अपेक्षा – भाग २
हिच्या एक दोन मैत्रिणींचे लग्न झाले होते. आणि लग्नानंतर घराची जबाबदारी आल्याने त्यांचं मैत्रिणींशी संपर्क कमी झाला होता. काय तर वेळच मिळत नाही म्हणून. निशाला वाटायचे की एकत्र कुटुंबात लग्न केलं तर आपलीही हीच गत होईल.
तिची एक मैत्रीण रिमा चांगल्या श्रीमंत घरची सून बनली होती. दर आठवड्याला तिचे चांगले चांगले फोटो सोशल मीडियावर टाकायची. कधी जेवताना, कधी बाहेर फिरताना तर कधी आणखी काही. निशाला सुद्धा वाटायचे की आपल्याला सुद्धा हीच्यासारखाच श्रीमंत नवरा भेटायला हवा. जेणेकरून आपल्याला घरातील काहीच कामे करावी लागणार नाही. फक्त चांगले कपडे घालून मिरवायचेच काम असेल.
आणि तेव्हापासून निशाने घरी सांगून ठेवले होते की तिला खूप श्रीमंत नवरा हवाय. जो तिच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण करेन. सुरुवातीला तिच्या आई बाबांना वाटले की आज ना उद्या निशाला आपणहून कळेल की तिच्या या अपेक्षा चुकीच्या आहेत पण निशा मात्र कुणाचेही काहीच ऐकून घेत नव्हती.
त्यानंतर एक दोन स्थळे आणखी आली. त्यांच्याकडून होकार असल्याचे कळवले गेले. निशा मात्र काही केल्या या लग्नाला तयार होत नव्हती म्हणून नाईलाजाने तिच्या बाबांना या लग्नाला नकार द्यावा लागला.
त्यानंतर सुद्धा निशाला लग्नासाठी अनेक स्थळे आली पण निशा ने मात्र सगळ्या स्थळांना नकारच दिला. तिचे आईवडील तिला समजावून सांगायचे पण त्यांना तिच्यावर लग्नाची जबरदस्ती सुद्धा करायची नव्हती. कारण तिचे जबरदस्ती ने लग्न लावून दिले असते आणि पुढे चालून दोघांचं पटलं नाही तर निशाने तिच्या आईवडिलांनाच दोषी मानले असते.
निशासाठी कितीही स्थळे आणली तरीही ती नाहीच म्हणायची. त्यामुळे आता नातेवाईकही तिच्यासाठी स्थळे आणून कंटाळले होते. त्यामुळे आता एवढी स्थळे सुद्धा येत नव्हती. असे करता करता निशाला एकोणतीसाव वर्ष लागलं आणि तरीही तिचं लग्न अजूनही झालं नव्हतं. आई बाबा सतत तिच्या काळजीत असायचे पण तिला मात्र अजूनही त्याची फारशी काळजी नव्हती. अजूनही निशा ऑफिस आणि मैत्रिणी राहायची.
त्यानंतर मात्र तिला तिची एक मैत्रीण निकिता भेटली. जी लग्नानंतर वेळ मिळत नसल्याने ह्यांच्या संपर्कात राहिलेली नव्हती. निशाला नेहमीच वाटायचं की लग्न झाल्यावर तिला नुसतं घरकामात जुंपल असेल. म्हणूनच तिला वेळ मिळत नसेल मैत्रिणींशी बोलायला. आज ती तिच्या नवरा आणि मुलासोबत बाहेर जेवण करायला आलेली होती. निशा तिला भेटली तेव्हा तिला खूप आनंद झाला.
तिने आनंदातच तिच्या नवऱ्याशी निशाची ओळख करून दिली. तिचा नवरा सुद्धा निशा सोबत खूप चांगल्या पद्धतीने बोलला. तिचा मुलगा सुद्धा तिला बोबड्या बोलीत मावशी मावशी म्हणत होता. निकिता खूप आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसंडून वाहत होता. निशाला नवल वाटले.
तिने विचार केला होता की निकिताला घरातील कामांपासून वेळ मिळत नसल्याने ती कोणाच्याही जास्त संपर्कात नसेल म्हणून. पण तिला पाहून निशाला कळत होते की ती स्वतःच्या संसारात खूप आनंदी आणि समाधानी आहे आणि ती हे संसाराच सुख भरभरून ओंजळीत घेण्यात व्यस्त असल्याने तिला जास्त वेळ मिळत नसेल. आज तिला इतक्या आनंदात पाहून निशा स्वतःच्या प्रश्नचिन्ह निर्माण करत होती.
त्या दिवशी दिवसभर निशाने निकिताचाच विचार केला. तिला जे मिळालं होतं त्यात ती खूप समाधानी होती. पण निशाने मात्र आपल्या अवास्तव अपेक्षांमुळे स्वतःच्या कक्षा कधी विस्तारल्याच नव्हत्या. पण आता मात्र तिला तिची चूक काहीशी कळून येत होती.
एके दिवशी तिच्या ऑफिस मध्ये त्यांच्या नव्या मॅनेजिंग डायरेक्टर साठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. नवीन बॉसचे नाव अजुन कोणाला कळलेले नव्हते. कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळ आधीच त्यांचे नवीन बॉस ऑफिस मध्ये पोहचले होते. आणि जेव्हा निशाने बॉस ला बघितले तेव्हा ती अवाक् झाली. कारण तो निषाद होता. ज्याला निशाने त्याच्या मध्यमवर्गीय असण्यावरून लग्नाला नकार दिला होता.
निशाद ऐटीत चालत येत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक वाटत होती. निशाने त्याला पाहिले आणि पाहतच राहिली. कार्यक्रम सुरू झाला आणि ऑफिस स्टाफ नी निशाद सरांना बोलायला विनंती केली आणि निशाद सर म्हणायला लागले.
” हॅलो एवरीवन…तुम्ही माझे इतक्या जोशात स्वागत केले त्याबद्दल खरंच थँक यू सो मच…माझा इथवर पोहचण्याचा प्रवास खरंच सोपा नव्हता…मी देखील तुमच्यासारखाच स्ट्रगल केलाय आधी…पण मेहनत करत गेलो आणि बरंच काही अचीव केलं…पण या सर्वात माझी सोबत केली ती म्हणजे माझ्या बायकोने…
माझ्या यशात सर्वात मोठा वाटा माझ्या बायकोचा आहे…तिने मला माझ्या संघर्षाच्या दिवसात मोलाची साथ दिली…तिने कधीच मला घराची जबाबदारी जाणवू दिली नाही…सर्वकाही समर्थपणे सांभाळले…म्हणूनच तिच्या भरवशावर घराची जबाबदारी टाकून मी निश्चिंतपणे माझ्या कामात लक्ष देऊ शकलो…म्हणून मी आवर्जून तिचे आभार मानत असतो…” निषाद म्हणाला.
आता मात्र निशाला तिच्या वागण्याचा खूप पश्चात्ताप झाला. आपला हट्ट किती चुकीचा होता हे तिला कळून चुकलं. फक्त श्रीमंतीचा हट्ट करून भागत नाही तर त्यासोबत जी जबाबदारी आपल्यावर येते ती सुद्धा आपण समर्थपणे पेलायला हवी हे तिला कळून चुकले. संसार म्हणजे फक्त बाहेर फिरणे आणि मिरवणे नसून नवरा बायकोने एकमेकांना भक्कम साथ देणे आहे हे सुद्धा तिला कळून चुकले.
त्या दिवशी जेव्हा ती संध्याकाळी घरी गेली तेव्हा तिची आई तिच्या जवळ आली आणि म्हणाली.
” निशा…मला माहित आहे की तू काही ऐकणार नाहीस…पण मी तुझी आई आहे म्हणून तुला समजावून सांगणे माझे काम आहे…आज तुझ्या बाबांच्या मित्राने तुझ्यासाठी एक स्थळ आणले आहे…मुलगा चांगली नोकरी करतो…घरी तो त्याचे आई बाबा आणि लहान भाऊ असतो…मुलगा चांगला आहे फक्त तू मनावर घे…आणि तुझा तो श्रीमंत नवरा हवा हा हट्ट सोडून दे…” आई म्हणाली.
त्यावर निशा म्हणाली.
” मला मान्य आहे आई…तुम्ही जो मुलगा माझ्यासाठी पसंत कराल त्याच्यासोबत लग्न करायला मी तयार आहे…पाहुणे कधी येणार आहेत त्याची फक्त मला कल्पना दे…म्हणजे मला ऑफिस मधून सुट्टी घेता येईल…”
निशाकडून होकाराची अपेक्षा नसलेल्या तिच्या आईला मात्र तिचा होकार ऐकून आश्चर्य वाटले. निशा मध्ये अचानक हा बदल झाल्याचे पाहून आईला आनंदच झाला. आई आनंदातच तिच्या बाबांना हे सांगायला गेली.
निशा मात्र अजूनही मनात विचारच करत होती. आपण किती आणि कुठे चुकलो आहे याचा.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
खुपच छान