मयंक मात्र तोवर जर्मनीला निघून गेला होता. मधुरा मात्र अजूनही तिच्या सासू सासर्यांकडेच राहत होती. कारण ती ज्या शाळेत शिकवत होती त्या शाळेच्या परीक्षा आता जवळ आलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तिने स्वतःचे दुःख न कुरवाळता मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याचे ठरवले होते. मयंकने वसंतराव आणि नीलिमा ताईंना त्यांची मन शरमेने खाली घालायला लावली होती. तो असे काही वागेल ह्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. शेवटी दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली.
आणि लवकरच दोघांचंही रीतसर घटस्फोट पार पडला. त्यासाठी मयंक ला पुन्हा एकदा भारतात यावे लागले होते. पुन्हा आल्यावर देखील त्याने वसंतराव यांच्याकडे जमीन विकायचा विषय काढला होता मात्र वसंतरावांनी त्याची मागणी धुडकावून लावत यापुढे त्याने त्याच्या आईवडिलांकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये असे ठणकावून सांगितले. त्यानंतर मात्र तो पुन्हा निघून गेला. मुलांच्या परीक्षा आणि घटस्फोटाची प्रक्रिया पुर्ण झाल्यावर मधुरा सुद्धा तिच्या माहेरी निघून गेली. पण अजूनही तिने वसंतराव आणि नीलिमाताईंशी बोलणे सोडले नव्हते.
इकडे मात्र वसंतरावांना सतत वाटायचे की त्यांच्यामुळेच मधुरा सोबत इतके वाईट घडले आहे. त्यांना नेहमीच वाटायचं मधुरा सोबत हे घडायला नको होते. त्यांच्या मुलाचा आणींसूनेचा डिव्होर्स झालाय ही बातमी आता बऱ्याच जणांना कळली देखील होती. लोक जाणूनबुजून त्यांच्याजवळ येऊन उगाच चौकशी करायचे. काही मात्र खरोखर मनापासून त्यांना आधार द्यायचे.
एकदा त्यांचे मित्र केशवराव ज्यांच्या शाळेवर मधुरा नोकरी करायची ते त्यांना भेटायला आले होते. त्यांना बाहेरून मधुरा आणि मयंक च्या डिव्होर्स बद्दल कळले होते. त्यांनी घरी येतच इकडच्या तिकडच्या गप्पा न करता सरळ विषयालाच हात घातला.
” वसंता…मी जे ऐकतोय ते खरंय का…मधुरा आणि मयंक चा खरंच घटस्फोट झाला आहे का..?” केशवराव म्हणाले.
” हो केशवा…खरंय हे…माझ्या मुलाने खूप वाईट केले मधुरा सोबत…मला खूप वाईट वाटतंय रे तिच्याबद्दल…ती आमची सून आली तरी तिने आम्हाला एका मुलीप्रमाणे आपले मानले होते…पण आम्ही काय केले तिच्यासोबत…फसवणूक झाली बघ तिची…” वसंतराव म्हणाले.
” ह्यात तुझी काहीच चूक नाही वसंता…तू उगाच मनावर ओझे नकोस बाळगू…मयंक च्या मनात असे काहीतरी आहे हे तुला थोडेच माहिती होते…तू उगाच स्वतःला अपराधी मानू नकोस…आणि राहिला प्रश्न मधुराच्या आयुष्याचा तर त्यासाठी माझ्याकडे एक प्रस्ताव आहे…” केशवराव म्हणाले.
” प्रस्ताव…कुठला प्रस्ताव…?” वसंतराव चमकून म्हणाले.
” हे बघ…तुला तर माहिती आहे मी माझ्या लहान मुलासाठी निशांत साठी मुलगी शोधतोय…आजवर बऱ्याच मुली पाहिल्या पण अजून काही जुळले नाही…म्हणून विचार करतोय की मधुरालाच माझ्या घरची लहान सून केले तर…?” केशवराव म्हणाले.
” अरे पण तुझ्या मुलाचे हे पहिलेच लग्न आहे…आणि मधुरा घटस्फोटित आहे…ही सोयरिक होऊ शकेल का…उद्या या विषयावरून काही वेगळंच निष्पन्न व्हायला नको…” वसंतराव म्हणाले.
” मधुराला की बऱ्याच दिवसांपासून पाहतोय…अगदी प्रामाणिक, गोड, मेहनती मुलगी आहे…तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रगती पाहूनच मला तिची योग्यता कळली होती…तुला तर माहिती आहे निशांत ला फोटोग्राफी मध्ये त्याचे करीअर करायचे आहे…आणि की एकटा किती दिवस या शिक्षण संस्थेचा डोलारा सांभाळणार…त्यामुळे मधुरा माझ्या निशांतला आणि माझ्या या शिक्षणसंस्थेला सुद्धा सांभाळेल अशी मला तिच्याबद्दल खात्री आहे…
माझ्या मुलानेही तिला एक दोनदा बघितलय…तुझ्याजवळ विषय काढण्यासाठी मी त्यालाही याबद्दल विचारले होते…आणि त्याने लगेच आनंदाने मान्य देखील केले…आणि आजकालची पिढी एवढा विचार नाही करत रे…आणि तिचा घटस्फोट झाला ह्यात तिची काहीच चूक नाही हे माहिती आहे आम्हाला…” केशवराव म्हणाले.
” असे असेल तर ह्याहून आनंदाची गोष्ट दुसरी काय असेल… मी लगेच मधुराच्या वडिलांशी बोलतो आणि तुला कळवतो…” वसंतराव म्हणाले.
आणि बोलल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी ते मधुराच्या माहेरी गेले आणि निशांत शी लग्न करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. यावेळी मात्र मधुराच्या वडिलांनी बरेच आढेवेढे घेतले. मात्र त्यांनी प्रत्यक्षात जेव्हा निशांतबद्दल चौकशी केली तेव्हा मात्र त्यांना कळले की निशांत खरोखरच चांगला मुलगा आहे. मग ते सुद्धा या लग्नाला तयार झाले.
मधुरा ने मात्र इतक्या लवकर दुसऱ्या लग्नाला नकार दिला. पण नंतर बराच विचार करून तिनेही लग्नाला होकार दिला. कारण तिनेही एक दोनदा निशांत ला बघितले होते. एका चांगल्या फोटोग्राफर सोबतच ती एक चांगला माणूस देखील होता हे तिला माहिती होते. आणि आज ना उद्या दुसरे लग्न करावे लागेल हे देखील ठावूक होते. तिने यावेळी प्रॅक्टिकली विचार केला.
आणि लवकरच निशांत आणि मधुराच्या लग्नाचा बार उडाला देखील. सुरुवातीला मधुरा निशांत बद्दल जरा साशंकच होती. पण त्याच्या प्रेमाचा ओलावा तिच्यापर्यंत यायला वेळ लागला नाही. मागचे सर्व काही विसरून दोघांनी नवीन आयुष्या कडे वाटचाल सुरू केली.
दोघांचा सुखी संसार पाहून देशमुख दाम्पत्य सुद्धा सुखावले होते. निशांत आणि मधुरा वेळोवेळी त्यांना भेटायला आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला त्यांच्याकडे जायचे. मधुराला तर त्यांनी आधीच आपली मुलगी मानले होते पण निशांतच्या रूपाने त्यांना जावयाच्या रुपात एक चांगला मुलगा देखील मिळाला होता. आणि आज त्यांच्याच साठी देशमुखांच्या घरी ही पूजा ठेवण्यात आली होती.
इतक्यात भटजींनी पूजा सुरू होत असल्याचे सांगितले आणि त्यासोबतच मधुरा आणि निशांत दोघेही जोडीने पूजेला बसले.
मघाशी मधुराच्या घटस्फोटाची चर्चा करून तिला नावे ठेवणाऱ्या बायका ह्या प्रसंगाने अवाक् झाल्या होत्या. यावर नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हे कुणालाच कळले नव्हते. वसंतराव आणि नीलिमा ताई मात्र त्या दोघांकडेही समाधानाने पाहत होते.
समाप्त.
©®आरती खरबडकर.
फोटो – साभार गूगल
कथा आवडल्यास माझ्या मितवा या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.