाऊ एवढी शिकलेली आहे हे तिला माहितीच नव्हते. कारण तिच्या मते शिकलेली माणसे असली साधारण कामे करत नाहीत. पण आज तिचा तो समज दूर झाला. उच्चशिक्षित आणि नम्र असणाऱ्या तिच्या जावेबद्दल आज तिला अभिमान वाटला. ती तशीच वसुधा कडे वळली. आणि हात जोडून म्हणाली.
” वसुधा ताई…मला माफ करा…मी आजवर बरेचदा टोचून बोलले तुम्हाला…मला माझ्या श्रीमंत असण्यावर, रुपावर, आणि शिक्षणावर गर्व होता…पण जर मला माणसेच कळणार नसतील तर काय उपयोग अशा शिक्षणाचा…तुम्ही आजवर मला समजून घेतले हा तुमचा मोठेपणा आहे…आणि मी तुम्हाला कमी लेखले हा माझा बालिशपणा…मला माफ करा…”
“अग…माफी काय मागतेस…तू मला माझ्या लहान बहिणी प्रमाणे आहेस…मला कधीच तुझा राग नाही आला…आणि जर तुला आपल्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीत सामील व्हायचे असेल तर मला काहीच हरकत नाही…” वसुधा नंदिनी ला म्हणाली.
” नाही…मला नाही वाटत की मी यासाठी योग्य आहे…मला अजुन खुप काही शिकायचे बाकी आहे…ही जबाबदारी मी नाही स्वीकारू शकत.” नंदिनी म्हणाली.
इतक्यात रावसाहेब म्हणाले…
” आपल्या संस्थेचा कारभार तुम्हा मुलांनाच सांभाळायचा आहे…पण त्यासाठी आधी तूम्ही ती जबाबदारी सांभाळायला पूर्णपणे तयार व्हायला हवे…”
” अगदी योग्य बोलत आहात तुम्ही…पण चला आज या निमित्ताने आमच्या दोन्ही सूनबाई समजदार झाल्या बरं का…” जानकीबाई हसत म्हणाल्या.
” चला मग मालकीण बाई…या निमित्ताने आज जेवणात काहीतरी गोड करा…” रावसाहेब म्हणाले.
” हो नक्कीच…” जानकीबाई म्हणाल्या.
जानकीबाई बाईंच वाक्य पूर्ण व्हायच्या आत दोन्ही जावा एकमेकींच्या हातात हात घालून स्वयंपाकाची तयारी करायला स्वयंपाक घरात गेल्या सुद्धा.
रावसाहेब आणि जानकीबाई मात्र दोघींकडे कौतुकाने बघत होते.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
( सर्व हक्क लेखिकेचे अधीन…शेअर करायची असल्यास लेखिकेच्या नावा सहित करावी.)
खुपच छान आणि हृदयस्पर्शी