आवडती आणि नावडती सून – भाग २ (अंतिम भाग)

गीताला सासूबाईंचे हे बदललेले रूप पाहून खूप आनंद होत होता. तिला वाटे, चला, उशिरा का होईना, सासूबाईंना आपली किंमत पटली. पण राजेश मात्र या सगळ्या परिस्थितीकडे फार वेगळ्या आणि प्रगल्भ दृष्टीने पाहत होता.

एकदा संध्याकाळी राजेश आणि गीता गच्चीवर चहा घेताना बोलत होते. राजेशचा चेहरा गंभीर होता. त्याने चहाचा कप बाजूला ठेवला आणि गीताला म्हणाला, “गीता, तू जे आईंची सेवा करतेयस, त्याचा मला अभिमान आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, माणसाचा स्वभाव इतक्या सहजासहज बदलत नाही. तू आईकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस.”

“म्हणजे? तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे ? आई आता खरोखरच माझ्याशी किती प्रेमाने वागतात हे तुम्ही पाहताय ना?” गीताने आश्चर्याने विचारले.

“हो, मी पाहतोय. पण गीता, हा बदल तिच्या आजारपणाचा परिणाम आहे. जोपर्यंत ती अंथरुणाला खिळलेली आहे, जोपर्यंत तिला तुझी गरज आहे, तोपर्यंतच हा गोडवा टिकेल. ज्या दिवशी ती पूर्ण बरी होऊन पुन्हा उभी राहील त्या दिवशी कदाचित पुन्हा ती तिच्या जुन्या स्वभावाप्रमाणे वागायला लागेल.  सुजाताचा वरचढपणा पुन्हा सुरू होईल आणि तुला पुन्हा एकदा त्या दोघी लांब सारतील. मला भीती वाटतेय गीता. तुझा हा भाबडा विश्वास एका दिवशी तुझं मन दुखावेल की तू सावरून उठू शकणार नाहीस.” राजेश दीर्घ श्वास घेत म्हणाला.

“तुम्ही चुकीचा विचार करताय. माणूस आजारपणात किंवा मृत्यूच्या दारातून परत आल्यावर नक्कीच बदलतो. आईचं मन आता माझ्यासाठी मृदु होत आहे. त्या मला आता कधीही दूर करणार नाहीत.” गीताने राजेशचे हात आपल्या हातात घेतले आणि विश्वासाने म्हणाली.

राजेश काही बोलला नाही, पण त्याच्या मनात एक अनामिक भीती घर करून राहिली होती. त्याला माहित होते की आईच्या मनात सुजाताविषयीची जी आसक्ती आहे, ती कोणतीही सून किंवा आजारपण पुसून टाकू शकत नाही. ती आसक्ती मुळापासून रुजलेली होती.

आणि राजेशची ती भीती हळूहळू खरी ठरू लागली.

दिवस जात होते. यशोदाबाईंची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली होती. त्या आता स्वतःच्या पायावर चालू-फिरू लागल्या होत्या. अंगणात तुळशीला पाणी घालू लागल्या होत्या. जसजसे त्यांचे शरीर बळकट होत चालले होते, तसतसा त्यांच्या स्वभावातील तो जुना करडा आणि पक्षपातीपणा पुन्हा वर येऊ लागला होता.

गीताकडे बघण्याची त्यांची नजर बदलू लागली होती. कौतुकाचे दोन शब्द हळूहळू गायब झाले आणि पुन्हा पूर्वीप्रमाणेच कामाची यादी गीताच्या तोंडावर फेकता येऊ लागली. सुजाता पुन्हा एकदा सोफ्यावर पाय पसरून बसू लागली आणि यशोदाबाई तिची पावले उचलण्यासाठी धावू लागल्या. हे सर्व पाहून राजेशचे काळीज तिळतिळ तुटत होते, पण तो आईच्या विरोधात काहीच बोलू शकत नव्हता.

दिवाळी अवघ्या तीन दिवसांवर आली होती. घराघरांमध्ये फराळाचा सुवास सुटला होता, नवीन कपड्यांची खरेदी सुरू होती. घरातील वातावरण उत्साहाचे होते.

दुपारी सर्वजण आपापल्या कामात व्यस्त असताना, काही महत्त्वाच्या कामानिमित्ताने गीता यशोदाबाईंच्या खोलीच्या दिशेने जात होती. ती खोलीच्या जवळ पोहोचली तेव्हा आतून यशोदाबाईंचा आणि सुजाताचा आवाज ऐकू आला. गीताने दार उघडलंच होतं, पण आतल्या संवादाने तिचे पाय जमिनीवरच थिजले. ती दारातच उभी राहिली.

आतून यशोदाबाई सुजाताला अत्यंत आपुलकीच्या सुरात म्हणत होत्या,

“अगं सुजाता… तू कशाला या कामांना आणि माझ्या या घामाने डबडबलेल्या कपड्यांना हात लावतेयस?  तू विश्रांती घे जा. जाऊ दे, ती गीता करेल ना सगळं! तिला कसली आलीय अडचण? तिला तर अशा कामांची सवयच आहे. राबायची सवय आहे तिला”

“हो आई, मला ही सवय नाही असल्या कामांची. आणि गीता वहिनी करत आहेत म्हणजे मला काही टेन्शन नाही. बरी आहे गीता वहिनी. सगळं निमूटपणे करते. नाहीतर एखादी मदतनीस ठेवावी लागली असती तुमच्या सेवेसाठी. आणि उगाच पैसे द्यायला लागले असते.” सुजाताचा हसण्याचा आवाज आला,

“हो गं! गरीब घरातल्या पोरींना सवयच असते राबायची. ते जाऊदे. आता दिवाळी जवळ येत आहे. ही कपाटाची चावी घे. माझ्या त्या लाकडी कपाटात दोन साड्या ठेवल्या आहेत. त्यात एक चांगली महागातली भारी साडी तुझ्यासाठी ठेवली आहे आणि ती दुसरी हलकी, साधी कॉटनची साडी ठेवली आहे बघ, ती गीतासाठी काढून ठेव. तिला तीच बरी पडेल. तिला कुठे सवय आहे भारी साड्या घालायची.” यशोदाबाई म्हणाल्या.

ते शब्द गीताच्या कानावर पडले आणि ती मनातून दुखावली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आजारपणात तिने जी सासूबाईंची रात्रंदिवस सेवा केली, स्वतःच्या पाठीचे मणके झिजवले, सासूबाईंच्या घाणीत हात घातले, त्या सगळ्याची किंमत आज एका हलक्या साडीत आणि दोन उपरोधिक वाक्यांत संपली होती का?

तिच्या डोळ्यांसमोरून ती रात्र सरकली जेव्हा सासूबाईंनी तिला आपली लेक मानले होते. ते सगळे शब्द खोटे होते? गीताला हुंदका दाटून आला. तिचे शरीर थरथरू लागले. पण यावेळी तिच्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत, तर चिड दाटून आली. तिने ठरवले—आता आणखी नाही. आता ती स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणार नाही.

गीताने स्वतःला सावरले. आणि ती सरळ सासूबाई आणि सुजाता समोर जाऊन उभी राहिली. आणि म्हणाली.

“सासूबाई, ती साडी मला अजिबात नको आहे! माझ्या नवऱ्याने मला त्याच्या कष्टाच्या पैशातून सुंदर साडी आधीच आणून दिली आहे. मला तुमच्या या खोट्या उपकारांची काही गरज नाही.”

यशोदाबाई आणि सुजाता दोघीही दचकल्या. त्यांनी कधीही गीताचे हे असे रूप पाहिले नव्हते. सुजाताच्या हातातील कपडे खाली पडले आणि डोळे विस्फारले. यशोदाबाईंचे तोंड वाकले, त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या,

“गीता… तू… तू माझ्याशी असा आवाज वर करून बोलतेस? विसरलीस का तुझे दिवस?”

गीताने यशोदाबाईंच्या डोळ्यात थेट पाहिले आणि अत्यंत सज्जड शब्दात उत्तर दिले,

 “मी काहीही विसरले नाही सासूबाई! तुम्ही आजारी होतात तेव्हा मी सुनेसारखी नाही तर एका मुलीसारखी तुमची सेवा केली. मला वाटले होते की तुमचे मन माझ्यासाठी बदलले आहे. पण नाही. तुम्ही मला माया सुद्धा तुमच्या गरजेपुरते लावली होती. जेव्हा गरज संपली तेव्हा मुलीवरून पुन्हा ‘नोकर’ समजायला लागलात तुम्ही मला!”

मी सुद्धा तुमच्या त्या नाटकी वागण्याला तुमचे प्रेम समजले होते. आजपासून एक गोष्ट स्पष्ट ऐकून घ्या. या घरातील कामाची जबाबदारी मी एकटीने घेतलेली नाही. आजपासून तुमची स्वतःची आणि घरातील अर्धी कामे सुजाताला करायला सांगा. जेव्हा अधिकारांचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला सुजाता आठवते आणि जेव्हा कर्तव्य पूर्ण करायचे असते तेव्हा मी आठवते. पण पुरे झाले आता. जर यापुढे या घरात कामाची वाटणी समान झाली नाही, तर मी ह्या घरात माझा हिस्सा घेऊन वेगळी चूल मांडायला देखील मागेपुढे करणार नाही.”

तिचे बोलणे ऐकून सुजाता आणि यशोदाबाई तिला बघतच बसल्या. मग यशोदाबाई तिला म्हणाल्या.

” काय बोलतेस तू. जरा भानावर ये. हे घर माझं आहे अन् मी जे म्हणेल तेच होईल या घरात. सुजाताला कामांची सवय नाही म्हणून ती काम करणार नाही. पूर्वी जसं चालायचं तसंच चालेल सगळं. तुझ्याशी काही दिवस चांगली बोलले म्हणजे तुझं ऐकेन असं नाही. तुझी जेवढी लायकी आहे तेवढंच बोल.”

” नाहीतर काय. आजवर करत आल्या तसंच पुढे सुद्धा करायला काय हरकत आहे. बरं चाललंय ना सगळं. मग चालू द्या तसंच.” सुजाता म्हणाली.

” नाही. आजवर सगळं चुकीचं चाललं होतं. सासूबाईंना मी आवडत नसेल हा विचार करून मी सहन करत होते. घरात वाद नकोत म्हणून मी कधी कोणाला काही बोलले नाही. पण सासूबाई हे सगळं मुद्दामहून करतात हे कळल्यावर सुद्धा मी गप्प राहिले तर माझ्यासारखी मुर्ख मीच असेल.”

असे म्हणत गीता त्या खोलीतून निघून गेली.

संध्याकाळ झाली. राजेश ऑफिसवरून घरी परतला. त्याने पाहिलं की घरातील वातावरण अतिशय गंभीर आणि तणावपूर्ण आहे. यशोदाबाई सोफ्यावर बसून डोक्याला हात लावून बसल्या होत्या. सुजाता सोफ्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसली होती आणि गीता नेहमीप्रमाणे आपल्या कामात मग्न होती.

राजेशला पाहताच यशोदाबाई म्हणाल्या.

” आलास तू. ये आणि बघ तुझी बायको काय गुण उधळत आहे ते. आजवर मुकी बनून राहिली ती. गरीब गाय असल्याचा आव आणला अन् आता शिंग फुटले तिला. वेगळे राहायची भाषा करत आहे. मला या वयात हे सगळं पहावं लागणार आहे का आता ?”

” हो ना भाऊजी. अहो माझ्यासमोर नाही ते बोलली गीता ताई आईंना. खूप अपमान केला हो त्याचा.” सुजाता सुद्धा म्हणाली.

राजेशने लगेच किचन मध्ये गेला आणि गीताला विचारले,

“गीता, काय झालं? आई काय सांगतेय? तू काही बोललीस का आईला?”

गीताने अत्यंत शांतपणे, घडलेला सगळा प्रकार राजेशला सांगितला. तिने कपाटातल्या त्या हलक्या साडीचा आणि सासूबाईंच्या बोलण्याचा प्रत्येक शब्द राजेशला सांगितला.

राजेशने हे सर्व ऐकले.  त्याने गीताच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला,

“मी तुला आधीच म्हणालो होतो ना, की आईचा स्वभाव बदलणार नाही. तू आज खूप योग्य पाऊल उचललंस. तुझा हा स्वाभिमान असाच टिकवून ठेव. मी पूर्णपणे तुझ्या पाठीशी आहे.”

थोड्या वेळाने राजेश हॉलमध्ये गेला. त्याने यशोदाबाईंसमोर जाऊन उभे राहत अत्यंत शांत पण कणखर आवाजात म्हटले,

“आई, गीताने जे काही केले ते अगदी बरोबर केले. तुम्ही आजारपणात तिला जवळ केले आणि बरे झाल्यावर पुन्हा तिला दुखावले, हे चुकीचे होते. हा संसार आपल्या सगळ्यांचा आहे, कोणा एकाच्या कष्टावर चालत नाही. जर या घरात सर्वांना समान हक्क आणि मान मिळाला नाही, तर मी आणि गीता वेगळे राहू, पण मी माझ्या बायकोचा असा अपमान कधीही सहन करणार नाही.”

राजेशच्या त्या शब्दांनी यशोदाबाईंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांना जाणीव झाली की त्यांनी आपल्याच मुलाच्या संसारात कसा भेदभाव निर्माण केला होता. गीता वेगळी राहायला गेली तर आपल्या घराची घडी विस्कटून जाईल ह्याची त्यांनाही जाणीव होतीच. आपण एका मुलाला आणि सुनेला डोक्यावर घेतले आणि दुसऱ्या मुलाला आणि सुनेला पायाखडकी तुडवले हे त्यांच्या लक्षात आले. वयाच्या या संध्याकाळी त्यांना समजले की पैशांपेक्षा आणि सुजाताच्या गोड गोड थापांपेक्षा, संकटाच्या काळात धावून येणारी गीता हीच खरी त्यांचा आधार बनेल.

दुसऱ्या दिवशी सकाळी, यशोदाबाई स्वतः चालत स्वयंपाकघरात गेल्या. गीता चहा ठेवत होती. यशोदाबाईंनी पुढे येऊन गीताचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्या तिला म्हणाल्या.

“गीता बेटा… मला माफ कर. मी खरोखरच मोठी चूक केली होती. मी आजवर तुझ्यासोबत खूप भेदभाव केला. आई म्हणून मी कमी पडले.”

सुजातानेही तिथे येऊन हळूच मान खाली घातली आणि तिनेही आपली चूक मान्य केली. कारण तिलासुद्धा माहिती होते की सुजाता वेगळी राहायला लागली तर घरचा सगळा भार तिच्यावर येईल म्हणून. तिने सुद्धा गीताची माफी मागून घरच्या काही जबाबदाऱ्या स्वतः उचलण्याचे कबूल केले.

आजचा दिवस गीताच्या आयुष्यात एक स्वाभिमानाचा सूर्य उगवला होता. तो सूर्य नात्यांमधील दुजाभाव मिटवून एकात्मतेचा प्रकाश पसरवणारा होता. गीताने सासूबाईंना मिठी मारली. तिचे दुःख आता पूर्णपणे धूसर होऊन गेले होते आणि तिच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंदाची आणि आत्मसन्मानाची दिवाळी साजरी झाली होती.

कधीकधी गप्प राहून सगळं सहन केल्यापेक्षा स्वतःसाठी आवाज उठवलेला आपल्यासाठी चांगला असतो. तुम्हाला काय वाटतं. गीताने जे केले ते योग्य केले का ? आणि तिच्या सासूबाई खरंच बदलल्या असतील का ?

समाप्त.

©® आरती निलेश खरबडकर.

Leave a Comment