चिंतामण काकांना नुकताच हार्ट अटॅक येऊन गेला होता. ते कालच हॉस्पिटल मधून घरी आले होते. चिंतामण काका एव्हाना बरेच थकलेले वाटत होते. तसे काका फक्त पंचावन्न वर्षांचे होते पण रमाकाकू गेल्यापासून त्यांच्या तब्येतीची जरा हेळसांड झाली.
त्यांना सुजय आणि सानिका अशी दोन मुले. दोघांचीही लग्न झालेली. सुजयचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्याने आपल्या बायकोसोबत त्याच शहरात वेगळा संसार थाटला.
सानिकाचे सासर आणि माहेर जवळच असल्याने तिचे सतत तिच्या माहेरी येणे व्हायचे. ती तिला शक्य त्या सर्व पद्धतीने आई वडिलांची सेवा करायची. पण तिच्यावर तिच्या सासरचीही जबाबदारी असल्याने ती पूर्णपणे आई वडिलांना वेळ देऊ शकत नव्हती.
मात्र दोन वर्षांपूर्वी हलक्याशा आजाराने रमाकाकू गेल्या आणि तेव्हापासून चिंतामण काका एकाकी झाले. आई गेल्यावर सुजय पंधरा दिवस त्याच्या बायकोसोबत घरी राहून गेला. जाताना त्याने एका शब्दानेही त्याच्या वडिलांना आमच्यासोबत चला किंवा आम्ही इथे राहायला येतो असे म्हटले नाही.
सानिका मात्र चिंतामण काकांना विनवत होती तिच्या सोबत तिच्या घरी राहायला चला म्हणून. पण चिंतामण काका तिला नाही म्हणाले. ते म्हणाले की ह्या घरात तुमच्या आईच्या आठवणी आहेत. त्यामुळे मी इथे एकटा नसेल. शेवटी सनिकाचा देखील नाईलाज झाला.
मग चिंतामण काकांनी त्यांच्या घराचा वरचा मजला भाड्याने द्यायचे एका कुटुंबाला भाड्याने दिला. त्या कुटुंबामध्ये लहान मुले होती. त्या मुलांच्या चिवचिवाटात चिंतामण काकांचा दिवस कसा जायचा हे त्यांना देखील कळत नव्हते. शिवाय मध्ये मध्ये सानिका देखील त्यांच्याकडे यायची.
सुजय मात्र एकच शहरात असून या दोन वर्षात केवळ पाच सहा वेळा आला असेल त्यांच्या भेटीला. चिंतामण काकांना सुरुवातीला आपल्या मुलाकडून फार अपेक्षा होत्या. मात्र सुजयची त्यांच्या प्रती असलेली उदासीनता पाहता त्यांनी हळूहळू याची सवय करून घेतलेली.
ते म्हणतात ना कुणाकडून अपेक्षाच नाही ठेवल्या तर दुःख आपोआप कमी होतं. सानिकाने मात्र तिच्या कर्तव्यात कधीच कसूर केली नाही. सानिकाचा नवरा अनिलसुद्धा स्वतःहून त्यांच्या भेटीला येत राहायचा. असे चिंतामण काकांचे दिवस चांगले चालले होते.
पण त्या दिवशी अचानक काकांना अस्वस्थ वाटायला लागले आणि काका त्यांच्या गॅलरीत खाली कोसळले. सुदैवाने त्यांच्या भाडेकरूचे त्यांच्यावर लक्ष गेले आणि त्यांना वेळेवर दवाखान्यात घेऊन गेले. काका दवाखान्यात असेपर्यंत सुजय रोज दवाखान्यात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायचा. सानिका मात्र रात्रंदिवस त्यांच्याजवळच होती.
काका घरी आल्यावर सानिका आठ दिवस त्यांच्याकडेच राहिली. मग मात्र तिला घरी जावे लागले. एके दिवशी सकाळीच सुजय त्याच्या बायकोसह घरी आला. त्याला अचानक पाहून काकांना नवल वाटले पण त्याहून जास्त आनंद देखील झाला.
त्यांच्या सुनेने किचन मध्ये जाऊन त्यांच्यासाठी चहा करून आणला. काका आणि सुजय एकमेकांशी बोलत होते. इतक्यात चिंतामण काकांनी सुजयला त्याच्या घरी येण्याचे कारण विचारले तेव्हा सुजय म्हणाला.
” बाबा, विषयच तसा होता म्हणून म्हटलं लवकर बोललेले बरे…” सुजय म्हणाला.
” का…काही झालंय का..?” चिंतामण काका काळजीच्या सुरात म्हणाले.
” बाबा, नुकताच तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेलाय…सुदैवाने तुम्ही ठीक आहे म्हणून बरे नाहीतर…” सुजय बोलता बोलता थांबला.
” नाहीतर काय..?” चिंतामण काकांनी विचारले.
” म्हणजे बाबा…वाईट नका वाटून घेऊ…पण आपली गावीसुद्धा बरीच संपत्ती आहे आणि इथेसुद्धा तुमचे दोन प्लॉट आहेत… शिवाय बरेच बँक बॅलेन्स आहे…” सुजय म्हणाला.
” मग..?” चिंतामण काका प्रश्नार्थक नजरेने सुजयकडे पाहत म्हणाले.
” तुम्ही वेळीच सर्व संपत्ती आमच्या नावाने केलेली बरी…नाहीतर आजकाल संपत्तीचा वाद वर्षानुवर्षे चालतो…म्हणजे उद्या सानिकाने सुद्धा तिचा वाटा मागितला तर उगाच वाद होईल…” सुजय म्हणाला.
” पण माझ्या संपत्तीवर जितका अधिकार तुझा आहे तितकाच सानिकाचा सुद्धा आहे…” चिंतामण काका म्हणाले.
” पण बाबा…तसे पाहिल्यास संपत्तीचा खरं वारस हा मुलगाच असतो…शिवाय तुम्ही सानिकाच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी बराच खर्च केला..आणि तिचं सासर अगदी संपन्न आहे तरीसुद्धा तिला वाटा कशाला द्यायला हवा…” सुजय म्हणाला.
” बरं झालं तू लवकर बोललास हे सर्व…नाहीतर मला तुझ्या मनातले काही कळलेच नसते…मी गेल्यावर तू सानिकाला माहेरपण देणार नाहीस ह्याची मला कल्पना होती पण ह्या संपत्तीमध्ये तिला वाटा मिळायला नको म्हणून तू प्रयत्न करशील हे मला कधीच वाटले नव्हते…” चिंतामण काका सूजयकडे रागात पहात म्हणाले.
” पण बाबा…”
” काहीच बोलू नकोस…मुलगा असो वा मुलगी मी तुम्हा दोघा बहीण भावांमध्ये कधीच भेदभाव केला नाही…होय, मी सानिकाच्या शिक्षणावर आणि लग्नावर खूप खर्च केला आहे पण तुला सुद्धा मी कधीच कशाची कमी भासू दिली नाही…तुला सुद्धा मी चांगलं शिक्षण दिलं तुझ्या लग्नातसुद्धा पाण्यासारखा पैसा खर्च केला…तुला कशाचीही कमी भासू दिली नाही…पण आता मला वाटतंय…तुझ्यावर संस्कार करताना कमी पडलोय आम्ही…तुला आजही काही कमी नाहीय…तू ज्या घरात तुझा वेगळा संसार थाटला आहेस ते घर सुद्धा मीच घेऊन दिलंय तुला…” काका म्हणाले.
” पण बाबा या सर्वांवर माझा देखील अधिकार आहे ना…” सुजय चाचरत म्हणाला.
” अधिकार फक्त आईवडिलांच्या संपत्तीवर मागायचा नसतो…तर कर्तव्यापूर्ती सुद्धा त्याच अधिकाराने करावी लागते…तू तुझ्या बायकोसोबत वेगळं राहायला लागला तेव्हा तुला तुझ्या आईवडिलांची आठवण आली नाही…या वयात मी आणि तुझी आई एकटे कसे राहणार ह्याचा तू अजिबात विचार केला नाहीस…पण सानिकाने मात्र आम्हाला मुलाची कमतरता भासू दिली नाही…ती प्रत्येक परिस्थितीत आमच्या सोबत खंबीरपणे उभी होती…काहीही अपेक्षा न ठेवता…त्यामुळे तसे पाहता माझ्या सर्व संपत्तीवर तिनेच अधिकार सांगायला हवा…पण नाही…तिने कधी हा विषय मनात देखील आणला नसेल…
आजारी वडिलांची विचारपूस करायची सोडून तुला मात्र वडिलांच्या संपत्तीच्या वाटणीची काळजी पडली आहे…मला माझ्या संपत्तीची वाटणी कशी करायची आहे ते ठरवायला माझा मी समर्थ आहे…मला तुझ्या मदतीची काहीही गरज नाही…ना मला कसल्या अपेक्षा आहेत तुझ्याकडून…तरीही मी संपत्तीचा ठराविक हिस्सा नक्कीच देईल तुला…कारण मला माझ्या कर्तव्यात कसूर ठेवायची नाही…पण या संपत्तीवर सानिकाचा अधिकार सर्वात जास्त आहे हे कधीही विसरू नकोस…आणि तू आता जाऊ शकतोस…” चिंतामण काका रागाने म्हणाले.
सुजय खाली मान घालून त्याच्या बायकोसोबत तसाच निघून गेला. आणि चिंतामण काका मात्र विचारत पडले. सुजय आणि सानिका ही दोन्ही माझीच मुले असूनदेखील दोघांमध्ये किती विरोधाभास ह्याचे त्यांनाच नवल वाटले.
समाप्त.
photo credit- pixel
©® आरती निलेश खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला लाईक करा.
खरे तर असे उदाहरण पाहून मन खट्टू होते व विचार येतो की संस्कार कमी पडतात दुसर काय नाहीतर दोघांना सर्व समान सुखसुविधा दिल्यानंतर असे विचार मनात येतात कसे?
असो .अपेक्षा कमी ठेवणे एवढेच आपल्या हातात