हक्काची सावली – भाग ७ ( हृद्यस्पर्शी मराठी कथा)

 

त्या दिवसानंतर प्रतीक्षाच्या आयुष्यात एक विचित्र शांतता आली होती. पण ती शांतता सुखाची नव्हती. ती होती वादळानंतर उरलेल्या उजाडपणाची. तिला आता वास्तवाची जाणीव व्हायला लागली होती.

 

प्रत्येक सकाळी जाग आली की काही क्षण तिला वाटायचं की“हे सगळं स्वप्न होतं.” पण लगेच वास्तव समोर उभं राहायचं. तिचं तुटलेलं लग्न. हरलेला संसार. आणि आतून रिकामी झालेली ती स्वतः.ह्यातून बाहेर यायला वेळ लागणार होता. पण ती सगळ्यांसमोर नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती.

 

 

 

इकडे प्रतीक्षा मात्र आता खूप कमी बोलू लागली होती. शालिनीताई अनेकदा तिच्याकडे बघत राहायच्या. पूर्वी सतत कामात रमणारी मुलगी आता बराच वेळ खिडकीत बसून राहायची. कधी पावसाकडे बघत.कधी आकाशाकडे. कधी फक्त रिकाम्या नजरेने.

 

 

हळूहळू गावात लोकांचा विषय बदलला. आता कुणी कोर्टाबद्दल बोलत नव्हतं. लोक म्हणत होते.

 

“प्रतीक्षाने हार मानली.”

 

“गरीब माणूस किती लढणार?”

 

काहींना तिची दया वाटत होती. तर काहींना समाधान. पण प्रतीक्षाला आता फरक पडेनासा झाला होता. कारण लोकांच्या शब्दांपेक्षा तिने आयुष्यात मोठ्या जखमा पाहिल्या होत्या.

 

दुसरीकडे अभिजीतचं आयुष्य पूर्वीसारखंच सुरू होतं. त्याचा व्यवसाय वाढत होता. मनालीसोबत तो शहरात फिरताना दिसायचा. प्रतीक्षा आता गावातल्या एका छोट्या शाळेत मुलांना शिकवू लागली. पगार खूप कमी होता. पण त्यामुळे तिचं मन थोडं गुंतू लागलं.

 

लहान मुलं तिच्या भोवती जमा व्हायची. ती त्यांना छान गोष्टी सांगत शिकवायची. मुलांसोबत असताना ती मनापासून हसायची. कधी कधी मुलांकडे पाहताना तिचं मन भरून यायचं.

“माझं मूल असतं तर?” असा विचार मनात यायचा. पण लगेच ती विचार बाजूला सारायची.

 

एका दुपारी गावात अचानक गोंधळ उडाला. रोहन धावत घरी आला.

 

“आई! तुला माहित आहे का काय झालं ते ?”

 

“काय झालं?” आईने जरा साशंकपणे विचारले.

 

“अभिजीतचा मोठा अपघात झाला!” रोहन ने सांगितले.

 

प्रतीक्षाच्या हातातला पाण्याचा ग्लास थरथरला. तिचं हृदय जोराने धडधडू लागलं.

 

“क… काय?”

 

“गाडी ट्रकला धडकली म्हणे.”

 

घरात काही क्षण शांतता पसरली. मग शालिनीताई हळू आवाजात म्हणाल्या,

 

“देवा…त्याला फार जास्त लागलेलं नसावं म्हणजे झालं…”

 

त्याने आपल्यासोबत कितीही हात केलेलं असलं तरी त्याच्या जीवाला काही बरं वाईट व्हावं असं त्यांना अजिबात वाटलं नव्हतं.

 

प्रतीक्षा काही बोलली नाही. पण तिच्या मनात विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. दोन दिवसांनी अधिक माहिती आली. अपघात खूप भीषण होता. अभिजीतचे दोन्ही पाय गेले होते. ही बातमी ऐकून प्रतीक्षाच्या अंगावर काटा आला. तिला काही क्षण काहीच सुचेनासं झालं.

 

तिच्या डोळ्यांसमोर अभिजीतचा चेहरा आला. तोच अभिजीत जो एकेकाळी तिच्यासोबत पावसात धावत होता. आज आयुष्यभरासाठी व्हीलचेअरवर बसणार होता. त्या रात्री तिला झोप लागली नाही.

तिच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता.

 

“हे खरंच कर्माचं फळ आहे का? की फक्त एक दुर्दैवी अपघात ??”

 

अभिजीतचा अपघात झाल्यावर वनमालाबाईंचं आयुष्य अचानक बदललं. पूर्वी आपल्या खुर्चीवर बसून आदेश देणाऱ्या त्या बाई आता रुग्णालयाच्या बाकांवर रडत बसत होत्या. त्यांचा मुलगा पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून झाला होता. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं.

 

“तो पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही.”

 

हे ऐकून त्या जवळ जवळ कोसळल्याच.

 

सुरुवातीला मनाली काही दिवस रुग्णालयात होती. पण हळूहळू तिचा स्वभाव बदलू लागला. ती चिडचिड करू लागली.

 

“मी किती दिवस हे सगळं सांभाळू?”

 

अभिजीत सुद्धा मानसिकरित्या खचला होता. तो आता जास्तवेळ शांत राहायचा. एक दिवस मनाली स्पष्ट म्हणाली,

“ अपघात तुमचा झालाय पण आयुष्य मात्र माझं संपलंय.”

हे ऐकून अभिजीतच्या डोळ्यांत वेदना उमटल्या. कारण आता त्याला पहिल्यांदा प्रतीक्षाची आठवण येत होती. कदाचित तिने या कठीण प्रसंगी थोड्या जास्त आपुलकीने त्याची काळजी घेत होती.

 

काही दिवसांनी अभिजीत हॉस्पिटल मधून घरी आला. पण आता तो पूर्वीसारखा नव्हता. मोठ्या बंगल्यात तो व्हीलचेअरवर बसून राहायचा. त्याला स्वतःच्या खोलीत जायला सुद्धा मदत लागायची. त्याचा अहंकार आता तुटला होता. एक दिवस त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याला पहिल्यांदा जाणवलं की“मी सगळं गमावलं.”

 

 

त्याला स्वतःचा भूतकाळ आठवू लागला. प्रतीक्षाचे अश्रू. तिच्या विनवण्या. दाराबाहेरचा पाऊस. आणि स्वतःचं निर्दयी वागणं. त्या आठवणी आता त्याला जाळत होत्या.

 

इकडे एका सकाळी मनालीने कपाटातून तिचे कपडे काढायला सुरुवात केली. वनमालाबाई दचकल्या. त्या तिला म्हणाल्या.

“काय करतेस? बॅग कशाला भरतेस ?”

 

“मी जातेय हे घर सोडून. मला आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे. मी हे लग्न ह्यासाठी केलं होतं की हे मला आयुष्यभर सुखात ठेवतील. पण एक अपंग नवरा मला कायतरी सुख देऊ शकणार आहे आता.” मनाली अभिजीत कडे तिरस्काराने बघत म्हणाली.

 

“काय?” वनमालाबाई जवळपास ओरडल्याच.

 

“मी आयुष्यभर त्यांची नर्स बनून राहू शकत नाही.”

 

हे ऐकून अभिजीत स्तब्ध झाला.

“मनाली…अगं हे काय बोलत आहेस तू…जेव्हा मी चांगला होतो तेव्हा माझ्या प्रेमाच्या शपथा घ्यायचीस तू. आणि आता जेव्हा माझ्यात हा दोष निर्माण झाला तेव्हा मला सोडून जात आहेस…हेच का तुझं प्रेम ? हाच जा तुझा पत्नीधर्म ?”

 

” हे सगळं तुम्ही न बोललेलेच बरे. तुमच्या पहिल्या बायकोला मूल झालं नाही म्हणून तिला लगेच सोडून दुसरं लग्न करणारे तुम्ही मला पत्नीधर्म शिकवताना बरे दिसत नाही.” ती चिडून म्हणाली,

 

” प्लीज मला सोडून जाऊ नकोस मनाली.” अभिजीत म्हणाला.

 

पण मनालीने उत्तर दिलं नाही. ती निघून गेली. दार बंद झाल्याचा आवाज घरभर घुमला.

 

त्या दिवसानंतर घर पूर्ण बदललं. मोठा बंगला असूनही तिथे उदासी पसरली होती. वनमालाबाई थकून भागून मुलाची काळजी घेत होत्या.

अभिजीत बराच वेळ शांत बसून राहायचा. एक दिवस तो आईला म्हणाला,

 

“आई…”

 

“ बोल बेटा..” वनमालाबाई म्हणाल्या.

 

“आपण प्रतीक्षासोबत खूप चुकीचं केलं ना ग.” अभिजीत म्हणाला.

 

वनमालाबाईंचे डोळे भरून आले. त्यांना पहिल्यांदा स्वतःच्या चुकांची जाणीव झाली होती. अभिजितच्या ह्या अवस्थेला आपण प्रतीक्षावर केलेला अन्याय कारणीभूत आहे हे त्यांना आता समजू लागले होते.

 

गावात ही सगळी बातमी पोहोचली. शेजारणी पुन्हा बोलू लागल्या.

 

“देवाचा न्याय आहे.”

 

“प्रतीक्षेची हाय लागली.”

 

पण प्रतीक्षा मात्र शांत होती. त्या रात्री ती देवासमोर बसली. तिच्या डोळ्यांत पाणी होतं.

“देवा… मला कुणाचं वाईट व्हायला नको होतं. पण आता त्याच्याबद्दल चांगलं किंवा वाईट काहीच वाटत नाही.”

 

असे म्हणून तिने डोळे मिटले. पण तिचं मन अजूनही पूर्ण कठोर झालं नव्हतं. ज्याने तिला एवढा त्रास दिला त्याच्यासाठीही तिच्या मनात कुठेतरी वाईट वाटत होते.

 

क्रमशः

हक्काची सावली – भाग ८ ( हृदयस्पर्शी मराठी कथा)

Leave a Comment