” हो आई…मला कळत आहे मी काय बोलत आहे ते…आता मी त्यांच्यापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही…” पंकज म्हणाला.
” तिच्या भावांनी तुझ्या आईचा अपमान केला होता हे विसरलास का…?” आई म्हणाली.
” आई…चूक तिची नाही तर तिच्या भावांची होती…प्रीती तर तुला काहीच बोलली नव्हती ना…आणि तू वाईट नको वाटून घेऊ पण त्या दिवशी प्रितीचे भाऊ जे काय बोलले ते पूर्णपणे खोटं सुद्धा नव्हतं…” पंकज म्हणाला.
” म्हणजे तुला म्हणायचं काय आहे…ज्या आईने तुला लहानाचं मोठं केलं ती आई चुकीची आहे…अन् तुझी बायको या जगातील सर्वात चांगली स्त्री आहे…” आई रागाने म्हणाली.
” तसं नाही आई…पण प्रितीच्या बाबतीत आपण खूप चुकलो गं…आपल्या वाईट कर्माची शिक्षा मात्र ती आणि माझा लहान मुलगा भोगतोय…की आजवर खूप वाईट वागलो…पण आता मला माझी चूक कळली आहे…आणि की माझी चूक सुधारणार आहे…तू सुद्धा झाले गेले सर्व काही विसरून प्रीतीला चांगल्या मनाने स्वीकार…” पंकज म्हणाला.
” ते शक्य नाही…तिला मी एक क्षणही इथे सहन करू शकत नाही…” आई म्हणाली.
” पण तिने असं काय वाईट केलंय आई…” पंकज म्हणाला.
” माझ्या मुलाला माझ्या विरोधात उभे केले आता आणखी काय वाईट करायचं बाकी आहे…” आई रागाने म्हणाली.
” मी तुझ्या विरोधात नाही आहे आई…मी फक्त आता प्रितीच्या बाजूने आहे आणि तुलाही आमच्या बाजूने यायला सांगतोय…तू एकदा तिच्या बाजूने विचार करून पहा ना आई…” पंकज काकुळतीने म्हणाला.
” ते शक्य नाही…मी जिवंत असताना ती या घरात पाऊल सुद्धा टाकू शकत नाही…” आई म्हणाली.
” आणि माझं सुद्धा ठरलंय…मी प्रीतीला कधीच घटस्फोट देणार नाही… मी आता माझं पूर्ण आयुष्य माझ्या बायको अन् मुलासोबत जगणार आहे…मग मला हे घर सोडून जावं लागलं तरी काही हरकत नाही…”
असे बोलून पंकज काहीसा रागातच त्याच्या खोलीत निघून गेला. पंकज च्या आईला मात्र हा इतका कसा काय बदलला ह्याचे नवल वाटत होते.
इकडे प्रितीच्या वहिनीने तिच्या भावाला घरी बोलावून घेतले होते. आणि त्याच्यासमोर प्रितीच्या आणि त्याच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. रघूला काहीच हरकत नव्हती. तशीही आधी एक दोनदा जेव्हा रघु त्याच्या बहिणीच्या घरी आला होता तेव्हा त्याची वाईट नजर प्रीती वर पडलीच होती.
पण त्यावेळी प्रीती घरच्यांच्या फारच लाडाची होती. आणि रघुचे कारनामे त्यांना माहिती असल्याने प्रितीसाठी रघुचा विचार त्यांनी स्वप्नात सुद्धा केला नसता. पण आज परिस्थिती बदलली होती. रघु च्या नजरेत प्रीती आता एक नवऱ्याने टाकून दिलेली बाई होती.
रघु येता जाता प्रीतीला पाहायचा. त्याची ती नजर प्रीतीला जाणवायची आणि तिला शिसारी आल्यागत व्हायचं. पण वहिनीच्या घरचा पाहुणा असल्याने प्रीती त्याला काही म्हणू शकत नव्हती. वहिनीचे मात्र अजूनही दोघांच्या लग्नासाठीचे प्रयत्न सुरूच होते. पण प्रीती आणि तिची आई काही वहिनीला दाद देत नव्हत्या.
एके दिवशी प्रितीची आई पार्थला घेऊन बाहेर दुकानात गेली होती. प्रितीचे दोन्ही भाऊ सुद्धा कामानिमित्ताने बाहेर गेले होते. प्रितीची वहिनी अंघोळीला गेलेली होती. प्रीती स्वयंपाक करत होती. रघु ने ही संधी हेरली. त्याला वाटलं की सरळ मार्गाने आपण प्रीतीला मिळवू शकलो नाही तर काय झालं. बळजबरीने का होईना प्रीतीला आपली बनवायचेच.
तो हळूच स्वयंपाक घरात गेला. त्याला स्वयंपाक घरात पाहून प्रितीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण तिने मुद्दामून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण तो सरळ प्रितीच्या समोर आला आणि त्याने सरळ प्रीतीचा हात धरला. प्रीती घाबरली. भीतीने तिच्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नव्हता.
” प्रीती…तू मला खूप आवडतेस…तू फक्त एकदा हो म्हण…तुझ्यासाठी काहीही करेन हा रघु…” रघु म्हणाला.
” हात सोड…दूर हो माझ्यापासून…जवळ नको येऊस… माझं लग्न झालेलं आहे…” प्रीती भीतीने थरथरत म्हणाली.
” कोणतं लग्न आणि कसलं लग्न ?…नुसतं चार महिने चालणारं लग्न काय कामाचं…तुझ्या नवऱ्याने तर इतक्या वर्षात एकदापण मागे वळून पाहिल नाही तुला…एकटी किती दिवस राहशील तू…पुरुषाचा आधार तर हवाच ना तुला…” रघु मोठ्याने हसत म्हणाला.
आता मात्र प्रीतीला काय करावं हे सुचत नव्हतं. तिला काहीही करून रघुच्या तावडीतून स्वतःला सोडवायच होतं. इतक्यात तिचे लक्ष गॅसवर असणाऱ्या चहाच्या पातेल्याकडे गेले. प्रीतीने चपळाईने चहाच्या पातेल्याला समोरून पकडले आणि तो उकळता चहा रघूच्या अंगावर फेकला.
रघु लवकर सावध झाल्याने चहा त्याच्या अंगावर सांडला नाही. पण त्याच्या एका हातावर मात्र चांगलच भाजल होतं. त्याने कळवळून प्रीतीचा धरलेला हात सोडून दिला. त्याने हात सोडताच प्रीती धावतच स्वयंपाक घरातून तिच्या खोलीत आली आणि दार आतून लावून घेतले. झालेल्या प्रकाराने प्रीती खूप घाबरली होती.
इकडे रघुचा आवाज ऐकुन वहिनी धावतच रघु कडे आली. त्याच्या हाताला चांगलच भाजलेलं होतं. वहिनीने त्याला औषध लावले. पण लगेच वहिनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रघु स्वयंपाक घरात कशाला गेला होता म्हणून तिने त्याच्याकडे चौकशी केली. रघु ने आधी तिला उडवा उडविची उत्तरे दिली पण शेवटी जे काय घडले ते खरे सांगितले. वहिनी रघु ला रागाने म्हणाली.
” अरे दादा…तू असं वागून चांगला खेळ खराब केला आहेस बघ…मी किती प्रयत्न करत होते तुम्हा दोघांचं लग्न व्हावं म्हणून…पण तू एका क्षणात माझ्या प्रयत्नांची माती केलीस…”
” असं काय झालं…ही नाही तर कुणी दुसरी मिळेल तुझ्या भावाला लग्नासाठी…हीच्यात काय आहे…आणि सोबत मुलगा सुद्धा वागवावा लागेल…” रघु बेफिकिरीने म्हणाला.
” अरे दादा माझ्या सासऱ्यानी घराच्या संपत्तीचे तीन हिस्से केले आहेत…त्यातला एक हिस्सा प्रीतीला मिळणार आहे…मला वाटलं होतं की तुझं अन् प्रितीच लग्न झालं तर ते सगळं तुला मिळेल म्हणून…पण तू मात्र सगळ्यावरच पाणी फिरवले…” वहिनी म्हणाली.
वहिनीच्या खोलीतून तिच्या आणि रघुच्या बोलण्याचा आवाज बाहेर पर्यंत येत होता. वहिनीचे बोलणे प्रीतीने ऐकले आणि तिला धक्काच बसला. वहिनी पैशांसाठी आपल्या आयुष्याशी खेळत आहे हे माहिती पडल्याने प्रीती आणखीनच खचली.
ती विचाराच्या तंद्रीत तशीच घराबाहेर पडली. जवळच एक देवीचे मंदिर होते तिथे जावून मंदिराच्या पायऱ्यांवर रडत बसली होती. इतक्यात तिची नजर समोर गेली. आधी तर अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तिला काही स्पष्ट दिसले नाही पण दुसऱ्याच क्षणाला तिला समोरून पंकज येताना दिसला.
त्याला पाहून तिला काही सुचले नाही. एका क्षणाला तर त्याला पाहून तिला त्याचा आधार वाटला. पण दुसऱ्याच क्षणी त्याने दिलेल्या कटू आठवणी जाग्या झाल्या. पण इतक्या दिवसानंतर आज पंकज अचानकपणे गावी कसा आला हे तिला कळत नव्हते. त्याच्या हातात एक बॅग सुद्धा होती.
क्रमशः
एकाच ह्या जन्मी जणू – भाग ६
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
कथा आवडल्यास माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरू नका.
Comments 1