“हे खोटं आहे…अभिजीतअसे वागू शकत नाहीत…” ती ओक्साबोक्शी रडत म्हणाली.
“नाही… नाही…असं होऊ शकत…”
ती वेड्यासारखी डोकं हलवत म्हणत होती.
शालिनीताईंनी सुद्धा डोळ्यांना पदर लावला. गणपतराव तर डोक्यावर हात देऊन सुन्न बसले. नेमके काय बोलावे हे कळत नसल्याने सुजित पुढे म्हणाला.
” आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की काकू असे काहीतरी करेन…त्यांनी प्रतीक्षा वहिनींना मूल होऊ शकत नाही असे म्हणून अभिजीतला तयार केले. अभिजीतने सुद्धा वहिनींचा विचार न करता असे टोकाचे पाऊल उचलले. कुण्या नातेवाईकांनी एक मुलगी सुचवली होती. त्या मुलीला सुद्धा प्रतीक्षा वहिनींबद्दल सगळ माहिती आहे पण फक्त ह्यांची संपत्ती पाहून ती या लग्नाला तयार झाली.”
हे ऐकून प्रतीक्षा पूर्णपणे कोसळली.
ती एकटी खोलीत जाऊन बसली. आणि दरवाजा आतून लावून घ्या.
कपाटातला लग्नाचा फोटो काढला. त्या फोटोमध्ये अभिजीत हसत होता.
“हे सगळं खोटं होतं का? कोणी एवढं कसं बदलू शकतं ?” ती फोटोला विचारत होती.
तिच्या डोळ्यांत राग नव्हता. फक्त असह्य वेदना होत्या. शालिनीताई बाहेर उभ्या राहून रडत होत्या. तिला बाहेर ये म्हणून मनवत होत्या. ती आतूनच आईला म्हणाली.
” आई…घाबरू नको…मी काही वाईट साईट करणार नाही…फक्त मला थोडा वेळ एकटं राहू दे…”
“देवा… माझ्या मुलीचंच आयुष्य का?” हा प्रश्न शालिनीताई सतत देवाला विचारत होत्या.
गणपतराव शांत बसले होते. त्यांच्या डोळ्यांत अपमान आणि असहाय्यता होती. गरीब माणसाकडे दुःख गिळण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
संध्याकाळ होताच प्रतीक्षाने अचानक डोळे पुसले. ती उठली.
“आई, बाबा…मी सासरी जाणार. मला त्यांना भेटायचं आहे..”
शालिनीताई हे ऐकून दचकल्या.
“आता कशाला?” त्यांनी विचारले.
“मला अभिजीतच्या तोंडून ऐकायचंय की त्यांनी दुसर लग्न केलंय. आणि मी त्यांना नकोय म्हणून. मला त्यांना विचारायचं आहे की त्यांनी असे का केले म्हणून..” प्रतीक्षा म्हणाली.
“ राहूदे पोरी…बाबा दोन- चार जणांना घेऊन जातील त्यांच्याकडे… अन् बोलणी करतील त्यांच्याशी.”
“आई, तो माझा नवरा आहे. मला त्यांना जाब विचारायचा आहे.”
तिच्या आवाजात अजूनही थोडी आशा होती.
गणपतरावांनी तिच्याकडे पाहिलं. त्यांना माहित होतं. ही मुलगी उत्तर मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि उत्तर मिळणं हा तिचा अधिकार होता.
तिला सासरच्या घरी पोहचेपर्यंत रात्र झाली होती. प्रतीक्षा धावतच देशमुखांच्या बंगल्यासमोर पोहोचली. घरात दिवे लागले होते. अंगणात काही गाड्या उभ्या होत्या. तिचं हृदय जोराने धडधडत होतं.
ती दारापाशी गेली. थरथरत्या हातांनी बेल वाजवली. एकदा. दोनदा. तीसऱ्यांदा. आत हालचाल झाली. तिच्या चेहऱ्यावर आशेची एक किरण चमकली. दार उघडेल… अभिजीत समोर येईल…आणि म्हणेल की
“हे सगळं गैरसमज आहे. मी दुसर लग्न केलेलं नाही.”
पण दार उघडलं नाही. प्रतीक्षाने दार ठोठावायला सुरुवात केली.
“अभिजीत!” तिचा आवाज फुटत होता.
“दार उघड… मला तुमच्याशी बोलायचंय!”
काही क्षणांनी आतून वनमालाबाईंचा आवाज आला.
“इथून निघून जा. ही दारउघडणार नाही. या घराचे दरवाजे तुझ्यासाठीकायमचे बंद झालेत.
”
प्रतीक्षा थरथरली.
“आई… मला फक्त बोलायचंय.”
“आमचा तुझ्याशी काही संबंध नाही.” आतून पुन्हा वनमाला बाई म्हणाल्या.
हे शब्द तिच्या छातीत खंजीरासारखे घुसले. ती चिडून म्हणाली.
“आई, मी अशी काय चूक केली? तुम्ही का असे वागलात माझ्याशी.”
“आमच्या मुलाचं आयुष्य खराब केलंस. अजून वर विचारतेस की काय चूक केली.” वनमालाबाई आतून कडाडल्या.
“मी…? मी आयुष्य खराब केलं त्याचं…मी तर किती प्रेम केलं त्यांच्यावर…”
ती रडत म्हणाली.
आता मात्र आतून उत्तर आलं नाही.
अचानक आतून अभिजीतचा आवाज ऐकू आला.
“आई, तिला जाऊ दे. कशाला नादी लागतेस तिच्या. थोडा वेळ बडबड करेल आणि निघून जाईल..”
तो आवाज ऐकताच प्रतीक्षाच्या डोळ्यांत आशा चमकली. ती दाराला टेकून रडू लागली.
“एकदा माझ्याशी बोला ना… मी तुमची बायको आहे…”
आत काही क्षण शांतता होती. मग त्याचा थंड आवाज आला—
“आता आपल्यात काही उरलेलं नाही. तू इथून निघून जा.”
हे ऐकून प्रतीक्षा स्तब्ध झाली.
“अभिजीत…तुम्ही असे काय बोलताय…?”
हे ऐकताच तिचं जग संपलं. ती दाराशीच खाली बसली.
“माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे… माझ्यासोबत असा अन्याय करू नका…” तिच्या आवाजात आर्जव होते.
पण आतून कोणतंच उत्तर आलं नाही.
अचानक पाऊस सुरू झाला. मोठमोठे थेंब तिच्यावर कोसळत होते. ती पूर्ण भिजली होती. पण ती उठली नाही. ती दाराशी बसून रडत होती.
पण आतल्या लोकांचं मन दगड झालं होतं. शेजारचे लोक खिडक्यांतून बघत होते. कुणालाही तिची दया आली नाही. अचानक वरच्या खिडकीत एक चेहरा दिसला. एक तरुण मुलगी. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं.
ती निर्दयीपणे प्रतीक्षाकडे बघत होती.
जणू या घरात तिची जागा बळकावण्याला ती स्वतःचा विजय समजत होती. अभिजीत फक्त आपलाच आहे ह्याचा गर्व तिच्या डोळ्यात दिसत होता. ही अभिजीतची दुसरी बायको असेल हे ओळखायला प्रतीक्षाला वेळ लागला नाही. तिला पाहून प्रतीक्षाच्या पायाखालची जमीन सरकली.
तिच्या डोळ्यांतून अश्रू धबधब्यासारखे वाहू लागले. आता ती समजून गेली. सगळं खरं होतं. अभिजीतने खरंच दुसरं लग्न केलं होतं.
ती त्याच्या दारातून उठायचा प्रयत्न करू लागली. पण तिच्या पायात ताकद नव्हती. तिचं डोकं गरगरत होतं. पण कधीतरी हिंमत करत ती आपल्या माहेरी परतली. त्या रात्री प्रतीक्षा झोपली नाही. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं.
एक लहान मुलगी तिच्या आईचा हात धरून चालत होती. लहान बाळ बघून प्रतीक्षाच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं. “मी आई होऊ शकले नाही म्हणून त्याने मला सोडलं…” हा विचार तिच्या मनात वारंवार येत होता.
तिला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला.
दुसऱ्या दिवशी गणपत काका पहिल्यांदा रागाने पेटलेले दिसले.
“मी त्या लोकांना सोडणार नाही. आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांनी!””ते म्हणाले.
पण शालिनीताई घाबरल्या त्या म्हणाल्या.
.
“ते लोक मोठे आहेत. त्यांचे काय वाईट करू शकणार आपण. आणि आपल्या म्हणण्यावर ते प्रतीक्षा घरी घेऊन गेले तरी तिला चांगलं वागवणार आहेत काय. आणि तिची सवत आधीच त्या घरात येऊन बसली आहे त्याच काय ?”
“मग काय? गरीब माणसाला न्याय नाही का?”
प्रतीक्षा शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. तिच्या मनात एक वेगळाच विचार सुरू होता. ती आरशासमोर उभी राहिली. तिचा चेहरा ओळखू येत नव्हता इतका मलिन झाला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं. ओठ कोरडे. चेहऱ्यावर वेदना.
तिने गळ्यातलं मंगळसूत्र हातात घेतलं. “याचा अर्थ काय उरलाय आता?”तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू आले. पण यावेळी त्या अश्रूंमध्ये फक्त दुःख नव्हतं…एक जळणारी वेदना होती.अन्यायाची.अपमानाची. आणि विश्वासघाताची.
त्या रात्री ती शांतपणे आई-वडिलांसमोर येऊन बसली.
“बाबा…”
“हं पोरी.”
“मला ह्यांच्याविरोधात कोर्टात जायचंय.”
दोघेही दचकले.
“काय?”
“मी त्यांची कायदेशीर बायको आहे. आणि कायद्यासमोर गरीब आणि श्रीमंत सारखेच आहेत. मला विश्वास आहे की मला न्याय नक्की मिळेल.”
तिचा आवाज थरथरत होता, पण डोळ्यांत पहिल्यांदा एक निर्धार दिसत होता. ती पुढे म्हणाली.
“त्याने माझ्यासोबत जे केलं… त्याचा जाब त्याला द्यावा लागेल.”
हे ऐकून गणपत रावांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांना माहिती होतं की कोर्ट कचेरी आपल्या सारख्या सामान्य माणसाचे काम नव्हे. तरीपण प्रतीक्षाला तिच्या हक्कांसाठी लढायचे आहे म्हटल्यावर आईवडील म्हणून दोघांनीही तिची साथ द्यायची ठरवले. त्यांनी मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले.
“तुला कायदेशीर लढाई लढायची आहे ना. मग आम्ही तुझ्यासोबत आहोत पोरी. तू लढ”
हे ऐकून प्रतीक्षाला जरा आधार वाटला. तिचं मन अजूनही अभिजीतच्या विश्वासघाताने घायाळ होतं. ती अजूनही अभिजीतवर प्रेम करत होती. पण त्या प्रेमाच्या राखेतून आता एक नवी प्रतीक्षा जन्म घेत होती—अन्यायाविरुद्ध लढणारी प्रतीक्षा.
क्रमशः