मायाळू सासू आणि अहंकारी सून – भाग १

सकाळचे सहा वाजले होते.

 

घरातील देवघरात मंद दिवा तेवत होता. उदबत्तीचा सुगंध घरभर दरवळत होता. मीनाताई देवासमोर हात जोडून बसल्या होत्या.

 

देवपूजा आटोपल्यावर त्या स्वयंपाकघरात गेल्या. गॅसवर चहा ठेवला, डबे तयार केले, पोळ्या लाटल्या, भाजी केली, कपडे मशीनमध्ये टाकले आणि घराची साफसफाईही सुरू केली.

 

इतक्यात सुमेधा आपल्या खोलीतून बाहेर आली.

 

“आई, माझा डबा तयार आहे ना? मला उशीर होतोय.” सुमेधा म्हणाली.

 

“हो गं, फक्त चपात्या ठेवायच्या बाकी आहेत.” मीनाताई म्हणाल्या.

 

“आणि चहा जरा गरम हवा. काल तर अगदी थंड झाला होता.” सुमेधा म्हणाली.

 

“हो, लगेच देते.” मीनाताई म्हणाल्या.

 

मीनाताई धावपळ करत होत्या.

 

सारंग हे सगळं शांतपणे पाहत होता.

 

त्याला माहीत होतं, त्याची आई वयाच्या साठीतही या घरासाठी स्वतःला झिजवत होती.

 

 

सुमेधा एका खासगी कंपनीत काम करत होती. तिचा पगार मोठा नव्हता, पण नोकरी लागल्यापासून तिच्या वागण्यात कमालीचा बदल झाला होता.

 

पूर्वी हसतमुख असलेली सुमेधा आता प्रत्येक गोष्टीत दोष शोधू लागली होती. आपण बाहेर जाऊन नोकरी करत आहोत ह्याचा तिला आताशा गर्व वाटत होता. त्यामुळे आपल्या सासूला ती खूप हलक्यात घेत होती. खरंतर तिच्या नोकरीला सारंगचा विरोध होता पण मीनाताई त्याला म्हणाल्या की तिची इच्छा आहे तर करू दे नोकरी. त्यामुळेच त्याने नाईलाजाने तिला नोकरी करायला होकार दिला होता.

 

घरी परतल्यावर ती मीनाताईंना कधीच विचारत नसे—

 

“आई, तुम्ही थकला असाल ना?”

 

त्याऐवजी तिचा पहिला प्रश्न असायचा—

 

” आई आज टेबल वर धूळ आहे. तुम्ही जरा कपडा मारत जा ना रोज.”

 

मीनाताई खरंतर दिवसभर कामातच असायच्या. पण वयोमान झाल्याने त्यांना आता घरकामात पूर्वीसारखा उरक राहिला नव्हता.

 

एक दिवस ती ऑफिसमधून आली. तिने जेवण वाढून घेतलं. पहिला घास तोंडात टाकला आणि लगेच ताट बाजूला सारलं.

 

“हे काय केलंय आई?”

 

मीनाताई जरा घाबरल्याच. त्यांना वाटलं की नेमकं काय झालं असेल. म्हणून त्यांनी तिला विचारले

 

“काय झालं गं?”

 

“भाजीत तेल किती जास्त आहे.” सुमेधा म्हणाली.

 

“अगं चुकून थोडं जास्त पडलं असेल माझ्याच्याने.” मीनाताई म्हणाल्या.

 

“थोडं? अहो आई तेलकट खाणे बरे नाही आणि महागाई किती वाढली ते बघताय ना. जरा जपून वापरत जा सामान. तुम्ही अजून बाहेर जाऊन नोकरी केलेली नाही ना त्यामुळे तुम्हाला नाहीत नाही. खूप मेहनत लागते पैसा कमवायला. त्यामुळे अशी उधळपट्टी नका करत जाऊ.” सुमेधा म्हणाली.

 

सारंगला राग आला.

 

“सुमेधा, काय बोलत आहेस ह्याचं भान ठेव.”

 

“तुम्ही मध्ये बोलू नका. दिवसभर मी काम करते. निदान घरी आल्यावर नीट जेवण तरी मिळायला हवं ना.”

 

सारंग आणखी काही बोलेल या आधी मीनाताईंनी डोळ्यांनीच त्याला काहीही बोलू नको असे सांगितले. मग नाईलाजाने सारंग गप्प बसला. पण सुमेधा आईला नेहमीच अशी वागणूक देत असेल अशी जाणीव झाल्याने त्याच्या मनात वेगळीच कालवाकालव झाली. तो त्या दिवशीपासून सुमेधाशी जरा कमी बोलायला लागला होता. पण सुमेधाला मात्र अजूनही त्या गोष्टीची जाणीव झाली नव्हती.

 

 

दुसऱ्या दिवशी शेजारच्या जोशीकाकू आल्या.

 

” काय ग मीना, चेहरा एवढा उतरलेला का आहे तुझा?”

 

मीनाताई हसण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या,

 

“काही नाही. जरा थकल्यासारखं वाटत आहे मला म्हणून.”

 

“हो. थकल्यासारखी तर वाटत आहेस तू. जरा काळजी घेत जा स्वतःची” जोशीकाकू म्हणाल्या.

 

” हो. काळजी तर घेते.”

 

” वाईट नको वाटून घेऊस पण या वयात इतकी कामे कशाला करतेस अगं. सून नोकरी करते ही चांगली गोष्ट आहे. पण म्हणून तिने घरातील एकाही कामाला हात लावू नये असे नाही ना.” जोशीकाकू म्हणाल्या.

 

” थोडीफार मदत करते अगं ती. आणि माझ्याच्याने आता होत आहेत म्हणून करतेय. पुढे तर तिलाच सांभाळावं लागेल ना सगळं.” मीनाताई हसून म्हणाल्या.

 

” बघ बाई. फक्त झेपेल एवढंच कर म्हणजे झालं. तब्येतीला जप जरा.” असे म्हणून जोशीकाकू निघून गेल्या.

 

 

महिने सरत गेले. सुमेधाचा लहान सहान गोष्टीवरून मीनाताईवर राग काढण्याची सवय वाढतच होती. सारंगसमोर ती जरा बरी वागायची. पण त्याच्या पाठीमागे मात्र अशीच वागत होती.

 

मीनाताई मात्र प्रत्येक कटू शब्द गिळून शांत राहिल्या. एक दिवस तर सुमेधाने कपडे घडी करताना म्हटलं,

 

“आई, माझ्या साड्या नीट कपाटात जरा नीट करून ठेवता का. दुपारी तुम्हाला तसेही काही काम नसते.”

 

मीनाताईंना तिचे बोलणे ऐकून वाईट वाटले पण तरीही त्या गप्प बसल्या.

 

त्या रात्री सारंग आईजवळ बसला.

 

“आई… सुमेधाच्या अशा बोलण्याचं तुला वाईट वाटतं ना. तू सगळं सहन का करतेस?”

 

मीनाताई हलकेच हसल्या.

 

“प्रत्येक आईला मुलाच्या संसारात आनंद हवा असतो. तुला संसारात मदत करायला म्हणुनच ती नोकरी करत आहे ना. मग तिची चिडचिड होते कधी कधी. मी थोडं सहन केल्याने घरातील वातावरण बिघडणार नसेल तर काय हरकत आहे तिचं ऐकून घ्यायला. आणि मनाने काही वाईट नाही ती. फक्त तोंडाने फटकळ आहे जरा.” आईचे बोलणे ऐकून सारंग पुढे काहीच बोलला नाही.

 

 

काही दिवसांनी सुमेधा आनंदाने घरी आली.

 

“सारंग, एक आनंदाची बातमी आहे.”

 

“काय?” सारंगने विचारले.

 

“माझी मावसबहीण पूजा पंधरा दिवसांसाठी इथे राहायला येतेय.” सुमेधा म्हणाली.

 

“अच्छा!” सारंग म्हणाला.

 

मग सुमेधा थेट मीनाताईंसमोर गेली.

 

“आई, दोन दिवसांत तुम्ही तुमची खोली रिकामी करून द्या.”

 

हे ऐकून सारंग आणि मीनाताई एकदमच आश्चर्यचकित झाले. काहीही न कळल्यासारखे मीनाताईंनी विचारले.

 

” खोली रिकामी कशाला ?”

 

” अहो आई माझी मावसबहिण येत आहे ना. मग ती कुठे राहील. आणि पाहुणीला असं हॉलमध्ये झोपवणं बरं दिसत नाही. त्यापेक्षा तुम्ही काही दिवस हॉलमध्ये झोपा.” सुमेधा म्हणाली.

 

” अगं पण…”

 

मीनाताई काही म्हणणार त्या आधीच सुमेधा म्हणाली.

 

” मी

एवढी घरासाठी राब राब राबते. तरीही माझ्या शब्दाला काहीच महत्व नाही का या घरात. अन् तुम्हाला मी एकदा सांगितलेलं कळत का नाही.”

क्रमशः

पुढील भाग इथे वाचा 👇

मायाळू सासू आणि अहंकारी सून – भाग २ (अंतिम भाग)

Leave a Comment