सुविधा लग्न करून इनामदारांच्या घरी सून बनून आली आणि तिने हळूहळू सर्वांची मने जिंकायला सुरुवात केली. सुविधा स्वयंपाकात हुशार होती. बोलण्यात मधुर होती. सर्वांना आपलेसे करण्याची जादू होती तिच्या बोलण्यात. फक्त थोडासा बालिशपणा होता.
घरात सासू, सासरे, तिचा नवरा सुयश आणि ती असे चार जण. नणंद दिव्या विवाहित होती आणि तिचे सासर अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर होते. त्यामुळे नणंद बरेचदा माहेरीच असायची. सोबत नवीनच आलेल्या वहिनीसोबत तिचं छान गुळपिठ जमलं होतं. .
दोघी नणंद भावजय सोबतच फिरायला जात असत. कधी मंदिरात, कधी शॉपिंगला, कधी सहज काहीतरी खायला बाहेर जायचं म्हणून एकमेकींना सोबत करत. दोघींची छान मैत्री जमली होती. सुयश तर नेहमीच सुविधाला चिडवायचा की माझ्यापेक्षा दिव्याशी छान जमतंय तुझं. सर्वकाही छान सुरू होतं. .
एके दिवशी सुविधा आणि दिव्या दोघीही शॉपिंग साठी बाहेर पडल्या. दोघीही एका साडीच्या दुकानात गेल्या. तिथे दिव्याने बऱ्याच साड्या बघितल्या पण तिला एकही साडी आवडेचना. सुविधाने मात्र स्वतःसाठी तिथूनच एक साडी पसंत केली. सुविधाने पसंत केलेली साडी दिव्याला सुद्धा आवडली. ती म्हणाली..
” वहिनी…तुला काही हरकत नसेल तर ही साडी मी ठेवून घेऊ का..?”
” अगं…त्यामध्ये विचारायचं काय…ठेव तुला आवडली असेल तर…”
असे म्हणून सुविधाने ती साडी दिव्याकडे दिली आणि स्वतःसाठी पुन्हा दुसरी साडी बघायला लागली. थोडा वेळ साड्या पाहिल्यानंतर सुविधाने दुसरी एक साडी तिच्यासाठी पसंत केली. पण सुविधाने पसंत केलेली दुसरी साडी पाहून दिव्याला ती साडी पहिल्या साडीपेक्षा जास्त आवडली. ती सुविधाला म्हणाली,
” वहिनी…तू आधी पसंत केलेली साडी तू ठेव आणि मला ही दुसरी साडी दे…”
” ठीक आहे…मला चालेल..” असे म्हणत सुविधा ने ती साडी दीव्याकडे देऊन तिला आधी दिलेली साडी परत घेतली.
आता मात्र दिव्या पुरती गोंधळली होती. ही साडी घेऊ की ती साडी घेऊ हे तिला कळत नव्हते. शेवटी तिने त्या दोन्ही साड्यांचे फोटो तिच्या नवऱ्याला फोन वरून पाठवले. पण बराच वेळ झाला तरीही नवऱ्याचा रिप्लाय आला नाही म्हणून ती सुविधाला म्हणाली.
” वहिनी…माझं काही ठरत नाही आहे बघ…मी आताच नाही घेत साडी…नंतर कधीतरी घेईल…”
“ठीक आहे…तुम्हाला घ्यायची नसेल तर मग मी ही तुम्हाला पसंत असलेली साडी घेतली तर चालेल ना..”
” हो…हो…चालेल ना…” दिव्या कसनुस हसत म्हणाली.
पण मनातून मात्र तिला या गोष्टीचा राग आला. तिच्या मते ती साडी मी घेत नाहीय तर वहिनीने सुद्धा नको घ्यायला. पण सुविधाच्या लक्षात मात्र हे आले नाही.
शॉपिंग संपवून दिव्या आणि सुविधा घरी परत आल्या पण दिव्या सुविधा सोबत घरी येईपर्यंत जास्त काही बोलली नाही. फक्त हो ला हो आणि नाही ला नाही इतकंच बोलायची. घरी आल्यावर सुविधाने उत्साहाने सासूबाईंना साडी दाखवली. दिव्याचा चेहरा मात्र उतरलेलाच होता. मात्र उत्साहाच्या भरात सुविधाचे दिव्या कडे लक्ष गेले नाही. संध्याकाळी दिव्या तिच्या घरी परत गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून सुविधाने तिच्या सासूबाईंना चहा दिला. पण त्या सुविधाशी रोजच्या सारखे हसून बोलल्या नाहीत. त्यानंतर दिवसभरात सुविधाने सासूबाईंच्या बोलण्यावरून त्या तिच्यावर रागावल्या आहेत ह्याचा अंदाज आला होता. पण त्या नेमके कशावरून रागाव ल्या आहेत हे मात्र कळत नव्हते. दिव्या ने सुद्धा दिवसभरात तिला एकही कॉल वा मेसेज केला नव्हता. शेवटी न राहवून सुविधा ने सासूबाईंना विचारलेच..
” आई…काही झालंय का… माझं काही चुकलं का..?”
” तुझं काय चुकणार आहे…तुला असं का वाटतंय…?
” तुम्ही दिवसभरात माझ्याशी नेहमीसारखं बोललाच नाहीत…आणि दिव्या ताईंनी पण सकाळपासून कॉल नाही केला.” सुविधा म्हणाली.
” हो…कारण तू असे करायला नको होते..”
” मी काही केलंय का आई..?”
” अगं काल दिव्या ला आवडलेली साडी तू स्वतःसाठी घेतलीस…तिला किती वाईट वाटले…तू तुझ्यासाठी एखादी दुसरी साडी घ्यायला हवी होती…आणि ती दिव्या ला घेऊ द्यायची असतीस..” सासूबाईंनी शेवटी त्यांच्या रागाचे कारण सांगितलेच. हे ऐकुन सुविधा ला नवल वाटले. कारण नणंद बाईंना विचारूनच तिने ती साडी खरेदी केली होती. दिव्या तिथे कन्फ्युज होती आणि नंतर तिला त्या दोन साड्यांपैकी एकही साडी घ्यायची नव्हती म्हणूनच तर तिने ती साडी घेतलेली.
झालेल्या प्रकारात सुविधाची चूक नव्हती. दिव्याचा गैरसमज झाला होता पण हे सासूबाईंना सांगितले तर सासुबाई तिच्यावरच चिडतील. म्हणून सुविधा सासुबाईंसमोर काहीच बोलली नाही. पण आता सासुबाई आणि नणंदबाई दोघीही सुविधावर नाराज असल्याने त्यांची समजूत काढणे गरजेचे होते.
दिव्याची समजूत कशी काढावी या विचाराने सुविधाला जरा टेन्शन आले होते. तिने बराच विचार केल्यावर तिला एक उपाय सुचला. दहा दिवसांनी दिव्याचा वाढदिवस होता. तोपर्यंत सुविधा आणि दिव्याचे फार काही बोलणे झाले नाहीत. सासुबाई सुद्धा कमीच बोलत होत्या.
वाढदिवसाच्या दिवशी घरातील सर्वजण दिव्याच्या घरी गेले होते. सर्वांनी दिव्यासाठी छान छान गिफ्ट घेतली होती. सुविधा ने सुद्धा दिव्या साठी गिफ्ट आणले होते. वाढदिवसाचा केक कापून झाल्यावर सर्वांनी तिच्यासाठी आणलेले गिफ्ट तिला दिले. सुविधाने सुद्धा दिव्या ला गिफ्ट दिले आणि उघडून पाहायला सांगितले.
” नंतर बघेन ना वहिनी गिफ्ट उघडून…” दिव्या म्हणाली.
” तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे आताच बघा ना..” सुविधा ने असे म्हटल्यावर दिव्याने तिने दिलेले गिफ्ट उघडून बघितले तर आतमध्ये त्या दिवशी घेतलेली साडी होती. साडी बघून दिव्या तिच्या वहिनीला म्हणाली.
” काय ग वहिनी…ही साडी तर तू तुझ्यासाठी घेतली होतीस ना…”
” नाही हो ताई… तुमच्या साठीच घेतली होती ही साडी मी…तुमचा वाढदिवस जवळ आला होता पण तुम्हाला गिफ्ट काय द्यावं हे कळत नव्हतं…ही साडी त्या दिवशी तुम्हाला आवडली होती पण तुम्ही घेतली नाही…मग मी माझ्यासाठी म्हणूनच घेतली…म्हटलं वाढदिवसाला तुम्हाला हीच साडी द्यावी..कारण मला तुम्हाला सरप्राइज द्यायचे होते…तुम्हाला आवडलं ना माझं गिफ्ट…” सुविधा म्हणाली.
हे ऐकुन नणंद बाईंची कळी फारच खुलली. ती सुविधाला म्हणाली.
” अग वहिनी…ह्याची काय गरज होती ग…तशी काही फारशी आवडली नव्हती मला…पण तू इतक्या प्रेमाने देत आहेस तर मी नक्की घालेन…”
सासूबाईंना सुद्धा खूप आनंद झाला. सासूबाईंना वाटले आपण उगाच सुविधा वर रागावलो. सुविधा वर असणारा दोघींचा राग अगदी क्षणार्धात दूर झाला. वातावरण अगदी आनंदमय झाले.
त्या दिवशी नंतर दिव्या आणि सुविधा पुन्हा जुन्या मैत्रिणी सारख्या वागायला लागल्यात. सुविधा ने अनोखी शक्कल लढवून झालेला प्रसंग सावरून घेतला. आणि पुढे नात्यांमध्ये होणार गोंधळ व्हायचा थांबला. पण सासरची नाती सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत आहे हे मात्र सुविधा चांगल्या प्रकारे समजली.
समाप्त.
©®आरती लोडम खरबडकर.
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करा.
छान कथा सुविधाने खूप संयमाने अनोखीपणे सर्व खूप छान सांभाळलं, कधीकधी अशी माघार घेणं nati टिकवून घेण्यासाठी खूप गरजेच असतं👍