“अगं तू काय बोलते आहेस… रविचं बाळ आहे ते… तुझं सुद्धा कोणीतरी आहेच ना…तुला तर आनंदच व्हायला हवा की तुझ्या भावाची निशाणी आपल्यासोबत आहे…अन् ते बाळ अजुन या जगात सुद्धा आले नाही आणि तू अशी बोलतेस…” रवीची आई म्हणाली.
“अगं काही खोटं बोलत नाही आहे मी… ही त्या बाळाचा फायदा घेऊन आपल्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागेल… हीचा प्लॅन आहे तो… नाहीतर चुपचाप माहेरी निघून गेली असती ही…”
“ते काहीही असो… पण हे रवीचं बाळ आहे… आणि मला जितके तुझे मुलं प्रिय आहेत तितकेच माझ्या रवीचे बाळ सुद्धा प्रिय आहे…” आई म्हणाली.
“हे बघ आई… तू इमोशनल होत आहेस… रवी आता या जगात नाही आहे हे सत्य तू स्वीकारायला हवेस… मग आता तोच नाही तर या मुलाचा काय उपयोग…? रेवा म्हणाली.
“बस कर रेवा… आता यापुढे मी काहीही ऐकुन घेणार नाहीस… स्वतःच्या भावाबद्दल जराही माया नाही तुझ्या मनात… अशी कशी ग तू… मी कधी विचार केला नव्हता की तू असेही काही बोलशील…” तिची आई म्हणाली.
यावर रेवा काही बोलणार इतक्यात तिचे बाबा आले आणि तिला म्हणाले.
“बस कर रेवा… आता वाद नकोस घालू… तुझी आई योग्य बोलत आहे…”
बाबांनी सुद्धा असे म्हटल्यावर रेवाला आणखीनच राग आला. पण तिच्या आईला आणि सुजाताला मात्र त्यांनी आपल्या बाजूने बोलल्याने बरे वाटले. रेवा तिथून बाहेर जायला लागली. रेवाच्या मागे तिचे बाबा सुद्धा बाहेर जायला लागले. सुजाता भावनिक होऊन तिच्या सासूबाईंना म्हणाली.
“थँक्यू आई… तुम्ही माझ्या बाळासाठी ताईंच्या विरोधात गेलात… तुमचे खूप मोठे उपकार झालेत आई… काहीही झालं तरी मला माझ्या बाळाला जन्म द्यायचा आहे… पण मला पैशांची किंवा इस्टेटीची हाव आहे म्हणून नाही… तर फक्त मला आई व्हायचं आहे म्हणून… मला सुद्धा आईपण अनुभवायचं आहे… माझ्या बाळाला अंगाखांद्यावर खेळवायचं आहे… ”
बोलता बोलता सुजाताच्या डोक्यात अश्रू आले. ते पाहून तिची सासू तिला म्हणाली.
“मलाही कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते… मी तुझ्याशी कितीही कठोर वागले असले तरी मी सुद्धा एक बाई आहे, एक आई आहे… आईपण काय असतं ते जाणून आहे… तुझ्या डोळ्यात पाहून मला सगळं कळतं… तू आई होणार हे कळल्यापासून तुझ्या डोळ्यातून मातृत्व ओसंडून वाहत आहे हे दिसतं मला… मी खूप वाईट अन् कठोर वागले तुझ्याशी… तुझी फसवणूक केली, तुझा वापर करून घेतला, अक्षरशः छळ केला ग तुझा… अन् मला त्या प्रत्येक गोष्टीचा पश्चात्ताप होतोय… आपण असे कसे काय वागलो ह्याचा अंदाजच येत नाहीय… हे सगळं वागताना एकदाही माझ्यातली बाई जागी का नाही झाली हेच कळत नाहीय ग… सगळं आठवून मलाच माझी लाज वाटत आहे..”. बोलता बोलता सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. सुजाता ने त्यांना आधार देऊन सोफ्यावर बसवले. त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली. त्यांना पाणी देत म्हणाली.
“आई… आता झाल्या गेल्या गोष्टी अजिबात आठवू नका… स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका… तुम्हाला असे हतबल झालेलं माझ्या च्याने पाहवल्या जात नाही आहे… आपण सगळं विसरून जाऊयात…” सुजाता म्हणाली.
सासुबाई पाणी प्यायल्या. सुजाताकडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाल्या.
“नाही सुजाता… आज मला माझ्या सगळ्या चुकांची जाणीव झालीच आहे तर सगळं काही कबूल करायला हवं… मनात साचलेलं सगळं काही आज मोकळं होऊ दे…”
मग आणखी एक दीर्घ श्वास घेत त्या म्हणाल्या.
“सगळं काही सुरळीत सुरू होतं… रवीच्या बाबांचा व्यवसाय चांगला सुरू होता… पदरी दोन मुलं… अगदी सुखाचा संसार होता… मुलं कधी मोठी झाली काही कळलंच नाही… घरी सगळचं उपलब्ध होतं… मुलांना सगळं काही अगदी सहज मिळायचं…
कधीच कुठल्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला नाही… हौसमौज पूर्ण व्हावी म्हणून त्यांना हवं ते दिलं… त्यांच्या लहानमोठ्या चुका पदरात घातल्या… अन् इथेच सगळं चुकत गेलं… आधी अभ्यासात हुशार असणारा रवी चुकीच्या संगतीत गेला… अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं…
म्हणून शिक्षणात मागे पडला… आधी फक्त बाहेरच दारू प्यायचा… मग घरात दारू प्यायला लागला… त्याला आम्ही बोललो… ओरडलो… पण तेवढ्यापुरतेच… कायमस्वरूपी त्याची दारू सोडविण्याचे काही विशेष प्रयत्न नाही केले आम्ही… त्याच्याबद्दल बाहेरून खूप तक्रारी यायच्या…
त्याच्या चुका दुरुस्त करण्याऐवजी आम्ही त्या लपवायला लागलो… मग रवीची सुद्धा हिम्मत वाढली… अन् त्याचे दारूचे व्यसन सुद्धा… मग त्याच्या बाबांनी त्यांच्या व्यवसायात त्याला सेटल करायचे ठरवले… पण तो तिथे सुद्धा रमला नाही… मुळात त्याच्या व्यसनाने त्याला काहीच सुचत नव्हते…
मग त्याला दुकान टाकून दिले… तिथे त्याच्या हाताखाली नोकर कामाला ठेवले… पण त्याने दुकानाला दारूचा अड्डा बनवला… दिवसभर मित्रांसोबत दुकानात पडून राहायचा… रात्री सुद्धा जेवण तिथेच मागवायचा… मग आम्हाला त्याच्या व्यसनाचे गांभीर्य कळले… मग आमच्या परीने आम्ही त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला…
अनेक डॉक्टरांना भेटलो… कुठल्या कुठल्या डॉक्टरांकडून औषधे घेऊन त्याच्या नकळत जेवणात मिसळून दिल्या… पण काहीच उपयोग झाला नाही… आणि तोवर फार उशीर झाला होता… रवी खूप मुजोर झाला होता… त्याने आमचे काहीच ऐकले नाही… मग आम्ही सुद्धा हार मानली… त्याला त्याच्या व्यसनासहित स्वीकारले…
तोवर त्याच्यासाठी स्थळे पाहायला सुद्धा सुरुवात केली होती… रविसाठी आम्हाला आमच्या तोलामोलाचे स्थळ हवे होते… आम्ही कितीही लपवले तरी पण त्याच्या व्यसनाची माहिती एव्हाना सगळीकडे पसरली होती… त्यामुळे त्याचे लग्न सुद्धा जुळत नव्हते..लोकांना वाटायचे की ह्याला दारूचे व्यसन असताना ह्याला मुलगी कशी काय द्यावी…
पण आम्हाला मात्र लोकांचे खूप नवल वाटायचे… आमच्या मते आजकाल दारू तर सगळेच पितात…फक्त आमचा मुलगा जरा जात पितो… पण त्याला कशाची कमी आहे… आम्ही एवढी इस्टेट त्याच्यासाठीच तर कमवून ठेवली आहे… मग आम्ही सुद्धा आणखी स्थळे पहायचो… अशातच बराच काळ गेला…
मग मनात विचार आला की श्रीमंत घरातील मुलगीच कशाला हवी… आपल्या जवळ कशाची कमतरता आहे… एखाद्या कमी श्रीमंत घरातील मुलगी सुद्धा चालेल लग्नाला… मग आम्ही आमच्या वधू संशोधनाचा मोर्चा तिकडे वळवला… पण अचानक रवीची तब्येत खूपच खराब झाली…
अगदी त्याला हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागले… आणि मग डॉक्टरांनी सांगितले की दारूमुळे त्याच्या शरीरातील अवयव हळूहळू कमजोर होत आहेत… त्याने दारू सोडली नाही तर त्याचे काही खरे नाही… तो काही दिवसांनी दवाखान्यातून घरी आला पण आम्ही मात्र हतबल झालो होतो…
मग अनेक लोकांनी अनेक उपाय सांगितले… त्यात सगळ्यात जास्त सांगण्यात येणारा उपाय म्हणजे मुलाचे लग्न करून द्या… लग्न झाल्यावर तो सुधारेल… त्याची बायको सुधारेल त्याला… मग आम्हाला सुद्धा वाटले की एकदा संसार सुरू झाल्यावर तो सुधारेल… आणि नाहीच सुधारला तर त्याची बायको सांभाळत बसेल त्याला आयुष्यभर…
पण एखाद्या श्रीमंत घरातील मुलगी ह्या लग्नासाठी कधीच तयार झाली नसती… मग आम्ही गरीब घरातल्या मुली शोधायला लागलो… अन् मग अशातच एकदा शालू ताईंकडे विषय काढला तेव्हा त्यांनी नंदिनी बद्दल सांगितले… त्यांना सगळं काही माहिती असल्यावर सुद्धा त्या नंदिनी च्या स्थळावर ठाम होत्या…
त्यांचा भाऊ त्यांच्या मर्जीतला आहे हे सांगितल्यावर आम्ही सुद्धा निश्चिंत झालो… आम्ही रवीच्या शिक्षणाबद्दल, नोकरी बद्दल त्यांना खोटे सांगितले…” रवीची आई म्हणाली.



