आदित्यच्या मनात असलेला कावेरीबद्दलचा तो जुना जिव्हाळा आता एका दृढ निश्चयात बदलला होता. त्याला हे ठाऊक होते की कावेरीच्या आयुष्यातील काळोख दूर करण्यासाठी तिला एका खऱ्या आधाराची गरज आहे. आणि ती साथ देण्याचे सामर्थ्य केवळ त्याच्या प्रेमात आहे. आईशी चर्चा केल्यानंतर, आदित्यने फारसा वेळ न घालवता थेट दोनच दिवसांत देशपांडे वाड्यात पावले टाकली.
दुपारची वेळ होती. देशपांडे वाड्याच्या व्हरांड्यात कावेरीचे वडील खुर्चीवर बसून तांब्या-भांड्यांचा काहीतरी हिशेब पाहत होते. आदित्यला अचानक दारात उभा असलेला पाहून ते थोडे अचंबित झाले. त्यांनी विचारले, “अरे आदित्य… तू इथे? काय काम काढलेस?”
आदित्यने कोणतीही भीती न बाळगता अत्यंत आदराने नमस्कार केला आणि थेट आपल्या येण्याचा उद्देश स्पष्ट शब्दांत मांडला. तो म्हणाला, “काका, मी आज एका महत्त्वाच्या कामासाठी आलोय. मला लपवाछपवी करायची नाहीये. मला कावेरीशी लग्न करायचंय! तिच्या आणि आनंदीच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी मी घ्यायला तयार आहे.”
आदित्यचे ते शब्द ऐकून वडिलांच्या हातातील कागद खाली पडले. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला. काही क्षण त्यांना काय बोलावे सुचले नाही, पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्यातील समाजाची भीती आणि जुनाट विचारसरणीचा अहंकार जागा झाला. ते संतापून जागेवरून उठले आणि मोठ्या आवाजात म्हणाले,
“आदित्य! भान आहे का तुला तू काय बोलतोस ते? कावेरी विधवा आहे! तिला एक मुलगी आहे! आणि तू एका चांगल्या नोकरीवर असलेला तरुण मुलगा, तिच्याशी लग्न करणार? जर आपण गावात असं काहीतरी केलं, तर लोकांना काय वाटेल माहीत आहे का? लोकांना असा संशय येईल की तुमचं आधीपासूनच काहीतरी प्रेमप्रकरण सुरू होतं आणि म्हणूनच हा सगळा घाट घातलाय! आमच्या घराची उरलीसुरली इभ्रतही मातीत मिळवायची आहे का तुला? नाही… हे अजिबात शक्य नाही. आमच्या घरातून या लग्नाला कधीही परवानगी मिळणार नाही!”
वडिलांच्या त्या कठोर आणि तुच्छ शब्दांनी आदित्य सुन्न झाला. त्याला वाटले होते की कदाचित अनुभवाने आणि वयाने शहाणे झालेले वडील कावेरीचे दुःख समजून घेतील. पण नाही! त्यांच्यासाठी आजही पोटच्या लेकीच्या सुखापेक्षा ‘समाज काय म्हणेल’ आणि ‘लोकांच्या दृष्टीने इभ्रत काय असेल’ हेच सर्वात महत्त्वाचे होते.
दुसरीकडे, घराच्या मागच्या खोलीत बसलेल्या कावेरीच्या कानावर जेव्हा आदित्यच्या लग्नाच्या प्रस्तावाची आणि वडिलांच्या रोषाची बातमी पडली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला धक्काच बसला. आदित्यसारखा सुशिक्षित, चांगल्या पगाराचा तरुण आपल्यासारख्या एका विधवा आणि संकटात अडकलेल्या महिलेसाठी असा धाडसी प्रस्ताव घेऊन येईल, याची तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण त्याच वेळी, वडिलांनी ज्या पद्धतीने तो प्रस्ताव झिडकारला होता, त्याने कावेरीचे काळीज चिरले गेले.
पण आदित्यच्या या प्रस्तावाने देशपांडे वाड्यात एका नवीनच वादळाला तोंड फोडले होते.
वडिलांना आणि घरातील इतर मंडळींना आता एका नवीन गोष्टीची भीती वाटू लागली— “जर आदित्यने हा लग्नाचा प्रस्ताव आणलाय आणि हे गावात वाऱ्यासारखे पसरले, तर लोक आपल्यावर आणखी हसतील. यावर काहीतरी तातडीने उपाय केला पाहिजे!”
त्यांच्या त्या संकुचित विचारांनी पुन्हा एकदा कावेरीच्या आयुष्याचा सौदा करण्याचा घाट घातला. घरच्यांनी आपापसात कुसुस करत ठरवले की, आदित्य या गावात किंवा आजूबाजूला फिरत आहे आणि लोक काही बोलण्याआधीच कावेरीचे लग्न दुसऱ्या कुठल्यातरी दूरच्या ठिकाणी उरकून टाकले पाहिजे. त्यांना वाटले की जर कावेरीचे हात दुसऱ्या कुणातरी बेवारस किंवा वयोवृद्ध माणसाच्या हातात सोपवले, तर हा सर्व अध्याय कायमचा संपून जाईल.
आदित्य तिथून अत्यंत अपमानाित होऊन आणि नाराज होऊन निघून गेला, पण जाताना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच जिद्द होती. त्याने ठरवले होते की, कावेरीला या नरकातून आणि तिच्या घरच्यांच्या या जुनाट विचारांच्या बंधनातून बाहेर काढल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही.
इकडे घरात मात्र कावेरीवर नवीन संकटाची पावले वाजू लागली होती. घरच्यांनी तिच्या मताचा जराही विचार न करता तिच्या दुसऱ्या लग्नासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. कावेरीला कोंदणात अडकवण्याचा हा आणखी एक भीषण प्रयत्न होता.
क्रमशः