एवढे बोलून अवनी रागा रागाने तिच्या खोलीत निघून गेली. तिला खूप राग आला होता आणि काही केल्या राग कमी होत नव्हता. अशातच तिने तिच्या आईला फोन लावला आणि झालेला सगळा प्रकार सांगितला. आईने तिच्या रागात आणखीनच भर पाडली. संध्याकाळी जेव्हा नीरज घरी आला तेव्हा त्याला झालेला प्रकार समजला. त्याने अवनीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण अवनी तिच्या आईकडे जायचं म्हणून हट्ट करून बसली होती. तिच्या सासूबाईंनी सुद्धा तिला समजावले पण ती कुणाचच काहीच ऐकत नव्हती. शेवटी काही दिवस माहेरी गेली तर तिचा राग शांत होईल आणि वातावरणात बदल झाल्याने तिची चिडचिड कमी होईल म्हणून नीरज ने तिला तिच्या माहेरी न्यायचे ठरवले. माहेरी जायचं म्हणून अवनी खूप आनंदली होती. अवनी आणि नीरज दोघेही तिच्या माहेरी गेले. आईला भेटून अवनी खुश झाली. दोन दिवस तिथे राहून अवनीला काही दिवसांसाठी तिथेच ठेवून नीरज सुद्धा त्याच्या घरी परत निघून गेला.
अवनीला आता माहेरी आल्यावर खूप मोकळे वाटत होते. इथे ना कोणाचे बंधन होते ना सूचना. अवनी आता तिला जसे हवे तसे कपडे घालायची. खाण्यात सुद्धा तिच्या आवडीचे पदार्थ खायची. अगदी बाहेरून मागवून सुद्धा खायची. अवनीच्या आईने अवनीची कामे करण्यासाठी घरी एका मुलीला कामाला ठेवले होते.
अवनीची आई मात्र दर दिवसा आड त्यांच्या कामानिमित्ताने वा काही सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी घराबाहेर असायची. सुरुवातीला माहेरी येऊन मोकळं आणि स्वतंत्र वाटणारी अवनी आता मात्र या एकटेपणाला कंटाळली होती.
आता तिला तिच्या सासरच्या भरल्या घराची आठवण येत होती. तिला त्या घरात आल्यापासून कधीच एवढा एकटेपणा वाटला नव्हता. तिच्या सासुबाई आणि चुलत सासुबाई सतत तिच्या जवळ असायच्या. दोन लहान नणंदा वहिनी वहिनी करून घिरट्या घालायच्या.
पुरुषमंडळी बाहेर असेल तरी घरात यांची सोबत असायची. सकाळी सगळी कामे आटोपली की मग घरातल्या सगळ्या बायका एकत्र बसून गप्पा मारायच्या. आठवड्यातून दोनदा सगळ्या बायका त्यांच्या शेतातल्या घरी जाऊन तिथेच जेवण बनवायच्या आणि दिवसभर छान शेतातच राहायच्या. शेतातील पिकांची दिवसेंदिवस होणारी वाढ पाहणे तिला किती आवडायचे. आता मात्र माहेरी घरी राहून ती तिच्या सासरच्यांना खूप मिस करत होती.
तिला आठवलं की एकदा ती आजारी पडली होती तेव्हा तिच्या घरच्यांनी तिची किती काळजी घेतली होती. आणि त्याच तिच्या सासुंना ती किती काही बाही बोलली होती त्या दिवशी. तिला आता तिच्या वागण्याचा राहून राहून पश्चात्ताप होत होता. तिला नीरज आणि घरच्यांची आठवण येत होती.
त्या दिवशी अवनीला खूप अस्वस्थ वाटत होते. राहून राहून पोटात दुखत होते. तिने आईला फोन केला आणि सांगितले की तिला बरं वाटतं नाहीय म्हणून. आई बाहेरून आली आणि अवनीला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेली. डॉक्टरांनी अवनीला चेक केले आणि सांगितले की बाहेरचं जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स जास्त खाण्यापिण्याने अवनीचे पोट बिघडले म्हणून. खाण्यापिण्यात हलगर्जी केल्याने डॉक्टरांनी अवनी ची कानउघडणी सुद्धा केली. डॉक्टरांनी औषधं आणि काही सूचना देऊन अवनीला घरी पाठवले.
इकडे अवनी च्या सासरच्यांना तिच्या तब्येत बद्दल कळल्याने अवनी ची सासू, सासरे आणि नीरज लगेच अवनीला भेटायला आले. तिच्या तब्येत बद्दल ऐकून तिघेही काळजीत पडले होते. तिची तब्येत आता चांगली आहे पाहून तिघांचाही जीव भांड्यात पडला. अवनीच्या सासूबाईंनी अवनीची आस्थेने विचारपूस केली. अवनीला मात्र आपण सासूबाईंशी जे वागलो त्याचे वाईट वाटत होते. अवनी त्यांना म्हणाली.
” आई…मी इथे येण्या आधी तुम्हाला नकळत पणे खूप काही बोलले होते…तुम्ही प्लिज मला माफ करा…”
” अग त्याचा एवढा विचार नकोस करू तू…ते तर आम्ही केव्हाच विसरलो…तू फक्त तुझ्या तब्येतीला जप…आणि तुझी चिडचिड आम्ही समजू शकतो… लहानपणीपासून शहरातील वातावरणात वाढलेली आहेस तू…तुला खेड्यातल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ तर लागेलच…आणि अशा अवस्थेत आणखीनच चिडचिड होणार ना तुझी…तू आणखी काही दिवस माहेरीच राहा…आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा ये घरी…तिथली काही काळजी करू नकोस…आम्ही सांभाळून घेऊ सगळं…” तिच्या सासुबाई हसून म्हणाल्या.
” नाही आई…मला आता इथे करमत नाही आहे…मी आताच तुमच्या सोबत घरी येणार आहे…मला पुन्हा वाटलं तर येईलच मी माहेरी…पण आता मात्र मला आपल्या घरी चालायचं आहे…” अवनी म्हणाली.
” ठीक आहे… तू तयार हो…आपण निघुया थोड्या वेळात…” सासुबाई म्हणाल्या.
आणि अवनी तयारीला लागली. अवनी तिच्या सासरी जाणार आहे हे कळल्यावर अवनीची आई तिच्याजवळ आली आणि म्हणाली.
” काय हे अवनी…तुझ्या सासुबाई तुझ्याशी दोन शब्द प्रेमाने बोलल्या आणि तू लगेच त्यांच्या सोबत जायला होकार दिलास…तिथे जाऊन पुन्हा त्याच वातावरणात राहायचं आहे का तुला…”
” नाही आई…माझ्या सासुबाई तर मला म्हणाल्या की तुला हवे तेवढे दिवस माहेरीच राहा…मीच त्यांना म्हटले की मला सोबत यायचं म्हणून…” अवनी म्हणाली.
” पण तू असे का म्हणालीस…तुला सतत त्यांच्या सुचणे नुसार वागावे लागेल…तुला तुझ्या बाळाला सुद्धा त्या गजबजाटात वाढवायचे आहे का..?” तिची आई म्हणाली.
” नाही आई…तो गजबजाट नाही…ते तर गोकुळ आहे…ते लोक फक्त सुखच नाही तर दुःखही वाटून घेतात…आणि माझ्या घरचे माझ्या काळजीपोटी मला वारंवार सूचना द्यायचे…डॉक्टरांनी सुद्धा तेच सांगितले…लहानपणी पासून जेवढे मिळाले नाही तेवढे प्रेम मिळाले मला तिथे…एकत्र कुटुंबाचे सुख काय असते ते मला तिथे कळले…आणि माझं मुल किती नशीबवान असेल ज्याला इतक्या मोठ्या कुटुंबाचे प्रेम मिळेल…आणि कुटुंबाशिवाय संसाराला गोडी कसली ग…” अवनी म्हणाली.
आणि अवनी आपली बॅग पॅक करायला लागली. आधीपासून आपल्या नवऱ्या सोबत वेगळ्या घरात राहिलेल्या तिच्या आईला अवनीने सांगितलेलं फारसं काही कळलं नव्हतं. पण अवनीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांना तिला रोखायची अजिबात इच्छा झाली नव्हती. आज अवनी ला तिच्या सासरी जाताना पाहून त्यांना मनातून एक वेगळंच समाधान वाटत होतं.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
अशाच नवनवीन कथा वाचण्यासाठी माझ्या मितवा या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका.