घराण्याची इभ्रत की आत्मसन्मान? भाग ८

 

आदित्यच्या प्रेमाचा आणि लग्नाचा प्रस्ताव देशपांडे वाड्यात एका वादळासारखा येऊन धडकला होता. जरी घरच्यांनी तो प्रस्ताव तुच्छतेने नाकारला आणि ‘समाज काय म्हणेल’ या भीतीने त्याकडे पाठ फिरवली, तरी कावेरीच्या मनातील एका कोपऱ्यात त्या प्रस्तावाने आशेचे एक लहानसे किरण मात्र नक्कीच निर्माण केले होते. तिला जाणीव झाली होती की जगात अजूनही अशी माणसे आहेत जी तिच्या भूतकाळाचा विचार न करता तिला माणूस म्हणून स्वीकारायला तयार आहेत.

 

पण देशपांडे कुटुंबाला या सगळ्याची काहीही देघेणे नव्हते. त्यांना फक्त आणि फक्त आपल्या प्रतिष्ठेची आणि लोकांच्या तोंडाची काळजी होती. आदित्यच्या प्रस्तावामुळे घाबरलेल्या घरच्यांनी कावेरीच्या दुसऱ्या लग्नाची घाई अधिकच वाढवली. त्यांना वाटले की जितक्या लवकर कावेरीचे लग्न या घरातून लावून देऊ, तितकेच गावात पसरलेले ते बोलणे थांबेल.

 

आणि अवघ्या काही दिवसांतच त्यांनी कावेरीसाठी एक नवीन स्थळ शोधून काढले. ते स्थळ पाहून खुद्द कावेरीच्या अंगावर काटा आला.

मुलगा किंवा तरुण सोडून, ते स्थळ होते जवळपास पन्नास वर्षांच्या एका विधुर माणसाचे! त्याला आधीच दोन मुले होती, आणि विशेष म्हणजे त्याची पहिली पत्नी हयात असतानाची मुलगी जवळपास कावेरीच्याच वयाची होती. एवढ्या मोठ्या वयाच्या आणि आधीच दोन मुलांच्या संसारात असणाऱ्या त्या माणसासोबत कावेरीचे लग्न ठरवून टाकण्यात आले होते.

 

घरच्यांनी आपल्या सोयीसाठी आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी या स्थळाला तत्काळ होकार दिला होता. त्यांचे म्हणणे होते, “अरे, या वयात आणि या परिस्थितीत यापेक्षा चांगले स्थळ तुला मिळणार कुठे? तो माणूस श्रीमंत आहे, तुझा सांभाळ करेल.”

 

या सर्व घडामोडीत कावेरीच्या माहेरी प्रत्येकाचे आपापले स्वार्थ आणि भूमिका होती.

 

सचिनची नवी कोरी बायको, जी घरात आल्यापासून कावेरीला आणि चिमुकल्या आनंदीला एक नकोसा भार मानत होती, ती या लग्नाच्या बातमीने सर्वात जास्त खुश होती. तिला वाटत होते की एकदा का कावेरी या घरातून गेली, की वाड्यातून विधवा नणंद आणि तिची मुलगी कायमची नाहीशी होईल आणि आपले राज्य अविरत चालेल.

 

नयनाताई तर या संपूर्ण प्रकरणावर पूर्णपणे मूग गिळून बसली होती. जिच्या एका चुकीच्या पावलामुळे कावेरीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते, त्या नयनाला आपल्या बहिणीच्या या दुर्दशेवर ना कोणताही पश्चात्ताप होता, ना तिने कधी कावेरीसाठी आई-वडिलांसमोर एक शब्द काढला.

पण या सगळ्या विवाहात आणि सौद्यात सर्वात मोठा आणि भयानक प्रश्न होता— आनंदीचे भवितव्य काय?

 

एके दिवशी रात्रीच्या वेळी, घरातील मंडळी दिवाणखान्यात बसून याच लग्नाची चर्चा करत होती. कावेरी स्वयंपाकघरातून पाणी घेऊन बाहेर येत होती, तितक्यात तिचे लक्ष घरच्यांच्या संभाषणाकडे गेले. आई आणि वडील आपापसात कुजबुजत बोलत होते.

 

“लग्न ठरल्यावर कावेरीला तिकडे पाठवून द्यायचे. पण अडचण त्या लहान आनंदीची आहे. त्या पन्नास वर्षांच्या माणसाला आणि त्याच्या मुलामुलींना ती पोरगी नको आहे. ते स्पष्ट म्हणाले आहेत की सोबत मुलगी आणायला परवानगी नाही.”

 

वडिलांनी हुंदका देत उत्तर दिले, “बरं मग काय हरकत आहे? आनंदीला इथेच आपल्याच वाड्यात ठेवून देऊ. मोठी होईल पोरगी हळूहळू!”

ते शब्द कावेरीच्या कानावर पडले आणि तिच्या हातातील तांब्याची ग्लास जमिनीवर जोरात आपटली. ख्न्न्न्… असा आवाज झाला आणि वाड्याची शांतता दुभंगली.

 

त्या आवाजाने सगळे चमकून वळले. कावेरी सरळ चालत दिवाणखान्यात आली. तिचे डोळे चोहोबाजूंनी संतापाने आणि दुःखाच्या महापुराने लाल झाले होते. तिच्या अंगात एक अनामिक ताकद संचारली होती. तिने थेट आई-वडिलांच्या डोळ्यात डोlळे घालून विचारले,

“तुम्ही लोक काय बोलताय हे?… माझ्या आनंदीला इथेच ठेवून आणि मला त्या म्हाताऱ्याच्या घशात उतरवून देण्याचा विचार तुम्ही कसा केलात? मी माझी पोरगी… माझ्या पोटच्या गोळ्याला सोडून कुठेही जाणार नाही!”

 

वडिलांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत कठोर आवाजात फर्मावले, “कावेरी, वेडीसारखी करू नकोस! परिस्थिती समजून घे. त्या घरात आनंदीला कोण स्वीकारणार? आणि जर तू तिथे राहू लागलीस तर तुझा संसार टिकणार नाही. आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करून हा निर्णय घेतलाय. तुला हा विवाह करावाच लागेल, दुसरा कोणताही पर्याय नाही तुझ्याकडे!”

 

त्या क्षणी कावेरीचा संयम पूर्णपणे सुटला. तिने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या आई-वडिलांसमोर असा ठाम आणि विद्रोही पवित्रा घेतला होता. ती उंच आवाजात ओरडली.

 

“भलं? कसले भलं कसली काळजी तुम्ही माझी करताय बाबा? तुम्ही आजवर कधीच माझा किंवा माझ्या सुखाचा विचार केलाय का? तुम्ही विचार केलाय तो फक्त आणि फक्त तुमच्या इभ्रतीचा, तुमच्या प्रतिष्रेचा आणि लोकांच्या चार चौघांतल्या बोलण्याचा! ताई पळून गेली तेव्हा तुम्ही तिची शिक्षा माझ्या आयुष्याला दिलीत. माझ्या आवडीचे शिक्षण सोडवले, माझ्या मनाच्या विरुद्ध एका दारुड्याच्या गळ्यात मला बांधले, आणि आता मला ओझं समजून पुन्हा एकदा कसलाही विचार न करता एका पन्नास वर्षांच्या माणसाच्या पदरात टाकताय! पण नाही… या वेळी मी गप्प बसणार नाही!”

 

ती पुढे सरकली आणि तिने आनंदीला आपल्या कुशीत घट्ट ओढून धरले. लेकीच्या डोक्यावरून हात फिरवत ती रडत म्हणाली.

 

“ही आनंदी माझी लेक आहे! रणजितच्या जाण्यानंतर माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे ती. तुम्ही तिचा विचार न करता माझा सौदा करायला निघाला आहात ना? तर ऐका… मला हे लग्न मान्य नाही! अजिबात मान्य नाही! मी या लग्नाला स्पष्ट नकार देतेय!”

 

घरातील सर्व मंडळी कावेरीचे असे रूप पाहून हादरून गेली. जी कावेरी आजवर प्रत्येक संकट मूकपणे सहन करत होती, जी कधीही घरच्यांच्या एका शब्दाबाहेर गेली नव्हती, ती आज स्वतःच्या आणि आपल्या लेकीच्या हक्कासाठी थेट बंड पुकारून उभी ठाकली होती.

तिचा तो स्पष्ट नकार आणि बाणेदारपणा पाहून घरचे क्षणभर निःशब्द झाले. पण त्यांच्या मनात कावेरीच्या दुःखाबद्दल कोणतीच संवेदना नव्हती, तर आपल्या निर्णयाविरुद्ध कोणीतरी बोलले याचा राग आणि अस्वस्थता जास्त होती.

 

त्या रात्री कावेरीने ठरवून टाकले की, जर आता ती स्वतःसाठी आणि आपल्या लेकीसाठी उभी राहिली नाही, तर तिचे आणि आनंदीचे आयुष्य कायमचे मातीमोल होईल. आणि याच निर्धाराने तिने दुसऱ्याच दिवशी सकाळी एक असा निर्णय घेतला, ज्याने देशपांडे वाड्यातील भिंती हादरवून सोडणार्या नव्या पर्वाची सुरुवात होणार होती.

 

क्रमशः

पुढील भाग इथे वाचा 👇

घराण्याची इभ्रत की आत्मसन्मान? भाग ९

Leave a Comment