त्याने तिच्याशी लग्न करायला होकार दिला तशी कावेरी खूप आनंदली. तिने त्याच्यासोबत पळून जायची तयारी केली. आधी पळून जाऊन लग्न करायचे आणि नंतर काही दिवसांनी अजय मुलांना सुद्धा त्यांच्याकडे घेऊन येणार असे त्या दोघांचे ठरले होते.
ठरल्या दिवशी कावेरी घरून तिचे आणि तिच्या सासूचे दागिने घेऊन एका लग्नाला जायचे म्हणून बाहेर पडली होती. सोबत नुकतंच शेतमाल विकून जे पैसे कैलासने तिला ठेवायला दिले होते ते सुद्धा घेतले होते. गावाबाहेर गेल्यावर अजय तिला भेटला आणि दोघेही सरळ पुण्याला निघून गेले.
इकडे कावेरी च्या घरी मात्र अंधार पडल्यावर सुद्धा ती परतली नाही म्हणून सगळे काळजीत पडले. कैलास तर तिच्या काळजीने नुसता बेचैन झाला होता. दोन्ही मुले आईच्या नावाने रडत होती. सासूच्या मनात मात्र वेगळीच शंका येत होती. पण केवळ शंकाच आहे म्हणून तिने ती बोलून दाखवली नाही.
कैलास ने लगेच कावेरी च्या हरवल्याची तक्रार पोलिस स्टेशन मध्ये दाखल केली. अंगावर सोने असल्याने कुणी चोरीच्या उद्देशाने तिचे अपहरण केले असावे अशी भीती कैलास ला वाटत होते. तिकडे अजय सुद्धा घरी नाही हे घरच्यांना कळले होते. अजय आणि कावेरी पळून गेल्याची गावामध्ये आडून आडून चर्चा सुरू होती. पण कैलास मात्र ह्या सगळ्यांवर विश्वास ठेवायला तयार नव्हता. तो मुलांना धीर देत होता की लवकरच आई घरी येईल.
या घटनेला आता जवळपास महिना उलटून गेला होता. एके दिवशी अचानक त्यांना पोलिस स्टेशन मधून फोन आला आणि कैलास आणि त्याच्या घरच्यांना तातडीने पोलिस स्टेशनला बोलावण्यात आलं. पोलिस स्टेशन मध्ये गेल्यावर कैलास ला धक्काच बसला. तिथे पोलिसांनी कावेरी आणि अजय ला पुण्यावरून पकडून आणले होते. कावेरी खरंच अजय सोबत पळून गेली होती हे पाहून कैलास चे उरले सुरले अवसान गळून पडले. कावेरी ने आपला आणि मुलांचा अजिबात विचार केला नाही या विचाराने त्याच्या डोळ्यात अश्रू आले. कावेरी च्या माहेरच्यांनी सुद्धा पोलिस स्टेशन मध्ये बोलावण्यात आले होते.
माहेरच्यांनी तिला खूप समजावून सांगितले. चांगला संसार मोडू नको म्हणून विनवण्या केल्या. कैलास किती चांगला आहे हे पुन्हा पुन्हा समजावून सांगितले पण कावेरी मात्र काहीच ऐकुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिच्या विचार करण्याची शक्ती अजिबात काम करत नव्हती. आधीच कैलास शी लग्न लावून दिल्यामुळे ती माहेरच्या लोकांवर नाराज होती. त्यातच अजयच्या प्रेमात ती आंधळी झाली होती.
शेवटी कैलास ने तिला समजावून सांगितले. मुलं रोज तिच्यासाठी रडतात हे काकुळतीने सांगितले. तो तिला अजूनही मनाने स्वीकारायला तयार आहे हे सुद्धा पटवून सांगितले. पण कावेरी आता त्याच्याकडे पाहायला सुद्धा तयार नव्हती. शेवटी कैलास ने तिच्यापुढे हात जोडले. पण तिला काहीच फरक पडला नाही. ती उलट कैलासलाच म्हणाली की…
” तुला माझ्यासारखी सुंदर बायको मिळणार नाही हे माहिती आहे म्हणून तू माझ्या विनवण्या करतो आहेस हे मला माहिती आहे…पण मी आजपर्यंत कधीच तुला मनापासून स्वीकारले नव्हते…तुझी मला आजवर लाजच वाटत आली आहे…माझ्या घरच्यांनी मला मारहाण करून हे लग्न लावून दिलं होतं…आजवर तुझा, मुलांचा अन् घरच्यांचा विचार करून मन मारून जगत होते. पण यापुढे मी फक्त माझाच विचार करणार आहे…माझ्या रस्त्यात कुणीच आडव येऊ नका…मला अजय पासून कोणीच दुर करू शकत नाही…”
तिचे बोलणे ऐकून साऱ्यांनीच हात टेकले. काहीही केल्या ती काहीच ऐकुन घेत नव्हती. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. गेला महिनाभर ती अजय सोबत अगदी स्वप्नांच्या दुनियेत जगत होती. काही वेळासाठी तिला तिच्या मुलांचा सुद्धा विसर पडला होता. ती पुन्हा अजयसोबत पुण्याला निघून गेली.
शेवटी कैलास रिकाम्या हातानेच घरी परतला. मुलांनी आईबद्दल खूप विचारले तेव्हा कैलासने सांगितले की आई अजुन सापडली च नाही. पण मोठा मुलगा संकेत हा आता सहा वर्षांचा झाला होता आणि त्याला थोडीफार कळत होते. गावातली लोक गोष्टी करत तेव्हा त्याच्या कानावर सगळ्या गोष्टी यायच्या. आई आपल्याला सोडून निघून गेली हे त्या कोवळ्या वयाच्या मुलाला कळून चुकले होते.
गावात कैलासची खूप बदनामी झाली होती. कावेरीच्या एका चुकीने कैलासचा सगळा चांगुलपणा पुसून निघाला होता आणि त्यावर बदनामीचा डाग लागला होता. परिणामी कैलास अंतर्मुख बनत चालला होता. कैलास आणि मुलांची अवस्था पाहून कैलासच्या आईवडिलांनी त्याचे दुसरे लग्न करायचे ठरवले. पण कैलास मात्र काही केल्या लग्नाला तयार झाला नाही. आपल्या दिसण्यावरून कावेरीला आपली लाज वाटायची हे आठवून त्याच्यात न्यूनगंड तयार झाला होता आणि त्याचा आता लग्न या गोष्टीवरून विश्वास उडाला होता. कावेरीने त्याच्यावर कधी प्रेम केले नाही पण कैलासने मात्र कावेरीवर खरे प्रेम केले होते.
ह्या सर्व गोष्टींचा परिणाम कावेरी च्या मोठ्या मुलावर संकेतवर होत होता. अभ्यासात त्याचे लक्ष लागत नव्हते. कैलास सुद्धा त्याच्यावर लक्ष देऊ शकला नव्हता. पण संकेतची मनस्थिती पाहता त्याच्या शिक्षकांनी कैलास ची भेट घेतली आणि त्यांना संकेतची स्थिती समजाऊन सांगितली.
संकेतच्या शिक्षकांनी कानउघडणी केल्यानंतर मात्र कैलास ला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. आपल्या दुःखात मुलांचे भविष्य आपण दावणीला बांधतो आहोत हे त्याला कळून चुकले. त्यानंतर मात्र त्याने स्वतःला सावरले. त्याने आपले पूर्ण लक्ष संकेत आणि साक्षी वर द्यायला सुरुवात केली. लोकांच्या डिवचण्याचा आता त्याच्यावर परिणाम होत नव्हता. परिणामी लोकांनी सुद्धा त्याच्या मागे बोलणे हळूहळू कमी केले.
कैलास च्या प्रयत्नांना हळूहळू यश मिळत गेले. घरच्यांच्या साथीने त्याने मुलांना पुन्हा हसते खेळते वातावरण दिले. ह्याचा चांगला परिणाम मुलांवर होऊन दोघांची सुद्धा शैक्षणिक प्रगती होत होती.
इकडे कावेरी आणि अजय मध्ये मात्र हळूहळू भांडणाला सुरुवात झाली होती. कावेरी चे परतीचे सर्व रस्ते बंद झालेत हे कळल्यावर अजय ने तिला त्याचे खरे रूप दाखवणे सुरू केले. त्याने कावेरीचे दागिने मोडले आणि त्या पैशांवर तो मजा मारायचा.
सकाळी लवकर घरातून निघून जायचा आणि रात्री उशिरा दारू पिऊन यायचा. आणि हिने काही विचारल्यावर हिला मारहाण करायचा. त्याचा चांगुलपणाचा मुखवटा हळूहळू उतरत होता. आणि हिला पण केलेल्या चुकीची जाणीव होत होती. माहेरचा आधार तर हो कायमचा गमावून बसली होती आणि सासरी जायला जागा नव्हती.
आता तिला प्रकर्षाने तिच्या मुलांची आठवण येत होती. आजवर ज्या नवऱ्याचा दुस्वास केला त्याच्या चांगुलपणाची आणि प्रेमाची जाणिव होत होती. पण ती आता ह्या सर्व गोष्टींना कायमची मुकली होती. अशातच जेव्हा त्यांच्याकडील पैसा संपायला आला तेव्हा अजय ने तिला सोडून घरी जायची तयारी केली. तेव्हा तिने अजयला विनंती केली.
” मी माझं सर्वकाही सोडून तुझ्या प्रेमाखातर तुझ्यासोबत राहायला आले आहे…आता मी मागे फिरू शकत नाही…माझ्यासाठी असलेले सर्व दरवाजे आता बंद झाले आहेत…तू मला सोडून नको जाऊस…आपण दोघेपण इथे काहीतरी काम शोधू आणि इथेच राहू…”
” कसले प्रेम अन् कसले काय ग…? माझं तुझ्यावर काही प्रेम बिम नव्हतं…” अजय तुच्छतेने म्हणाला.
” मग तू माझ्याशी मंदिरात लग्न केलंय ते काय होतं…?” कावेरीने विचारले.
” कोणतं लग्न घेऊन बसलीस तू…तुझा आणि कैलास चा घटस्फोट पण झाला नाही अजुन…आपलं लग्न कायदेशीर कधीच नव्हतं…तो तर कैलास चा चांगुलपणा आहे की त्याने अजुन तुझ्यावर कायदेशीर कारवाई केली नाही…आणि तू इतक्या चांगल्या कैलास ला सोडून माझ्या मागे येऊ शकतेस तर उद्या माझ्यापेक्षा आणखी चांगला कुणी दिसायला मिळाला तर त्याच्या मागे जाणार नाहीस याची खात्री काय…?” अजय म्हणाला.
क्रमशः
काय भुललीस वरलीया रंगा – भाग ३ (अंतिम भाग)