” केदार, मी स्वयंपाक करतेय तोवर जरा बाळाला पाहशील का..?” पल्लवी ने किचनमधून केदार ला आवाज दिला.
” मी जरा महत्त्वाच्या कामात आहे…आणि तसंही मुलांना सांभाळणे बायकांचं काम असतं…” केदार म्हणाला.
” अरे पण मी कामातच आहे ना…हे एवढं झालं की घेतेय त्याला…बघ ना थोडा वेळ…” पल्लवी म्हणाली.
” काय ग…एक रविवार च असतो आराम करायला आणि त्यातही तुझं आपलं सुरू असतं…जरा हे करा…ते करा…” केदारने त्रासिक पणे म्हटले.
” अरे पण एरवी मी सगळं काही मॅनेज करतेच ना… सध्या बाळ लहान आहे म्हणून…” पल्लवी म्हणाली.
” अग दिवसभर घरीच असतेस ना तू…आणि घरी काय काम असतात…माझ्या आईला तर तीन मुले होती…पण तिने कधीच माझ्या बाबांना कुठले काम सांगितले नाही…तुम्हा बायकांना मात्र काहीच जमत नाही…” केदार म्हणाला.
हे ऐकुन पल्लवीला वाईट वाटले. शेवटी तिने हातचे काम सोडून दिले आणि बाळाला घेतले. एव्हाना हे रोजचेच झाले होते. केदार प्रत्येक कामात पल्लवीला त्याच्या आईचे उदाहरण द्यायचा.
तुला कोणतेच काम जमत नाही हे सांगताना तो त्याच्या आईने त्यांना सांभाळताना किती कष्ट घेतले. ते तीन भावंडे असूनही तिने सर्व व्यवस्थित सांभाळले हे उदाहरण द्यायचा.
केदार आणि पल्लवीचे तीन वर्षांपूर्वी झाले होते. केदार आणि पल्लवी नोकरीनिमित्ताने शहरात राहायचे. केदारचे आईबाबा त्याच्या दोन भावांसमवेत गावी राहायचे.
लग्न झाल्यावर दोन वर्षे कशी निघून गेली हे त्यांना कळले देखील नाही. एका वर्षांपूर्वी दोघं कबीरचे आईबाबा झाले.
कबीर आल्यावर मात्र त्याला सांभाळताना एखादेवेळी तिचे एखाद्या कामाकडे दुर्लक्ष व्हायचे. तेव्हा ती केदारला हलके फुलके काम सांगायची. पण केदार मात्र घरी आला की फोन मध्ये बिझी व्हायचा. आणि काहीही काम सांगितले की कंटाळा करायचा आणि माझी आई कशी काम करायची आणि तुला काहीही येत नाही ह्याचा पाढा पल्लवी पुढे वाचायचा.
केदारचे कुटुंब गावात राहायचे. तिथे त्यांचा भला मोठा एकत्र परिवार होता. केदारचे आईवडील, त्याचे दोन काका काकू आणि त्यांची मुले असा बराच मोठा गोतावळा होता.
केदार सांगायचा की त्यावेळी गावात फारशा सोयी उपलब्ध नव्हत्या. लाईट सुद्धा फार कमी राहायची. त्यामुळे मिक्सर, वॉशिंग मशीन ह्या वस्तू तर फार दूरच्या होत्या. त्यामुळे त्याच्या आईला, आणि काकूंना दिवसभर कामे पुरायची.
अगदी घर सारवण्यापासून ते बाहेरून पानी आणेपर्यंत सर्वच कामे करायला लागायची. सुरुवातीला जेव्हा केदार त्याच्या आईबद्दल सांगायचा तेव्हा पल्लवी ला त्यांचे खूप कौतुक वाटायचे. पण आता जेव्हा ती तिच्या सासू सोबत तिची तुलना करायचा तेव्हा मात्र तिला आवडायचं नाही.
पण केदार मात्र वारंवार पल्लवीला त्याच्या आईचे उदाहरण द्यायचा आणि तुला काहीही कामे येत नाहीत असे म्हणायचा.
एकदा केदारच्या वडिलांना शहरातल्या हॉस्पिटल मध्ये दाखवायचे होते म्हणून केदारचे आई बाबा केदारकडे आले होते.
डॉक्टरांनी केदारच्या वडिलांना दर आठ दिवसांनी तपासणीला बोलावले होते. त्यामुळे त्यांनी दोन महिन्यांसाठी केदारकडे राहायचे ठरवले होते.
शिवाय त्यांना कबीर सोबत वेळ घालवायला मिळेल म्हणून केदारचे आईवडील खूप खुश होते. पल्लवी या आधी कधीच इतके दिवस त्यांच्या सोबत राहिलेली नव्हती.
कारण ते शहरात आले तरी दोन चार दिवसां पुरतेच यायचे. आणि पल्लवी गावी गेली तरीही केदारला जास्त सुट्ट्या मिळत नसल्याने जास्त दिवस राहणं होत नसे.
त्यामुळे इतके दिवस एकत्र राहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. पल्लवीची सासू तिला घरातील कामात मदत करायची. पल्लवी मात्र त्यांच्याशी जरा जपूनच वागायची. तिच्या मनावर सतत दडपण येत होते.
आपले काही चुकणार तर नाही ना या भीतीपोटी तिच्या हातून नकळत चूक व्हायच्या. केदारच्या आईला तिच्या मनात चाललेला गोंधळ लक्षात येत होता. पण त्या पल्लवीला काही बोलल्या नाहीत.
एकदा पल्लवीने केदारला आवडते म्हणून त्याच्यासाठी खास कारल्याची भाजी बनवली होती. केदार पहिला घास घेताच म्हणाला,
” काय बेचव भाजी केलीस ग…तुला येत नसेल तर माझ्या आईला विचारून तरी घ्यायचं ना…माझी आई किती छान भाजी करते…तुला तर काहीच येत नाही…”
हे ऐकताच पल्लवीचा चेहरा पडला. तिच्या सासूला मात्र तिच्या वागण्याचे कोडे हळूहळू उलगडत होते. त्या तेव्हा काहीच म्हणाल्या नाहीत. मात्र त्यांनी पुन्हा केदारला पल्लवी आणि त्यांच्यात तुलना करताना पाहिले.
एकदा खेळताना कबीर फरशीवर पाय घसरून पडला. तेव्हा केदार पल्लवी ला फार बोलला. एकच मूल असून सांभाळता येत नाही. माझ्या आईला तर तीन मुले होती. तिने आम्हाला किती चांगलं सांभाळलं वगैरे वगैरे. हे सर्व केदारच्या आईने ऐकले.
रडणाऱ्या कबीर ला शांत करायला म्हणून पल्लवी त्याला घेऊन रूम मध्ये गेली. ती गेल्यावर केदारची आई केदार जवळ आली आणि त्याला म्हणाली.
” मी बऱ्याच दिवसांपासून पाहतेय हल्ली तू पल्लवी च्या प्रत्येक कामामध्ये चूक शोधून काढतोस…तिने केलेल्या भाजीला नाव काय ठेवतोस…तिच्या समोर आईला हे जमतं आणि तुला जमत नाही असं म्हणतोस. तिला वाईट वाटत असेल रे…अशाने तिचा आत्मविश्वास कमी नाही का होणार..”
” पण आई मी काही चुकीचं बोलतोय का… तिचं कबीर कडे लक्ष नव्हतं म्हणून पडला ना तो…ते तरी बरे एकच मुलगा आहे तिला…तुला जितकी कामे असायची तितकी तिला नसतात…तरीही असे दुर्लक्ष करते ती…” केदार आईला म्हणाला.
” अरे पण ती घरातील कामे करत होती ना…उलट तो जेव्हा पडला तेव्हा तूच त्याच्या जवळ होतास…त्यामुळे ह्या गोष्टीला तुला सुद्धा जबाबदार धरू शकते ती…” आई म्हणाली.
” अग पण मुलांना सांभाळणे हे आईच काम असतं ना…” केदार म्हणाला.
” हे कुणी ठरवलं की मुलांना सांभाळणे हे फक्त आईचेच काम असते…तुझ्या फक्त हेच लक्षात आहे की तुझ्या आईने तीन मुलांचा सांभाळ केला पण यामध्ये तुझ्या वडिलांनी मला किती साथ दिली हे साफ विसरलास तू…
मी जेव्हा कामात असायचे तेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला सांभाळायचे ना ते…मला त्रास नको म्हणून बाहेरून आल्यावर स्वतःच पाणी घ्यायचे…तू मात्र ऑफिस मधून घरी आला की त्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसतो…वरून तिलाच आवाज…पल्लवी पाणी आण…पल्लवी चार्जर दे…
आणि राहिलं काम करण्याचा प्रश्न तर प्रत्येकाच्या काम करण्याच्या आणि स्वयंपाक करण्याच्या पद्धती सारख्या नसतात…आधी एकत्र कुटुंब असायचे…एका घरी बऱ्याच स्त्रिया असायच्या…त्यामुळे त्या कामांची वाटणी करून घ्यायच्या…आणि घरातील मोठी मंडळी त्यावेळी लहान मुलांना सांभाळायचे…त्यामुळे कामांचा फारसा ताण यायचा नाही…
पण आजकाल कुटुंब लहान झाल्याने मुलांचं आणि घराचं करताना तारांबळ उडते…मग अशा परिस्थितीत नवऱ्याला बायकोची थोडी मदत करायला काय हरकत आहे…” केदारची आई एका दमात एवढे बोलून गेली.
” अग पण आई आज तिचं लक्ष नव्हतं म्हणून कबीर पडला ना…” केदार स्वतःची बाजू सावरत म्हणाला.
” मुळीच नाही…अरे कबीर आता एका वर्षाचा झालाय…नवीन नवीन चालायला शिकलाय…त्यामुळे हे पडणं, धडपडणं आणि पुन्हा उठून चालायला लागणं होणारच…तुम्ही तिघे भाऊ काय कमी पडलात की काय…नुसते धडपडत राहायचे तुम्ही…अरे हे चालायचंच…म्हणून यासाठी काय नेहमी तिला जबाबदार धरणार का तू…”. केदारची आई.
” बरोबर आहे आई तुझं…मी बोलताना हा विचारच केला नाही की तिला ह्याचं वाईट वाटत असेल…खरंच माझं चुकलं…बायकांची कामे म्हणून मी तिला कधीच कुठल्याही कामात मदत केली नाही…पण यापुढे हे होणार नाही…” केदार.
” तू नक्कीच तिला समजून घ्यायला हवं केदार…आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचे वेगळे महत्त्व असते…मग ती बायको असो वा आई…ह्या दोघींचे आपल्या आयुष्यातील स्थान महत्त्वाचे असते…पण ह्या दोघींमध्ये कधीच तुलना होऊ शकत नाही..” केदारची आई.
” मला आता कळून चुकलय आई…मी नक्कीच तिला समजून घेईल…” केदार म्हणाला.
तिकडे नुकतीच केदारला झोपवून बेडरूमच्या बाहेर आलेल्या पल्लवीच्या कानावर केदार आणि त्याच्या आईचे बोलणे पडले. आणि तिच्या मनातले न सांगताही समजल्या बद्दल तिने मनोमन सासूबाईंचे आभार मानले.
आणि त्या दिवसानंतर कधीही केदार ने पल्लवी आणि त्याच्या आईची तुलना केली नाही. कबीर च्या बाबतीत सुद्धा तो पल्लवी ला मदत करायला लागला. पल्लवीच्या मनात तिच्या सासुबाईंबद्दल असलेली भीती कमी झाली आणि त्यांची छान गट्टी जमली. पल्लवीने त्यांच्याकडून केदारच्या आवडीचे बरेच पदार्थ देखील शिकून घेतले.
केदारच्या आईने त्याची चूक वेळेवर त्याच्या लक्षात आणून दिली. नाहीतर ही कामे बायकांची आणि ही कामे पुरुषांची या भानगडीत पडून तो त्याच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींतून मिळणाऱ्या आनंदाला मुकला असता.
समाप्त.
©®आरती निलेश खरबडकर.
(अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या “मितवा” या फेसबुक पेज ला लाईक करा.)